गिरिजा कीर
‘‘नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरतोय म्हणजे काय ते समजून घ्यायला प्रत्यक्ष काम करायला हवं. आजही समाजाची अनेक दारं बंद आहेत. तुमच्यासारख्या लेखिकेनं ती बंद दारं ठोठावली पाहिजेत. हे शब्द मला त्या वंचितांच्या जगात धेऊन गेले व तिथल्या अनुभवांना शब्दबद्ध करू शकले. म्हणूनच आज या टप्प्यावरही मी समाधानाने जगते आहे.’’ ८५ वर्षीही लिखाणाची ऊर्मी कायम असलेल्या गिरिजा कीर यांचा जीवन प्रवास
आयुष्यभर लिहित्या आणि बोलत्या राहिलेल्या नामवंत लेखिका गिरिजा कीर आज वयाच्या ८५ वर्षांच्या टप्प्यावरही लिहित्या आहेत. आयुष्यभर ज्या साहित्यावर त्यांनी प्रेम केलं, जी माणसं त्यांना भेटली आणि ज्यांच्यामुळे त्या सतत कार्यरत राहिल्या त्या सगळ्यांची व्यक्तिचित्रं त्यांच्या लिखाणातून सतत डोकावत राहतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आणि जवळजवळ पाच पुस्तकांचं काम आजही चालू आहे. आयुष्यभर माणसं भेटत गेली आणि त्यांना त्या शब्दबद्ध करत गेल्या..
त्या सांगतात, ‘‘वाचन आणि लिखाण हा माझा श्वास आहे. आजही अनेक माणसं मला येऊन भेटतात. त्यांचे अनुभव मी ऐकते. त्यांची सुख–दु:ख ते मला सांगतात. त्यातल्याच काहींना लिखाणातून शब्दरूप मिळतं आणि मग खचलेल्या, कोसळलेल्या अनेक माणसांना आयुष्यात पुन्हा कसं उभं राहावं याचा मार्ग त्यातून सापडतो. आणि मी लिहीत राहते; माझ्या विचारांना शब्द फुटत राहतात.’’
साहित्यनिर्मितीच्या प्रांतात कथा, कादंबऱ्या, मुलाखती, प्रवासवर्णनं, ललित लेखन, बालसाहित्य अशा सगळ्या विषयांत मुशाफिरी गाजवलेल्या गिरिजा कीर. आपल्याकडे मासिकांचा एक काळ होता. या मासिकांमधून लिखाण करणाऱ्या लेखक–लेखिका थेट वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. ‘किर्लोस्कर’, ‘प्रपंच’, ‘ललना’ या प्रख्यात मासिकातून गिरिजाबाईंच्या कथा प्रसिद्ध झाल्या आणि जवळजवळ १० वर्ष त्या ‘अनुराधा’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका होत्या. या कथा–कादंबऱ्यांचं लिखाण करताना त्यांची नाळ वास्तव जीवनाशी नेहमीच जोडलेली होती. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी तसंच सामाजिक प्रश्नांविषयी त्यांच्या मनात आस्था होती आणि म्हणूनच कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर लिहिलं. सहा वर्ष येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून ‘जन्मठेप’ हे पुस्तक लिहिलं. लिखाणाबरोबरच त्यांना दिसलेलं हे जग त्यांनी कथाकथनाच्या माध्यमातूनही अनेकांपर्यंत पोहोचवलं. सध्या मुलांच्या काही गोष्टींचं भाषांतराचं काम, एकांकिकांचं पुस्तक आणि ‘गिरिजायन’च्या दुसऱ्या भागाचं काम या सगळ्यात गिरिजाबाई व्यग्र आहेत. १९६५ ते २००० या काळातल्या त्यांच्या लेखनावर इतर लेखकांनी लेख लिहिलेल्या ‘गिरिजायन’चा पहिला भाग ‘चांदणवेल प्रकाशना’तर्फे २००५ मध्ये प्रकाशित झाला. आता २००० ते २०१८ या काळातल्या त्यांच्या लिखाणाविषयीचा दुसरा भाग येतोय. त्यात आणखी एक महत्त्वाची आणि मानाची गोष्ट म्हणजे गिरिजाबाईंच्या लेखनावर चार जणींनी पीएच.डी. केलेलं आहे. आज पुढच्या पिढीला त्यांच्या साहित्याची अशा प्रकारे दखल घ्यावीशी वाटतेय, यातच त्यांच्या लेखणीचं यश आहे.
गेली ५५ वर्ष गिरिजाबाई राज्यभर फिरून विविध विषयांवर व्याख्यानं देत होत्या. ती सगळी व्याख्यानं एकत्रित करून पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचं काम सध्या सुरू आहे. याशिवाय आजच्या कालानुरूप काही कथाही त्या लहान मुलांसाठी लिहीत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘किशोर’मध्ये त्यांची एक कथा छापून आली तर प्रतिसादपर परभणीतून सहा पत्रं आली. कथा आवडल्याचं तर त्यांनी लिहिलंच पण कथा सांगायला परभणीला कधी येणार अशी विचारणाही त्यांनी केली. आता जाणं–येणं जमत नाही, आवाजही तितका काम करत नाही त्यामुळे त्यांना नाही सांगावं लागलं, ही खंत मात्र त्यांच्या मनात आहेच.
मात्र आजही गिरिजाबाई ज्या उत्साहाने लिहीत आहेत या मागे आयुष्यभर त्यांनी केलेलं काम तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचे, आजोबांचे संस्कार, काम करण्याची त्यांनी दिलेली ऊर्मी बाईंना खूप महत्त्वाची वाटते. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसनिक होते आणि गिरिजाबाई पावणेदोन वर्षांच्या असताना त्यांची आई गेल्यामुळे वडीलच यांच्यासाठी आई–वडील, गुरू, खेळगडी सगळेच होते. निरनिराळ्या गोष्टी सांगायचा संस्कार त्यांच्या वडिलांनीच केला. म्हणूनच वयाच्या ८० वर्षांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी भारतात, भारताबाहेरही त्या कथाकथनासाठी जात असत आणि त्यातून मिळणारे पैसेही पुन्हा वंचित मुलांसाठी वापरत असत. त्यातूनच समाजातल्या दुर्लक्षित, वंचितांचं दु:ख त्यांच्या लेखणीची ताकद बनली, पण त्यासाठी त्या प्रत्यक्ष त्या त्या समाजात वावरल्या. गिरिजाताई ‘रेस्क्यू रिमांड होम’मध्ये गेल्या, ताराबाई मोडक यांच्यासोबत आदिवासी भागात गेल्या, नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्टचे संस्थापक हरीभाऊ भडसावळेकाका यांच्याबरोबर १६ वर्ष त्या भागात जाऊन काम केलंय, तर अमरावतीला अनुताई भागवत भेटल्या त्यांच्यासह शिवाजीराव पटवर्धन यांच्या कुष्ठरोग्यांच्या कामातही काही काळ सहभागी झाल्या.
गिरिजाबाई आजही ठामपणे उभ्या आहेत त्या, गेल्या काही वर्षांत केलेल्या विधायक कामाच्या बळावर. त्या म्हणाल्या, ‘‘नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरतोय म्हणजे काय ते समजून घ्यायला प्रत्यक्ष काम करायला हवं. आजही समाजाची अनेक दारं बंद आहेत. तुमच्यासारख्या लेखिकेनं ती बंद दारं ठोठावली पाहिजेत. हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले म्हणून मी प्रत्यक्ष समाजातल्या त्या वंचितांच्या जगात जाऊ शकले, काम करू शकले आणि त्या अनुभवांना शब्दबद्ध करू शकले. हे सगळं केल्यामुळेच आज आयुष्याच्या या टप्प्यावरही मी समाधानाने जगते आहे.’’
आजही घरी दिवसभर मुला–नातवंडांत त्या रमतात. त्यांच्या हातचा स्वयंपाक सगळ्यांना आवडतो. त्यामुळे जेवण करायला बाई असली तरी त्याही अधूनमधून पाककलेतलं समाधान घेतात. आजही त्यांच्या हातची लोणची, चटण्या बरण्या भरून त्यांच्या मत्रिणी–नातेवाईकांकडे जातात. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांची एक मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्या तीन महिने घरी होत्या. तीन महिन्यांच्या आरामानंतर लेखन, व्याख्यान, दौरे सगळं वेगात सुरू झालं. खाण्या–पिण्याच्या वेळा चुकल्या, धावपळ, दगदग याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला. अर्थात दोन्ही मुलं शरद आणि प्रफुल्ल, सूनबाई शुभदा सगळ्यांनी खूप काळजी घेतली. कोणत्याही प्रकारचं दडपण येऊ न देता आजही मुलं त्यांची काळजी घेतात. अर्थात गाण्याची, नाटकाची आवड आहे पण आता एकटी जाऊ शकत नाही याचं शल्य त्यांच्या मनात आहे, अर्थात ‘घरातल्या सगळ्यांनी त्यांची कामं सोडून माझ्याबरोबर यावं अशी माझी अपेक्षा नाही’ असंही त्या म्हणतात. दोन पिढय़ांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मुलांचं–नातवंडांचं जग वेगळं असतं. हे गिरिजाबाई समजून घेतात. पण त्याचबरोबर आमची भांडणंही होतात. मग मी रात्रभर जागी राहते हेही त्या प्रांजळपणे कबूल करतात.
मुळात वयाच्या या टप्प्यावर पिढय़ांचं अंतर, आवडीनिवडी समजून घेतल्या पाहिजेत किंवा त्यांच्या सासूबाईंकडून त्यांना तेवढं स्वातंत्र्य मिळालं नाही जे आज मी माझ्या सुनेला दिलं पाहिजे हे गिरिजाबाईंना वाटतं म्हणून त्या आजच्या पिढीशी सूर जुळवत सुखा–समाधानाने जगू शकतात. आपल्याला सुखात ठेवण्यात मुलांचा मोठा वाटा आहे, हे त्या आवर्जून सांगतात. त्यामुळे पशांची श्रीमंती नसेल कदाचित पण समाधानाची श्रीमंती मात्र त्यांच्याकडे आहे.
वयाच्या ८५ वर्षांच्या टप्प्यावर आजपर्यंत त्यांची ७५ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुढच्या पुस्तकांचं काम चालू आहे. १९८५ मध्ये प्रकाशित झालेलं ‘आभाळमाया’ फेमिना मासिकातून इंग्रजीमध्ये अनुवादित झालंय. ‘मनोबोली’ उडिया भाषेत अनुवादित झालंय. एका लेखिकेसाठी हे खूप मोठं समाधान आहे. आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्याचं ‘चांदण्याचं झाड’ त्यांनी ‘झपाटलेल्यागत’ वाचकांसमोर उलगडलंय म्हणूनच ‘गाभाऱ्यातली’ ‘जगावेगळी माणसं’ उलगडताना त्यांच्या लेखणीला आलेलं ‘आत्मभान’ आजही ‘कलावंत’ म्हणून त्यांना मोठं करतंय. आणि म्हणूनच आजही त्यांचं माणसं वाचण्याचं वेड संपलेलं नाही. हे वेड जोपर्यंत त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत सकारात्मक ऊर्जेने त्या येणाऱ्या नव्या पिढीला जगण्याचा मंत्र देतच राहतील एवढं निश्चित.
उत्तरा मोने
uttaramone18@gmail.com
chaturang@expressindia.com