|| अरुणा सबाने
चळवळीची पाश्र्वभूमी लाभलेली एक स्त्री वैयक्तिक स्तरावर अतिशय हालअपेष्टा सोसून उभी राहते, परित्यक्ता स्त्रियांसाठी काम सुरू करते आणि त्यातूनच पुढे तिला गरज जाणवू लागते, ती स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेलं नियतकालिक सुरू करण्याची. हा रस्ताही तिच्यासाठी सोपा नसतोच. अनेक अनुभव गाठीशी बांधत ती नेटानं हे नियतकालिक चालवत राहते आणि पुरोगामी विचारांचं नियतकालिक म्हणून ते मान्यता प्राप्त करतं. ती स्त्री म्हणजे या वर्षीच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’प्राप्त अरुणा सबाने. त्यांच्या नियतकालिक काढण्याच्या ‘आकांक्षे’चा हा प्रवास…
माझ्या लहानपणापासून मी घरी ‘मनोहर’, ‘मार्मिक’, ‘किर्लोस्कर’ ही मासिकं आलेली बघायची. कधी उत्सुकता म्हणून, तर कधी त्यातलं काही आवडलं म्हणून ती मासिकं हातात घेणं सुरू झालं. कथा-कादंबऱ्यांचा तर मी वाचून फडशाच पाडायची. हळूहळू वाचायची सवय वाढली. घरात सर्वांनाच वाचनाची आवड असल्यामुळे खूप पुस्तकं असायची. उन्हाळ्यात गावाला गेल्यावर गावच्या ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचायची. गावाला फार कुणाकडे जाण्याची परवानगी नसायची. आमच्या चार पाटलांच्या वाड्यात कुठेही जा, पण गावभर फिरायचं नाही, हा आजोबांचा कडक नियम होता. (अर्थात त्यांना गुंगारा देऊन मी गावभर फिरायचीच हा भाग वेगळा!) पण त्या वेळी पुस्तकं जी जवळ आली त्यांची सोबत आयुष्यात कधीच सुटली नाही.
कालांतरानं नागपुरात शिकायला आले आणि इथे वेगळाच मित्रपरिवार भेटला. त्यात मुळातच चळवळ्या स्वभावाची मी बरोबर चळवळीतल्याच मित्रांच्या ग्रुपमध्ये सामावले गेले. मग काय, आमच्या खूप गप्पा चालायच्या. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सारं बंद झालं पाहिजे, क्रांती केली पाहिजे, यावर घमासान चर्चा! त्या वेळी दिल्लीहून येणारं ‘मानुषी’, याशिवाय ‘प्रेरक ललकारी’, ‘बायजा’, ‘आंदोलन मंथन’, ‘लोकप्रभा’ अशी मासिकं आम्ही वाचत असू, चर्चा करत असू. कधीकधी कुणी तरी सांगायचं, की अमुक एका मासिकात एक चांगला लेख आला आहे… पण आम्ही तो मागवून वाचायचो; पण त्याच वेळी विदर्भात एकही चांगलं चळवळीचं असं मासिक नाही, याची आम्हाला खंत होती. मग मी म्हणायचे, ‘मी डॉक्टर झाले की, तुम्हाला पैसे देईन. तुम्ही मासिक काढा!’ तर नेताजी राजगडकर म्हणायचे, ‘मी आमदार झालो, म्हणजे आपण मासिक काढू.’ मासिक आणि पैसे, हे एक समीकरण डोक्यात बसलेलं होतं त्या वेळी.
कालांतरानं आयुष्यात बरीच स्थित्यंतरं झाली. स्वत:ला पूर्णपणे चळवळीत झोकून दिलं. स्वत:चा उद्योग सुरू केला. त्यातही रमले. तरीही विदर्भात चांगलं, त्यातही चळवळीच्या दृष्टीनं, स्त्रियांच्या दृष्टीनं विचार करणारं नियतकालिक नाही, याची खंत डाचत असायची. मनात ते कुठे तरी रुतून बसलं आणि जेव्हा मी माझ्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले, त्या वेळी प्रथम मनात काही आलं असेल, तर ते म्हणजे ‘आता आपण नियतकालिक काढायचं!’ विचार मनात आला, की तो मी कृतीत उतरवल्याशिवाय राहात नाही. त्या वेळी विदर्भातली चळवळ कमी कमी होत चाललेली होती. पूर्ण महाराष्ट्रातूनही कमीच मासिकं निघायची. उलट ‘सत्यकथा’, ‘मागोवा’, ‘तात्पर्य’ अशी मासिकं बंद पडली होती. ही मराठी वाङ्मयीन चळवळीची हानीच होती. एकंदरीत नियतकालिकांच्या ऱ्हासाचा तो काळ होता. त्याच वेळी आपण नियतकालिक काढावं हा विचार प्रबळ झाला. लगेच कामाला लागले. मला नियतकालिक काढायचं होतं, पण ते स्त्रियांसाठी आणि त्यातही चळवळीचं. स्त्रीजागृतीसाठी, प्रबोधनासाठी, सुधारणेसाठी शासन आणि अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेतच. त्यांच्या व्यापक क्षेत्राशी स्पर्धा करण्याची आपली शक्ती नाही, हे मी तेव्हाही जाणून होते. स्त्रियांचे प्रश्न कायदे करून, मोर्चे काढून आणि परिषदा भरवून व्यापकपणे समाजासमोर मांडणं हा एक मार्ग होताच, आहेच; पण वैचारिक लढाई लढायची असेल, चळवळ, स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समता, अशा अंगानं जायचं असेल, तर वैचारिक खाद्य पुरवणं, त्यावर चर्चा होणं गरजेचं होतं. या विचारातूनच हे अवाढव्य धनुष्य उचलण्याचं मी ठरवलं. त्यामागे माझी सामाजिक, पुरोगामी भूमिका होती. स्त्रीवादी विचारसरणीला खतपाणी पोहोचावं, स्त्रियांना लिहितं करावं, नव्या पिढीला नवा विचार द्यावा, अशा विचारांतून मला नियतकालिक काढावंसं वाटलं. स्त्रियांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित होते. त्यांचे म्हणून काही प्रश्न असतात, हे कुणाच्या गावीही नव्हतं. ‘स्त्रीवादा’सारख्या शब्दाची हेटाळणी व्हायची. मला हे सारं समाजात रुजवायचं होतं, स्त्रीला समाजात जागा द्यायची होती. या साऱ्या विचारांतून स्त्रियांच्या समस्यांना वाहिलेल्या ‘आकांक्षा’ या त्रैमासिकाचा जन्म झाला. त्याचा पहिला अंक- ‘सावित्रीबाई फुले विशेषांक’, ३ जानेवारी १९९९ ला मी प्रसिद्ध केला.
हे एक नवीन आव्हान होतं. नियतकालिक काढणं, ते नीट चालवणं, त्यासाठी विषयानुरूप लेखक मिळवणं, हे काही सोपं काम नव्हतं. हे काम म्हणजे माझा केवळ उत्साह नव्हता किं वा मला काही तरी करून दाखवायचंय म्हणूनही मला नियतकालिक काढायचं नव्हतं. सामाजिकतेच्या गरजेतून निर्माण झालेलं पुरोगामी साहित्य हा मी ‘आकांक्षा’चा कायम मूलाधार ठेवला. त्यातल्या डोंगराएवढ्या अडचणी मला माहिती होत्या. अर्थकारण समजत होतं. त्याला पुरून उरण्याइतपत श्रीमंत, समृद्ध मी नव्हते. माझा कुणी ‘गॉडफादर’ नव्हता, पण माझ्याकडे स्त्रियांची येणारी प्रकरणं खूप होती. त्यातून त्यांचे विचित्र प्रश्न मला कळत होते. माझ्याहीसमोर प्रत्यक्ष जगण्याचीच आव्हानं भरपूर होती. तरीही मासिक काढायचं ठरवलंच. त्यामागे माझी निश्चित अशी काही भूमिका होती. मी जो सामाजिक काम करण्याचा मार्ग स्वीकारला होता, त्याचा तो एक भाग होता. समाजासाठी, माझ्या भूमीसाठी, माझ्या लोकांसाठी- विशेषत: माझ्या भगिनींसाठी काही करायचं होतं. मी आणि डॉ. हरीश धुरत आम्ही विदर्भात पहिल्यांदा सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणं सुरू केलं, तेव्हा त्या वेळच्या लहान मुलांना ‘कोण सावित्री’ हा प्रश्न पडला होता. फुले यांचे विचार आम्ही खोलवर रुजवले. ताराबाई शिंदे, त्यांच्या विचारांना रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले. आपलं म्हणणं वारंवार मांडत राहिलो तरच तो विचार रुजतो. ते काम ‘आकांक्षा’नं केलं.
त्या वेळी वर्तमानपत्रातल्या पुरवण्यांमध्ये ठरावीक लेखकांनाच जागा होती. इतरांचं काय? नवोदितांचं काय? साहित्य पुरवणीतही ग्रुप होते. ग्रुपबाहेरच्या लेखकांचं काय?
जे प्रश्न समाजानं, स्त्रियांनी, पोळलेल्यांनी समजून घ्यायला हवे होते, त्यांचं काय? प्रथितयश आणि नवोदितांची सांगड आपण इथेच का घालू नये? अशा सर्व विचारांनी मी ‘आकांक्षा’चा हा वैचारिक गुच्छ तयार करायचं ठरवलं. मात्र इथूनच माझा खडतर प्रवास सुरू झाला. पहिलाच अंक सावित्रीबाई फुले विशेषांक. त्याच्या उद्घाटनाला आले ते डॉ. भा. ल. भोळे आणि मृणाल गोरे. आधीच मी स्त्रीवादी, त्यात आता या प्रकाशनानं माझ्यावर शिक्कामोर्तबच झालं. त्यामुळे वाचणारा अर्धा वर्ग आपोआपच दूर झाला; पण प्रकाशनाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. खूप प्रतिसाद मिळाला. पहिल्याच अंकात साहित्यिक बेबी कांबळे, कुमुद पावडे, सुरेश भट, डॉ. लीला पाटील, बा. ह. कल्याणकर, सुगंधाबाई शेंडे, ज्योती लांजेवार, सुधाकर गायधनी, प्रतिमा इंगोले अशा प्रथितयश लेखकांचे लेख, कविता मला मिळाल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचं भरघोस स्वागत झालं, प्रतिसाद मिळाला आणि विदर्भातले; विशेषत: नागपुरातले शत्रू वाढले! तरीही वार्षिक आणि आजीव वर्गणीदार मला मिळाले; पण इथून एक वेगळाच प्रवास सुरू झाला.
दुसरा अंक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक. त्यातले लेखक होते- वामन निंबाळकर, अरुणा लोखंडे, भा. ल. भोळे, अशोक गोडघाटे, अश्विनी धोंगडे, सुरेश भट, बबन सराडकर, भाऊ मांडवकर. याही अंकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यावर ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, निळू फुले यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आल्या. मग मी मागे वळून बघितलंच नाही. माझे विरोधक चारी बाजूंनी वाढले होते. नागपुरातून एक जातीवाचक मासिक निघायचं. तिथल्या संपादकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सारेच माझ्या ओळखीतले. त्या संपादकाची तर मी सर्वांत मोठी शत्रू! नव्यानं निघालेल्या ‘आकांक्षा’चं यश बघून त्यानं वाईट राजकारण करणं सुरू केलं. आमच्या मासिकाची बंडल्स पार्सलमधून गायब करणं, पोस्टातून गायब करण्याचा प्रयत्न करणं, मासिकांच्या स्टॉलवर ‘आकांक्षा’ ठेवायचंच नाही म्हणून स्टॉलवाल्याला ‘मॅनेज’ करणं, हे सारे प्रयत्न सुरू झाले. व्यक्तिगत माझी खूप बदनामी करण्याचे प्रयत्न झाले. स्त्री मोठी झालेली चालतच नाही ना! पण मी थांबले नाही की अडखळले नाही. मी माझं काम निष्ठेनं सुरू ठेवलं. नागपुरात जाहिरातदार मिळणं भयंकर कठीण. त्यातही चळवळीचं मासिक, तेही स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडणारं; पण मी एक ठरवलं होतं, अगदी सुरुवातीपासून, की माझ्या कमाईतल्या ६० टक्के भागावर माझ्या तीन मुलांचा हक्क असेल, तर ४० टक्के भागावर माझ्या सामाजिक कार्याचा अधिकार आहे. हे गणित मांडल्यामुळे मला यातायात झाली; पण मी ते अशक्य होऊ दिलं नाही. माझ्या चळवळीचाच तो एक भाग होता.
मी १७ वर्षं नित्यनेमानं मासिक काढलं. कधी त्याला त्रैमासिक केलं, तर कधी ते मासिक व्हायचं; पण कर्जाचा डोंगर वाढला, मला सोनं विकावं लागलं. १७ वर्षांनी हे घडलं. मग मी दोन वर्षं थांबले. कुटुंबातलीही काही वेगळी आव्हानं होती; पण मन अस्वस्थ असायचं. मग फक्त दिवाळी अंकच काढले. त्यानंतर थोडी स्थिरस्थावर झाले, मुलं मार्गी लागली. धाकटी मुलगी उच्चपदस्थ झाली. माझ्या चळवळीत तिनं स्वेच्छेनं हातभार लावला. थोरली लेक तर कार्यालयीन कामकाजात खूपच मदत करायची. मी परत ‘लष्करच्या भाकऱ्या’ भाजायला सुरुवात केली. दोन वर्षांच्या मध्यंतरानंतर मी पुन्हा झेप घेतली. आज २२ वर्षं पूर्ण झाली मी ‘आकांक्षा’ चालवते. दिवाळीला फुटकळ जाहिराती मिळतात, बाकी आनंदी आनंदच! पण माझा प्रत्येक अंक आला, की पहिलटकरणीला बाळ हातात घेतल्यावर, जो आनंद मिळेल, तोच आनंद प्रत्येक वेळी मला मिळतो आणि मी कर्जाचा ताण विसरून जाते.
‘आकांक्षा’ पूर्णपणे पुरोगामी विचारांना वाहिलेलं, चळवळीचं मासिक आहे. यातले विषय नेहमी वेगळे असतात. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा विदर्भात अतिशय नवीन शब्द असताना २००८ मध्ये मी त्यावर विशेषांक काढला होता. त्यावर सर्वांत जास्त उड्या पडल्या, त्या पुण्या-मुंबईहून! दोनदा छापावा लागला. पाणी विशेषांक, जल साहित्य विशेषांक, सिंचन विशेषांक, संविधान समीक्षा विशेषांक, शेतकरी आत्महत्या विशेषांक, कायदा विशेषांक, महिला आयोग विशेषांक, कौटुंबिक हिंसाचार विशेषांक, मराठी मायबोली विशेषांक, असे अनेक विशेषांक मी प्रसिद्ध केले.
लोक वाचतात, पण एकू ण वाचकांशी तुलना करता मूठभर. त्यातही विकत घेऊन वाचणारे कमीच. आजही जवळच्याही मित्रांना, लेखकांना तो अंक आपल्याकडे ‘कॉम्प्लिमेंटरी’ आला पाहिजे, असंच वाटतं. विकत घ्या, वर्गणी भरा, असं म्हटलं तर तो त्यांना त्यांचा अपमान वाटतो आणि अंक फुकट आला की त्यांचा गौरव झाल्यासारखं वाटतं, ही शोकांतिका आहे. अशाही वातावरणात माझा एक विशिष्ट वाचक वर्ग आणि लेखक वर्ग मी टिकवून ठेवला. एक अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे, की आजपर्यंत एकाही लेखकानं, मग ते
सुरेश भट असोत, मंगेश पाडगावकर, तारा भवाळकर, अश्विनी धोंगडे, आनंद पाटील असोत, अगदी एकाही लेखकानं माझ्याकडून मानधन घेतलं नाही. मी करत असलेली सर्कस त्यांना कळत असेल किंवा माझ्या चळवळीवर त्यांचं प्रेम आहे, त्याबद्दल त्यांना आदर आहे म्हणूनच हे मला शक्य झालं. त्यांनीही माझ्या या चळवळीला एक प्रकारे मदतच केली.
कधीकधी अगदी हतबल व्हायला होतं. ऐन वेळी कोणतीही अडचण येते. कधी कॉम्प्युटर नादुरुस्त होतो, कधी प्रिंटिंगमध्येच घोळ होतो, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या हा तर वेगळाच तापदायक प्रकार आहे. एक आठवण सांगायचीय, २००२ च्या दिवाळी अंकाचा अनुभव भयानक होता. तीन महिन्यांपासून सुरू असलेलं अंकाचं काम संपत आलं असताना आणि दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना कॉम्प्युटरची ‘रॅम’ गेली. झालं! सारं त्यात साठवलेलं. सारा मजकू र, फोटो गायब झाले. मी पार गांगरूनच गेले होते. सगळ्यांचाच धीर सुटला. मी काही क्षण तशीच बसून राहिले. मग ग्लासभर गटागटा पाणी प्यायले. घरातून सर्वांसाठी कडक चहा मागवला आणि इंजिनीअरला फोन केला. त्याला अडचण सांगितली. त्यानं दुसऱ्या दिवशी रॅम टाकून देतो म्हणून सांगितलं. मग मी ऑपरेटरला सांगितलं की, ‘आता तुम्ही दोघंही रात्रंदिवस काम करा. समीक्षाही (माझी मुलगी) करेल. मध्ये मध्ये आराम करा.’ प्रेसचं टाइमटेबल बदलून घेतलं. बारा दिवसांत अंक निघायला हवा हे ठरवलं. पोरं दुसऱ्या दिवसापासून कामाला भिडली. रात्रंदिवस एक केला. प्रूफरीडर्सनी साथ दिली आणि दिवाळीच्या दोन दिवस आधी अंक हातात पडला! आमच्या विपणनाच्या किशोर वाघमारेंनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंक साऱ्या वितरकांच्या हातात दिला तेव्हाच आम्ही दिवाळीचा दिवा लावला.
या वर्षी एक नवीन प्रयोग मी केला. ‘आकांक्षा’ दिवाळी अंकाला अतिथी संपादकपद दिलं. सतत आमच्याबरोबर चळवळीत असलेले ज्येष्ठ समीक्षक प्रमोद मुनघाटे अतिथी संपादक झाले. खरं तर काही काळासाठी का होईना, पण आपलं बाळ असं ‘दूधमाय’च्या हवाली करणं सोपं नव्हतं माझ्यासाठी; पण जसं ते बाळ दूधमायच्या मांडीवर सुखानं खेळतंय हे दिसल्यावर आई निश्चिंत होते, तसंच माझं झालं. हाही अनुभव छानच. दुरून दुरून अंकावर, मुख्य म्हणजे वेळापत्रकावर माझं पूर्ण लक्ष होतं. अंक उत्तम करत असताना लेखक, कवींची निवड, पत्रव्यवहार, डीटीपी, शुद्धलेखन, एडिटिंग, सेटिंग हे सारं करत असताना अंक सुंदर व्हावा, हे जेवढं महत्त्वाचं, तेवढंच महत्त्वाचं आहे ते दिवाळी अंक वेळेवर निघणं, तो वाचकांपर्यंत पोहोचणं, बाहेरगावच्या स्टॉलवर पोहोचणं. दिवाळी अंकाच्या खरेदीचं आयुष्य पहिल्या १० दिवसांचं असतं. त्यानंतर तो गेला, की तुमचा अंक कितीही चांगला असला तरी पुन्हा त्या अंकाच्या खरेदीसाठी जाणारे रसिक दोन टक्के ही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
या २२ वर्षांत खूप अनुभव घेतले. अनेक नवोदित लेखकांना संधी देता आली, अनेक मोठ्या लेखकांबरोबर यानिमित्तानं ओळख झाली. अनेकांना अरुणा सबाने काळी की गोरी माहिती नाही; पण ‘आकांक्षा’ म्हटलं की ओळखल्याशिवाय राहात नाहीत, हे मी माझ्या चळवळीचं यश मानते. मनुष्याला आत्मसंवाद करायला वेळ नसण्याच्या काळात मी ‘आकांक्षा’चा एक वाचक वर्ग निर्माण केला, तो वाढवला हे ‘आकांक्षा’चं यश आहे. प्रचंड धावपळीच्या आणि वैचारिक गदारोळात भरडून निघत असलेल्या परिस्थितीत सध्या वाङ्मयीन पर्यावरणही नष्ट होईल की काय, अशी भीती असताना आम्ही मूळ धरलं.
लेखन आणि वाचनसमृद्धीसाठी असे प्रयत्न अनेकांनी करायला हवेत. संथ गतीनं का होईना, पण प्रतिसाद मिळतो. अशातूनच लेखक घडत असतो. आम्ही नवोदितांना संधी दिली, त्यातील अनेकांना पुढे मोठी संधी मिळाली. कष्ट आहेत, अडचणी आहेत, कर्ज तर आहेच, पण मला यातूनच मानसिक समाधान खूप मोठं मिळालं आहे. मोठी इमारत बांधून त्यात राहण्यापेक्षा पुस्तकांच्या, मासिकांच्या, लेखक-वाचकांच्या गराड्यात राहून जगणं किती सुंदर आहे ना! आत्मिक समाधान ते यापेक्षा वेगळं काय असतं!…
warunasabane123@gmail.com