लोकसंख्येच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी २३ जुलै १९४९ रोजी सुरू झालेल्या ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सुरुवातीला चिटणीस आणि नंतर ३४ वर्षे अध्यक्ष असलेल्या आवाबाई वाडिया. आपलं आयुष्य नि:स्वार्थीपणे लोकसंख्या नियंत्रणाच्या कामात घालवणाऱ्या आवा यांना ९२व्या वर्षी मृत्यू आला तोही विश्वलोकसंख्यादिनी, ११ जुलै २००५ रोजी. आवाबाईंचे यंदाचे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने..
लोकसंख्येत सातत्याने घट होणारी पारशी अल्पसंख्य जमात आहे म्हणून भारतातील पारशी लक्षणीय अल्पसंख्याक आहेत. पण भारतातील औद्योगिक प्रगतीत व विकासात पारशी उद्योगपती, कारखानदार यांची कामगिरी भरीव, अनन्यसाधारण आहे. वाडिया घराण्याने उद्योग, व्यापार वैद्यकीय सेवा या क्षेत्रात कर्तृत्व व विशेष कामगिरी बजावून आपला ठसा उमटवला आहे. याच घराण्यात पूर्वाश्रमीच्या आवाबाई मेहता यांनी आवाबाई वाडिया म्हणून प्रवेश केला.
आवाबाई मेहता यांचा जन्म १८ सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या राजधानीत कोलंबो येथे झाला. आवाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोलंबोतच झाले. लहानपणी आवाच्या आई-वडिलांनी अभ्यासाचे, शिस्तीचे, सद्वर्तनाचे संस्कारधन दिले. थिऑसफीच्या तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा प्रभाव मेहता कुटुंबीयांवर विशेष होता. डॉ. अॅनी बेझंट यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप मेहता कुटुंबीयांवरही होती. डॉ. अॅनी बेझंटनी सुरू केलेल्या स्वदेशी वृत्ती, स्वदेशी वस्तू प्रसार चळवळीचा प्रभावही होता.
आवाची आई चांगल्या शिक्षणापासून वंचित राहिली होती म्हणूनच आपल्या मुलीला ते शिक्षण मिळावे अशी तिची खूप इच्छा होती. आवाचा भाऊ चांगला उच्चशिक्षित होता. आवानेही उच्चशिक्षित व्हावे असे तिला वाटत होते. डॉ. अॅनी बेझंट सभेत बोलत होत्या, तेव्हा त्यांनी आवाला पाहिले व तिच्या गालावर स्पर्श करीत आईला म्हणाल्या, ‘‘तुम्ही या तुमच्या छोटय़ा मुलीला इंग्लंडमध्ये शिकायला पाठविलेच पाहिजे.’’ हा आशीर्वाद, ही भेट आवाच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आवा व तिची आई ५ मे १९२८ रोजी बोटीने साऊथ हॅम्पटनला पोहोचली. वयाच्या १३व्या वर्षांपासून आपण वकील व्हावे, असे वाटत होते. आवा १९३३ मध्ये बार अॅट लॉ ही कायद्याची पदवी पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. जून १९३२ मध्ये ब्रिटिश कॉमनवेल्थ लीगने आयोजित केलेल्या एका परिषदेत आवाला भाषण करण्याची संधी लाभली, तेव्हा वय होते १८, विषय होता ‘भारतातील स्त्रियांचा मताधिकार’.
१९३५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आवाला जीनिव्हाला जाण्याची सरकारी प्रतिनिधीसाठी भेटीद्वारे प्रयत्न करण्याची संधी मिळाली. लंडनच्या वास्तव्यात अध्ययन काळात वुईमेन्स इंडियन असोसिएशन, वुईमेन्स फ्रीडम लीग आदी ब्रिटिश महिला संघटनांमध्ये उमेदवारी करण्याची संधी आवाला मिळाली व भावी आयुष्यास उपकारक, सहायक असा समृद्ध अनुभव मिळवता आला. १९४१ मध्ये आवाबाई मुंबईस कायमच्या वास्तव्यासाठी आल्या. १९४० चे दशक आवाबाईच्या जीवनात, सामाजिक कार्याचा, वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करणारे होते. डॉ. बोमनजी वाडिया ६ फूट उंचीचे गृहस्थ, त्यांची बौद्धिक, वैचारिक उंचीही मोठी होती.
डॉ. वाडिया यांच्याशी आवाबाई विवाहबद्ध झाल्या व आवाबाई वाडिया म्हणून त्यांचे कर्तृत्व फुलू लागले. आवाबाई अखिल भारतीय महिला परिषदेच्या व महाराष्ट्र राज्य वुईमेन्स कौन्सिल या दोन मोठय़ा महिला संघटनांच्या कार्यात निष्ठेने, आस्थेने, उत्साहाने काम करू लागल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाल्यावर नियोजनबद्ध विकासाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. इतर समस्यांबरोबर लोकसंख्यावाढीचा प्रश्नही भेडसावू लागला होता. या प्रश्नाचा मुकाबला करण्यासाठी २३ जुलै १९४९ रोजी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची मुंबईत स्थापना झाली. संस्थापक- अध्यक्षा होत्या श्रीमती भगवंती रामाराव व मानद चिटणीस म्हणून आवाबाई वाडिया यांनी १५ वर्षे काम पाहिले. या काळात असोसिएशनच्या शाखा देशाच्या अनेक राज्यांत सुरू करण्यासाठी अपार कष्ट घेतले. मुंबईत व इतर अनेक ठिकाणी सभा, परिषद, चर्चासत्रे आयोजित करून प्रबोधनाचे, जाणीव जागृतीचे काम सुरू केले. जगातील अनेक देशांत कुटुंब नियोजनाचे काम सुरू झाले. स्वयंसेवी संस्थांनी हे काम सुरू करण्यात पुढाकार घेतला. २९ नोव्हेंबर १९५२ रोजी आठ देशांच्या स्वयंसेवी संस्थांची इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहुड फेडरेशन ही संस्था मुंबईत स्थापन झाली. अमेरिका, इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, भारत, हाँगकाँग, स्वीडन, सिंगापूर या आठ देशांच्या स्वयंसेवी संस्था संस्थापक सदस्य होत्या. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे काम सुरू झाले तेव्हा ना कार्यालय होते ना निधी. ज्येष्ठ उद्योगपती श्री. जे. आर. डी. टाटा यांनी दहा हजार रुपयांची पहिली वैयक्तिक देणगी असोसिएशनला दिला. १९५४ मध्ये असोसिएशनचे ‘द जर्नल ऑफ फॅमिली वेल्फेअर’ हे त्रमासिक प्रकाशित होऊ लागले. मानद संपादक म्हणून श्रीमती आवाबाई वाडिया यांनी या त्रमासिकाचे संपादन व इतर जबाबदाऱ्या सलग ४५ वर्षे म्हणजे डिसेंबर १९९९ पर्यंत समर्थपणे पार पाडल्या.
१९६४ मध्ये आवाबाई वाडिया असोसिएशनच्या एकमताने अध्यक्ष झाल्या आणि सलग ३४ वर्षे हे पद, जबाबदारी नेतृत्वपूर्ण कुशलतेने, सक्षमतेने सांभाळून असोसिएशनचे नाव मोठे केले. १५ हून अधिक राज्यांत ४० हून अधिक शाखा सुरू केल्या. अनेक प्रकारचे विकास प्रकल्प राबविले. १९६०च्या दशकात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कानपूर शहरातील गिरण्या, कारखान्यांमधून कामगारांसाठी कुटुंब नियोजन प्रबोधने, प्रशिक्षण, सल्ला, साधनसेवा सुरू केल्या. १९७०च्या दशकात ‘तरुण पिढीसाठी लोकसंख्या शिक्षण’ कार्यक्रम सुरू करून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधून प्रबोधन कार्यक्रम सुरू झाले. १९८० च्या दशकात ‘लैंगिकता शिक्षण मार्गदर्शन, प्रशिक्षण, संशोधन केंद्रे’ असोसिएशनच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई, लखनौ आदी शाखांमधून सुरू झाली. १९८४ मध्ये भिवंडी ह्य़ा मुस्लीमबहुल तालुक्याच्या ठिकाणी महिला विकास प्रकल्प सुरू होऊन त्यास आता २८ वर्षे पूर्ण झाली. ‘पाळणा लांबवा, पाळणा थांबवा’ एव्हढेच कुटुंब नियोजनाचे काम नसून कुटुंब जीवन, महिला सक्षमीकरण, पुरुषांचा सहभाग, लैंगिकता शिक्षण ही विस्तारित क्षेत्रे आहेत, असे आवाबाई वाडिया मानत.
१९८२ मध्ये आवाबाई वाडिया ‘इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहुड फेडरेशन’च्या अध्यक्षा म्हणून बहुमताने निवडून आल्या व हे पद त्यांनी सहा वर्षे सक्षमतेने सांभाळले. आवाबाई वाडिया या शहर, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार, पारितोषिके यांनी सन्मानित झाल्या. अनेक राज्य, देश, आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रांमध्ये त्यांचा अभ्यासपूर्ण, कृतिशील सहभाग होता. या सर्व कामांत त्यांचे पती डॉ. वाडिया यांचा संपूर्ण पाठिंबा होता. The Light is ours हा ८०० पानी आत्मकथनात्मक ग्रंथ वयाच्या ८७ व्या वर्षी साकार केला. असोसिएशनचे सारे काम ५०-५५ वर्षे निरलसपणे, नि:स्वार्थी वृत्तीने पार पाडले आणि आपल्या इच्छापत्रात फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियासाठी आठ कोटीं रुपयांची भव्य अमोल देणगी दिली. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा हा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे त्यांचे ९२ वर्षांचे जीवन होते. ११ जुलै २००५ विश्वलोकसंख्यादिनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा एक क्रूर योगायोग होता. ईश्वर कृपेने लाभलेले दीर्घायुष्य त्यांनी समाजसेवी कार्यासाठी वाहिले. त्यांच्या जीवनाचे सोने झाले. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र अभिवादन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा