युगंधरा वळसंगकर

जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं म्हणजे आयुष्य. मानवी जीवनात सगळय़ात महत्त्वाचं काय असेल, तर हे आयुष्य सुसह्यपणे जगणं. आपलं जीवन हे सुख आणि दु:ख या दोन्हीनी भरलेलं आहे. अनेक प्रकारच्या दु:खांशी सामना करत करत आपण सुख शोधायचा प्रयत्न करत असतो. त्यातूनच सापडत जातो, आयुष्याचा अर्थ.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

वयाच्या पन्नाशीनंतर मागे वळून पाहाताना सुखाच्या कमी, पण दु:खाच्याच आठवणी मनात रुंजी घालू लागतात. मी इयत्ता तिसरीमध्ये असताना ‘आईला खूप मोठा आजार झालाय आणि तीन महिने ती काका-काकूंकडे राहाणार आहे,’ असं (त्या वेळी माझ्या बालबुद्धीला पटेल असं) मला सांगण्यात आलं होतं. मोठी होत गेले, तसं आईच्या आजारपणाचं खरं कारण कळलं, की तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. आई बरी झाली आणि काका-काकूंनी, इतरांनीही ज्या प्रकारे तिला सांभाळलं, त्यामागे होती, आई-पप्पांनी जपलेली नाती. ते मला कळत गेलं आणि आयुष्याचा अर्थ उमगत गेला.

प्रसिद्ध अभिनेत्री-निर्मात्या स्मिता तळवलकरांनी एकदा मुलाखतीत सांगितल्याचं आठवतं, की ‘घर श्रीमंताचं कसं ओळखायचं? तर ज्या घरासमोर चपलांचा ढीग, ते घर श्रीमंताचं!’ अगदी तसंच आमचं चाळीतलं घर होतं. नाती- मग ती रक्ताची असोत, मानलेली असोत, मैत्रीची असोत, आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची असतात. हे चाळीतल्या त्या दहा-बाय-दहाच्या खोलीतल्या वास्तव्यानं नसानसात भिनवलं. दिवाळीत बाळगोपाळांनी किल्ला बनवणं, त्यात प्रत्येक जागी मावळय़ांना उभं करणं, किल्ल्यातल्या आयुधांची (तोफगोळे, ढाल, तलवारी) पूजा करणं, या कृती जणू काही जीवन जगण्याचं सूत्रच सांगून जातात. बालपणीचा काळ आर्थिक सुख नाही, पण मानसिक आनंद देऊन गेला. परंतु सतत आनंदी ठेवणं बाप्पाला परवडणारं नव्हतं म्हणून की काय, पुन्हा एकदा आमच्या कुटुंबासमोर संकटाला आणून उभं केलं. माझ्या वडिलांना कामावर असताना अपघात झाला. औषधोपचार सुरू असताना त्यांना चुकीचं इंजेक्शन दिलं गेल्यामुळे अर्धागवायूचा झटका आला. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा मोठी बहीण दहावीत, भाऊ सातवीत आणि मी पाचवीत होतो. आमच्या तिघांचंही कमवण्याचं वय नव्हतं. आईचं शिक्षण बेताचंच, परंतु अतिशय कष्ट करण्याची तयारी आणि त्यात माझ्या मामा-मामींनी दिलेली साथ. त्यामुळेच संकटांना पळवून लावण्यात आम्ही यशस्वी झालो. वडील पूर्णपणे बरे झाले आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागले. सुखापेक्षा दु:खातच नात्यांची खरी किंमत कळते. त्यामुळे जीवन जगण्याचा खरा अर्थ पुन्हा नव्यानं कळत जातो.

आमच्या वेळी दहावीची परीक्षा झाली, की टायिपग शिकायचं हे सगळय़ांचं ठरलेलंच असायचं. मीही त्याला अपवाद नव्हते. टायिपगमध्ये बऱ्यापैकी गती होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता एका इन्स्टिटय़ूटमध्ये टायिपग इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी करत होते. जवळजवळ महिनाभर नोकरी केल्यानंतर नोकरीचा मोबदला न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्या वेळी ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीचा चांगलाच प्रत्यय आला, पण आयुष्यातला एक मोठा धडा शिकवूनच.

मला शाळेत असल्यापासूनच नाटकाची आवड होती. पुढे महाविद्यालयात गेल्यावरही एकांकिका स्पर्धा, राज्य नाटय़ स्पर्धामध्ये मी भाग घेऊ लागले. यातून माझी अभिनयाची आवड जोपासली गेलीच, शिवाय अनेक पारितोषिकंही मिळाली. रेडिओ ऐकण्याची लहानपणापासूनच आवड होती. एक दिवस आकाशवाणीवर एका कार्यक्रमात सहभागी होण्यानिमित्त पत्र पाठवलं. ते पत्र आकाशवाणीवरच्या कार्यक्रमात किशोर सोमण यांनी वाचून दाखवलं. आकाशवाणीवर आपल्या नावाचा उल्लेख ऐकताना अतिशय आनंद झाला. त्यानंतर आवाजाची चाचणी घेतली गेली, त्यात मी पास झाले आणि ‘युववाणी’ या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. या कार्यक्रमाचा मोबदला म्हणून मला चक्क १२१ रुपयांचा चेक मिळाला. हीच माझ्या आयुष्यातली पहिली कमाई! याचा मला विलक्षण आनंद झाला. त्याच वेळी हेही लक्षात आलं, की आपल्या आयुष्यात काही नकारात्मक प्रसंग घडतात, त्या वेळी खचून न जाता त्या प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मकतेनं बघून पुढचं पाऊल टाकलं, की यश मिळतंच. कितीही कटू प्रसंग असला, तरी हार न मानता प्राप्त परिस्थितीला सामोरं गेल्यावरच आयुष्याचा अर्थ आपल्याला कळत जातो.

वयाच्या २५ व्या वर्षी लग्न झालं. जोडीदाराच्या साथीमुळे ‘एम.ए.’ करता आलं. सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या पािठब्यामुळे नाटकाची आवड जोपासता आली. अनेक साहित्यिक कार्यक्रमांचं निवेदन करण्याची संधी मिळाली. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अचानक करोनामुळे घरातून बाहेर पडणं बंद झालं, तेव्हा या काळात नव्या तंत्रज्ञानाबरोबर जोडून घेत स्वत:ला घडवता आलं. कुटुंबांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवता आला. नवनवीन पाककला शिकता आल्या. करोनाचा काळ खूप काही शिकवून गेला. लांब गेलेली नाती नव्या तंत्रज्ञानामुळे जवळ आली. याच काळात स्वत:तल्या कलेला अधिकाधिक वाव मिळाला. पुस्तकं अधिकाधिक वाचता आली. कवितेची आवड जोपासता आली. आपण वाचलेल्या कविता, साहित्य लोकांपर्यंत पोहोचवावं या उद्देशानं ‘कलारंग’ या माझ्या यूटय़ूब चॅनेलचा शुभारंभ याच काळात केला.

त्या निमित्तानं क्षितिज दाते, हेमा पटवर्धन, रमा रुक्मांद, संजय कृष्णाजी पाटील, गीता चिटणीस, भाग्यश्री नूलकर, शंकर पेंडसे, सुप्रिया लोकरे, मेधा देव, शुभदा पाटकर, असे अनेक नवोदित लेखक, कवी जोडले गेले. त्यांचं साहित्य मला रसिकांपर्यंत पोहोचवता आलं. दरम्यान समाजातल्या काही स्त्रिया- ज्या स्वत:चे वेगळे छंद जोपासता जोपासता छोटेखानी व्यवसाय करतात, त्यांच्याही मुलाखती माझ्या यूटय़ूब वाहिनीच्या माध्यमातून घेता आल्या.
आयुष्यात चढउतार येतच असतात, मात्र अशा वेळी खचून न जाता त्या प्रसंगांना धीरानं तोंड देणं महत्त्वाचं असतं. आपण या प्रसंगांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, त्यावर कशा पद्धतीनं मात करतो हे महत्त्वाचं आहे, हे मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या सुखदु:खाच्या प्रसंगांनी शिकवलं. त्यामुळेच मला हे गाणं नेहमीच गुणगुणावंसं वाटतं-

‘जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम.. वो फिर नही आते..
फूल खिलते हैं.. लोग मिलते हैं मगर.. पतझड मे जो फूल मुरझा जाते हैं..
वो बहारों के आने से खिलते नहीं..!’

yugandharasv31@gmail.com

Story img Loader