निवृत्तीनंतर माझी वेगळी इनिंग सुरू झाली. ‘लगे रहो मुन्नाभाई’पासून चित्रपटात अभिनय करायला सुरुवात झाली. आजवर हिंदी-मराठी मिळून ३५ ते ४० चित्रपटांत काम केलं. निवृत्तीनंतरचा पंचाहत्तरी ते ऐंशीचा टप्पा के व्हा आला केव्हा गेला कळलं नाही. इतकंच नाही तर वयाच्या
८४ व्या वर्षी ‘कॉन्ट्रिब्युशन ऑफ उर्दू लँग्वेज इन इंडियन सिनेमा’ या विषयावर ५ ते ७ वर्षे कसून अभ्यास करत पीएच.डी. मिळवली. फुटपाथवर पुस्तकं विकणारा एका गरीब विद्यार्थ्यांचा डॉ. याकूब सईद झालो. हा माझ्या जीवनातील कर्तृत्वाचा उच्चांक!
‘‘काय जोशी काका, तुम्ही पुढच्या आठवडय़ात निवृत्त होताय म्हणे.
‘‘हो साठी झाली, संपलं सगळं.’’
‘‘पुढे काय?’’
‘‘पुढे काय म्हणजे ‘हरी हरी’ करत बसायचं.’’ जोशी काकांचे हे उद्गार साहजिकच होते, कारण त्यांनी पुढे काय करायचं हे ठरवलंच नव्हतं. आपल्या भारतीयांचा हा एक मोठा दोष आहे, असं मला वाटतं. निवृत्त झालं की जसं आयुष्यच संपलं, असंच वागतात सारे. दूरदृष्टी नाही. जे समोर आहे तेवढय़ावर भागवून घ्यायचं. नोकरीत माझ्याबरोबर काम करणारे अधिकारी निवृत्ती जवळ आली की धावपळ सुरू करतात. ग्रॅच्युईटीचा पैसा सरकारकडून मिळतो. पण खर्च त्यापेक्षा दुप्पट! मुलांची लग्नं, उच्च शिक्षण, वडीलधाऱ्या माणसांचं आजारपण, सरकारी क्वार्टर सोडावं लागतं, म्हणजे नवं घर, या सगळ्यात ग्रॅच्युईटी कुठे जाते पत्ता लागत नाही. जेमतेम मिळणारं निवृत्ती वेतन, त्यात कसंतरी घर चालवतात. एका साहेबांना मी म्हटलं, ‘‘साहेब थोडा पुढचा विचार करा.’’ ‘‘ह्य़ॅ.. कसला पुढचा विचार, होईल सगळं ठीक.’’ पण काही ठीक होत नाही कारण नोकरीवर असताना बसायला खुर्ची, सत्ता, बेल वाजवली की कार हजर, हे सगळं निवृत्तीच्याच दिवसापासून नाहीसं होतं – कुणी विचारत नाही. शेवटच्या दिवसाची पार्टी होते. त्यात हारतुरे, फुलं, ऑफिसच्या लोकांनी वर्गणी गोळा करून खरेदी केलेली कुठलीतरी फडतूस बॅग मिळते. ऑफिसचे लोकही डॅम्बिस असतात, म्हणतात, ‘ए बरं झालं उद्यापासून येणार नाही हा ७७७ पिडा गेली.’ पण निवृत्ती समारंभात भाषण देतात, ‘‘सर, आपण आम्हाला पोरकं करून जात आहात, आपल्यासारखा माणूस अधिकारी म्हणूून जन्मात भेटणार नाही. जाऊ नका साहेब, जाऊ नका.’’ साहेबांनाही घरी राहवत नाही, तीन-चार दिवसांनी परत कार्यालयात येतात. गेटवरचा शिपाई विचारतो, ‘‘कोण आपण? आयडी दाखवा.’’
‘‘ मी मी अमुक-अमुक. इथे अधिकारी होतो.’’
‘‘होता व्हय? आता नाहीना? आयडीपण नाही. मग नो प्रवेश. बरं, कुणाला भेटायला आला होता?’’
‘‘अमुक अमुक यांना.. सी.ई.ओ.’’
‘‘ ते साहेब – मुख्यमंत्र्यांबरोबर बाहेर गेलेत.’’
हे महाशय तोंडात मारल्याप्रमाणे परत फिरतात. ही हकिगत आहे. गंमत म्हणून लिहीत नाही. माझ्याच कार्यालयीन सहकाऱ्याबरोबर घडलेली. कार्यालयातील नाती खरी नसतात. कार्यालयाची वेळ दहा ते पाच, तिथली मैत्री म्हणजे तुम्ही बसता ती खुर्ची, तुमचा हुद्दा, त्यातून ‘त्यांना’ किती फायदा किंवा काय काढता येईल याचा अंदाज, त्यावर ‘त्यांचा’ डोळा असतो. सरकारी नोकरीची मर्यादा पूर्वी ५८ वरून आता ६० झाली. ती गाठली की तुम्ही आउट! घरी बसा. कुणी विचारत नाही, असे अनेकजण आजूबाजूला पाहिलेले, अनुभवलेले!
जीवनात एक काळ असा येतो, मग तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी. त्या काळात सगळी भरभराट होते. मुलांचं शिक्षण संपतं. त्यांना नोकरी लागते. लग्न होतं, मुलं होतात. तो काळ म्हणजे ‘पीक पिरियड’. आणि मग हळूहळू तो काळ पडद्यामागे जातो, मुलं अनेकदा घर सोडून जातात. आई, बाबा किंवा बायको काळाच्या आड निघून जातात. तुमची उंच उंच भरारी जमिनीवर येते. नोकरीत असाल तर निवृत्त. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा उलट प्रवास सुरू होतो. तुम्ही प्रकाशातून अंधाराकडे जाता – अनेकदा काय करावं कळत नाही. हा काळ फार विचित्र असतो. बळजबरीने तुम्ही हसता, आनंदात आहे, असं दाखवता पण प्रत्यक्षात तुम्ही अगदी निराशेच्या खोल तळाशी पडलेले असता. वर येण्याची धडपड करत असतानाच तुम्ही पूर्ण बुडून जाता. हे टाळायचं असेल तर निवृत्तीपूर्वीच काही निर्णय घ्यावे लागतात.
१९३९ मध्ये मी (दुसऱ्या महायुद्धाचा काळ) शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये काही काम मिळतं का म्हणून जात असे. डब्ल्यू. झेड. अहमद हे त्याचे मालक. (अभिनेत्री असलेली त्यांची पत्नी) नीना – नायिका, मोतीलाल, श्यामा, पृथ्वीराज कपूर हे सगळे थोर कलाकार, कृष्णा चन्दर, अली सरदार जाफरी, जोश मलिहाबादी, अख्तुरल इमाम, असे लेखक-कवी भेटायचे. शाळा शिकून काम करतो म्हणून मी त्यांचा आवडता गडी. व्यक्तिगत काम करणारा. संध्याकाळी आठ आणे किंवा रुपया मिळत असे. रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’, ‘ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या गाण्यांची पुस्तकं विकत असे. ‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’ असं करता करता एम. ए. झालो. १९५८ मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून पुणे आकाशवाणीत रुजू झालो. नंतर पुणे, सांगली, दिल्ली असं करून पुढं १९७१ मध्ये ‘मुंबई दूरदर्शन’ला रुजू झालो. चित्रपटातल्या लोकांच्या ओळखीचा फायदा झाला. माझ्याकडे मराठी, हिंदी चित्रपट विभाग आला. खूप मनापासून चांगलं काम केलं आणि १९९२ मध्ये ‘दूरदर्शन कलकत्ता’ येथून डायरेक्टर म्हणून निवृत्त झालो. नोकरीत असताना घर घेतलं, मुलीला डॉक्टर केलं. तिचं एका डॉक्टराशी लग्न लावून दिलं म्हणजे मी माझ्या जबाबदारीतून मोकळा झालो – नो लायबिलिटी, नो टेन्शन!
माझ्या कार्यालयीन मित्रानं मला विचारलं, ‘‘तुम्ही दुसऱ्याला शहाणपण शिकवता, तुम्ही काय केलं निवृत्तीनंतर? मी म्हणालो, ‘‘मित्रा, निवृत्तीनंतर वेगळी इनिंग सुरू झाली.’’ ‘लगे रहो मुन्नाभाई’पासून चित्रपटात अभिनय करायला सुरुवात झाली. आजवर हिंदी-मराठी मिळून ३५ ते ४० चित्रपटांत काम केलं. ‘नटरंग’, ‘जॉली एल एल बी -२’ मधल्या भूमिका लोकांना आवडल्या. त्या सगळ्यामध्ये निवृत्तीनंतरचा पंचाहत्तरी ते ऐंशीचा टप्पा के व्हा आला केव्हा गेला कळलं नाही. पण या गोष्टी सर्वाच्या नशिबात नसतात. पैसा असाच मिळत नाही, त्याची कदर करावी लागते म्हणजे तो आपली कदर करतो!
नोकरीवर असतानाच मी घराच्या, कुटुंबीयांच्या जबाबदारीतून मोकळा झालो होतो त्यामुळे मोकळा वेळ होताच. आणि कार्यरत राहण्याची सवय असल्याने शांतही बसवत नव्हतं. प्रा. विलास जोशी या माझ्या मित्राच्या सांगण्यावरून पुणे विद्यापीठात ‘कॉन्ट्रिब्युशन ऑफ उर्दू लँग्वेज इन इंडियन सिनेमा’ या विषयावर संशोधन करायचं ठरवलं, नोंदणी केली आणि ५ ते ७ वर्षे कसून अभ्यास केला. वयाच्या ८४ व्या वर्षी संशोधन पूर्ण करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तो प्रबंध सादर केला. मला पीएच.डी. मिळाली. फुटपाथवर पुस्तकं विकणारा एका गरीब विद्यार्थ्यांचा
डॉ. याकूब सईद झालो. हा माझ्या जीवनातील कर्तृत्वाचा उच्चांक!
मी माझ्या जीवनाचं रंगीत चित्र सादर करत नाही. जीवनाच्या आउटलाइनमध्ये रंग भरताना किती यातना सोसाव्या लागल्या हे फक्त मलाच माहीत आहे. जीवनात सामाजिक, व्यक्तिगत, आर्थिक, राजकीय अडचणी येत राहिल्या. त्यांना मी आनंदाने सामोरा गेलो. त्यांचा स्वीकार केला.
मला गालिबचा एक शेर आठवतो –
‘मौत का एक दिन मुअय्यन (ठरलेला) है
नींद क्यूँ रात भर नहीं आती.’
ysayed1934@gmail.com
chaturang@expressindia.com