‘पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ ही संत तुकारामांची सांगी उभ्या महाराष्ट्राच्या मनीमानसी घर करून आहे, याचा प्रत्यय पिढय़ान्पिढय़ांच्या आषाढी-कार्तिकीच्या वारीत जो लोकसागर पंढरीत उसळतो, त्यावरून येतो. अगदी प्रा. सोनोपंत दांडेकरांसारख्या व्युत्पन्न प्राध्यापकापासून ते ‘विठ्ठल : माझा बॉयफ्रेंड’ म्हणणाऱ्या विदुषी इरावतीबाई कर्वे यांच्यापर्यंत, विठ्ठल आणि पंढरीची वारी हा आंतरिक जिव्हाळ्याचा विषय असतो.
महाराष्ट्रातल्या मातीत राबणाऱ्या श्रमकऱ्यांच्या मनीमानसी पंढरी आणि विठ्ठलाच्या परिवाराने घर केले आहे. शेकडो वर्षे जात्यावर दळण दळताना, या वर्गातल्या स्त्रिया त्यासंबंधीच्या ओव्या रचत, गात आल्या आहेत. अक्षरश: शेकडो ओव्यांनी पंढरी आणि विठ्ठलाचा परिवार जिवंत केला आहे. पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईंचे नव्हे; तर पुंडलिक, चंद्रभागा, गोपाळपुरा, ज्ञानोबापासून चोखोबापर्यंत सर्व संतपरिवार, वाळवंटातला भक्तीचा, भजन-कीर्तनाचा जल्लोष, एक की दोन अनेकानेक घटक या बायांच्या ओवीतून जिवंत होतात.
‘पंढरी आणि विठ्ठल’ यांचे नाते अतूट आहे हे खरे; पण विठ्ठल येथे कधीपासून आहे?
पंढरीचा विठू तिथं आहे कवाच्यानं।
नव्हती पंढरी तवाच्यानं।।
पंढरी नगरीच्या वस्तीच्या आधीपासून विठ्ठलाचे अस्तित्व तिथे आहे, किंबहुना विठ्ठलामुळे पंढरी गाव वसले आहे, असा या लोकमनाचा विश्वास आहे. बायकांच्या ओव्यांतून या भूमीतील लोकसमूहाच्या मनात वसलेल्या विठ्ठल-रखुमाई परिवाराच्या कथा, प्रतिमा परोपरीने वर्णन केल्या आहेत.
आषाढी-कार्तिकीलाच केवळ महाराष्ट्रातल्या लोकमनाला विठ्ठलाची आठवण येते असे नाही. जात्यावर दळण दळताना पंढरी आणि पांडुरंगाच्या परिवाराच्या कथा परोपरीने गाणाऱ्या या स्त्रीमनाला अखंड पंढरीची ओढ असते.
जिवाला वाटतं पंढरीला जावं जावं।
आईबापा भेटू यावं, पुंडलिकाला लुटावं।।
पंढरीहून परतताना तुकारामांसारखा पुरुष भक्तही म्हणतो,
कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।
तैसे झाले माझ्या जीवा। केव्हां भेटसी केशवा।।
मग प्रत्यक्षात वर्षांनुवर्षे सासरचा छळ सहन करीत, काबाडकष्ट उपसणाऱ्या बाईला या माहेराची किती ओढ लागावी? तिच्या लेखी पंढरपुरातच तिचे जिव्हाळ्याचे सगळे गणगोत असते.
विठ्ठल माझा पिता। रुक्मीण माता।
पुंडलिक भाऊ। बहीण चंद्रभागा।
अशा भक्तिमाहेराची ओढ अनेक परींनी व्यक्त होते. दरवर्षी वारीला जायची अनावर ओढ लागते, पण प्रापंचिक अडचणींचे पर्वत इतके मोठे असतात की, पंढरीला जाणे लांबतच जाते.
आषाढीला मी नाही गेले। कार्तिकीला ग जाईन।
देव पंढरीचा इठू। विटें उभा मी पाहीन।।
हे तिचे स्वप्न असते आणि मग पंढरीच्या यात्रेचे स्वप्नरंजन सुरू होते.
सपन पडियेलं, काय सपनाची मात।
माझं इठू-रखुमाई, उशाशी सारी रात।
जीवाला जडभारी। म्या पांडुरंगाला केली तार।
माझं इठू-रखुमाई, उशाशी सारी सात।।
मग त्याच भारावल्या अवस्थेत साऱ्यांचा गोतावळा गोळा करण्याचा प्रयत्न होतो.
पंढरीला जाते, तुम्हीं सयानु येता कोन कोन ।
माझ्या इठूची मला पत्र आल्याती दोन ।।
‘विठू माझा, मी विठूची’ हा खऱ्या भक्ताचा विश्वास घेऊन पंढरीची तयारी सुरू होते. वारीची खरी गंमत पायी जाण्यात.
आषाढी कार्तिकीला चालते बारा वाटा।
माझा इठूदेव पंढरीचा साधू मोठा।।
पंढरीला जाते सोबत नको कुनी।
पुढं इठ्ठल मागे जनीं।।
विठ्ठल सर्वसामान्य श्रमक ऱ्यांचा, कष्टक ऱ्यांचा, अठरापगड जाती-जमातीच्या स्त्रीपुरुषांचा, सर्व भेदाभेदांच्या पलीकडे असलेला, भक्तांवर आपल्या प्रेमाची पाखर घालणारा आणि केवळ त्या प्रेमाच्या आत्मीय आश्वासनातून पुन्हा आपल्या वर्षभरातल्या कष्टांना विनातक्रार सामोरे जायला बळ देणारा देव आहे. नवस-सायासांची लाचलुचपत किंवा बसल्या जागी भक्तांना भौतिक सुखांच्या राशी देण्याचे ‘दैवी चमत्कार’ करणारा देव नाही. वास्तवाच्या भूमीवर पक्के पाय रोवून असलेल्या, इथल्या कष्टक ऱ्याच्या प्रवृत्तीचाच तो देव आहे. त्याच्याकडे आपल्या दैनंदिन प्रपंचासाठी काही मागायचे नसते. गाऱ्हाणी सांगायची नसतात. उलट त्याच्या पायांशी जाताना प्रापंचिक दुखण्यांचे गाठोडे गुंडाळून ठेवायचे असते. भीक मागायची नसते. उलट पिठा-मिठासह आपली शिधासामग्री पाठीवर बाळगीत, जमेल तिथे वाटेत तीन दगडांची चूल मांडून झुणका-भाकरी करीत आपली वारी पूर्ण करतो. कोणी आपणहून दोन घास दिले, तरच त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो.
देवा लई नाही मागणं।
भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी।।
कळणा अथवा कोंडा देई भुकेच्या तोंडी।।
ही खऱ्या वारकरी विठ्ठलभक्ताची अल्पसंतुष्ट वृत्ती असते, कारण त्याचा परमसखा ‘इठुदेवही अल्पसंतुष्ट आहे. भक्ताकडून खऱ्या भक्तीखेरीज त्याला काही नको असते. भक्तालाही ते मनोगत माहीत असते.
माझ्या इठ्ठलाला न्हाई काई बी लागत।
त्येला माळ बुक्क्य़ाची आगईत।।
पंढरीला जाऊ, इठ्ठलास काय नेऊ।
तुळशीची प्रीत वाहू।।
पंढरीला जाया नाही लागत मला रुक्का।
देवा इठ्ठलाला पैशाचा माळबुक्का
आणि म्हणून पंढरीची वारी वर्षांनुवर्षे आपोआप सहज वाहती राहिली आहे. विठ्ठल हा दूरस्थ परमात्मा असूनही, तो जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा अंतरंगसखा म्हणून अधिक जवळचा आहे.
संगत करावी इठूसारख्या सजणाची।
ओटीत माळबुक्का शिडी चढावी चंदनाची।।
अशा शेकडो ओव्यांच्या लडी सहजपणे उलगडताना पाहिल्या, की संतमेळ्यातल्या अग्रणी अशा जनाईंच्याच जातीची उत्कटता असणाऱ्या या अनाम मायबहिणींचे कौतुक करावे तेवढे कमी वाटते!
बहिणाबाई चौधरींनीही अन्य तालेवार श्रीमंत देव (खरे तर त्या देवांचे तालेवार भक्त) आणि पंढरीचा विठू यांच्यामधला फरक फार नेमकेपणाने सांगितला आहे.
सोन्यारुपाने नटला, मारवाडय़ाचा बालाजी।
शेतक ऱ्याचा इठोबा, पानाफुलाईले राजी।।
जसा माणूस तसा त्याचा देव! माणूस आपल्या जीवनदर्शनातून आपला देव मूर्त करतो, हे सांस्कृतिक सत्य येथे जाणवते. अशा विठ्ठलदेवाची गाठभेट घेण्याआधी संतमेळ्याच्या खुणा बोलावीत असतात.
वडाच्या झाडाखाली नामदेवाची पायरी।
चोखामेळा उभा बाहेरी।।
साधूंमध्ये साधू नामदेव खरा।
झाला पायरीचा चिरा।।
देवळाच्या देवळात गरुड खांबाला विसावा।
कधी भेटसी केशवा।।
देवामधी देव देव पुंडलिक आधीचा।
विठुदेवाच्या संगतीनं जागा पाहिला कधीचा।।
विठ्ठलाच्या दर्शनाचीही किती तरी वर्णने सत्य-स्वप्नांच्या सीमांवर घोटाळणाऱ्या या तरल मनाने केलेली ही वर्णने पाहून मन थक्क होते.
दर्शनाला मी गेले मला राऊळी रात झाली।
देवा माझ्या विठ्ठलानं मला गुजाला बैसविली।।
दर्शनाला गेले एक पायरी चुकली।
देवा माझ्या विठ्ठलाच्या चंद्रहाराला दीपली।।
एकादशी हे मात्र विठ्ठलासाठीच खास व्रत! पण या बायकांच्या मनीमानसीचा विठ्ठल हा स्वत:च एकादशीचा उपवास करतो आणि ‘केळीच्या पानावर विठू सोडितो बारस!’ एकादशीचे पारणे द्वादशीला सोडतो त्या एकादशीलाही ओव्यांतून चेतनरूप दिलेले आहे.
एकदशीबाई पंधरा दिवसाची पाहुणी।
विठुराजाची मेहुणी।।
परंपरेमध्ये वाघाटय़ाची (एक डोंगरी फळ) भाजी खाणे हे एकादशीला आवर्जून करावे लागते. म्हणून देवालासुद्धा वाघाटय़ाची भाजी हवी असते.
आषाढी एकादशी, इठू माझ्या त्या नामयाची।
पांडुरंगाच्या पंगतीला, शाक केली वाघाटय़ाची।।
एकादशीबाई तुझा लागला मला छंद।
सावळा विठ्ठल माझा केशरी लावी गंध।।
एकादशीबाई किती निर्मळ तुझा धंदा।
गुणाबाई लागली तुझ्या छंदा।।
सरगीचा देव पापपुण्याच्या घेता राशी।
जल्माला येऊन किती केल्याती एकादशी।।
एकादस केली नाही ग वाया गेली।
म्होरल्या जल्माची सोडवन झाली।
एकादशीबाई तुझं नाव ग मोहिनी।
पांडुरंगाच्या माझ्या एकादशी हरिदिनी।।
शिवाची शिवरात्र विष्णूची एकादशी।
कानडी रखुमाबाई सारी वर्त चालविशी।।
मनातल्या मनात पांडुरंगाचे काळेसावळे रूप आळवीत ही भक्तीण प्रपंचातली कर्तव्ये सांभाळीत राहते.
माझ्या इठूला नका म्हणूसा काळा काळा।
माझा तो सबजाचा ढाळा।
पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा।
सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा।।
किंवा
कस्तुरीचा वास माझ्या अंगाला कोठून।
आले माझ्या इठूला भेटून
माझ्या घरी पाव्हनं आलं पंढरींचं हरी।
चंद्राच्या वाचून उजेड पडला माझ्या दारी।।
अशा अनेक प्रकारांनी मनात घर करून राहिलेला विठ्ठल ओव्यांतून अवतरत राहतो.
पंढरीच्या वारीतून नेमके काय मिळाले? हा प्रश्न खरे तर गैरच! पण या परंपराशील भक्त स्त्रीने काढलेला इत्यर्थही लक्षणीय आहे.
सया पुशिताती, पंढरी जाऊनी काय केलं?।
चंद्रभागेच्या पान्यानं, देहभान उजळील।।
आजवर अनेक तत्त्वज्ञांनी जडजंबाळ भाषेत किंवा कवींनी काव्यात्मक भाषेत माणसाच्या अस्तित्वाचे जे रहस्य सांगितले, ते ही प्रापंचिक बाई किती साध्या सरळ थेट भाषेत सांगते! ‘देह’ हे अखेर एक भांडे, पात्र! त्यात विठ्ठलरूपी चैतन्य नसेल तर त्याची काय किंमत! पण तोपर्यंत हे ‘देहभांडं’ही निर्मळ ठेवायला हवे, पवित्र ठेवायला हवे; त्यासाठी तरी पंढरीला जायला हवे.
एकादशीबाई, तुझा लागला मला छंद।
‘पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ ही संत तुकारामांची सांगी उभ्या महाराष्ट्राच्या मनीमानसी घर करून आहे, याचा प्रत्यय पिढय़ान्पिढय़ांच्या आषाढी-कार्तिकीच्या
आणखी वाचा
First published on: 20-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi and lord vitthal