डॉ. अंजली जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अत्याधुनिक प्रकारचं वा उच्च शिक्षण घेणाऱ्यांची आणि करिअरसाठी देशापरदेशांत कुठेही राहण्याची तयारी असणाऱ्यांची संख्या आता खूपच वाढली आहे. अर्थातच ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ अर्थात ‘एलडीआर’मध्ये राहणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढलीय. असं दूरवरचं नातं सांभाळण्याची कसरत करताना त्यांना सतत घरातून लग्नाच्या धोशाचाही सामना करावा लागतो. यात त्या जोडप्याचीसुद्धा समजून घेण्याजोगी काही बाजू असते का? की ते दोघं ‘जोडपं’ म्हणून या ‘लाँग डिस्टन्स’मध्ये वेळ फुकट घालवताहेत?..
गजराचा कर्कश आवाज झाला आणि माझी साखरझोप पुरती चाळवली. सुट्टीच्या दिवशी इतक्या लवकर उठणं जिवावर आलं होतं, पण नीरजचा मेसेज डोळय़ांसमोर आला. त्याच्या अगदी लहानशा मेसेजवरूनही मला त्याचे मनोतरंग ओळखू येतात. नीरजचं ‘पीएच.डी.’चं कोर्सवर्क अजूनही पूर्ण झालं नसणार! अंगावरची दुलई झटकन बाजूला सारून मी त्याला व्हिडीओ कॉल लावला. त्याचा चेहरा उतरलेला होता.
‘‘काय झालं नीरज? कोर्सवर्क अजूनही अडकलंय का?’’ मी काळजीनं विचारलं.
‘‘प्राची, आता तिसऱ्यांदा सबमिट केलंय.
दर वेळी काहीतरी क्षुल्लक चुका गाइड काढतच राहतात.’’
‘‘मग आता?’’
हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..
‘‘मी सुधारतोय ते, पण या वेळी जर त्यांनी अॅप्रूव्ह केलं नाही, तर मात्र मला टर्म रिपीट करण्यावाचून गत्यंतर नाही.’’ तो पडेल स्वरात म्हणाला.
व्हर्च्युअल कॅमेऱ्यातूनही त्याची अस्वस्थता माझ्यापर्यंत पोचली. कॅनडात असणाऱ्या नीरजचा पीएच.डी.चा पाच वर्षांचा अभ्यासक्रम, टर्म रिपीट करायला लागली तर वाढणारा कालावधी आणि खर्च, सुरुवातीलाच खळखळ करणारे गाइड पुढचं काम तरी अॅप्रूव्ह करतील का, याची डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि पीएच.डी.च्या भविष्याबाबतची साशंकता, हे सगळं त्याच्या डोळय़ांत साठून आलं होतं.
‘‘अरे, गाईड वरकरणी कडकपणा दाखवतात, पण टर्म रिपीट करायला लावून विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाहीत. काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर!’’ मी त्याला धीर देत राहिले. पण त्याच्या अस्वस्थतेचं सावट माझ्या मनावरही पसरलंच.
स्वयंपाकघरात लगबग चालू झालेली दिसत होती. आई-बाबा उठले होते. आलं घातलेल्या चहाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. त्या क्षणी मला चहा फार हवासा वाटला. भराभर आवरून मी चहा प्यायला गेले, तर वर्तमानपत्रातल्या एका बातमीवरून आईबाबांची चर्चा चालू होती. ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ म्हणजे ‘एलडीआर’मध्ये असणाऱ्या जोडप्यांसाठी एका चायनीज स्टार्टअपनं तयार केलेलं दूरवरून चुंबन घेण्याचं एक उपकरण आता भारतातही उपलब्ध होणार होतं! एकानं घेतलेलं चुंबन दूर अंतरावरूनही मोशन सेन्सर्सच्या सहाय्यानं जोडीदारापर्यंत जसंच्या तसं ते उपकरण पोहोचवणार होतं.
‘‘काहीतरीच बाई! प्रत्यक्षातल्या स्पर्शाची भूक यामुळे कशी भागेल?’’ आईची टिप्पणी.
मनात आलं, जितके ग्राहक जास्त, तेवढी जास्त उपकरणं निघणार, यात नवल काय? हल्लीच्या पिढीत ‘एलडीआर’ कॉमन झालं आहे. आईबाबांच्या मात्र अजून काही ते पचनी पडत नाही.
माझी ‘एंट्री’ नेमकी चुकीच्या वेळेला झाली होती. चहाचा कप घेऊन मी माझ्या खोलीत निघणार तोच बाबांनी विचारलं, ‘‘नीरजशी बोलत होतीस ना? विचारलंस का त्याला?’’
‘‘कितीदा सांगितलंय तुम्हाला, की त्याची पीएच.डी. पूर्ण होईपर्यंत मी लग्नाचा विषय काढणार नाही.’’ मी विषय संपवण्यासाठी म्हटलं. नीरजशी झालेला संवाद, त्याच्या समस्या, टेन्शन, हे सगळं आईबाबांशी शेअर करणं अशक्य होतं. टर्म लांबण्याची शक्यता नुसती कानावर जरी पडली असती, तरी त्यांच्या चिंतेची सुई आणखीनच तीक्ष्ण झाली असती.
हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’
‘‘लग्न तरी नक्की करणार आहात ना?’’ आईनं तितक्याच चिवटपणे विचारलं.
मी गप्प बसले. नीरजची पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर आम्ही लग्न करणार आहोत, हे मी त्यांना अनेकदा सांगितलं होतं. नीरजला पीएच.डी.साठी जो स्टायपेंड मिळतो, तो दोघांचा खर्च भागवायला पुरेसा नव्हता आणि त्याच्या शहरात केमिकल इंडस्ट्रीज नसल्यामुळे माझ्या शिक्षणाशी सुयोग्य नोकरी मिळणंही अवघड होतं. एकदा का नीरजची पीएच.डी. झाली, की नव्या शहरात जाण्याचा आमचा बेत होता, हेही त्यांना माहीत होतं.
‘‘पीएच.डी. पूर्ण व्हायला अजून पाच वर्ष आहेत. म्हणजे ती निर्विघ्नपणे पार पडली तर! नाही तर त्यात अजून काही वर्षांची भर! मग तोपर्यंत तुमचे संबंध असेच दूरवरून?’’ आई म्हणाली.
‘‘हे बघ, आम्हाला वाटतंय की तुमचं ठरलंय ना, मग उगाच लग्न लांबवू नये. एकदा का तू तिथे गेलीस, की कुठली ना कुठली नोकरी मिळेलच की!’’ बाबांनी पुस्ती जोडली.
‘‘अच्छा, म्हणजे मी इतकं शिक्षण घेतलंय, उत्तम करिअर केलंय, ते वाऱ्यावर सोडून तिथे जाऊन दुकानाचा दरवाजा उघडण्याची, नाहीतर बर्गर सव्र्ह करण्याची कामं करत बसू?’’ मी आता जाम उखडले.
शिक्षण देण्याच्या बाबतीत आधुनिक असणारे आईबाबा लग्नाचा विषय आला की इतके पारंपरिक का होतात?
‘‘प्राची, तू आमची पोटची मुलगी आहेस ना! तुला तुझ्या बुद्धिमत्तेला अनुरूप अशीच नोकरी मिळावी अशीच इच्छा असणार ना आमची? पण काहीतरी तडजोड नको का? चोवीस तास एकत्र राहाणाऱ्या जोडप्यांचंही फिसकटतं, तर तुमचे हे दूरचे संबंध इतकी वर्ष तसेच टिकून राहतील का, याची चिंता वाटते आम्हाला!’’ आई म्हणाली.
मनात आलं, चोवीस तास एकत्र राहतात म्हणूनच त्यांचं फिसकटतं!
हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!
‘‘आमचं उत्तम चाललंय. ते पुढे फिसकटेल, अशा नकारात्मक विचारांना आम्ही मनात थारा देत नाही. आणि अगदी झालं तसं, तर ते पुढचं पुढे बघता येईल!’’ मी त्रासिक स्वरात म्हटलं.
‘‘पुढचं पुढे कसं? उद्या तुमचं तुटलं तर? एकतर मुली नातेसंबंधांत खूप गुंततात. तुटलं तर त्यातून बाहेर येणं कठीण जातं. जितकी जास्त वर्ष नातेसंबंध, तितकं ते जास्त कठीण! आणि त्यावेळी तुझं वयही वाढलेलं असेल. परत नव्यानं जोडीदार शोधणं किती अवघड जाईल! हा विचार तुला आता सुचणार नाही, पण आईवडील म्हणून हा विचार आम्हाला करावाच लागतो.’’ बाबा म्हणाले.
मी काही न बोलता खोलीत आले. काहीही करून मी लवकरात लवकर लग्न करावं, हे म्हणणं रेटून धरण्याची एकही संधी आईबाबा सोडत नाहीत.
आईबाबांना सांगण्याचा किती प्रयत्न केला, की ‘एलडीआर’ फार पूर्वीपासून आहेत. कालिदासाच्या मेघदूतातही ‘एलडीआर’ आहे! शिवाय जोडीदारांपैकी एकजण सैन्यात, बोटीवर किंवा दूरच्या ठिकाणी नोकरी करत असेल, तर मग दूरवरूनच नातेसंबंध जोपासायला लागतात ना! त्यात नवीन काय?
यावर ते म्हणतात, ‘‘अगं, पण ती जोडपी लग्न करतात. लग्नात कमिटमेंट असते. ती मोडणं सहजासहजी शक्य नसतं. म्हणून तर आम्ही लग्नाचा आग्रह धरतोय.’’
म्हणजे नातेसंबंध सुखाचे असावेत, यापेक्षाही ते टिकले पाहिजेत यावर आईबाबांचा जोर! आमचं अगदी याउलट आहे. आम्हालाही नातेसंबंध टिकवायचे आहेत, एकत्र राहाणं हवं आहे, पण वाट्टेल ती तडजोड करून नव्हे. कसेही करून नातेसंबंध टिकवण्यापेक्षा ते जितका काळ आहेत, तितका काळ ते सुखाचे असण्यावर आमचा भर आहे. पण आईबाबांना हे पटत नाही.
आईबाबा सतत हा विषय चिवटपणे ताणून धरतात. साधं बोलणं असो की गप्पा, याच विषयाशी येऊन थांबवतात. मला नामोहरम करण्यासाठी त्यांच्या भात्यात अस्त्रं असतातच. त्यातलं एकेक ते माझ्यावर सोडत राहतात.
‘‘प्राची, लग्नाचा आग्रह धरतो म्हणजे तुम्ही एकत्र राहू शकाल. एकत्र नसलं की दोघांना स्वतंत्र राहण्याची सवय लागते. जोडीनं करण्याची गरजच वाटत नाही. सगळं एकटय़ानंच करायचं तर जोडीदार हवाच कशाला?’’
हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!
आईबाबांना वाटतं की जोडीदार जितके एकमेकांवर अवलंबून राहतील तेवढं त्यांचं नातं अधिक टिकतं. माझ्या मते नातं टिकणं आणि अवलंबन या भिन्न गोष्टी आहेत. मी किंवा नीरज एकमेकांवर अवलंबून नाही, पण तरीही आम्हाला एकमेकांची ओढ लागतेच. एकमेकांशी संवाद, भावनिक-शारीरिक सान्निध्य हवंहवंसं वाटतं. प्रत्यक्ष भेट होत नसल्यामुळे आम्हाला तळमळायलाही होतं, पण सध्याच्या परिस्थितीत तरी त्यावर मार्ग दिसत नाही. आमची ओळख, अस्तित्व आमच्या करिअरशी घट्ट जोडलेलं आहे. त्यात तडजोड करण्यापेक्षा अनुकूल परिस्थितीची वाट पाहणं हे आम्हाला जास्त शहाणपणाचं वाटतं.
आईबाबा मात्र आम्ही निर्णयच घेत नाही, म्हणून बोलत राहतात, पण आम्ही निर्णय घेत नाही असं नसून त्यांना हवा तो निर्णय घेत नाही, हे त्यांचं खरं दुखणं आहे. अर्थात त्यांना हवा तो निर्णयही आम्ही घेऊ, पण त्याची आम्हाला घाई करायची नाहीये. समजा नातं तुटलं, तरी त्याही परिस्थितीशी कणखरपणे सामना करण्याचं मनोबळ आमच्यात आहे. आणि समजा लग्न करून एकत्र राहत असलो तरीही नातं तुटू शकतंच की! म्हणजेच अशी अनिश्चिती, असुरक्षितता आपण टाळू शकत नाही किंवा काय केलं की ती टळू शकेल याचं नेमकं उत्तर आपल्यापाशी नाही. मग निदान स्वत:ला जे पटतंय ते करणंच सयुक्तिक नाही का?
कितीही व्यग्र असलो तरी दिवसातून पाच मिनिटं का होईना व्हिडीओ चॅट करण्याचं बंधन आम्ही दोघंही पाळतो. दिवस उजाडला की मला पहिला मेसेज नीरजचाच असतो आणि त्याला माझा! आम्ही एक डिजिटल वही तयार केलीय. दोघांपैकी एकाचाही मूड बिघडला असेल, तर आम्ही ती हमखास वापरतो. त्यात गाणी लिहितो, चित्र काढतो, कविता लिहितो, विनोद करतो. ती वही आम्हाला जीवनरस पाजते. अर्थात आमच्यात भांडणं, रुसवेफुगवेही होतातच! पण दोघांपैकी एकजण पुढाकार घेऊन ते मिटवूनही टाकतो. पण एक गोष्ट मात्र ‘मिस’ करतो. भांडणानंतरचं एकत्र येणं खूप उत्कट असतं. त्या वेळी मात्र व्हर्च्युअल उत्कटतेवर समाधान मानावं लागतं. सगळय़ाच गोष्टी एकाच वेळी मिळत नाहीत ना!
हेही वाचा >>> पाहायलाच हवेत : शिक्षणातून नवा दृष्टिकोन!
लॅपटॉप सुरू करून मी आमची ती वही उघडली. नीरजच्या पीएच.डी.नंतर काय काय करायचं, कुठे भेटी द्यायच्या, काय बेत आखायचे, याबाबत झालेला आमचा शब्दसंवाद नजरेस पडला. भविष्याबद्दलची आशा आमच्या मनात तेवत ठेवण्याचं बळ त्यात होतं. एकमेकांपासून दूर, वेगवेगळय़ा देशांत असताना असा संवाद किती महत्त्वाचा आहे! कोलमडून जाण्याचे जे काही क्षण येतात, त्यावर कुरघोडी करण्याचं सामर्थ्य या संवादात आहे. ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
मी वहीचं नवीन पान उघडलं आणि मनातले शब्द झरझर टाइप करू लागले- आमचं नातं, आईबाबांना न कळणारे त्याचे सूक्ष्म पदर आणि आमच्या भविष्याचं आशादायी चित्र! शेवटी लिहिलं, ‘नातं जवळ राहून जोडलेलं असो, वा दूरवरून.. ते जोपासणं महत्त्वाचं असतं. परस्परांत विश्वास असेल तर नातं टिकवण्यात अंतराचा अडथळा येत नाही. नात्यात चढउतारांच्या लाटा येतात, अनिश्चिततेचे भोवरेही येतात. पण नीरज, मला माहितीय, की आपण त्यात गटांगळय़ा खाणार नाही. एकमेकांच्या साथीनं पोहत राहून त्यातून बाहेर पडू. शेवटी एकत्र असणं महत्त्वाचं नाही का? मग प्रत्यक्ष असो वा व्हर्च्युअल!’
anjaleejoshi@gmail.com