डॉ. राजन भोसले

लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये एक गोष्ट खूप समानतेने दिसून येते.

अत्याचार झालेली व्यक्ती असे प्रकार स्वत:हून खूपच कमी वेळा बोलून दाखवतात किंवा त्याची तक्रार करतात.  इथेही रमाने ही गोष्ट आई-वडिलांना का सांगितली नाही? तिला कुणाची भीती होती का? तिला आपले पालक आपल्याला समजून घेतील किंवा मदत करतील याबद्दल काही शंका होती का? अनेक दिवस सतत होत असलेली ही लैंगिक कुचंबणा तिने गप्प बसून का सहन केली?  हे आणि यासारखे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये उपस्थित होतात.

मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रू भागांत अनेक बहुमजली इमारती आहेत जिथे काही श्रीमंत मंडळी राहतात. जवळपासच मंत्र्यांचे बंगले, त्यामुळे पोलिसांचा वावर या परिसरांत थोडा अधिक. इथे असलेल्या ‘पूनम’ इमारतीच्या चोविसाव्या मजल्यावर मेहरा कुटुंब राहते. तेरा वर्षांची रमा ही मेहरा दाम्पत्याची एकुलती एक मुलगी. रमा एक आनंदी व उत्साही मुलगी. अभ्यासात हुशार, भरतनाटय़म शिकत असलेली, शाळेच्या बास्केट बॉल टीमची कप्तान. तिचे वडील एक श्रीमंत उद्योगपती व आई सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापिका.

रमा एका नामांकित ‘ऑल गर्ल्स’ कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी. या शाळेतले सर्व शिक्षक व कर्मचारीसुद्धा स्त्रिया. रमाच्या घरीसुद्धा सर्व नोकर स्त्रिया. घरात व शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले. रोज सकाळी रमाची आई तिला शाळेसाठी तयार होताच लिफ्टच्या दारापर्यंत सोडत असे. लिफ्ट खाली पोचताच सोसायटीच्या जिममध्ये सकाळीच गेलेले तिचे वडील तिला स्वत: शाळेत सोडून येत. रमाला शाळेतून परत आणण्याची जबाबदारी रमाच्या आईची. त्या कॉलेजमध्ये शिकवून घरी परत येताना रमालाही घेऊन येत. थोडक्यात, रमा आई-वडिलांचं पूर्ण लक्ष असलेल्या अशा एक सुरक्षित वातावरणात राहात होती.

इयत्ता आठवीत असताना रमाच्या आई-वडिलांच्या पाहण्यात एक गोष्ट आली. दोघांनाही रमा थोडी गप्प-गप्प राहातेय असं वाटू लागलं. तिच्यातला उत्साह व खेळकरपणा खूपच कमी झालेला दिसू लागला. तिला मत्रिणी, खेळ व अगदी अभ्यासातही रस वाटत नाही, हे जाणवू लागलं. तिच्या आवडत्या डान्स क्लासलाही ती ‘नको’ म्हणून टाळू लागली. ती कुठल्या तरी तणावाखाली असावी, अशी तिची देहबोली दोन्ही पालकांना स्पष्ट दिसत होती. आई-वडिलांनी अनेक प्रकारे तिच्यापाशी याची विचारणा केली. विचारल्यावर ‘काही नाही’ असं म्हणून रमा बोलण्याचं टाळत होती. काही दिवस वाट बघून तिच्या आई-वडिलांनी तिच्या शाळेला भेट दिली. जे पालकांना दिसत आणि जाणवत होतं नेमकं तेच शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा प्रकर्षांने दिसलं आणि जाणवलं होतं. रमामधल्या या उदास बदलाचं नेमकं  कारण काय हे शाळेतल्या शिक्षकांनाही उमजलं नव्हतं.

शाळेच्या समुपदेशकाला विचारलं असता, तिने ‘एखाद्या मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या’ असं सुचवलं. मुंबईच्या एका ज्येष्ठ व नामांकित मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला. त्यांनी रमाला नैराश्य आलं असल्याचं निदान केलं व त्यावरची औषधं लिहून दिली. एका आनंदी व उत्साही मुलीला अचानक ‘नैराश्य’ का आलं, हा प्रश्न आई-वडिलांना भेडसावत होता. ‘नैराश्यावरची औषधं सुरू करताच रमा जास्त झोपू लागली. तिच्यातला उत्साह व चलाखी कमी होऊ लागली. तिचं वजनही झपाझप वाढायला लागलं. शिवाय तिच्या उदास वागणुकीबाबतची मूळ तक्रार अजूनही तशीच होती.

पुढे कोणाच्या तरी सुचवण्याने रमाला घेऊन तिचे आईवडील एका अनुभवी समुपदेशकाकडे आले. काही सत्रं होता-होता, रमा हळूहळू बोलती झाली व एक धक्कादायक गोष्ट तिने अखेरीस समुपदेशकाला सांगितली. रोज सकाळी शाळेसाठी निघताना रमाची आई तिला चोविसाव्या मजल्यावर लिफ्टच्या दरवाजात सोडत असे. लिफ्टने एकटीने चोवीस मजले खाली येताना एक ठरावीक लिफ्टमन रमाला नेहमी कामुक शरीरस्पर्श (सेक्शुअल अ‍ॅब्युज) करत असे. हा स्पर्श लैंगिक उद्देशाने व बळजबरीने केलेला असे. तिच्या शरीराला अनेक प्रकारे असा कामुक स्पर्श करण्याचा प्रकार बरेच दिवस चालू होता. ‘हे तू आजपर्यंत कुणालाही का सांगितलं नाहीस’ या प्रश्नाचं उत्तर मात्र अनेक प्रयत्न करूनही रमाला देता आलं नाही.

रमाने ही गोष्ट आई-वडिलांना का सांगितली नाही? तिला कुणाची भीती होती का? तिला आपले पालक आपल्याला समजून घेतील किंवा मदत करतील याबद्दल काही शंका होती का? अनेक दिवस सतत होत असलेली ही लैंगिक कुचंबणा तिने गप्प बसून का सहन केली? एका हुशार व चुणचुणीत मुलीला ही गोष्ट आई-वडिलांना सांगण्यात नेमकी काय अडचण होती? हे आणि यासारखे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये उपस्थित होतात. लैंगिक शोषणाच्या अशा केसेसमधे ही गोष्ट खूप समानतेने दिसून येते. अत्याचार झालेली व्यक्ती असे प्रकार स्वत:हून खूपच कमी वेळा बोलून दाखवतात किंवा त्याची तक्रार करतात.

‘लैंगिक शोषणाच्या दर सोळापैकी फक्त एक केस उघडकीस येते,’ असं विधान अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेण्टने आपल्या अधिकृत परिपत्रकात अलीकडेच केलं आहे. असं का होतं? अत्याचार झालेली व्यक्ती या गोष्टींची वाच्यता का करत नाही? याचा अभ्यास करताना जी काही कारणं माझ्यासमोर आली ती पालकवर्गाने खास समजून घेण्यासारखी आहेत. कारण त्या कारणांचा खूप जवळचा संबंध पालकांच्या काही मूलभूत आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांशी आहे.

पहिलं कारण. कुठलीही गोष्ट व्यक्त करायला, बोलून दाखवायला (कम्युनिकेशन) योग्य अशा भाषेचं ज्ञान व शब्दांची गरज असते. अनुरूप भाषाच अवगत नसेल तर एखादी गोष्ट कशी सांगायची, हा प्रश्न निर्माण होतो. जशी वकिलांची, डॉक्टरांची, अभियंत्यांची विशिष्ट भाषा असते, जी ते त्यांच्या क्षेत्रातल्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी वापरतात. अगदी त्याच प्रकारे लैंगिकतेशी संबंधित अशीसुद्धा एक भाषा आहे ज्यामधे जननेंद्रियांची योग्य नावं, लैंगिक बाबींचं विवरण करता येईल अशी योग्य शब्दावली समाविष्ट असते. ही भाषा व शब्दावली मुलांना शिकवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पालकांचीच असू शकते, कारण हे काम शाळेत जायच्या वयाच्या आधी, म्हणजे मूल जेव्हा मातृभाषा शिकू लागतात तेव्हाच सहजपणे करणं आवश्यक असतं. आपण मुलांना शरीराच्या विविध भागांची.. नाक, कान, हात, पाय अशी नावं, अगदी मूल एक वर्षांचं होता-होता सहजपणे शिकवू लागतो. पण जननेंद्रियांसाठी असलेली योग्य नावं शिकवायचं मात्र आपण टाळतो. कारण जननेंद्रियांबाबत आपल्याच मनात संकोच तरी असतो किंवा पूर्वग्रह असतात. आपला हाच संकोच लैंगिकतेबाबतची योग्य भाषा मुलांना अवगत करून देण्यात बाधा बनतो. आपल्या मुलांना आपणच याबाबतीत अज्ञानी ठेवण्यास कारणीभूत होतो.

लैंगिक अंग-प्रत्यंग, आविर्भाव, अभिव्यक्ती व वर्तणूक यांच्यासंबंधीच्या भावना व्यक्त करण्यासाठी जी विशिष्ट  शब्दावली व भाषा माहिती असायला हवी ती मुलांना शिकवणं ही पालकांचीच जबाबदारी आहे. यात पालक कमी पडतात. हे टाळण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे रमाची केस. रमाच्या केसमध्ये दुसरं कारण हे होतं, की झालेल्या प्रकाराला आपण स्वत:ही कुठेतरी कारणीभूत आहोत अशी धारणा तिने करून घेतली होती. त्यामुळे बोलून दाखवल्यास त्याचा ‘दोष’ आपल्यावरच येईल व आपल्यालाच त्याचे ‘परिणाम’ सोसावे लागतील असा उलट समज तिने करून घेतला होता. शिवाय हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याचा ‘बदला’ तो लिफ्टमन आपल्यावर घेईल अशी भीती तिला भेडसावत होती. या व अशा अनेक नकारात्मक विचारांनी गोंधळून रमा बिथरली होती व काहीच मार्ग न सुचल्याने थकून आत्मग्लानीमधे खचत गेली होती. यालाच डॉक्टरी भाषेत ‘रिअ‍ॅक्टिव ‘नैराश्य’ म्हणतात.

लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये पीडित व्यक्ती कधीच त्याला जबाबदार नसते. अशा प्रकाराचा पूर्ण दोष अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा असतो. म्हणूनच असे प्रकार उघडकीस येताच पीडित व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून तिला बेशर्त आधार व संरक्षण देणं आत्यंतिक गरजेचं असतं. असा आधार, असा विश्वास, असं संरक्षण आपल्याला मिळेल की नाही याबाबत जेव्हा व्यक्ती साशंक असते तेव्हाच ती गोष्ट लपवून ठेवण्याची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये निर्माण होते.

मुलांनी पालकांशी नि:संकोचपणे सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलावं. आपले पालक आपलं पूर्ण ऐकून घेतील व आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतील याची निश्चित खात्री त्यांच्या मनात असावी. ते आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास मुलांना असावा. लैंगिक बाबींची चर्चा करता येईल अशी भाषा व शब्दावली त्यांना सहजपणे शिकवलेली असावी. हे सर्व जर आपण साध्य करू शकलो तरच असे लैंगिक अत्याचार व गैरप्रकार आपण रोखू शकू.

शरीराचे काही भाग खासगी असतात. त्यांना आपल्या इच्छेविरुद्ध अनावृत्त करणं किंवा स्पर्श करण्याचा अधिकार कुणालाही नाही. शरीराच्या या खासगी भागांची मर्यादा सांभाळणं ही आधी स्वत:ची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणजेच आपल्याला गैर प्रकारे स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट विरोध करणं व अशा प्रकाराबद्दल ताबडतोब आई-वडील शिक्षक अशा कुणीही जबाबदार व्यक्तीला स्पष्टपणे सूचित करणं. इंग्रजीमध्ये हीच शिकवण ‘रेझिस्ट ब्रेवली अ‍ॅण्ड रिपोर्ट ईमिडिएटली’ अशा शब्दात दिली जाते.

केवळ स्पर्शच नव्हे तर दुरून केलेले लैंगिक अंगविक्षेप, आविर्भाव, हातवारे, फोनवर पाठविलेले लैंगिक मेसेजेस, चित्र, चित्रफिती यालासुद्धा आज कायदा सेक्शुअल अब्यूज वा लैंगिक शोषणच मानतो. अनेक वेळेला समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्यासाठी अशीच सुरुवात केली जाते. विरोध न केल्यास ‘आपण यासाठी तयार आहोत’ असा सोईस्कर अर्थ काही जण काढतात. म्हणूनच अशा प्रकाराची चाहूल लागताच सावध राहाणं, स्पष्टपणे याला नाकारणं व त्याचा निर्भीडपणे विरोध करणं हेसुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे. अर्थात हे पालकांचंच कर्तव्य आहे. ‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ’ (प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर) हे ब्रीदवाक्य पालकांनी गांभीर्याने अंगीकारण्याची व कसोशीने पाळण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मुलांना संभाव्य लैंगिक अत्याचारांपासून संरक्षित ठेवण्यासाठी योग्य वयात योग्य प्रकारे प्रशिक्षित करणं हे आव्हान पालकांना स्वीकारावं लागेल.

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com