|| स्टॅन्ली गोन्सालविस

मुलासाठी आसुसलेल्या व्हॅलेरिना आणि सेलेस्तिन यांनी मूल दत्तक घ्यायचा विचार के ला आणि अनाथाश्रमातून घरी आणलेल्या गोंडस मुलाला खेळवताना त्यांना दिवस पुरेना! पण एक अगदी अनपेक्षित गोष्ट घडली आणि त्यांचा हा आनंद अल्पजीवी ठरला… तरी हे दाम्पत्य खचलं नाही. पुन्हा नव्यानं सुरुवात करत आला क्षण ते समरसून जगू लागले. मात्र ते जगत असताना, आई एकच व सदाची असते, यावर विश्वास असणाऱ्या व्हॅलेरिना यांच्यातल्या ‘आईपणा’चा कस लागला आणि त्यांचं मातृत्व तावून-सुलाखून झळाळून उठलं; पण…

प्रसूतीच्या कळा आणि वेदना सोसत आपल्या रक्त-मांसावर जोपासलेला नुकताच जन्मलेला जीव डोळे भरून पाहिला, की मातेचा देह-मन तृप्तीनं काठोकाठ भरून जातं. स्त्री-देहाच्या परिपूर्णतेचा गौरव ती रोमारोमांतून उपभोगत असते. मात्र मातृत्वाची ही धग काही जणींना नको असते, तर हा सर्जनसोहळा अनुभवण्याची असोशी ज्यांच्यात असते, त्यांपैकी अनेकींना ही सुखभावना कधीच लाभत नाही; हाही एक विरोधाभास! व्हॅलेरिना त्यांपैकीच एक…

त्यांचे पती सेलेस्तीन डिमेलो. परस्परांशी पूर्णत: समरूप झालेलं हे सुविद्य, समस्वभावी जोडपं. अपत्यप्राप्ती ही एरवी बहुसंख्य जोडप्यांच्या बाबतीत सहजप्राप्य असलेली बाब त्यांना हुलकावणी देत राहिली. सातत्यानं प्रार्थना-चिंतनात असलेल्या या जोडप्याला मनोदेवतेचा कौल मिळाला- ‘होऊ या अनाथांचे नाथ!’ मुंबईला ‘मदर तेरेसा अनाथाश्रमा’त त्यांनी पाऊल टाकलं. नवजात मूल दत्तक घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. कोणी माता आपलं नकोसं बाळ आश्रमात सोडून गेली होती. मुलगा होता. गोरा, लालबुंद. आक्रोशत होता पान्ह्यासाठी. सिस्टरने त्याला उचलून व्हॅलेरिनांच्या हातात दिलं. त्यांनी बाळाला उराशी धरलं. तो उबदार स्पर्श लाभताच बाळ शांत झालं. त्यांच्यात उमलून आलेलं हे आईपण निरखताना सेलेस्तीन हरखून गेले. बाळ घरी आलं आणि व्हॅलेरिनांनी त्यांच्या रेल्वेच्या नोकरीतून दीर्घ सुटी घेतली. सडसडीत बांध्याच्या, सदा तजेलदार वाटणाऱ्या त्यांच्या प्रसन्न मुखावर आता अधिकच झळाळी दिसू लागली. सेलेस्तीनही उत्साहानं आपल्या सामाजिक कार्याला लागले. त्या वेळी चालू असलेल्या ‘हरित वसई’च्या चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं.  ते तसे हौशी नाटकवेडे. त्यांच्यातील कलावंताला आता नव्यानं प्रतिभेचे कोंब फुटू लागले. ‘प्रीत माझी युगेयुगे’ या संगीत-नृत्य-नाट्याची त्यांनी निर्मिती केली.  गावागावांतून त्याचे प्रयोग सुरू केले. दरम्यान, त्यांनी बांधावयास घेतलेलं घरकुल- ‘सिनाय’ पूर्ण झालं.

बाळाचा नामकरण विधी त्यांनी नव्या घरात जोशात साजरा केला. बाळ ‘निवेन’मुळे त्या घरात आनंद आला; पण अचानक एके दिवशी निवेनला ताप आला. त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. ताप उतरला, पण दोन दिवसांनी पुन्हा चढला. या तापात त्याला आकडी येऊ लागली. मग मोठ्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले. सुमारे दोन महिने रुग्णालयात ठेवावं लागलं. व्हॅलेरिना तिथेच मुक्काम ठोकून राहिल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी एक दिवस सांगितलं, की बाळामध्ये जन्मजात दोष आहेत. बाळ मतिमंद आहे. त्यावर औषधोपचार नाहीत. तुमचं प्रेम हाच एकमेव उपाय आहे! परिस्थिती अशा वळणवाटेवर आणून सोडील, याची त्या दोघांना कल्पना नव्हती. काळोख्या भवितव्याच्या कल्पनेनं मन अस्वस्थ झालं. आश्रमातील सिस्टर्स नेमानं बाळाची चौकशी करीत होत्या. निवेनला आयुष्यभर दिव्यांग म्हणून जगावं लागणार हे कळताच त्या वसईला आल्या. म्हणाल्या, ‘‘बाळाला परत द्या. तुम्हाला अशा मुलाचा सांभाळ करणं कठीण होईल. आम्ही त्याची काळजी घेऊ. तुम्हाला दुसरं मूल दत्तक देऊ.’’

प्रकाशाची तिरीप समोर आली. पर्याय सोपा होता. आयुष्यभराचं ओझं बाजूला ठेवून, नव्या वाटेवरून सुखाचा प्रवास सुरूकरता येणार होता; पण दोघांनीही ठाम नकार दिला. व्हॅलेरिना म्हणाल्या, ‘‘आई एकच व सदाची असते. बाळ कसाही असला तरी तो आता आमचा आहे व आमचाच राहील. आम्ही कधीच बाळाची अदलाबदल करणार नाही.’’

आणि त्यांच्या पालकत्वाच्या अग्निपरीक्षेला सुरुवात झाली. निवेन हा ‘विशेष’ मुलगा होता. त्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता होती. व्हॅलेरिनांनी आपली उत्तम पगाराची रेल्वेतील नोकरी सोडली. सेलेस्तीन यांनी त्यांची सामाजिक, सांस्कृतिक कार्यं कमी केली. दोघांनी स्वत:ला निवेनच्या संगोपनात वाहून घेतलं. काळ पुढे सरकत होता. निवेनला त्यांनी दिव्यांगांच्या शाळेत घातलं; पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. वयानुसार त्याची शारीरिक वाढ पुरेशी नव्हती. बौद्धिक वाढही खुंटलेली होती. त्याला उभं राहता येत नव्हतं. दुमडलेल्या पायांवर पाश्र्वभाग घासत तो पुढे सरकायचा. निसर्गधर्म पाळण्याची उपजत बुद्धी त्याच्यात नव्हती. बोलणं तोतरं होतं. मतिमंद आणि गतिमंद अशा निवेनवर चोवीस तास लक्ष ठेवावं लागे. तो कधी चिडायचा, आदळआपट करायचा. त्याला समजावताना सहनशक्ती पणाला लावावी लागे. सतत त्याच्या कलानं घेणं ही नोकरचाकरांना जमणारी बाब नव्हती. त्याला घेऊन कुठे बाहेर गेलं तरी त्याची आरडाओरड, इतरांना बोचकारणं यामुळे त्याला आवरणं कठीण जायचं. त्यामुळे दोघांपैकी एकानं कायम निवेनजवळ राहायचं, असं व्हॅलेरिना व सेलेस्तीन यांनी ठरवून टाकलं. बाजारहाट, चर्च, लग्न समारंभ, सहल वा अन्यत्र ती दोघं कधीही एकत्र गेली नाहीत, गेली पंचवीस वर्षं!

लोक दयाभावनेनं, दु:खी चेहऱ्यानं निवेनची चौकशी करत, तेव्हा व्हॅलेरिना हसत हसत सांगायच्या, ‘‘आईपणात हे सारं सामावलेलं आहे. आम्ही ते विचारपूर्वक स्वीकारलं आहे. दोघांनी वाटून घेतलेला हा आमचा आनंद आहे.’’ आपल्या इतरांकडून, अगदी निकटवर्तीयांकडून अपेक्षा या गोड गोड सुखा-आनंदाच्या असतात. मात्र अंगाला तोशीस लागेल असं काही अनपेक्षित घडलं, की आपण भेलकांडून जातो. त्यामुळेच सुरक्षिततेचे सर्व गड-कोट स्वत:भोवती उभारून चालणाऱ्या आम्हाला तिच्या आनंदाची ही व्याख्या समजणं कठीण होतं! एक दिवस त्या दोघांनी सर्वांना आणखी एक धक्का दिला. त्यांनी आणखी एक बाळ दत्तक घेतलं, तीही मुलगी! कमावत्या, सुस्थापित घरांतून आताशा एकच मूल असताना, पदरी एक मतिमंद मुलगा असूनही दुसरी मुलगी दत्तक घेणाऱ्या या दाम्पत्याबद्दल कौतुकोद्गार निघाले, तसेच ‘कसं सांभाळणार दोघांना?’ असे चिंतेचे सूरही कानी पडू लागले; पण त्या दोघांनी विचारांती निर्णय घेतला होता, की निवेनला बहीण आणायची!

सुरेक्ता घरी आली. ती शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या पूर्णत: सक्षम, निरोगी होती. बुद्धिमान व समंजस सुरेक्तानं आपल्या भावाची अवस्था खूप लवकर जाणली. या विकलांग भावावर ती खूप प्रेम करू लागली. निवेन कधी इतरांचं ऐकत नाही, त्रागा करतो, तेव्हा तो सुरेक्ताची दटावणी मुकाट स्वीकारतो. त्याचे बदलते मूड, हट्ट, राग, आवडीनिवडी व्हॅलेरिना अचूक जाणायच्या. त्यांचाही प्रत्येक शब्द तो झेलायचा. मात्र, सेलेस्तीनचं अव्यक्त प्रेम समजूनही तो त्याला दाद देत नसे. तरी मनोकायिक दुखणं घेऊन जन्माला आलेला निवेन या तिघांच्या मायेत सुखरूप वाढत होता. निवेन आता पंचवीस वर्षांचा झालाय. तारुण्यातील त्याचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनले आहेत. दुसरीकडे डॅडी-मम्मीच्या सावलीत व सुसंस्कारांत वाढणारी सुरेक्ताही मोठी झाली आहे. ती अभ्यासात हुशार, चुणचुणीत व सभाधीट आहे. इंग्रजी माध्यमात शिकूनही तिचे मराठीचे उच्चार डॅडींसारखेच निर्दोष आणि खणखणीत आहेत. तिच्या उंच डॅडींच्या ती खांद्याला भिडली आहे. कधी डॅडी, तर कधी मम्मीचा हात धरून ताठ चालीनं तिला जाता- येताना पाहिलं, की पाहाणाऱ्यांच्या नजरा कौतुकभरल्या होतात.  घरात आनंदाचं कारंजं उडवणारी ही उत्फुल्ल  युवती आता ‘एम.एस्सी.’चा अभ्यास करतेय. देव एका बाजूनं काढून घेतो, तेव्हा तो दुसऱ्या बाजूनं देत राहतो, असं म्हणतात.  त्याचं देणं-घेणं हसतमुखानं स्वीकारलं, की दु:खाचंही सोनं होऊन जातं. या दाम्पत्यानं जे वाट्याला आलं ते विधात्याचं दान म्हणून पावन मानलं आणि ठरवून अनुसरलेला वेगळा मार्ग अविचलपणे चालत राहिले. दोन अनाथ बालकांवर आपल्या मातृ-पितृप्रेमाचा वर्षाव करताना आपण काही जगावेगळं करत आहोत, असा आव त्यांनी कधी आणला नाही. आपल्या मुलांची सर्वस्वानं पाठराखण करत राहिले.

सेलेस्तीन यांची पंचाहत्तरी पूर्ण झाली. व्हॅलेरिनाही ६७ वर्षांच्या झाल्या. आता आयुष्याच्या उत्तरायणात प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं मावळतीचं उबदार सूर्यबिंब हाती लागत आहेसं त्यांना वाटत होतं. सुरेक्ताच्या रूपानं संसारकथा सुफळ होण्याची स्वप्नं त्यांच्याही क्षितिजावर फुलत होती; पण ध्यानीमनी नसताना करोनाच्या काळदूतानं ‘सिनाय’चा दरवाजा ठोठावला. निवेन, सुरेक्ता आणि सेलेस्तीनना त्यानं स्पर्श केला. सेलेस्तीनना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, सुरेक्ताला घरातच विलगीकरणात ठेवावं लागलं; पण ज्याला कधी क्षणभर नजरेआड होऊ दिलं नव्हतं, त्या निवेनला बंद दाराआड कसं ठेवणार? जिवलगांच्या काळजीनं व्हॅलेरिना सैरभैर झाल्या. तिघांसाठी धावाधाव करताना त्यांचा ऊर धपापू लागला. आपल्या हास्यातून इतरांना उभारी देणाऱ्या व्हॅलेरिनांना गळून गेल्यासारखं वाटू लागलं. जिवाला जीव लावणाऱ्या त्यांच्या तीन भगिनी होत्या; पण परिस्थितीचा प्रत्यक्ष क्रूस तर व्हॅलेरिना यांनाच वाहायचा होता. आजवर त्यांची अशी कधी घालमेल उडाली नव्हती. खचणाऱ्या, दमणाऱ्या त्या खचितच नव्हत्या. व्हॅलेरिनांचा थकवा त्यांना वाटत होतं तसा या धावपळीतून आलेला नव्हता. शेवटी बहिणी त्यांच्या मागेच लागल्या म्हणून त्यांनी आपल्या चाचण्या घेतल्या. सर्वांच्या मनातील शंका खरी ठरली. व्हॅलेरिना मुलांभोवती स्वत:च्या देह-मनाचं कडं करून ‘करोना’चे वार झेलत होत्या. पण त्यांना स्वत:वरचा वार परतवता आला नाही. उशीर झाला, खूपच उशीर झाला. करोनानं त्यांचंही शरीर पोखरलं होतं. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. पुन्हा एक झुंज सुरू झाली. महिनाभराची ती लढाई अखेर ‘ईश्वरेच्छा बलियसी’ ठरली!

मरणविळख्यातून सेलेस्तीन वाचले. मुलंही सुरक्षित राहिली; पण आपला प्राणसखा व दोन पिल्लांना मागे ठेवून व्हॅलेरिना प्रभुधामी गेल्या. निगुतीनं उभारलेल्या घराची एक भिंतच कोसळली. असंख्य प्रश्नांचा ढिगारा आता समोर विखुरला आहे.

 स्वत:ला वजा करीत त्या जगल्या, सावली बनल्या मुलांची. अस्सल, सोनवर्खी असं हे त्यांचं आईपण. मातृत्वाची ही आकाशउंची. आमच्या खुज्या नजरेच्या आवाक्यात न येणारी!

stanleyg2013@gmail.com  

Story img Loader