विद्या बाळ vidyabalms@gmail.com
वृद्धावस्था ही फक्त शरीराची अवस्था असते. वय वाढत जातं तसं शरीर थकत जातं, अवयवांची क्षमता कमी होत जाते. आयुष्याला एक ठहराव येतो. ही शरीराची अपरिहार्य अवस्था. पण अनेकांना त्यांचं आयुष्य थांबायला परवानगी देत नाही. अनेकांचं आयुष्य इतकं काही ‘करण्यात’ गेलेलं असतं की आपण वृद्ध असल्याची जाणीव त्यांना होत नाही किंवा झाली तरी स्वीकारायला मन तयार नसते. अशाच मान्यवरांचं हे सदर. ज्यांच्या शारीरिक वयाने पंचाहत्तरी गाठली आहे किंवा त्यापलीकडे वय गेले आहे, पण आजही ते कार्यरत आहेत. म्हातारपणाचा बाऊ न करता भरभरून जगत आहेत.. त्या नामवंतांचं हे सदर दर शनिवारी.
मी लवकरच वयाची ८२ वर्ष पूर्ण करून ८३ व्या वर्षांची सुरुवात करणार आहे. तेव्हा उघडच आहे की मी म्हातारं माणूस आहे. तरुणपणीची माझी ताठ चाल आता वाकली आहे; घनदाट केशसंभाराचे विरळ आणि पांढऱ्या रंगाचे अवशेष उरलेत, डोळ्यांनी कमी दिसतं, कानांनी कमी ऐकू येतं, अशा वेळी कशासाठी म्हणायचं की मी म्हातारी नाही? हा, एक गोष्ट खरी की अनेक म्हाताऱ्या माणसांसारखी माझ्या आतली मातीची ओल हरवलेली नाही. मला आजही चांगलं ऐकण्यात, बघण्यात रस आहे, तरुणांशी बोलण्याची उत्सुकता आहे. अजून येतो वास फुलांना तशी, आजही माझी अश्रूंची तुडुंब भरलेली तळी बऱ्या वाईटच्या स्पर्शानं सांडू लागतात. या साऱ्या गोष्टी मला सांगत असतात, ‘या सगळ्यामुळेच तुझ्या कामाच्या विषयात, तू आजही काही लिहिते, बोलते आहेस. यानिमित्ताने थोडी घराबाहेर, थोडी थोडी गावाबाहेरही जाते आहेस.’
हे तर खरंच आहे. मनाच्या गतीनं आता धावता काय चालताही येत नाही. पण अजूनही हलता चालता येत आहे हे काय कमी आहे? हे सगळं करताना म्हणजे बोलताना, चालताना तोल जातो आणि तो जाऊ शकतो याची जाणीव आहे. त्यातूनच मी माझं म्हातारपण स्वीकारलं आहे. ते केवळ नाइलाजानं मान्य केलं नाही तर दीर्घायुष्याची एक अटळ अवस्था म्हणून मी मनोमन तरी स्वीकारली आहे हे आवर्जून सांगण्याचं कारण म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची ही हकिगत. एकदा तिचं एका रिक्षावाल्याशी भांडण झालं. कशावरून माहीत आहे? त्यानं तिला ‘आजी’ म्हटलं. ती भांडली. म्हणाली, ‘काकू म्हण, मावशी म्हण, आंटी म्हण पण हे काय ‘आजी’ म्हणणं!’
तर असं का होत असेल, असा मी विचार करायला लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणसांची वयं वाढतात, शरीर बदलतं पण ‘माणूस’ ना बदलतं, ना वाढतं! या संदर्भात सांगायला हवं की, भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टी मला खटकतात आणि काही फार महत्त्वाच्या म्हणून आवडतात. त्यातली एक महत्त्वाची संकल्पना आहे चार आश्रमांची – ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. यापैकी वार्धक्याची सुरुवात वानप्रस्थाश्रमातून होत असावी. शिक्षण झालं, नोकरी-व्यवसाय ही पोटापाण्याची व्यवस्था झाली म्हणजे ब्रह्मचर्याश्रम संपला. त्या स्थिरस्थावरतेनंतर लग्न, संसार हा गृहस्थाश्रम सुरू. त्यातल्या चढउतारांसह, उपभोगांसह बराच काळ काढल्यानंतर काहीशी निवृत्ती सुचवणारा तो वानप्रस्थाश्रम. हळूहळू संसारातून काढता पाय घेण्याची सुरुवात इथे करायची. आपलं खाणंपिणं, आपली खरेदी, आपले हिंडण्या फिरण्याचे खर्चीक शौक, एकूणच सांसारिक जीवनातल्या मौजमजेच्या गोष्टींच्या धूमधडाक्यातून थोडंसं बाजूला व्हायचं. म्हणजे या सगळ्याकडे एकदम पाठ नाही फिरवायची. एक पाय त्यात ठेवून, एक पाय संसाराच्या पल्याड, कुटुंबाच्या व्यवहाराच्या पल्याड ठेवायचा. आणि त्याच वेळी स्वत:च्या आतमध्ये बघायला सुरुवात करायची. सतत इतरांशी बोलण्याच्या सवयीतून किंचित दूर होत. स्वत:शीच संवाद करायला सुरुवात करायची.
हे मी करून आता इथवर पोचले आहे. ‘त्या’वेळी. एकतर त्याच पाण्यात मी होते, म्हणू सगळं स्पष्टपणे उलगडलं नव्हतं. आता इतक्या वर्षांची पुढची वाटचाल झाल्यावर त्यातल्या एकेक पायऱ्या सांगता येताहेत. शिवाय व्यक्तिश: मी वयाच्या पन्नाशीत संसाराचा संन्यास घेतला आहे. त्यामुळे मी माझ्या संसाराच्या पलीकडे कामाच्या संसाराकडे तेव्हाच वळले आहे. माझं हे प्रातिनिधिक उदाहरण ठरत नाही, म्हणून ते बाजूला ठेवूया. पण आज जगताना हाच माझ्या जगण्याचा पाया बनून, मला साथ देतो आहे.
आपल्याला कोणत्या कामात रस आहे? कोणत्या कामामुळे आपल्याला पैसा, नाव, प्रतिष्ठा यापलीकडचा आनंद मिळतो? वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यावर, किंवा खरं तर याआधीच हे प्रश्न पडले, यांची उत्तरं सापडावी तर वानप्रस्थाश्रमात, हळूहळू ज्यातून एक पाय बाहेर ठेवला, तिकडेच दुसरा पाय यायला बघतो. मग आपल्या जगण्यातले अग्रक्रम बदलतात. पूर्वी ज्यात मन रमलं किंवा मन रमणं आहे की नाही हे न कळताच आपण सहभागी झालो, त्यातली कधीकधी निर्थकता जाणवायला लागते इतके दिवस केलं म्हणून ते करत राहायचं की मन रमवणाऱ्या, कदाचित परंपरेपलीकडच्या काही कामात अधिकपणे मिळणारा आनंद घ्यायचा? यांसारखे प्रश्न म्हणजे अडथळ्यांची शर्यत नाही उलट नव्या वाटेसाठी मार्गदर्शन करणारे फलक किंवा बाण असतात. ही वाट तशी अखेपर्यंत न संपता सोबत करणारी ठरू शकते. निदान माझ्यापुरता हा अनुभव आहे.
मनाबरोबरच्या या विचारांबरोबरच शरीराचा विचारही अतिशय महत्त्वाचा असतो. तरुणपणी किंवा अगदी पन्नाशीपर्यंत आपल्या शरीराला आपण (फार नाजूक तब्येतीचे नसू तर) खूप गृहीत धरतो. इतकं की खरं तर कधी कधी दुर्लक्षच करतो. त्याच्या हाका, त्याचे सांगावे न ऐकता किंवा ऐकू आले तरी धुडकावून लावत, आपण आपल्या मस्तीत जगत राहातो, पण मन आणि शरीर यांच्यात एक अतूट नातं आहे. म्हणूनच दोघांकडे लक्ष द्यायला लागतं. कामाचा ध्यास, वाचनाचा सोस, छंदांचा पाठलाग हवाच पण यावेळी यासोबत शरीर चालतंय ना, बघावं लागतं. वानप्रस्थाश्रमाच्या या काळात या ध्यासातले, सोसामधले काही मोह टाळावे लागतात. आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी! शक्यतो रोजच्या जेवण्याइतक्याच नेमाने व्यायाम करावा लागतो. माझी प्रकृती जन्मजातच बऱ्यापैकी चांगली आहे. पण मी गेली ४०/४५ वर्ष सातत्यानं रोज, (प्रवासातले दिवस सोडता) व्यायाम करते. माझा व्यायाम घाम काढणारा नाही. काही योगासनं आणि काही फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायामप्रकार यांचं ते मिश्रण आहे. त्यासोबतच मी प्रार्थना करते. देवाची नाही; कुणा बाहेरच्यांची नाही. शेवटी माझं शरीर हाच माझा आधार. त्यामुळे या शरीरातल्या सर्व अवयवांना, संस्थांना साद घालत मी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी प्रार्थना तयार केली आहे. ती म्हणते, आज या वयात मी जितपत चालती-फिरती आहे, त्याबद्दल मी माझ्या शरीराला रोजच धन्यवाद देते. माझ्या वयाच्या माझ्या अवती-भवती दिसणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या तुलनेत मी खूपच बरी आहे. तरीसुद्धा कधी कधी मला अचानक एक अपराधभाव दाटून येतो. मनातून अपराधी वाटतं. गेल्या तीन महिन्यांत या भावनेचा जोर जरा वाढलाच आहे. घरातच झालेल्या एका छोटय़ाशा अपघातात मी पडले. माकडहाडावरचा एक मणका फ्रॅक्चर झाला. त्यावरचा मुख्य उपाय अंथरुणावर पडून राहाण्याचा. शिवाय फारशा शारीरिक वेदनाही नाहीत. घरात हातापायाशी, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, दिवाळी अंक पसरलेले. पण खूप उत्साहानं खूप वाचावं असं होत नाही. वाचनासाठी एखादी मोठी संधी असताना, मन वाचू बघत नाही याचा त्रास होतो. मग मी मनाची समजूत घालत म्हणते, ‘तुझ्या वयाची इतर माणसं काय करताहेत ते बघ- म्हणजे तुझीही अपराध-भावना कमी होईल.’ एका मैत्रिणीनं सांगितलं की डॉक्टर म्हणाले – ‘या वयातलं असं पडणं यात मेंदूलाही एक हबका बसतो. त्याला एक थकवा येतो.’ मला लगेच बुडत्याला काडीचा आधार वाटावा तसं वाटलं. हा थकवा आहे की आळस? मी म्हणते थकवाच असेल!
शरीराचा थकवा असतानाही अनेकदा मन एवढं धावतं आणि उडय़ा मारत असतं. या विश्रांतीच्या काळातही, ते एका मुद्दय़ावरून तिसऱ्याच मुद्दय़ावर झेपावत असतं. कधी कधी वाटतं, अॅनिमल प्लॅनेटसारख्या चॅनेलवरची ही माकडं तर नाही – या झाडाच्या फांदीवरून, वीसपंचवीस फुटांवरच्या दुसऱ्या झाडाच्या डहाळीवर झेपावत अलगद झोक्यासारखी डोलणारी? आपण झाडांच्या फांद्या नाही तर आठवणीत किंवा गतकाळातल्या घटना प्रसंगात असेच हेलकावे घेत असतो! वयाच्या पस्तिशीपर्यंतच्या काळात मी सजग नसलेलं, पारंपरिक माणूस म्हणून, विशेषत: बाई म्हणून जगत होते. लोक काय म्हणतील आणि लोकांनी चांगलं म्हणावं यासाठीचा जणू सगळा जगण्याचा खटाटोप होता! या विचारांच्या हिंदोळ्यात अचानक एक महत्त्वाचा धागा हाती लागला. ‘त्याकाळात’ मी, ‘आपण लोकांना आवडावं’ यासाठी खूप धडपडत होते! धडपड यशस्वी होत, या ‘चांगुलपणाचं’ खूप मोठं गाठोडं मी मिळवलं होतं. पण स्वत:चा विचार, स्वत:ला काय आवडतं, नावडतं याचा विचार तेव्हा सुचलाच नव्हता. शहाणं होता होता, वाढता वाढता लक्षात आलं, लोक काही का म्हणेनात, मला माझं वागणं, बोलणं, लिहिणं, जगणं कसं वाटतंय? योग्य वाटतंय ना, झालं तर मग! ‘तशीच वाग’ असा मनानं कौल दिला. लोकांना आवडल्यापासून स्वत:ला आवडल्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. आधार फक्त विवेकाचा होता आणि आहे! यासाठी समाजाला निर्भयपणे आणि स्वत:ला कठोरपणे सामोरं जावं लागतं. त्यासाठीच बळ बाहेरून नाही, आतल्या विवेकाच्या वाहिनीतून येतं. लोकांपुढे नमायचं नाही आणि स्वत:च्या बाबतीत पक्षपाती व्हायचं नाही. हे सारं मी मिळवायच्या प्रयत्नात आहे. सगळं मुळीसुद्धा जमलेलं नाही. पण काय जमायला हवं ते कळलं आहे हे काय कमी!
कधीतरी कुणीतरी अचानक प्रश्न विचारतं आणि मी गोंधळून जाते. विचारतात की तुमचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय? मी माझ्या आणि आजूबाजूच्या अनेकांच्या अनुभवाचं निरीक्षण करते. स्वत:लाच विचारते. कसं जगायचं आहे तुला? माझं उत्तर आहे, ‘मला चांगल्या माणसासारखं जगायचं आणि वागायचं आहे. जगण्यातली अर्थपूर्णता आणि गुणवत्ता सांभाळत जगायचं आहे.’
अलीकडे माझ्या कामाचा परीघ स्वाभाविकपणे छोटा होत चालला आहे. शिवनेरी, रेल्वेचं सेकंड एसी – हे प्रवासही झेपत नाहीत. उरलेला विमानप्रवासाचा पर्याय कधी मला तर कधी बोलवणाऱ्याला झेपत नाही. एकेकाळी चैनीची वाटणारी प्रवाससाधनं आता गरजेची झाली आहेत. तरीही या प्रवासात, या कामात शरीर दमतंच. पण मन तरारून येतं! आपला कुणाला तरी उपयोग झाला यातला आनंद हेच या दमणुकीवरचं औषध असतं.
इथवर सगळं ठीकच आहे. पण हे सारं चालू असताना, मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न कायमच उभा राहून खुणावत असतो, विचारत असतो – ‘मेंदू शरीर ठाकठीक साथ देत आहे तोवर ठीक आहे. पण त्यांनी साथ सोडली. पूर्णपणे परावलंबून आलं. आपल्या अशा जगण्याचा ना आपल्याला आनंद, ना इतरांना! अशी अवस्था आल्यावर काय करशील?’ या प्रश्नाला माझ्याकडे आज तरी उत्तर नाही. ‘राइट टू लाइफ’ मध्येच ‘राइट टू डेथ’चा अधिकार समाविष्ट आहे खरा. पण त्यासाठीची कायदेशीर मदत शासन करत नाही तोवर, अरुणा शानबागसारख्या अवस्थेत जिवंत राहण्याखेरीज पर्याय नाही! अशी भयानक जीवघेणी वेळ आपल्यावर येऊ नये, असं म्हणत राहाण्याखेरीज आज हातात काहीच नाही.
हातात एवढंच आहे की अशा प्रकारचं व्हेजिटेटिव्ह अवस्थेतलं जगणं नाकारू इच्छिणाऱ्यांची एकजूट करून, शासनाचे दरवाजे ठोठावत राहायचं आणि म्हणायचं ‘आम्हाला त्यातल्या त्यात समाधानानं मरू द्या ना!’
chaturang@expressindia.com