शुभांगी पुणतांबेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक छोटीशी मुलगी. जेमतेम अडीच वर्षांची झाली आणि तिचं लग्न करून देण्यात आलं. नवरा सात-आठ वर्षांचा! पण ही ‘लहान’ म्हणून माहेरीच राहिली. सासर जवळच, म्हणून नवरा-बायको एकत्रच वाढले, खेळले-बागडले. एवढंच नाही, तर कलेची जोपासनाही दोघांनी एकत्रच केली. या मुलीला गाण्याची, नाचण्याची खूप आवड. अंगभूत कसबही होतंच. ‘मी कलाकार होणार’ असं ती म्हणत होती. पण नेमकं हेच तिच्या वडिलांना नको होतं.
कलाकाराचं आयुष्य अस्थिर असतं, असं त्यांचं मत. म्हणून त्यांचा विरोध. पण या मुलीनं नाचणं-गाणं सोडलं नाही, म्हणून चिडून एकदा वडिलांनी पाच-सहा वर्षांच्या तिला उचलून चक्क विहिरीत फेकलं. नशीब, विहिरीत पाणी कमी होतं. ती वाचली. सगळय़ांनी वडिलांना खूप समजावलं. शेवटी वडिलांचा राग गेला आणि त्यांनी तिला नाच-गाणं शिकायला परवानगी दिली. मग ही मुलगी दुप्पट जोमानं सराव करायला लागली. पंथी, पंडवानी या लोककलांच्या अभ्यासात, सरावात आणि सादरीकरणात तिनं स्वत:ला झोकून दिलं. नवरा साथीला होताच. त्या कलेत पुढे ती एवढी मोठी झाली, की तिला या वर्षी ‘पद्मश्री’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

ही आहे छत्तीसगडच्या ज्येष्ठ कलाकार उषा बारले यांची गोष्ट. पंथी आणि पंडवानी या लोककलांच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी उषा यांनी जिवाचं रान केलं. देशा-परदेशांत त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्या त्यांच्या संस्थेत अनेकांना ही कला विनामूल्य शिकवतात. पण त्यांचा जीवनपट उलगडण्यापूर्वी ‘पंथी’ आणि ‘पंडवानी’ म्हणजे काय ते जाणून घेणं गरजेचं आहे. छत्तीसगडला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक जातीजमाती तिथे आहेत. प्रत्येक जातीची स्वत:ची लयबद्ध लोककला आहे. त्यातलं सर्वात प्रसिद्ध ‘पंडवानी’. पंडवानीचा अर्थ ‘पांडववाणी’. यात पांडवांच्या कथा श्लोक, गाणी, नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या जातात. गोंड समाजातल्या परधान आणि देवर जातींची ही गायन परंपरा. २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानं सन्मानित तीजनबाई यांचं या लोककलेच्या प्रसारात मोठं योगदान आहे. या तीजनबाई उषा बारले यांच्या गुरू. पौराणिक वेशभूषा, दागिने लेऊन अतिशय उत्कटपणे हे सादरीकरण केलं जातं. सगळे प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळय़ांपुढे उभे राहतात. यात एक मुख्य कलाकार असतो. काही सहगायक, वादक असतात. मुख्य कलाकार एकापाठोपाठ एक कथा सादर करतो. हातातल्या एकतारीच्या तारा छेडत त्या लयीत गाणी सादर करतो, अभिनयही करतो. याच्या ‘वेदमती’ आणि ‘कपालिक’ अशा दोन शैली आहेत. उषा या ‘कपालिक’ शैलीच्या कलाकार आहेत. सतनाम पंथाकडून ‘पंथी’ नृत्य सादर केलं जातं. त्यांचे आध्यात्मिक गुरू घासीदास यांच्या चरित्राचं गायन त्यात केलं जातं.

पंथी, पंडवानीचा प्रसार करणं, रसिकांना रिझवणं हीच जीवनाची उद्दिष्टं मानणाऱ्या उषा यांचा जन्म २ मे १९६८ रोजी, मध्य प्रदेशातल्या भिलाई इथे झाला. अगदी लहान वयातच त्यांनी मोठय़ा कलाकारांचं गाणं ऐकलं. ते त्यांच्या मनात रुजलं, रक्तात भिनलं. त्या लहान असतानाच त्यांच्या फुफांनी- म्हणजे आत्याच्या यजमानांनी- मेहेत्तरदास बघेल यांनी त्यांना शिकवायची जबाबदारी घेतली आणि त्यांचं रीतसर गायनशिक्षण सुरू झालं. त्या सात वर्षांच्या असताना फुफांनी त्यांना पंथीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. फक्त चौथी उत्तीर्ण एवढंच उषांचं शिक्षण. पण त्यामुळे त्यांचं फारसं काही अडलं नाही. फुफांनी त्यांना ‘पंडवानी’चं शिक्षण द्यायला सुरूवात केली. खूप प्रोत्साहन दिलं, मेहनत करवून घेतली. रात्रभर रियाज आणि सराव चालायचा, तरी दमणं ठाऊक नव्हतं त्यांना. फुफांचा त्यांच्यावर विश्वास होता. ते म्हणायचे, ‘‘एक दिवस तू आपल्या गावाचंच नाही, तर देशाचंही नाव उज्ज्वल करशील.’’ अर्थातच उषा यांनी तो विश्वास सार्थ ठरवला.

पंडवानीचं प्राथमिक शिक्षण फुफांकडे घेतल्यावर त्या पुढच्या शिक्षणासाठी तीजनबाई यांच्याकडे गेल्या. सासरची आर्थिक स्थिती बेताचीच. पण तरीही त्यांच्या सासरच्यांनी आडकाठी केली नाही. घरच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी त्या भिलाईत दारोदार जाऊन फळं विकायच्या. घरच्या पािठब्याच्या बळावर त्या कार्यक्रम करू लागल्या. चौंका भजनंसुद्धा शिकल्या. नुसतं सादरीकरण नाही, तर कार्यक्रमांचं आयोजन, व्यवस्थापनही त्या उत्तमरीत्या करत. छोटय़ाश्या गावात कोणत्याही सुविधा नसताना, तंत्रज्ञान उपलब्ध नसताना, आर्थिक स्थिती ओढगस्तीची असतानाही त्यांनी अपार जिद्दीनं उत्तुंग कारकीर्द घडवली. नंतर हळूहळू तंत्रज्ञानाशीही जुळवून घेतलं. त्यांच्या कार्यक्रमांच्या, गाण्यांच्या कॅसेट्स निघाल्या. आताही ‘युटय़ूब’वर त्यांचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतात.

उषा बारले ‘आकाशवाणी’च्या ‘अ श्रेणी’च्या कलाकारही आहेत. आकाशवाणीवर, तसंच दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आध्यात्मिक गुरू घासीदास यांचं चरित्र ‘पंडवानी’मध्ये सादर करणाऱ्या त्या पहिल्या कलाकार. त्यांचा एक वेगळा पैलू म्हणजे, छत्तीसगड स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून झालेल्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे.पती अमरदास बारले यांचं अनमोल सहकार्य, पाठिंबा, उत्तेजन, साथसंगत यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो, असं त्या कृतज्ञतेनं सांगतात. आध्यात्मिक गुरू, सहकलाकार, सासरचे लोक, मुलं आणि मुख्य म्हणजे रसिकांचे आपल्यावर खूप उपकार आहेत, असंही सांगतात. अनेक मान-सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे. गिरोधपुरी वा गिरौदपुरी तपोभूमीमध्ये सहा वेळा त्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे. छत्तीसगड सरकारचा ‘गुरू घासीदास सामाजिक चेतना पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ‘भिलाई स्टील प्लांट प्रबंधन’ यांच्या ‘दाऊ महासिंग चंद्राकार पुरस्कारा’नंही त्या सन्मानित आहेत. या साऱ्या पुरस्कारांचा कळस म्हणजे ‘पद्मश्री’. ‘हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. घरातल्या सगळय़ांनी एकमेकांना मिठय़ा मारून, रडून आनंद साजरा केला,’ असं त्या सांगतात.

‘पद्मश्री’चा सन्मान मिळाला म्हणून त्या थांबणार नाहीतच. रियाज सुरूच ठेवणार आहेत. त्या सांगतात, ‘‘मला पैसा नको, पण माझ्यापाशी असलेली कला मला इतरार्ंयत पोहोचवायची आहे. राज्य सरकारनं पंडवानीसाठी वर्ग सुरू केले, तर मी मोबदला न घेता शिकवीन. आता माझी एकच इच्छा आहे, मंचावर कार्यक्रम सादर करत असतानाच मरण यावं!..’’

puntambekar.shubhangi@gmail.com