|| मंगला गोखले
‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ मराठी ही जगातील एकोणिसाव्या क्रमांकाची भाषा; तर भारतीय भाषांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर हिंदूी, बंगाली, तेलुगू आणि मग मराठी, अशा प्रकारे मराठी ही चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. २७ फेब्रुवारीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त इतर भाषेतल्या मराठीत रुळलेल्या शब्दांचा धांडोळा..
‘संस्कृतवाणी देवे केली, मऱ्हाटी काय चोरापासोनी घेतली’- असा खडा सवाल करीत संत एकनाथांनी मराठीचा अभिमान बाळगला. ‘पुष्पामाजी पुष्प मोगरी, परिमळामाजी कस्तुरी, तैसी भाषामाजी साजिरी, भाषा मराठी’- असा गौरव ‘ख्रिस्तपुराण’ रचयिते फादर स्टिफन्स यांनी केला आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या महाराष्ट्र राज्याची ही राजभाषा. कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, खान्देशी इत्यादी अनेक बोलीभाषा, लोकगीतं, कृषीगीतं, ओव्या, अभंग, म्हणी, वाक्प्रचार, चिऊकाऊच्या गोष्टी अशा अनेक अंगांनी मराठी भाषा स्थिरावली आहे.
भाषा हे परस्परसंवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे, साधन आहे. भाषा ही प्रवाही असते. प्रवाही असावीच लागते. अनेक इतर भाषांना जननी, भगिनी, मावशी, सख्खे शेजारी म्हणून मराठीनं सामावून घेतलं आहे. असंख्य इतरभाषिक शब्द मराठीत लोणच्यासारखे मुरले आहेत. उदा. तोडगा, गजरा (हिन्दी), संविधान, पुरस्कार (संस्कृत), चोपडी, खेडूत (गुजराती), अण्णा, तूप (कन्नड), वेठ (तेलुगू), सार, टेंगूळ (तमिळ), ऑफिस, शर्ट, कॉलेज (इंग्रजी), हजेरी (उर्दू), बाजार, बोगदा, सरकार (फार्सी), जाहिरात, वकील, अफवा (अरबी), काडतूस, कूपन (फ्रेंच), बादली, चावी, पगार (पोर्तुगीज). मराठीतील ही सरमिसळ नाक मुरडण्यासाठी तर नाहीच, उलट कन्नड, हिन्दी, संस्कृत, उर्दू, फारसी, अरबी अशा अनेक भाषांच्या सहवासात ती अधिकच सशक्त, समृद्ध झाली आहे. भाषा प्रवाही असल्यानं आणि संपर्काचं प्रभावी माध्यम असल्यानं हे घडणारच आणि अनेक भाषांबाबत हे घडतच असतं. नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहते, तो भाग तर ती सुजलाम् सुफलाम करतेच. पण त्याबरोबर तिथली माती, तिचा कस, पानंफुलं बरोबर घेऊन पुढे जात असते. एका जागी स्थिर राहतं ते डबकं आणि प्रवाही असते ती नदी. तेव्हा या मराठीभाषिक नदीनं प्रवाही असताना अनेक भाषांना सहजपणे सामावून घेतलं, तसंच आपली ओळखही त्या त्या भागात रुजवली. त्यामुळे यात कमीपणा, किंवा भाषेचं प्रदूषण वाटण्याचं कारण नाही, खंत करण्याचंही कारण नाही.
संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हटलं जातं. असंख्य संस्कृत शब्द मराठीमध्ये असल्यानंच ती स्थिरावली आहे असं मानलं जातं. भाषिक देवाणघेवाण ही सर्वच भाषांत होत असते. दोन भिन्न संस्कृतीच्या संपर्कामुळे, अपरिहार्यपणे सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय पातळीवर तर ही भाषिक देवाणघेवाण अधिकच होते. अनेक शतकं महाराष्ट्रावर असलेल्या मोगल राजवटीमुळे उर्दू, फार्सी, अरबी भाषांचा पगडा मराठीवर होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे त्यांचे अनेक शब्द सहजपणे मराठीत आले. उदा. बाजार, हमाल, जकात, मालक, इनाम, दुकान, तगादा, जुलूम, अर्ज, अक्कल, माहिती, गफलत, सुस्त, इ. अनेक फार्सी-अरबी शब्द इतके रूढ झाले आहेत की ते मराठी नाहीत हे कुणी मान्य करायलाही तयार होणार नाहीत.
तीच गोष्ट दीडशे वर्ष इंग्रजी अमलाखाली असलेल्या भारताची आहे. स्वातंत्र्यानंतरही हिन्दी भाषा मोठय़ा प्रमाणावर बोलली जात असूनही इंग्रजी भाषेचा प्रभाव कमी झालेला नाही. ऑफिस, कॉलेज, क्लास, फॉर्म, हॉस्पिटल, डॉक्टर, कंपाऊंडर, बँडेज, रेल्वे, तिकीट, रिझर्वेशन, बूट, पँट, ब्लाऊज आदी असंख्य शब्द मराठीत ठाण मांडून बसले आहेत. यातल्या काही शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द कोणी मराठी भाषाभिमानीही फारसा उच्चारताना दिसत नाही. आणखी एक बदल असा, की इंग्रजांनी इथे असताना मराठी भाषा शिकायला सुरुवात केली.
भौगोलिकदृष्टय़ा जवळ असलेल्या प्रदेशातील भाषांचा परिणामही परस्परांवर होत असतो. गुजरातीच्या संपर्कामुळे चोपडी, खेडूत यांबरोबरच अगाशी (गच्ची), भाव वधारणे, हे शब्द मराठीनं स्वीकारले. तसच तेलुगू, कन्नड, तमिळ आदींमुळे मराठीनं अण्णा, आप्पा, उपमा, गोंधळ हे शब्द, तर वसई, दादरा हवेली, गोमंतक येथील पोर्तुगीज आधिपत्याखालील प्रदेशातील भाषासंपर्कामुळे पगार, चावी, बिजागरी, घमेलं, पिंप आदी शब्द मराठीनं स्वीकारले. हिन्दीतील खिचडी, जिलेबी, कचोरी, धंदा, रोजगार, खटाटोप, उद्योग, आदी शब्द मराठीत आलेच, पण दूरचित्रवाणी, चित्रपटांच्या प्रभावामुळे तर हिन्दीचं मराठीवरील आक्रमण वाढतंच आहे. विशेषत: सांस्कृतिक क्षेत्रातील शब्दांत अदलाबदल होताना दिसत आहे. उदा. धन्यवाद, तापमान, स्थानीय (स्थानिक हा शब्द असतानाही), कक्ष आदि.
राजकीयदृष्टय़ा विचार केला तर लक्षात येतं की पूर्वी कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील राजांनी या दोन्ही भाषिक भूमीवर राज्य केलं आहे. त्यामुळे मराठी तिच्या जन्मापासूनच कन्नडच्या संस्कारात वाढलेली दिसते. शहाजी राजे, तंजावरचे व्यंकोजीराजे, राजाराम राजे इत्यादींमुळे तंजावर, धारवाड, जिंजी, म्हैसूर, बंगाल आदी प्रांतात जी महाराष्ट्रीय कुटुंबं गेली, स्थिरावली, त्यामुळे मराठी आणि त्या ठिकाणची भाषा यात देवाणघेवाण होत राहिली. अडकित्ता, अण्णा, केळवण, येळकोट, दिंडी, गुढी, अडगुळं-मडगुळं, ओंडका, गोणपाट, सोगा आदी कन्नड शब्द मराठीत आले.
हैदराबादमुळे तेलुगूशी जवळीक झाली. त्यातून तेलुगू भाषेवरही मराठीप्रमाणेच संस्कृतचा प्रभाव असल्यानं मराठवाडय़ातील काही भागातील मराठीवर तेलुगूचा प्रभाव दिसतो. त्यामुळे अनारसा, टाळा, गदारोळ, अळुमाळु इ. तेलुगू शब्द मराठी झाले. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर फार पूर्वी फ्रेंच, डच, पोर्तुगीज इ. लोकांच्या संपर्कामुळे मराठी भाषेत त्यांचे काही शब्द स्थिरावले. काडतूस, कूपन (फ्रेंच), इस्पिक (डच), हे शब्द मराठी झाले. अनेक वर्ष गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांमुळे तेथील संस्कृतीवर, तेथील कोंकणी, मराठीवर परिणाम झालेला दिसतो. खोटं वाटेल, पण असे संदर्भ मिळतात की, हापूस, पायरी, माणकूर, या आंब्यांच्या जाती आणि पपई, पेरू, भोपळा, काजू आदी लागवड कोकणात, गोव्यात म्हणे पोर्तुगीजांनीच केली. पगार, परात, चावी, इस्त्री, बंब, साबण, बादली, अलमारी, लिलाव, आदी पोर्तुगीज शब्द मराठीत आले आहेत. तेव्हा मराठी भाषेत कितीतरी इतरभाषिक शब्दांची सरमिसळ झालेली आहे. बदलणं हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. भाषा, समाज आणि संस्कृती यांचे संबंध अतूट असतात. समाजजीवन प्रवाही असल्यामुळे त्याला व्यक्तरूप देणाऱ्या भाषेला बदलावंच लागतं. हा बदल हळूहळू, सूक्ष्म रूपानं होत असल्यामुळे काही पिढय़ांनंतर तो जाणवू लागतो.
अनेक कारणांमुळे भाषांची घुसळण होतच असते. पण संपर्कासाठी, व्यवहारात भाषिक सौंदर्य राखून, आपलं, समाजाचं भलं करून घेण्यातच शहाणपण आहे, की माझी मायमराठी दूषित झाली म्हणून गळा काढायचा, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. चूक की बरोबर हा प्रश्न परिस्थितीनुसार बदलणारा आहे. उपजीविका महत्त्वाची म्हणूनच कोकणातील माणूस एकेकाळी देशावरील मोठय़ा शहरात आला. त्यानं तेथील मराठी आपल्या कोकणी भाषेत मुरवली. तीच गत आजची.
मोठय़ा शहरातील विद्यार्थी इतर प्रगत देशात जात आहेत आणि त्यासाठी इंग्रजी शिकत आहेत, जर्मन,जपानी आदी परदेशी भाषाही शिकत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी नको आहे असा तर होत नाही ना! पण शेवटी धाव भविष्याकडेच असणार आणि असावी, हे कुणी नाकारणार नाही. भूतकाळाचा अनुभव गाठीला घेऊन वर्तमानात वावरताना, भविष्याचा वेध घेतला तर काय चुकलं? तेव्हा भिन्न संस्कृतीच्या भिन्नभाषक लोकांशी संपर्क आल्यानं भाषाबदल होणं स्वाभाविक आहे.
‘एक आटपाट नगर होतं. तिथे एक..’ अशा अनेक कथा बालपणी आपण ऐकल्या आहेत. पण गंमत अशी, की ‘आटपाट’ हा शब्द अट्ट म्हणजे भरवस्तीचे आणि पट्ट म्हणजे विस्तृत या ‘अट्टपट्ट’ कन्नड शब्दावरून आला आहे. थोडक्यात काय, तर एका आटपाट नगरातील ही मराठी भाषेची सरमिसळ तुमच्या लक्षात आलीच असेल! पुढे यामध्ये आणखी कितीतरी भर पडेल ते माहीत नाही. मराठीची समृद्ध पताका अशीच फडकत राहो..
mangalagokhale22@gmail.com