वंदना बोकील-कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायकोला आलेलं पत्र परस्पर फोडून वाचणारा, ‘तुझी कला तुझ्या आनंदासाठी असावी’ असं मानभावीपणे म्हणत बायकोनं त्यात ‘करिअर’ करण्याचा विचार सोडून द्यावा, असं सुचवणारा, सहवासासंबंधीच्या बायकोच्या अपेक्षा खिजगणतीत न ठेवता आपल्या सोयीप्रमाणे प्रेम करणारा नवरा आणि ‘संसार हेच सर्वस्व’ ही खूणगाठ बांधून वाटचाल करत राहणारी, कधी नवऱ्याबरोबर फरफटत जाणारी बायको, हे जोडपं केवळ महेश मांजरेकर यांच्या ‘अस्तित्व’ या चित्रपटातलंच नव्हे. अशा बायकोनं विवाहबाह्य संबंधांत अडकणं, हा केवढा प्रमाद! मग तो कोणत्या परिस्थितीत घडला, याला काही महत्त्व उरत नाही. या घोर अपराधाबद्दल नवऱ्याकडून शिक्षा सुनावल्या गेलेल्या ‘अदिती’ची बाजू समजून घेण्यासाठी हा चित्रपट वेगळय़ा दृष्टीनं पाहावा लागेल.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या चित्रपटाची नायिका अदिती (अभिनेत्री तब्बू). महत्त्वाकांक्षी आणि पुरुषप्रधानतेचा पाईक असलेल्या श्रीकांत पंडितची (सचिन खेडेकर) ही बायको. एकटेपणा, ‘श्री’च्या सहवासाचा अभाव, यांमुळे गाता गळा असलेल्या अदितीचा, संगीतशिक्षक मल्हार कामतशी (मोहनीश बहल) संबंध येतो आणि अनिकेतचा (सुनील बर्वे) जन्म होतो. अनिकेतचं जन्मरहस्य कळल्यावर श्री नवरेपणाच्या हक्कानं तिला शिक्षा सुनावतो. पण आता अदिती एकटी नाही. अनिकेतची होणारी बायको, रेवती (नम्रता शिरोडकर) तिच्यासोबत आहे. या नायिकेला उद्देशून लिहिलेलं हे पत्र..

आणखी वाचा-पाहायलाच हवेत : कहाणी जीवनव्यापी मनोभंगाची

अदितीस-
तू अगदी बेचैन केलं आहेस. काही प्रश्न तुला विचारायला भाग पाडलं आहेस. तुझ्या वागण्याचं समर्थन करायला लावलं आहेस. एकप्रकारे तुझ्या वेदनेचं नातं स्त्रीच्या अस्तित्वाशीच जोडलं आहे अदिती, म्हणून हे पुढचं सारं..

स्वत:चा हातरुमाल, मोजे आणि टायसाठी बायकोला हाका मारणारा, तथाकथित करिअरिस्ट, आत्ममग्न, आत्मकेंद्रित आणि रुढीप्रिय पुरुष म्हणून तुझा नवरा श्रीकांत पंडित समोर येतो. आणि त्याच्या या सगळय़ा मागण्या बिनबोभाट भागवणारी, त्याच्या सेवेसी तत्पर अशी त्याची बायको म्हणून तू. श्रीचा मित्र रवी बापट आणि त्याची बायको मेघना आल्यावरचा प्रसंग आठव. तुझ्या नावे आलेलं रजिस्टर्ड पत्र श्री उघडतो. मेघना त्याला हटकते; पण तू? ‘आता काय करायचं या नवऱ्याचं’ असा एक कौतुकमिश्रित हताश भाव तुझ्या चेहऱ्यावर आणि पूर्वी असं अनेकदा घडून गेल्याचं सूचित करणारा सहज स्वीकार. तू ते घडू दिलं आहेस अदिती. आपल्या हक्कांची इतकीही जाण तुला नसावी? की तू सोडून दिलीस ती? मेघनाला ते जाणवलं आहे. ती तुला ‘स्वत:चं काहीतरी कर’ असं सुचवते, तेव्हा तू ‘घरातच किती असतं करण्यासारखं!’ असं म्हणून विचार करायचंदेखील टाळतेस.

सुरुवातीला, तुमच्या लग्नानंतरच्या नवलाईच्या दिवसांत श्री सतत कामात, प्रवासात आहे. तू एकटेपणाला कंटाळली आहेस. श्री तुला अजिबात वेळ देत नाही, म्हणून चिडचिडली आहेस. बाळासाठी आसुसली आहेस. श्रीला मात्र त्याच्या मनासारखं घर, गाडी इत्यादी झाल्याखेरीज मूल नकोय. तू त्रागा करतेस, रागवतेस. तो राग श्रीपाशी व्यक्तही करतेस. पण नंतर तू बंद करून घेतेस स्वत:ला. आत आत एकटी होत जातेस. तुझा शुष्कपणा थेट पोहोचतो आमच्यापर्यंत. मग श्रीच्या परवानगीनं गाणं शिकायला सुरुवात करतेस. मल्हार कामत तुला गाणं शिकवायला घरी येत राहतो. त्याचा सहवास, सुरांची साथ, यातून तुझी गाभ्यातली पोकळी काहीशी भरून निघते. आणि एका उत्कट क्षणी तुमचे संबंध येतात. अनिकेतचा जन्म होतो. श्री, बाप झालो, तोही एका मुलग्याचा- म्हणून यशस्वी मानतो स्वत:ला. अगदी कृतकृत्यच!

अनिकेतकडे कोण बघणार, म्हणून तू गाणं बंद करतेस. आणि त्याचबरोबर तुझा आनंद, तुझी वेदना, भावना, इच्छा सारंच घडी घालून ठेवून देतेस. का? का मिटल्या मनानं संसार रेटतेस? का नाही अटीतटीनं त्याच्याशी भांडत? का सगळं निमूटपणे सहन करत राहतेस? मौनाची दीर्घ वाट पंचवीस वर्ष का चालत राहतेस?

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: वहिवाटेच्या पलीकडचा प्रवास

अनिकेतचं जन्मरहस्य श्री तुला रवी बापट, मेघना, अनिकेत यांच्यासमोर सांगायला भाग पाडतो. अनिकेत मल्हार कामतचा मुलगा आहे, हे समजल्यावर श्री तुझ्या श्रीमुखात भडकावतो. अनिकेतही त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून तुला तिरस्करणीय ठरवतो. घराबाहेर नव्हे, तर अत्यंत क्रूरपणे घरातच गुदमरत जगण्याची शिक्षा श्री तुला सुनावतो. अदिती, हा शिक्षा करण्याचा अधिकार कुणी दिला त्याला? का नाही हा प्रश्न तुला पडला? तेव्हाही ‘खरं प्रेम मी फक्त श्रीवर केलं’, असं तू म्हणतेस. असेलही. पण श्रीकडून मात्र या प्रेमाचं कुठे पुसटही दर्शन पूर्ण चित्रपटात घडत नाही. तुमच्या दोघांच्या नात्यात त्याच्याकडून ना आपुलकी, ना जिव्हाळा, ना सौहार्द, ना सन्मान, ना सामंजस्य, ना आतली, खोल गुंतवणूक. कोणतं प्रेम अदिती? शरीराची झोळी नाईलाजानं त्याच्यापुढे पसरावी लागण्याचा उल्लेख तू करतेस.. आणि प्रेम आहे म्हणतेस? आपली थोर भारतीय रीती तुला तसं करायला, म्हणायला भाग पाडतेय, की ‘तरीदेखील मी मनानं तुझीच आहे’ हे सिद्ध करण्याचा तो आटापिटा आहे?

श्रीला सगळं खरं खरं सांगून टाकल्यावर तू मेघनाला म्हणतेस, ‘‘आता मला खूप मोकळं वाटतंय. नवा जन्म झाल्यासारखं..’’ अदिती, पंचवीस वर्ष हे सत्य लपवून ठेवल्याचं ओझं तू मनात बाळगलंस. सत्याला सामोरं जाण्याचं धाडस तू दाखवू शकली नाहीस, त्याची किंमत तू पंचवीस वर्ष चुकवत राहिलीस. आपल्या आसपासच्या जवळजवळ सर्वच स्त्रिया, अशी नाही तर तशी किंमत चुकवत राहिल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या सत्याला डोळा भिडवण्याची हिंमत नसल्यानं आयुष्याचं मोल देत राहिल्या आहेत. त्याची कारणं अर्थातच इथल्या सामाजिकतेत आहेत.

अदिती, खूप मोठा गुन्हा केल्याचं दडपण घेऊन तू जगलीस. अनिकेतचा बाप मल्हार कामत, हे सांगून टाकल्यानंतरच होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची ताकद तुझ्यात आली. अदिती, सत्यात खरंच मोठं बळ असतं ग! म्हणून तुला नवा जन्म झाल्यासारखं वाटतंय. खरं म्हणजे पूर्वीच तुला सगळं काही खरं ते श्रीला सांगून टाकावं असं वाटलंय. अगदी तुला दिवस राहिले आहेत, हे तू त्याला रडत सांगतेस तेव्हाही! पण श्री सदैव आपल्याच धुंदीत, त्याला तुझ्या अश्रूंचा अर्थ, संदर्भ काहीच उमगत नाही. बाप होणार म्हणून त्याला अत्यानंद होतो आणि त्याचा आनंद नासू नये म्हणून तू गप्प बसतेस. म्हणतेस, ‘मी प्रेग्नंट आहे, या बातमीनं श्री इतका हरखून गेला होता की त्याला हे सहनच झालं नसतं.’ अदिती, तेव्हाही तू त्याचाच विचार करतेस. हे सारे बारकावे समजून घेण्याची श्रीची पात्रता तरी आहे का, याचा का नाही एकदा तरी विचार करत तू? समजून घेणं- समजावून देणं या प्रकारचा संवेदनशील माणूस नव्हेच गं तो! आणि तू.. त्याच्या बरोब्बर उलट. सूर-ताल जुळत नसताना गाऊ कशी, असा प्रश्न तुला पडलाय! एकटेपण आलं ते केवळ नवऱ्याचा सहवास नाही म्हणून नव्हे. सूर-ताल जुळत नाहीत श्रीशी, याची खोलवरची खंत आहे ती. पण अशा बेसुऱ्या संसारातून बाहेर पडण्याची परंपरा नाही, तसं धाडस नाही, म्हणून तू एकतर्फी जुळवून घेत राहिली आहेस. पण साज जुळलेच नाहीत, तर गीत कसं उमलणार बाई? इतर अनेकजणींसारखं गळय़ातलं गाणं गळय़ात मरून गेलं तुझं!

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: आत्मसन्मानासाठीचा विजिगीषू प्रवास!

‘तुझं गाणं फक्त आनंदासाठी असावं’, असा औदार्याचा मोठा अविर्भाव श्री आणतो. त्यामागचा खरा अर्थ उमगतो का तुला? करिअर म्हणून तू त्याकडे बघूच नकोस! व्यावसायिक गायिका होण्याचं तर मनातही आणू नकोस, हे तो सुचवतोय. मल्हार कामतशी तो हे बोलत असतानाचा तुझा चेहरा अनेकींचा चेहरा आहे. आपल्याच आई, बहिणी, आत्या, काकू, मावश्या यांचा! कुटुंबसंस्था टिकवण्यात अशा कितीतरी चेहऱ्यांवर खंत कायमची वस्तीला आलीय, ती त्यामुळेच.

एकमेकांबरोबरच्या नात्यात पारदर्शीपणा असावा, प्रामाणिकपणा असावा, हे समजू शकतं. पण तीही फक्त बाईची जबाबदारी कशी? रवी बापटकडून बोलण्याच्या ओघात जेव्हा तुला श्रीच्या काही अफेअर्सबद्दल समजतं. तेव्हा तरी का नाही तू विचारत स्वत:ला, की प्रामाणिक असणं ही अट फक्त तुलाच लागू कशी? पण तेही किती गृहीत धरलं आहे आपण! थोडय़ा वेळच्या भेटीत मेघना श्रीला ओळखू शकते. ही ओळखण्याची शक्तीच नवरा-बायकोच्या नात्यात बाया गमावतात की काय? की ओळखूनही गप्प राहणं, हीच त्या नात्याची अट आहे?

मल्हार कामत मृत्यूपूर्वी त्याची सगळी मालमत्ता तुझ्या नावे करतो आणि तसं पत्र तुला पाठवण्याची व्यवस्था करतो. त्या पत्रामुळे तर श्रीला समजतं की अनिकेत त्याचा मुलगा नाही. श्रीला रोज डायरी लिहायची सवय आहे. मल्हार कामतचं पत्र आल्यावर तो मागच्या सर्व डायऱ्या काढून, तर्क लढवत, दिवस-महिन्यांचे हिशेब लावत तुझ्या गर्भारपणाच्या दिवसाची संगती लावतो. तुला जाब विचारतो. त्यानं डायरी लिहिलीच नसती, तर त्याला अनिकेत त्याचा मुलगा नाही, हे समजलं तरी असतं का गं, तू सांगितल्याखेरीज? मरताना मल्हार कामतनं तुला त्याची मालमत्ता दिली नसती तरी समजलं नसतं. पण त्यानं तर जणू ते पत्र पाठवून अनिकेतच्या जन्मरहस्याची किल्लीच श्रीच्या हाती सोपवली! या दोन पुरुषांनी नेणिवेच्या (?) पातळीवर ही जी खेळी केली, त्याची मुळंही आपल्याकडच्या स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेत आहेत.

आणखी वाचा-पाहायलाच हवेत : नातेसंबंधांची अनवट वीण..

मल्हार कामतलाही किती खात्री, की अनिकेत त्याचाच मुलगा म्हणून! तू नाही म्हटलेलं असूनही किती हक्कानं तो, तुझ्या घरात येऊन लहानग्या अनिकेतला पाहतो, सोन्याचा दागिना देतो. श्रीपेक्षा त्याची समजुतीची पातळी जरा वरची, म्हणून तो निघून जातो खरा, पण मरताना त्याची मालमत्ता तुझ्या नावे करून एकप्रकारे तुझ्यावरचा हक्कच शाबित करतो. आणि नंतर तुला ‘या घरातच राहाण्याची शिक्षा’ फर्मावून श्रीदेखील तोच हक्क सिद्ध करतो. त्यानंतर प्रथमच श्रीला तू काही बोलतेस, जाब विचारतेस. तुझी बाजू मांडतेस. त्यात अनिकेतच्या होणाऱ्या बायकोचा- रेवतीचा वाटा मोठा आहे. तिनं तुला समजून घेण्यात, त्यामुळे भविष्यात कदाचित अनिकेत तुझ्याकडे येण्याची शक्यता, यांचाही वाटा आहेच.

घरच्याच चौकटीत राहून पुरुष किती मोकळा, किती स्वतंत्र राहू शकतो. ही चौकट त्याच्या सोयीनं हवी तशी, हवी तितकी लवचीक होऊ शकते. तशी ती स्त्रीला का नसावी? मग ‘घरातच करण्यासारखं किती तरी करूनही’ ते सारं सोडून जाण्याची सक्तीही तिच्यावर का अदिती? किती प्रेमानं तू घरातल्या निर्जीव वस्तूंचाही निरोप घेतेस.. स्वत:चं अस्तित्व त्या वस्तूंत का शोधतेस तू? सारं आयुष्य निघून गेलं, आता अचानक दिशाहीन झाल्याचं जाणवलं तुला. सारा खटाटोप व्यर्थ गेल्याचं उमगलं तुला. संदर्भचौकट बदलून आता पुन्हा नव्यानं स्वत:चा शोध घेणं भाग पडलंय तुला अदिती.

अदिती, तू ‘उंबरठा’मधल्या सुलभा महाजनची आठवण करून दिलीस. काय फरक पडला इतक्या वर्षांत? तेव्हा तीही अस्तित्वाच्या शोधात घराबाहेर पडली होती आणि तुलाही इतक्या वर्षांनी तोच एक रस्ता असावा?.. घराबाहेरचा?
vandanabk63@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astitva movie directed by mahesh manjrekar mrj
Show comments