दत्तप्रसाद  दाभोळकर

आज मी ८० वर्षांचा आहे, पण जे काम हाती घेतलंय त्यामुळे दिवसातले २४ तास कमी पडतात. त्यामुळे घरच्यांना माझा त्रास कमी आणि दिवसातले चोवीस तास ज्याला कमी पडतात तो तरुण आणि चोवीस तास ज्याला खायला उठतात तो म्हातारा! साऱ्या सजीवांची आणखी एक गंमत आहे. शेवटचा श्वास कोणता आणि कोणत्या परिस्थितीत हे कुणालाही माहीत नाही. मात्र, मृत्यू हे या जगातले एकमेव सत्य आहे आणि ती जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट आहे हे ज्याला समजले त्याला मोक्षप्राप्ती झाली. ‘तुम्ही ७५ वर्षांचे झालात म्हणजे तुम्ही वयात आलात.’ मी हे जे काही विधान केलंय ना, ते वाचून अनेकांना वाटेल माझी सटकली किंवा मला म्हातारचळ लागलाय! तर तसे अजिबात नाही. सध्या आमच्या मित्रांच्या कार्यक्रमात घडलेली खरी घटना सांगतोय. आता काहीजणांना ही घटना खरी, की ही स्वप्नावस्था असे वाटेल. मी जो स्वप्नावस्था हा शब्द वापरलाय तो वाचून अनेकांच्या भुवया वर गेलेल्या असणार. एकतर स्वप्नावस्था हा शब्द, ही अवस्था वाईट नाही, तर ती एक सुंदर नैसर्गिक घटना आहे. हे समजावून घ्यावयास हवे. आणि स्वप्नावस्थेचे माझेच नव्हे तर माझ्या नातवाचेही वय पार मागे पडले असले, तरी ती मनात अजूनही अधीमधी घुटमळायला हवी. असो, तूर्तास सांगतो, ते एवढेच, की ही घटना पूर्णपणे जागृतावस्थेतील आहे. ती नंतर सविस्तर सांगणार आहे. पण त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात.

आज माझे वय फक्त ८०. म्हणजे आज जी पिढी सत्तर ते नव्वद या वयात आहे. त्या पिढीतील मी एक प्रातिनिधीक उदाहरण. आमची पिढी ही भारताच्या इतिहासातील पहिली पिढी आहे. म्हणजे काय ते जरा नीटपणे सांगतो. आम्ही जेव्हा शाळेत होतो, त्या वेळी ‘साठी बुद्धी नाठी’ असे म्हणत. माणसाची एकसष्टी झाली, म्हणजे अगदी आनंद. बहुसंख्य माणसे ६० ते ६५ वर्षांपर्यंत काळाच्या पडद्याआड जात. त्यामुळे ७० ते ९० या वयात माणसाने कसे वागावे, काय करावे, याबाबत समाजात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नव्हती. आमची पिढी ही मागून येणाऱ्या पिढय़ांच्यासाठी पथदर्शक पिढी आहे. अंधारात चाचपडत आम्ही काही नव्या वाटा शोधल्यात. त्या सांगतो. पण त्यापूर्वी साठी गाठण्यापूर्वीच माझ्यावर झालेले दोन महत्त्वाचे संस्कार सांगतो.

पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे मी त्या वेळी ४५ वर्षांचा होतो. हे फार अडनिडे वय. शरीर आणि मन ना धड तरुण, ना धड म्हातारे. डॉक्टरांच्या दृष्टीने या वयातला माणूस फार उपयोगी! मुंबईतल्या एका फार नामांकित हार्ट सर्जनने मला २४ तासांत बायपास सर्जरी करणे अत्यावश्यक म्हणून सांगितले. (ते डॉक्टर आज हयात नाहीत. मृत व्यक्तीचे नाव कशाला सांगा?) खर्च प्रचंड, पण पैसे कंपनी देणार होती. काळजी घरचे घेणार होते. शरीर माझे कापले जाणार होते! पण माझा मित्र डॉ. रवी बापटमुळे वाचलो. रवीने त्या दिवशी मला दिलेला सुखाचा मूलमंत्र असा, ‘ठणठणीत’ राहायचे असेल, तर डॉक्टर आणि पथ्य यापासून माणसाने शक्यतो दूर राहावे.’ हा मंत्र या वयात नीटपणे समजावून घेतला पाहिजे. दारू वाईट नव्हे, पण तिच्या आहारी अजिबात जाऊ नये. डॉक्टर, पथ्य यांचे असेच आहे. मात्र, एक पूर्वअट आहे. तुम्हाला कायम तुमच्या शरीराशी संवाद साधता आला पाहिजे. शरीर आणि तुमचे मन यांचे नाते मुलगा आणि आई असे आहे. आई शंभर गोष्टींत गुंतली असली, तरी तिचे मन मुलात गुंतलेले असते. मुलाची अजिबात हेळसांड होणार नाही, हे पाहात असतानाच त्याचे फाजील लाड होणार नाहीत, याचीही ती काळजी घेते. तुमचे शरीर तुमचे मन यांनी हे नाते जपले, तर म्हातारपण वयावर नसते तर ते मनावर असते, हे तुम्हाला नकळत कळते.

ते असो, आमच्या मागून येणाऱ्या पिढय़ांच्यासाठी आमच्या पिढीतील अनेकांनी अनेक ठिकाणी केलेले मजेशीर प्रयोग सांगतो. ‘तेच ते अन् तेच ते’ यामुळे माणूस कंटाळतो. ‘मॉर्निंग वॉक’ हे आता रुटीन झालंय. एकदा मदानात चालताना काही वय वाढलेल्या ‘तरुणांनी’ ठरवले- आज शंभर मीटर उलटे चालून पाहायचे. लक्षात आले, कितीही प्रयत्न केला, तरी पाऊल शेवटी वाकडे पडते! आपण सरळ रेषेत नाही, तर तिरके जातो. महिनाभर सरळ उलटे चालायचा सराव. मग परीक्षा. सर्वप्रथम येणाऱ्याला धपाटय़ांचे बक्षीस! एका हास्यगटाने तर कमाल केली. तुम्हाला हसावे, की रडावे हेच कळणार नाही. पण त्या गटाला ते कळले. एके दिवशी भल्या पहाटे मदानावर या गटाने रडायला सुरुवात केली. रडणे सर्व प्रकारचे. स्फुंदून, मुसमुसून, धाय मोकलून, हंबरडा फोडून वगरे- वगरे. खरेतर रडणे आणि हसणे शरीराला सारखाच व्यायाम देणारं. अती झाले आणि हसू आले, किंवा हसता हसता डोळ्यात पाणी आले, हे आपल्या अनुभवाचे. मनाच्या या दोन्ही विलोभनीय अवस्था. मन मोकळे करणारे, मनाचे खेळ- पण हा म्हाताऱ्यांचा गट असा रडतोय म्हटल्यावर चालायला आलेल्या सगळ्यांच्याच मनावरचा ताण हसत हसत गेला! एक ना दोन अशा अनेक गोष्टी आहेत. या दोन गोष्टी फक्त वानगीदाखल सांगितल्या. किमान या वयात आपण हसत हसत नवे व्यायामप्रकार आणि नवी आसने शोधली पाहिजेत. तो ठेका आपण काय फक्त रामदेव बाबांनाच द्यायचा का?

पण खरी गरज आहे ७० ते ९० या वयोगटातील लोकांनी एकत्र येण्याची. वेगवेगळे मार्ग शोधत स्वत: आनंद घेत इतरांना आनंद देण्याची. प्रत्येक गावात असे विखुरलेले गट आहेत. मी सातारा येथे राहतो. माझा मित्र

अरुण गोडबोले काय करतो, ते सांगतो. सातारा जिल्ह्य़ातील तो सर्वात यशस्वी कर सल्लागार. काही मराठी, हिंदी सिनेमांची निर्मिती. सत्तराव्या वर्षी तो या सर्वातून पूर्णपणे बाजूला झाला. त्याने त्याच्या मित्रांना बरोबर घेऊन केलेल्या तीन गोष्टी सांगतो. या वयात माणसांच्याकडे समंजसपणा असतो. कार्यकुशलता असते. आपण काहीतरी उभे करावे, असे किमान सुप्त मनात वाटत असते. त्याने आपल्या मित्रांच्याबरोबर सज्जनगडच्या पायथ्याशी जागतिक दर्जाची ‘समर्थसृष्टी’ उभी केली आहे. दोन- तीन वर्षे सर्वाचीच कशी झपाटल्यासारखी मजेत गेली. दुसरी गोष्ट सांगतो. आपण समाजासाठी काहीतरी करावे, असे वय वाढल्यावर सर्वानाच वाटते. पण नेमके काय करावे, हे समजत नाही. मध्यंतरी दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली. चाळीसजण मरण पावले. ते मृतदेह कुणी बाहेर काढले माहीत आहे? महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्य़ाद्री ट्रेकर्स यांनी. वृत्तपत्रात बातमी आली, ती एवढीच. मात्र, माहिती काढली तेव्हा लक्षात आले, समाजातील गरीब वर्गातील ही मुलेमुली आहेत. भाजी विक, रिक्षा किंवा पानपट्टीचे दुकान चालव. काही फक्त गरीब घरांतील गृहिणी. अशी कोणतीही दुर्घटना घडली, की तासाभरात हे तीस-चाळीसजण एकत्र येतात. जिवाच्या कराराने मृत शरीरे, जखमी माणसे, वाहने बाहेर काढतात. त्यांच्याकडे साधनसामग्रीपण फारच कमी आहे. अरुणने मनावर घेतले. या गटाने महिन्याभरात जवळजवळ तीन लाख रुपये जमवले किंवा पैसे सहजपणे जमले. सातारला या मुलांचा सत्कार करून, कपडे, वॉकीटॉकी, दोरखंड देण्यात आले. नियम वाकवून नॅशनल इन्शुरन्स, पुणे यांनी त्यांचा विमा उतरवला. मृत्यू- तीन लाख, अपंग- दीड लाख, हॉस्पिटल खर्च, लॉस इन इनकम सर्व. विमा फक्त एक वर्षांचा होता. सत्कार सभेत देणग्या आल्या. त्यातून तो विमा दोन वर्षांचा झाला आणि मग विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून तो तीन वर्षांचा केला. समाजात देणारे हात हजार आहेत. वय वाढलेल्या माणसांच्या आवाहनाला ओ देणारा समाज आहे.

या प्रवासात अरुणने केलेली सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे त्याने सत्तर वर्षे वयावरील माणसांसाठी लेखन स्पर्धा सुरू केली. मजेशीर विषय, प्रवेश फी ५० रुपये, भरपूर बक्षिसे, एकूण स्पर्धा ना तोटा न नफा या तत्त्वावर झाली. आम्हाला वाटले कोणीच भाग घेणार नाही. पण महाराष्ट्राच्या सर्व भागांतून भरभरून प्रतिसाद. बक्षीस घ्यायला पुणे, मुंबई नव्हे तर विदर्भ मराठवाडय़ातून माणसे एकटी वा नातवांचे बोट धरून आली. यंदाचे तिसरे वर्ष होते. स्पध्रेत भाग घेतलेल्या सर्वात वयोवृद्ध माणसाचा सत्कार असतो. या वेळी ९४ वर्षांचे महामुनी नावाचे गृहस्थ हे बक्षीस घ्यायला म्हसवडवरून आले होते. म्हणाले, ‘मला बक्षीस नाही. मग नातवाला त्रास नको, म्हणून एकटा बस स्टँडवर आलो. वयोवृद्ध माणसांना मदत करण्याची तरुणांची हौस फार. बस स्टँडवरून मला एक मुलगा येथे घेऊन आलाय. ना ओळख, ना पाळख.’ त्यांनी मग स्वत:च्या खणखणीत आवाजात त्या कार्यक्रमासाठी लिहिलेली कविता म्हणून दाखवली. गेल्या वर्षी बक्षीस घ्यायला मुंबईहून डॉ. सौ. वाघ आल्या होत्या. औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होत्या. त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न प्रथमच केला होता. अनेक नातवंडे आपल्या आजोबा-आजींचा पराक्रम बघायला येऊन गेलीत. या वर्षी पहिले बक्षीस मिळाले होते- प्रिया विश्वनाथ प यांना. वय फक्त ७६ वर्षे. पण बक्षीस स्वीकारताना त्या म्हणाल्या ते महत्त्वाचे आहे. त्या म्हणाल्या, ‘तीन विषय होते. मी -सून-मुलगा, मी-मुलगी-जावई व तिसरा होता माझा जीवनसाथी. प्रथम वाटले याच्यावर काय लिहायचे. पदरी पडले पवित्र झाले! त्यात आम्हा दोघांच्या वयात अंतर फक्त १४ वर्षे. आमच्या वेळी हे एवढे अंतर म्हणजे अनुरूप जोडा! पण लिहीत गेले आणि माझे आयुष्य माझ्यासमोर उलगडत गेले. खरेतर आमचे स्वभाव, आवडीनिवडी भिन्न. पण नकळत आम्ही एकत्र आलो. एकरूप झालो. एकमेकांना आम्ही अपार आधार आणि सुख दिलंय. आधार- मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि शारीरिकसुद्धा! त्या बाईंचा ९० वर्षे वयाचा नवरा वकील, छान जीन पँट घालून आला होता. म्हणाले, ‘‘वयाच्या ऐंशीव्या वर्षी गाडी चालवायला शिकलो. आज पुण्याहून गाडी चालवत हिला घेऊन आलोय. आज मुक्काम सातारचे हॉटेल, उद्या हिला घेऊन गोव्याला जाणार. पहिले बक्षीस मिळवलंय. मौजमजा केली पाहिजे.’’ किती महत्वाचे आहे हे.

‘अरुण तू ७५ वर्षांचा झालास म्हणजे तू वयात आलास,’ असे त्याला अनेकांनी सांगितले, ते त्याच कार्यक्रमात! आणि हे अगदी माझ्याही बाबतीत खरे आहे. मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात फारसे काही केले, असा माझा दावा नाही! आणि समजा मी तो केला, तरी तुम्ही तो थोडाच मान्य करणार आहे! पण मी वयाच्या ७५ वर्षांपर्यंत जे केले त्याच्याहून खूप अधिक ७५ ते ८० या वयात केलंय. आणि ८० ते ८५ या वयासाठी माझ्यासमोर जो ग्रंथ आहे, तो पुरा झाल्यावर मराठीचे राहू देत कुठल्याच भाषाभगिनींना माझे नाव विसरता येणार नाही. असो! माझा ग्रंथ आणि माझा अहंकार! थोडा विसरा. मात्र, मला त्यामुळे आज दिवसातले २४ तास कमी पडतात! त्यामुळे पुन्हा घरच्यांना माझा त्रास कमी! आणि दिवसातले चोवीस तास ज्याला कमी पडतात तो तरुण आणि चोवीस तास ज्याला खायला उठतात तो म्हातारा! साऱ्या सजीवांची आणखी एक गंमत आहे. शेवटचा श्वास कोणता आणि कोणत्या परिस्थितीत हे कुणालाही माहीत नाही. मात्र, मृत्यू हे या जगातले एकमेव सत्य आहे आणि ती जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट आहे हे ज्याला समजले त्याला मोक्षप्राप्ती झाली.

विज्ञानाने आणखी एखादी हूल दिली, तर माझ्या पिढीतील अनेकांना चक्क शंभरी गाठावी लागणार. त्यानंतर स्टेमसेल आणि बॉडी पार्ट क्लोनिंग येणार आहे. म्हणजे आपला पणतू किंवा खापर पणतू किमान १५० वर्षे जगणार आहेत- ते आपल्या मित्रांना सांगतील, ‘‘आमचे पणजोबा भलतेच कर्तृत्ववान होते. पण बिचारे शंभरीतच मरण पावले!’’

dabholkard@dataone.in

chaturang@expressindia.com

Story img Loader