आरती कदम
‘बायपोलर डिसऑर्डर’ हा एक मानसिक आजार. शरीराला होणाऱ्या अनेक आजारांप्रमाणेच मनालाही काही आजार होतातच. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी लागते तीव्र इच्छा आणि त्यातलं सातत्य. अपर्णा पिरामल राजे यांचं त्यांच्या २० वर्षांच्या ‘बायपोलर’च्या सहवासातील अनुभव सांगणारं पुस्तक ‘केमिकल खिचडी- हाऊ आय हॅक माय मेंटल हेल्थ’ नुकतंच प्रकाशित झालं. या मानसिक आजाराला त्यांनी कसं ‘हॅक’ केलं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली ही बातचीत..

‘‘हो, मला ‘बायपोलर डिसऑर्डर’चा त्रास होता आणि हे सगळय़ांसमोर सांगण्यात मी काही धाडस करतेय, असं मला कधी वाटलंच नाही. ना हे कधी मला लपवावंसं वाटलं, ना कधी माझ्या आजूबाजूच्यांनी ते मला जाणवून दिलं. उलट आपण ज्या मानसिक अवस्थेतून गेलो ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे हे तीव्रतेनं वाटलं म्हणून तर हे पुस्तक लिहिलं,’’ ‘केमिकल खिचडी- हाऊ आय हॅक माय मेंटल हेल्थ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि गेली
२० वर्ष ‘बायपोलर’ अवस्थेचा सामना करणाऱ्या अपर्णा पिरामल-राजे सांगतात तेव्हा याविषयीची त्यांच्या मनातली स्पष्टता आपल्याला लख्खपणे जाणवते.
मानसिक आजार असणं आणि त्याबद्दल लोकांसमोर स्पष्टपणे बोलणं, हे आजही समाजात निषिद्धच मानलं जातं, हे आतापर्यंतच्या असंख्य अनुभवांतून माहीत होतं. ती व्यक्तीच नाही, तर त्या व्यक्तीचे कुटुंबीयसुद्धा त्या व्यक्तीचा मानसिक आजार लपवण्याच्याच प्रयत्नात असतात. त्यामुळे अपर्णाना पहिला प्रश्न हाच विचारला, की हे पुस्तक लिहिणं त्यांच्यासाठी धाडसाचं नव्हतं का? त्याला स्वच्छ शब्दात नकार देत त्या म्हणाल्या, ‘‘कदाचित मी ज्या पिरामल कुटुंबात वाढले, ते सगळेच आधुनिक, सुशिक्षित आणि परिस्थितीची जाण असणारे आहेत, शिवाय मी सतत परदेशांत जात असते. तिथे तर अशा गोष्टी फारच ‘कॉमन’ आहेत. त्यामुळे मला असा आजार लपवायचा असतो हेच माहीत नव्हतं. उलट त्याविषयी बोलल्यामुळेच मी यातून लवकर बाहेर पडले. मी सतत लिहीत होतेच. ते फक्त लोकांसमोर आणलं इतकंच. पण हो, धाडस म्हणशील तर ते होतं. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी दोन प्रकारच्या धाडसांचा सामना मला करावाच लागला. आपल्याला ‘बायपोलर’ वा ‘मॅनिक डिप्रेशन’ हा मानसिक आजार आहे हेच मुळात सुरुवातीच्या काळात मला कळलं नव्हतं. दोन टोकाच्या भावनांचा खेळ सुरु असायचा मनात. प्रचंड मूड बदलायचे माझे. कधी प्रचंड उत्साह, आनंद, अंगात ऊर्जा सळसळत असायची. काय करावं आणि काय नाही असं व्हायचं. तर कधी टोकाची निराशा, उदासी आयुष्य वेढून टाकायची. पण तो आजार असेल असं वाटलं नव्हतं. जेव्हा हे होण्याचं प्रमाण वाढायला लागलं तेव्हा मात्र डॉक्टरांकडे जाण्याशिवाय आणि आपल्याला ‘बायपोलर डिसऑर्डर’ आहे म्हणजे काय, हे जाणून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हा फक्त आजार आहे. मुख्य म्हणजे तो काही जीवघेणा नाही नि तो फक्त मधून मधूनच तुम्हाला त्रास देतो, हे मी शांतचित्तानं काही काळ स्वत:ला समजावत राहिले, डॉक्टरांचं म्हणणं मनात उतरवत गेले.. हे स्वत:ला पटवणं म्हणजे धाडसच होतं. ‘करेज ऑफ रेझीलियन्स’. मला कुठल्याही प्रकारे या आजाराला माझ्यावर वर्चस्व गाजवू द्यायचं नव्हतं. मी स्वत:ला समजावून सांगितलं, की हा आजार माझ्या मनाला झाला आहे, मला नाही. मी बायपोलर नाही, तर मला बायपोलर आजार आहे. त्यामुळे मी पराभव पत्करणार नाही. उलट मला हवं तसं आयुष्य जगणार आहे. ज्या क्षणी माझ्या मनाला ते पूर्णत: पटलं त्या क्षणी माझ्या मनातला संघर्ष संपला होता.’’

woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

‘‘आणखी एक धाडस म्हणशील तर ते होतं, ‘करेज ऑफ डीटॅचमेंट’. कारण जेव्हा मी हे पुस्तक लिहायचं नक्की केलं तेव्हा मला प्रत्येक गोष्ट पुन्हा अनुभवावी लागणार होती. मला आलेला प्रत्येक अटॅक, त्या वेळची माझी मन:स्थिती, माझ्या डॉक्टर-मेन्टॉरशी माझं झालेलं बोलणं, आई-बहीण-नवरा यांचं प्रत्येक परिस्थितीत मला सांभाळणं, ‘हॉर्वड बिझनेस स्कूल’मधला माझा अभ्यास, तिथला एकटेपणा, योगाभ्यास, माझं लग्न, मुलं, सारं पुन्हा पुन्हा अनुभवताना मला रडू फुटणारच नव्हतं, आवंढा गिळावा लागणारच नव्हता असं शक्यच नव्हतं. त्या अवस्थेतील लिखाण कुणाच्याच उपयोगाचं नव्हतं. म्हणून मला त्या सर्व अनुभवांकडे तटस्थपणे बघायला लागणार होतं. स्वत:ला त्या साऱ्या अनुभवांपासून दूर करून वेगळी अपर्णा होऊन लिहायला लागणार होतं. ते थोडं धाडसाचं होतं, पण मी ते शक्य केलं. आता पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे ते बघता अशा प्रकारच्या पुस्तकांची किती गरज आहे ते लक्षात येतंय. सध्या प्रत्येकाला मानसिक ताण आहेच. प्रमाण कमीअधिक असेल, पण प्रत्येक जण त्यातून जातोय. अगदी लहान मुलंसुद्धा. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय होणंही गरजेचं आहे. तेच या पुस्तकात आलं आहे.’’

‘केमिकल खिचडी..’ हे पुस्तक वाचताना हे स्पष्टपणे जाणवतंच. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, एनआयएसएचएनएस (National Institute of Mental Health and Neruo Sciences)नुसार २० पैकी एका भारतीय माणसाला नैराश्य आहे. याशिवाय एका सर्वेक्षणानुसार ०.६ टक्के भारतीय लोक ‘बायपोलर’नं आजारी आहेत. असं असेल तर त्यावर मोठय़ा प्रमाणात संशोधन आणि उपाय व्हायला हवेत. ही मानसिक अवस्था होण्याची नेमकी कारणं जरी सांगता येत नसली तरी ती काही गोष्टींच्या एकत्रित संयोगातून मेंदूत तयार होणारी रासायनिक प्रक्रिया वा ‘केमिकल खिचडी’ असते. ती अपर्णा यांनी या पुस्तकात नेमकेपणानं उलगडून दाखवली आहे. या पुस्तकात त्या लिहितात, ‘‘ जेव्हा अशांतता वाढायला सुरुवात व्हायची तेव्हा माझ्या मनात प्रचंड खळबळ माजायची. मन म्हणजे सुरुंगांची भूमी व्हायची. झोप विस्कटून जायची. सलग ५ रात्र झोप न लागण्याचा अनुभव मी घेतलाय, पण तरीही उत्साह असायचा. बोलण्याचा, वागण्याचा वेग प्रचंड वाढायचा. वेगानं गाडी चालवणं, अति खर्च करणं हाही त्याचाच भाग. मन इतकं ताजं असायचं, की सतत काही तर करत राहायचा उत्साह संचारत राहायचा. कल्पनाशक्ती अगदी धावायची, अशा वेळी कागद आणि पेन जवळचे वाटायचे. मी मनात जे जे यायचं ते उतरवून काढायचे. पण कधी त्याउलट घराबाहेरचा समुद्र मनात उसळून यायचा, समोरच्या उद्यानातली हालचाल, लगबग मनात उमटायची, पण मन मात्र रितं असायचं.. काहीच नाही जगण्यासारखं, असं वाटत राहायचं.’’

अशा मन:स्थितीत अपर्णा यांनी एक गोष्ट आवर्जून केली ती म्हणजे कुणाला तरी फोन करायचा किंवा इमेल करायचा. जे आहे ते बोलून-लिहून मोकळं व्हायचं. कविता लिहिणं हा त्याचाच भाग. त्यांनी एक किस्सा सांगितला, म्हणाल्या, ‘‘आधीचं कशाला.. परवाच मी कुठल्याशा कारणानं अस्वस्थ झाले. इतकी, की रडू आवरेचना. थोडं सावरत मी सरळ माझ्या मैत्रिणीला व्हिडीओ कॉल लावला आणि सांगितलं, ‘ही बघ माझी अशी हालत झाली आहे. बोल माझ्याशी.’ त्या मैत्रिणीनं मस्त गप्पा मारल्या अन् थोडय़ा वेळात मी शांत झाले.’’

हेच खरं तर अपर्णा यांचं कौतुक आहे. कारण पुस्तकातही त्यांनी अनेक मेन्टॉर आणि मैत्रिणींचे उल्लेख केले आहेत. त्याबद्दल त्यांना विचारलं, ‘‘जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटलं तेव्हा तेव्हा तुम्ही कुणाला ना कुणाला फोन केलेत. ते भान तुम्हाला त्याही अवस्थेत कसं होतं आणि कुणाला फोन करायचा हे कसं ठरवायचात?’’

‘‘खरं सांगू का, आपली माणसं आपली असतात. त्यांच्यापर्यंत फक्त पोहोचायचं असतं. त्यांना कसं कळणार, की आपल्या मनात काय चाललंय? तुला खोटं वाटेल, पण माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत, हे ना बहीण राधिकाला त्या वेळी कळलं, ना माझा नवरा अमितला. कारण जोपर्यंत माझ्या मनात काय चाललंय हे मी सांगितल्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार होतं? पण त्याच बरोबरीनं हेही सांगते, तुमच्या अशा मानसिक अवस्थेत तुमच्या घरचेच तुम्हाला खरी साथ देतात. माझ्या मनात होणारे छोटे छोटे बदल माझी बहीण पटकन पकडायची आणि मला सावध करायची. आणि नंतरच्या काळात औषधांचा भर कमी करायचा निर्णय अमितमुळेच शक्य झाला. पण हेही तितकंच खरं, की सगळेच जण समजून घेणारे असतील असं नाही. माझी एक अत्यंत जवळची मैत्रीण आहे. इतर वेळी माझं तिचं खूप घट्ट नातं आहे, पण ती माझं डिप्रेशन सांभाळूच शकत नाही. अशा वेळी मी तिला फोन करत नाही. ते भान तुम्हाला ठेवावंच लागतं, कोणाशी बोललं तर बरं वाटेल हे कळत जातंच.’’ अपर्णा सांगत होत्या. ‘‘गंमत वाटेल, पण एका नामवंत व्यक्तीनं या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की अपर्णाला यातून सहज बाहेर पडता आलं कारण ती ‘पिरामल’ आहे. लंडनमध्ये शिक्षण, श्रीमंत कुटुंब.. कशाचीच कमतरता नाही. मी मनात म्हटलं, ‘बाबा रे, माझ्यासारखे अनेक श्रीमंत आणि परदेशांतच राहाणारेही अनेक जण ‘बायपोलर’ आहेत, पण ते बाहेर पडले आहेत का? नाही. कारण यातून बाहेर पडायला तेवढंच पुरेसं नसतं. त्यासाठी तुम्ही माझ्यासारखे मुळातच सकारात्मक, आयुष्यावर प्रेम करणारे, आणि बरं होण्यासाठी मेहनत घेणारे असावे लागता. त्यासाठी आपली माणसं जोडणं असो की वेळोवेळी ‘सेल्फ टॉक’ करणं असो ते नियमित करावं लागतंच त्याशिवाय, स्वत:ची ओळख तयार करणं हेही करावं लागतं जे मी सातत्याने करत आले. हा प्रवास सोपा नव्हताच आणि अजूनही नाहीच.’’

हे मात्र अगदी नक्की, की या पुस्तकातून उलगडलेला अपर्णा यांचा हा प्रवास सोपा नाहीच. मुळात त्यांचा संवेदनशील स्वभाव, त्यातच आई-वडिलांचा घटस्फोट, ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये प्रवेश घेतला असला तरी तिथे फारसं न रमणं, एकटं पडणं, या साऱ्याचा एकत्रित परिणाम मनावर होत होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या फर्निचर बिझनेसमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यात यश मिळायला लागलंही, पण जागतिक मंदी आली, बिझनेसमध्ये घाटा होत होता, जुनी माणसं सोडून गेली, दरम्यान लग्न झालं होतं आणि मुलंही खूप लहान होती, त्याच वेळी त्यांच्यातल्या ‘बायपोलर’नं उचल खाल्ली आणि त्याचा नकारात्मक परिणाम कामावर व्हायला आणि एके दिवशी त्यांना ‘सीईओ’ पदाचा राजीनामा द्यायला सांगितला गेला. ही घटना त्यांना फारच लागली आणि त्या अधिकच निराश झाल्या. पण त्या थांबल्या नाहीत. आपली मूळ आवड- लेखन त्यांनी पुन्हा सुरु केलं, आता नियमित व्यावसायिक स्वरूपाचं. पत्रकारितेत पाऊल टाकलं. बिझनेस, अर्थ विषयक त्यांचे लेख, स्तंभलेखन इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागलं. इतकंच नाही, तर त्यांनी विद्यार्थ्यांना बिझनेस आणि डिझायिनग शिकवायला सुरुवात केली. काही ठिकाणी तर ‘प्रेरणादायी भाषणे’ही द्यायला सुरुवात केली.. आणि त्यांना त्यांच्यातलीच नवीन अपर्णा सापडली. हा सारा प्रवास या पुस्तकात येतो. जो करण्यासाठी त्यांना स्वत:ला प्रचंड ताकद एकवटावी लागली. त्यासाठी पुस्तकं वाचणं, समुपदेशन, औषधोपचार, योग आणि आध्यात्मिक वाचन (धार्मिक नव्हे) याची साथ त्यांनी सोडली नाही. जेव्हा जेव्हा त्या नॉर्मल असायच्या तेव्हा तेव्हा कुटुंबाबरोबर धमाल करणं, सण-समारंभ, कुटुंब, मुलांची शाळा, अभ्यास हेही चालू होतंच.

मानसिक आजारातून बाहेर पडायचं असेल तर सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्या मानसिक त्रासाची कल्पना येणं जास्त गरजेचं असतं. पण आपल्याकडे मानसिक आजार वा मानसिक रुग्ण याविषयी इतकी गुप्तता बाळगली जाते, की अनेकदा आजार बरा होण्याच्या पलीकडे गेल्यावरच डॉक्टरकडे नेलं जातं. काहींना तर रुग्णालयात तरी टाकून दिलं जातं किंवा सरळ घराबाहेर काढलं जातं. ही शोकांतिका आहे विशेषत: आपल्याकडच्या बायकांची. अपर्णाना याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘‘ हो आहे खरं, पण मला वाटतं, त्यावर बोलणं हाच एक पर्याय आहे. निराश वाटायला लागणं काय किंवा मानसिक आजार सुरुवातीला तीव्र नसतोच. मधून मधून ती भावना दाटून येत असते. अशा वेळी व्यक्त होणं हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी नाती सांभाळण्याचं महत्त्वाचं काम करायला हवं. मी ती गोष्ट जाणीवपूर्वक केली. मला खूप मैत्रिणी आहेत. जवळची माणसंही बरीच आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांच्या मदतीला धावून जाते. अलीकडेच एका मैत्रिणीला फोन केला तर कुठल्याशा कारणाने ती खूपच हळवी झाली होती. मी सरळ तिच्याकडे पोचले. तिच्या आवडत्या टॉम क्रुझच्या सिनेमाला घेऊन गेले. बरीच खादाडी केली. ती रिलॅक्स झाली. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांची मन:स्थिती कळली तर त्यांना निराशेतून बाहेर काढणं सहज शक्य होतं. फक्त ती नजर आणि ती संवेदना हवी. प्रत्येकानं ती वाढवायला हवी. माणसांना माणसं हवीच असतात. आपण ती सांभाळायची असतात.’’ त्या बाबतीत अपर्णा खूपच नशीबवान म्हणाव्या लागतील. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, त्यांचं एकूणच पिरामल कुटुंब घट्ट आहे. काकांचं कुटुंब असो वा मामांचं, सगळे एकमेकांशी जोडून आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आई, गीता पिरामल आणि बहीण राधिका पिरामल या त्यांच्या आयुष्यातल्या अविभाज्य घटक म्हणता येतील इतक्या जवळच्या आहेत. त्या दोघांनीही सुरुवातीच्या काळात त्यांना खूपच सांभाळलं. अपर्णा यांना येणारे मॅनिक वा हायपोमॅनिक अटॅक यात थोडा फरक आहे. आपण आनंदी, उत्साही असलो की तो व्यक्त करतोच, पण तो आणि हायपोमॅनिकमधली धूसर रेषा राधिका सहज पकडू शकते. अशी साथ मिळणं हे खूपच मोलाचं. आज राधिका लंडनला असल्या तरी त्या दोघी जिवाभावाच्या सख्या आहेत. अपर्णाच्या आयुष्यात अमित राजे यांचा प्रवेश हासुद्धा त्यांच्यासाठी शांतावणाराच होता. ‘लंडन बिझनेस स्कूल’मधून पदवी घेणारा हा उमदा तरुण त्यांना जोडीदार म्हणून आवडला कारण तो आपल्याला एक स्थिर कुटुंब देऊ शकेल याची त्यांना खात्री होती. जरी त्या दोघांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत प्रचंड अंतर असलं तरीही त्यांनी त्यांच्याशीच लग्न केलं.
‘‘मानसिक ताण कुणालाच नवीन नाहीत, पण ग्रामीण क्षेत्रातल्या, तेही स्त्रियांना असणाऱ्या तणावाचं काय,’’ या प्रश्नावर अपर्णा यांचं म्हणणं असतं, ‘‘पुन्हा तेच सांगेन, बोलणं हाच सर्वात चांगला उपाय. घरातल्या कुणाशी बोलता येत नसेल तर गावात मैत्रिणी तर असतातच. आपल्या वेदना, दु:ख व्यक्त करणं आणि परिस्थतीवर, मनावर ताबा मिळवणं आपल्याच हातात असतं. पण त्याहीपेक्षा प्रत्येक स्त्रीनं आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. अनेक प्रश्न, ताण हे आर्थिक परिस्थितीशी जास्त जोडलेले असतात. बाई आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाली, की तिला आत्मविश्वास येतो आणि आपल्या ताणांवर मात करणं आणि समजा काही अप्रिय प्रकार घडलाच तर औषधोपचार करण्यासाठी तिच्याकडे तिचा असा पैसा असतो, त्यामुळे मला तरी हा एक महत्त्वाचा मार्ग वाटतो. छोटय़ामोठय़ा पातळीवर उद्योग-व्यवसाय-नोकरी करत का होईना बाईनं पैसे कमावणं, साठवणं गरजेचं आहे आणि हा प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचा मंत्र आहे.’’

आज अपर्णा यांनी त्यांच्या ‘बायपोलर डिसऑर्डर’वर बऱ्यापैकी मात केली असली तरी मधून मधून निराशा दाटून येतेच. त्याला त्या ‘गुड टाइम’ आणि ‘बॅड टाइम’ म्हणतात. त्या गुड वेळेत छान जगायचं. बॅड वेळ आली की जगण्याचा वेग थोडा मंद करायचा, आयुष्यावर प्रेम करायचं, हा त्यांचा सध्याचा फंडा आहे.

२७४ पानांच्या या पुस्तकात बरेच असे ‘नुस्खे’ सापडतात. शिवाय पुस्तकाच्या शेवटी मानसिक रोगावर उपचार करणाऱ्या संस्थांचे संपर्क क्रमांक, पत्ते दिले असल्यानं त्याचा अनेकांना नक्की उपयोग होऊ शकेल. ‘पेन्ग्विन रॅन्डम हाऊस इंडिया’ यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्रसिद्ध उद्योजक आनंद मिहद्र यांची प्रस्तावना लाभली आहे.

पुस्तकात एका ठिकाणी अपर्णा म्हणतात तसं, ‘‘माझ्यासाठी मॅनिया म्हणजे वादळ होतं. एक भ्रम. दिशाभूल झालेली ऊर्जा. चांगल्या- वाईट कल्पनाशक्तींचा अखंड खेळ आणि शारीरिक गुंतागुंतही.’’ यातून बाहेर पडण्यासाठी अपर्णा यांना खूप मेहनत घ्यावी लागली.. ते दु:स्वप्न आता संपतं आहे.. काळय़ाकभिन्न बोगद्याच्या शेवटी हळूहळू येत गेलेली प्रकाशाची तिरीप पुढच्या मोकळय़ा, स्वच्छ आकाशाचा सांगावा देत त्यांचं आणि त्यांच्या जीवलगांचं आयुष्य उजळून टाकते आहे..

‘बायपोलर डिसऑर्डर’ म्हणजे काय?
‘बायपोलर डिसऑर्डर’ यालाच ‘मॅनिक डिप्रेशन’असेही म्हटले जाते. हा मानसिक आजार असून त्यात माणसाच्या ‘मूड’ मध्ये टोकाचे बदल होत असतात. माणूस भावनिकदृष्टय़ा कधी एकदम टोकाचा उत्साही होतो, तर कधी त्याला एकदम नैराश्य येतं. उत्साही अवस्थेत अंगी प्रचंड ऊर्जा खेळू लागल्यासारखा बदल त्याच्या वागण्यात जाणवतो, झोपावंसं वाटत नाही, कधी आजूबाजूबाजूच्या जगाचं भानही राहात नाही. नैराश्याच्या अवस्थेत ऊर्जा, उत्साह एकदम घटतो, दैनंदिन गोष्टींत रस उरत नाही. भावनांच्या अशा लाटा काही दिवस, काही महिनेही टिकू शकतात. या आजाराचं नेमकं कारण ज्ञात नसलं, तरी समुपदेशन व औषधांनी रुग्णाला बरं वाटतं.

arati.kadam@expressindia.com