डॉ. राजन भोसले rajanbhonsle@gmail.com
आजच्या काळात जन्माला आलेल्या आणि वाढणाऱ्या मुलांच्या जीवनात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय असावी हे समजून घेणे गरजेचे आहे. तिथे जर आपली गफलत झाली तर पाहता पाहता गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात.केवळ नियम बनवायचे आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याची बळजबरी करायची हा प्रकार आता जुना झाला आहे.
सत्तरीच्या दशकात जेव्हा मी षोडशवर्षीय (टीन एजर) होतो तेव्हा दूरचित्रवाणी हा प्रकार भारतात नव्याने आला होता. दूरचित्रवाणीच्या आगमनाचे तीव्र परिणाम आबालवृद्धांवर झाले. एवढंच नव्हे तर मनुष्यजीवनाचा आणि समाजाच्या तमाम आदर्श, ध्येय या सर्वावर प्रभावी परिणाम करण्याची क्षमता दूरचित्रवाणीमध्ये होती. त्या वेळी दूरचित्रवाणी या माध्यमावर ‘दूरदर्शन’ या एकमेव कृष्णधवल वाहिनीचे अधिराज्य होते. रंगीत दूरचित्रवाणी संच येता येता १९८२ उजाडलं. दूरचित्रवाणीच्या आगमनाने जी उलथापालथ समाजाच्या जडणघडणीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर व दिनचर्येच्या वेळापत्रकावर होताना आम्ही सत्तरीच्या दशकात पाहिली, त्यापेक्षा कितीतरी पटीने भेदक आणि दूरगामी कायापालट करू शकेल अशी शक्यता इंटरनेटच्या उद्रेकामुळे निर्माण झाली आहे.
याला सोय म्हणावं की उणीव? उपयोगी मानावं की उपद्रव, वेळ वाचवणारं की वेळेचं भान घालवणारं, माहिती पुरवणारं की नको ती माहिती लादणारं, विरंगुळा देणारे की विरंगुळा कायमचा हिरावून घेणारे, विचारांना वृद्धिंगत करणारे की विकृत करणारे हे ठरवणं आज अवघड होऊन बसले आहे.
इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले अनेक जण वेळ-काळ विसरून आपली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या विसरून आपलं सत्त्व आणि पराकाष्ठा गमावून चक्क व्यसनाधीन झालेले आज दिसतात. पण त्याचबरोबर इंटरनेटचा विधायक उपयोग करून उपचार आणि उपकार, संशोधन आणि संकलन, संपर्क आणि संदर्भ यांची सुबक सांगड घालतानाही अनेक जण दिसतात. इंटरनेट हे खरं तर एक केवळ माध्यम. शक्तिशाली आणि कार्यक्षम माध्यमाला दोष देण्याची चूक नेहमी केली जाते. माध्यमाचा उपयोग जर एका तत्पर सक्षम सेवकासारखा केला तर ते आपली पूरक आणि समर्पक सेवा करू शकतं. पण सेवकालाच जर आपण सर्व अधिकार देऊन मालक बनवले तर तो आपल्या सर्वनाशाला कारणीभूत होऊ शकतो. मालकाने मालक बनून राहणं व सेवकाला केवळ सेवेची संधी देणं हे खरं तर अपेक्षित आहे.
माझा इंटरनेटशी पहिला सामना झाला ते वर्ष १९९९ होतं. त्या वेळी त्याचे स्वरूप बरेच मोघम होते. इंटरनेटचा वेगही आजच्या तुलनेत फारच मंद होता. इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती भरपूर जरी असली तरी आपल्या आवाक्यात आहे असंच भासत होतं. पण एखादे छोटे रोपटे डोळ्यासमोर बघता बघता वाढत एक मोठा वटवृक्ष व्हावे आणि त्याच्या फांद्या आणि पारंब्या चारी दिशांनी हजारो मैल पसरत जाव्यात अगदी तसाच प्रकार इंटरनेटच्या बाबतीत घडला आहे.
ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये असताना विविध संदर्भ शोधण्या आणि निवडण्यासाठी तासन्तास लायब्ररीमध्ये घालवलेले मला आठवतात. आज असे संदर्भ काही क्षणात बसल्या ठिकाणी ‘गुगल’ या ‘अॅप’च्या मदतीने आपण मिळवू शकतो. जगातली सर्व विषयांवरची पुस्तकं आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला चक्क आपल्या तळहातावर उपलब्ध झाली आहेत. क्षणार्धात शोध-संशोधन, मोजणी-उजळणी, संकलन-वर्गीकरण अचूकपणे करण्याची क्षमता इंटरनेटमध्ये आहे. त्यामुळे त्याचा विधायक असा उपयोग आपल्या जीवनात आपण करू शकतो. पण इंटरनेटच्या या क्षमतेचा वापर करून नको त्या माहितीला अचानक समोर जाणं, विकृत आणि अनावश्यक गोष्टी अवेळी पुढे येणे, सोशल मीडियाच्या भोवऱ्यात ओढलं जाणं, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव बधिर करून टाकणं हे प्रकारही इंटरनेटच्या अधीन झालेल्या लोकांमध्ये दिसून येतात.
बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय जसं बंदूक हाताळण्याची चूक करू नये, पण केवळ चालवण्याचे तंत्र शिकूनही भागणार नाही. बंदूक कधी व कुणावर चालवावी याची प्रगल्भ जाणीव असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी याच प्रकारे इंटरनेटच्या सुपरफास्ट दुनियेत भ्रमण सुरू करण्याआधी आणि करण्याबरोबरच त्याच्या संदर्भात काही सावधगिरीचे उपाय समजून घेणेही तेवढंच महत्त्वाचं आहे.
पूर्वीच्या पिढीत साधारणपणे पालक आणि शिक्षक हेच मुलांना विविध गोष्टी शिकवत असत. इंटरनेटचे आगमन आणि आकलन झाल्यानंतर मात्र ती गोष्ट नेमकी उलटी झाली आहे. बहुतांशी वेळा पालक आणि शिक्षकच मुलांकडून इंटरनेटचे धडे आणि बारकावे समजून घेताना दिसतात. हा एक चक्रावून टाकणारा प्रकार आहे. आजच्या अशा या काळात जन्माला आलेल्या आणि वाढणाऱ्या मुलांच्या जीवनात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय असावी हे समजून घेणे गरजेचे आहे. तिथे जर आपली गफलत झाली तर पाहता पाहता गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. याची अनेक उदाहरणे एक डॉक्टर आणि समुपदेशक म्हणून मला नेहमी पाहायला मिळतात. ही सावधगिरी सांभाळण्याचं काम पालकांनी आवर्जून करायला हवं. केवळ नियम बनवायचे आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याची बळजबरी करायची हा प्रकार आता जुना झाला आहे. नव्या पिढीबरोबर तो अगदीच बोथट ठरतो. आजच्या नव्या पिढीसाठी पालकांना आपल्या जुन्या पद्धती बदलण्याची एक तातडीची अशी गरज निर्माण झाली आहे. त्यात परस्परांबद्दलचा आदर आणि स्वीकार करणं, समान पातळीवर येऊन एक समंजस असा संवाद साधणं आणि दोघांनीही बरोबरीने ‘निगोशिएट’ करण्याची मानसिक तयारी दाखवणं हाच मार्ग पालकांनी अवलंबण्याची आता वेळ आली आहे.
ठरवलेल्या नियमांना पाळण्यामागचं ‘लॉजिक’ त्याची कारणमीमांसा आणि परिणामाचं तारतम्य हे चर्चेतून विकसित होणं गरजेचं आहे. एकतर्फी बनवलेले आणि लादलेले नियम निमूटपणे पाळण्याचा काळ आता निघून गेला आहे. नवीन पिढी तो कदापि मान्य करणार नाही. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची योग्य-अयोग्यता मुलांच्या स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला मान्य होणार नाही, तोपर्यंत पालक आणि मुलं हा संघर्ष चालूच राहील आणि पालकत्वाचं आव्हान पेलणं पालकांना शक्य होणार नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल.
chaturang@expressindia.com