|| –  मृदुला भाटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयीन कामामुळे गेली ३९ वर्ष त्यांचा-माझा फार जवळून संबंध आला. त्यांचा अप्रामाणिकपणा, कुचंबणा, अडचणी, गरजा, त्यांचे पैसे खाण्याचे किस्से, पण त्याच बरोबरीनं प्रामाणिक शौर्यकथाही अनुभवल्या. हे सगळं आपल्या समाजाचंच प्रतिबिंब, हे वारंवार अनुभवास आलं. पण पोलीस यंत्रणेकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्याशा वाटत असतील, तर या यंत्रणेत नागरिक म्हणून आपणही काही वाटा उचलणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

तेव्हा मी कायद्याची विद्यार्थिनी होते. घरच्या सखूबाईला हे माहिती असल्यामुळे ती एके दिवशी तिच्या आजूबाजूला काम करणाऱ्या तीन-चार मैत्रिणींना घेऊन आली. ‘‘ताई, आपल्या सोसायटीच्या मागे हातभट्टी लावलीय दादानं. आमचे नवरे पिऊन येतात, आम्हाला रोज मारतात. पैसा रोजच दादाच्या डोक्यावर जातोय. करा काहीतरी.’’

मी तक्रार लिहून माझ्या सहीसह सात-आठ बायकांच्या सह्या घेऊन पोलीस स्टेशनला देऊन आले. तशी पोलीस स्टेशनला जायची तेव्हा माझी दुसरी वेळ होती. चार-पाच वर्षांपूर्वी फग्र्युसन कॉलेजमध्ये असताना फग्र्युसन रस्त्यावर कॉलेजमध्ये जाणाऱ्या आम्हा मुलींना तिथल्याच एका वस्तीतल्या बायका-मुली रोज धक्के द्यायच्या, विनाकारण अंगावर थुंकायच्या. हा ‘क्लास कॉम्प्लेक्स’ होता. पण एकदा अति झालं, मग एकीबरोबर ‘रुपाली’ रेस्टॉरन्टसमोर एकमेकींच्या झिंज्या ओढून रस्त्यावर लोळून मारामारी केली होती. तेव्हा पोलिसांनी पकडून व्हॅनमधून पोलीस स्टेशनला नेलं. ‘नीट वागा, अभ्यास करा’ अशी सक्त ताकीद देऊन सोडून दिलं होतं, असा बरा अनुभव गाठीशी होता. या वेळी मात्र त्यापेक्षा एकदम वेगळा अनुभव आला.

 त्या संध्याकाळी माझ्या दारात दोन अनोळखी माणसं उभी ठाकली. ‘‘ताई, पोटासाठी आम्ही हातभट्टी लावतो. आधीच पोलिसाला ‘मॅनेज’ करावं लागतंय. तर तुम्हीपण कंप्लेंट देता.’’  मी त्यांना बायकांचे प्रश्न, मारहाण, वगैरेबद्दल मोठं लेक्चर दिलं. ते कंटाळून चेहऱ्यावर धमकीवजा भाव आणून निघून गेले. नगरसेवकालाही आम्ही कळवलं. कसं काय माहीत नाही, ती भट्टी बंद झाली. पण माझ्यासमोर वास्तव उभं करून, की तक्रारदाराचा पत्ता पोलीस गुन्हेगारांना देतात! मग हा पोलीस माझा मित्र की शत्रू? त्याचं उत्तर मला वेळोवेळी हेच मिळालं, की तो दोन्ही असतो.

 अनेकदा गुन्हेगाराऐवजी तक्रारदारालाच तक्रार नोंदवण्याच्या वेळकाढू दिव्यातून जावं लागतं. तीच गोष्ट पंचनाम्याची, तोच प्रश्न जप्त केल्या जाणाऱ्या मुद्देमालाचा. आज चोरलेली साखळी दहा वर्षांनंतर खटला झाल्यानंतर मिळणार. वास्तविक मुद्देमाल न्यायालयात अर्ज करून परत मिळू शकतो. केस संपलेली नसतानाही. पण आपल्याला कायदा माहितीच नसतो. पोलीस स्टेशनला चोरीच्या स्कूटर्स, गाडय़ा धूळ खात, मोडीत जाऊन पडलेल्या असतात. त्यातच पोलीस अनेक गोष्टी करतात. उदा. तक्रार नोंदवायला टाळाटाळ करणं, भलत्याच माणसाला गोवणं इत्यादी. ‘एन.डी.पी.एस.’च्या- अर्थात अमली पदार्थविरोधी प्रकरणांसाठीच्या कोर्टात असताना काय मुद्देमाल समोर येणार याची काळजीच वाटायची. कारण समजा चरसच्या ५० गोळय़ा सापडल्या असतील, तर त्या मोजल्यानंतर कधी त्या साठही असायच्या. म्हणजे त्या गोळय़ांना कस्टडीत पिल्लं झालेली असायची! कधी ‘क्ष’ आरोपीचा रक्तगट बदलून ‘य’ आरोपीचा झालेला असायचा. आरोपीचा जप्त केलेला लाल शर्ट कोर्टात उघडल्यावर पांढरा दिसायचा. तर काही उदाहरणं एकदमच वेगळी! माझी मैत्रीण विजया चौहान हिची चोरीला गेलेली सोन्याची वस्तू संबंधित आरोपीला तमिळनाडूत पकडल्यावर पोलिसांनी जप्त केलेली होती. तिला खटला संपल्यावर आठ वर्षांनी तमिळनाडूतून तिच्या सोन्यापेक्षा थोडासा जास्तच वजनाचा सोन्याचा गोळा पोस्टानं आला! हिंदूी सिनेमांमधला कधी अत्याचारी, कधी पैसे खाणारा, खोटय़ा आरोपांमध्ये साध्या माणसांना गुंतवणारा, कधी शूर, तर कधी अगदीच साधासुधा अशा प्रकारचं चित्रीकरण केलेला पोलीस मला वास्तवातला वाटतो.

    सुमारे ३४ वर्षांपूर्वी राजकीय आणि पोलिसी अत्याचारांचं चित्रण करणारा ‘प्रतिघात’ चित्रपट पाहिला होता. तो बघताना मी खूप रडले होते. ‘‘हा सगळा मेलोड्रामा आहे. तू कशाला रडतेस बावळटासारखी?’’ असं म्हणणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी मूकपणे सांगत होते, ‘‘नाही, हे सर्व खरं आहे. असं घडतं.’’ हा मेलोड्रामा नाही, तर हे आपल्या समाजाचं अंगावर येणारं प्रतिबिंब आहे. त्यामुळे आजही ‘जय भीम’मधलं राजा आणि संगिनीचं पोलिसांनी उध्वस्त केलेलं जग पाहताना मी तेवढीच रडते. नवीन भरती झालेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीशांच्या प्रशिक्षणात मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारतेच, ‘तुमच्यापैकी किती जण पोलीस स्टेशनला जाऊन आले आहेत?’ न्यायाधीशासमोर कडक ‘सॅल्यूट’ ठोकणारा पोलीस आणि पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांवर गुरगुरणारा पोलीस या फार वेगळय़ा गोष्टी आहेत. 

या संदर्भात मला अण्णांबरोबरचा (सासरे संगीतकार स्नेहल भाटकर) एक प्रसंग आठवतो. मी न्यायाधीश असताना अण्णांबरोबर भाजी आणायला आगर बाजारात चालले होते. मध्येच अण्णा म्हणाले, ‘‘चल आपण रस्ता क्रॉस करू.’’  मला कळेना, आमच्या बाजूच्या फूटपाथवर तर भाजी होती. २०० मीटरवर! 

 ‘‘अगं पोलीस येतोय.’’ 

 ‘‘मग?’’ 

‘‘नको नको..’’ असं म्हणत ते पलीकडे पोहोचलेही. मीही मग त्यांच्या मागे गेले.  माझ्या लक्षात आलं, अण्णांच्या मनातली ती भीती इंग्रज गोऱ्या पोलिसाची होती. प्रतिमा होती ती अत्याचारी, धरपकड करणाऱ्या पोलिसाची. स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली, तरी तो पोलीस त्यांचा शत्रूच राहिला होता. पण स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आमच्या पिढीला किंवा आताच्या पिढीला पोलीस मित्र वाटतो का?  माझी आजी नेहमी म्हणायची, ‘‘धाक बडी चीज हैं!’’ तिला भीती अभिप्रेत नव्हती. कायदा, पोलीस आणि प्रशासक यांचा धाक समाजात हवा. भीती नको. जेव्हा आपण लोकांची, लोकांनी, लोकांसाठी चालवलेली राजकीय व्यवस्था- म्हणजे ‘लोकशाही’ म्हणतो, तेव्हा या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग नितांत आवश्यक असतो. अन्यथा ती खऱ्या अर्थानं समंजस, सज्ञान लोकशाही होऊ शकत नाही. आचार, विचार, स्वातंत्र्याचा उच्चार करणं, जपणं, हे लोकशाहीत जितकं गरजेचं, तितकाच या यंत्रणेमधला तुमचा-माझा सहभाग आवश्यक. 

  पोलीस हा सर्वसामान्य नागरिकच असतो. पण ‘वर्दी’तून येणाऱ्या जबाबदाऱ्यांबरोबर मिळणारा अधिकारही तेवढाच मोठा. ही झाली एक बाजू. मला जाणवते आणि फार महत्त्वाची वाटते ती दुसरी बाजू. सर्वसामान्य नागरिकांचा या सबंध पोलीस यंत्रणेमध्ये असणारा उदासीन सहभाग. इंग्लंडमध्ये ‘ले मॅजिस्ट्रेट’ म्हणून सर्वसामान्य नागरिकाला वय १८ ते ६५ पर्यंत स्वेच्छेनं काम करता येतं. त्यात शासनाकडून मोबदला न घेता काम केलं जातं. तो त्यानं देशाला, समाजाला दिलेला वेळ असतो, ब्रिटिश नागरिकाचा हा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा सहभाग असतो. हे आपण करू शकतो का? होय! आधी ग्रामपंचायत असायची, पण आता हे सत्तेचे आखाडे झाले आहेत. त्यात आपला पोलीसही बिचारा भरडला जातोय. पोलिसाला ‘बिचारा’ म्हटल्यावर कितीतरी भुवया उंचावल्या जातील, पण त्याची ही बाजूही न्यायाधीश असताना समोर आलेली. सतत सत्ताधारी आणि वरिष्ठांच्या दबावानं मजबूर असलेला, बदलीच्या भीतीनं घाबरलेला, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या पुढे-मागे पळणारा, असाही पोलीस समोर आलेला. सर्वोच्च न्यायालयानं पोलीस यंत्रणा ही सर्व दबावांपासून मुक्त असावी म्हणून वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, पण सर्वसामान्य नागरिकाला त्यांच्या भ्रष्टाचार आणि उद्धटपणा यांचा अनुभव जास्त येतो.  

 काहींच्या डोक्यात हा मजेदार ‘पांडू हवालदार’ म्हणून आहे, तर काहींना तो ‘सिंघम’ वाटतो. रमेश (भाटकर) जेव्हा ‘हॅलो इन्स्पेक्टर’ मालिका करायचा, तेव्हा कितीतरी छोटी मुलं आणि मोठी माणसंही त्याला ‘हॅलो, हॅलो, हॅलो इन्स्पेक्टर’ म्हणून प्रेमानं हाक मारायची. तो त्यांना हवाहवासा पोलीस होता.

पण मला अंतर्मुख करतो, तो अण्णांच्या मनातला पोलीस!

 पोलिसांचं काही वेळा असंवेदनशील असणं, लोकांच्या वेळेविषयी बेपर्वा असणं, हे खरं तर आपल्याच समाजाचं प्रतिबिंब आहे. मात्र त्या प्रतिबिंबाला चौकट आहे ती सत्तेची, वर्दीची. त्यामुळे ती आपल्याला जास्त बोचते. कायदा, सुरक्षा आणि सुव्यवस्था या त्रिसूत्रींची न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन यांकडून आपली अपेक्षा असते. भीती आणि स्वत:चं रक्षण या आदिम प्रेरणा घेऊन प्रत्येक प्राणिमात्र जगतो. पण माणसानं त्याच्या सुपीक मेंदूतून जगणं सुलभ करण्यासाठी ज्या काही विविध सामाजिक रचना बनवल्या, त्यातली आधुनिक काळातली व्यवस्था म्हणजे पोलीस! न्यायालयीन कामामुळे गेली ३९ वर्ष त्यांचा-माझा फार जवळून संबंध आला. त्यांचा अप्रामाणिकपणा, कुचंबणा, अडचणी, गरजा, त्यांचे पैसे खाण्याचे किस्से ऐकले, पण त्याचबरोबरीनं प्रामाणिक शौर्यकथाही अनुभवल्या.  सहभागाबद्दल बोलताना मला अधोरेखित करायचा असतो, तुमचा-माझा तक्रारदार, साक्षीदार, पंच म्हणून तपासकामातील सहभाग. वेळ जातो, पोलीस त्रास देतात, गुन्हेगारही धमकी देतात, कोर्टात किती चकरा मारायच्या इत्यादींमुळे आपण कोणत्याही अपघात, चोरी वा त्यांच्या तपासकामापासून दूरच राहतो. पण आपल्याला रोजचं सुरक्षित जगणं देणारी, आपल्या घराचं रक्षण करणारी ही जी यंत्रणा आहे, ती आपल्यासाठी काय काय करते याचा थोडासा विचार करायला हवा. एकदा तरी या यंत्रणेचा आपण जवळचा भाग का होऊ नये? कदाचित लक्षात येईल, की एवढी भीती बाळगण्याचं कारण नव्हतंच या  यंत्रणेची! आपल्याला त्यांना प्रश्न विचारण्याचा आणि त्यांच्याशी भांडण्याचा अधिकार आहे, तो विसरता कामा नये.  

 माझ्याबरोबर काम करणारे ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’मधील माजी सहकारी प्रवीण दीक्षित हे जेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते, त्या वेळेस त्यांचे महाराष्ट्रभर सुमारे ५ लाख ‘पोलीस मित्र’ होते. ‘पोलीस मित्र’ हे नागरिकांच्या सहभागाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पोलीस मित्र होण्यासाठी तुम्ही जिथे राहता त्या भागातल्या पोलीस निरीक्षकांकडे एक फॉर्म भरून द्यावा लागतो. पोलीस मित्राच्या विरुद्ध कुठल्याही फौजदारी गुन्ह्याची नोंद नसणं गरजेचं. अशी कोणतीही सज्ञान व्यक्ती पोलीस मित्र म्हणून काम करू शकते. पोलीस मित्र आणि खबऱ्या (informer) या दोन वेगळय़ा बाबी आहेत. खबऱ्या हा खूपदा गुन्हेगारी विश्वातील व्यक्ती असू शकते, पण पोलीस मित्र तसा नसतो. अर्थात लोकांच्या सहभागाचा योग्य प्रकारे आणि कल्पक उपयोग कसा आणि किती करायचा, हे त्या त्या भागातील पोलीस प्रमुखावर अवलंबून!

प्रवीण दीक्षित नागपूर येथे पोलीस आयुक्त असताना माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणी समाजकंटकांनी थोडा खराब केला होता. त्या घटनेनंतर साहजिकच अतिशय तीव्र प्रतिक्रिया समाजातून तातडीनं व्यक्त झाली आणि काही हजारांचा जमाव त्या पुतळय़ाजवळ जमला. दीक्षित तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की जमाव कधीही हिंसक बनू शकेल. त्या जमावाला नियंत्रित करणं किंवा तो पांगवणं या दोन्ही गोष्टी जिकिरीच्या होत्या. तेवढय़ात एक वयस्कर बाई त्या हिंसक होणाऱ्या जमावाला अचानकपणे सामोऱ्या गेल्या आणि पुतळय़ाजवळ उभ्या राहून त्यांनी जमावाला सांगितलं, की ‘‘मी पोलीस मित्र आहे. इकडे पोलीस आलेले आहेत आणि हे घृणास्पद कृत्य ज्यांनी केलं त्यांचा तपास करून त्यांना ते निश्चित अटक करतील. पोलिसांना हे काम करू द्या. आपण इथून त्यांना शांतपणे काम करण्यासाठी मार्ग मोकळा करू.’’ त्या बाईंच्या वाक्यांनी त्या जमावाच्या मानसिकतेवर आश्चर्यकारक परिणाम केला आणि जमाव तिथून शांतपणे पांगला. सर्वसामान्य माणसाचा सहभाग आणि त्यात असणारी शक्ती याचं हे जिवंत उदाहरण आहे.

  मला असं वाटतं, की अनेकदा शत्रूचा शोध घेतल्यावर आपल्याला शत्रू सापडतो; तो दुसरं कोणी नाही, पण आपणच असतो. (We found the enemy and it is us!) एकदा १५ ऑगस्टला सकाळी ६ वाजता फिरायला निघाले होते. एक छोटा मुलगा झेंडे विकत होता. मला धातूचा तिरंगा झेंडा हवा होता. एक झेंडा २० रुपयांना होता. माझ्या आधी एक तरुण झेंडे निवडत होता. तेवढय़ात कडक इस्त्रीच्या वर्दीतला पोलीस मोटारसायकलवरून आला आणि पाय टेकवून त्याने त्या मुलाकडून दोन धातूचे तिरंगे घेतले. मी पाहत होते मुद्दाम, की तो पोलीस पैसे देतोय की नाही.. तेवढय़ात पोलिसानं छोटय़ाला द्यायला ५० रुपयांची नोट काढली. इतक्यात सोबतच्या तरुणानं स्वत:

१०० रुपयांची नोट झेंडे विकणाऱ्याला दिली नि पोलिसाला म्हणाला, ‘‘थांबा, मी देतो ते पैसे. तुम्ही खूप काम करता. एवढं करू द्या तुमच्यासाठी!’’  तेव्हा त्या तरुणाच्या आणि पोलिसाच्या हसण्यात मला माझा देशच हसला असं वाटलं!

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author mridula bhatkar article gele lihayache rahun memories court student laws informer police akp
Show comments