डॉ. राजन भोसले
‘‘प्रेशर कुकरची शिट्टी वाजून त्यात दाटलेल्या वाफेची वाट मोकळी व्हावी हेच अपेक्षित असतं, तसंच भर तारुण्यात वेळोवेळी उफाळून येणाऱ्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी हस्तमथुनाचा यथोचित व सुरक्षित मार्ग अवलंबणं गरजेचं असतं. प्रेशर कुकरप्रमाणेच दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला मोकळी वाट करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.’’
सत्तेचाळीस वर्षांचे योगेश अविवाहित होते. शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. नोकरी एका खासगी कार्यालयात. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गिरगावात एकटे राहात होते. हा एकटेपणा अनेकदा त्यांना उद्विग्न करत असे. फारसे मित्र नाहीत. नोकरी आणि घर या चाकोरीतच त्यांचं अवघं जीवन व्यतीत होत होतं. अलीकडे ते एका समस्येमुळे फारच अस्वस्थ होते.
अखेर ते आपली व्यथा घेऊन डॉक्टरांकडे पोहोचले. ‘‘डॉक्टर, मी लग्न करायचं आजपर्यंत टाळलं, कारण आपण लग्नानंतर पत्नीशी शारीरिक संबंध ठेवूच शकणार नाही, असं मला खात्रीने आणि सतत वाटत आलेलं आहे. आपल्यात ती क्षमताच नाही. आपण आपली लैंगिक क्षमता तरुण वयात केलेल्या काही चुकांमुळे कायमची गमावून बसलो आहोत, असं मला वाटतं.’’ योगेशने स्वत:ची समस्या धाडस करून डॉक्टरांसमोर मांडली. ‘‘तुमच्यात लैंगिक क्षमता नाही, असं तुम्हाला का वाटतं? असा काही अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष आला आहे का? तरुण वयात अशा नेमक्या कोणत्या चुका तुम्ही केल्यात ज्यामुळे असं झालं आहे, असं तुम्हाला वाटतं? यापूर्वी तुम्ही कधी या गोष्टीसाठी वैद्यकीय सल्ला घेतला आहे का?’’ असे प्रश्न विचारत डॉक्टरांनी विषयाची कारणमीमांसा सुरू केली.
डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता-देता योगेशच्या जीवनातले काही खूप जुने संदर्भ समोर येत गेले. योगेश तेरा वर्षांचा असताना एकदा अचानक त्याच्या आईने त्याला हस्तमथुन करताना पाहिलं होतं. त्याचा काय अर्थ काढायचा व या प्रकाराला कसं हाताळायचं हे न सुचल्याने तिने सरळ ही गोष्ट योगेशच्या वडिलांना सांगितली. योगेशच्या वडिलांनी याची गंभीर दखल घेतली व योगेशला खूप कडक शब्दात ताकीद दिली. ‘‘असे पुन्हा करशील तर बेदम मार पडेल व तुला पोलीसांच्या ताब्यात देईन,’’ असा दमही भरला. या प्रकारांनंतर वडिलांनी योगेशवर पाळत ठेवण्याची जबाबदारी त्याच्या आईला दिली. नवऱ्याच्या धाकात असलेली योगेशची आई, मुलाला वाईट मार्गापासून परावृत्त करावं, या उद्देशाने खरोखरच योगेशच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवू लागली. दुर्दैवाने काही दिवसांनी पुन्हा एकदा हस्तमथुन करताना योगेशच्या आईने त्याला पाहिलं व तात्काळ ही गोष्ट योगेशच्या वडिलांना सांगितली. त्यावर रुद्रावतार धारण करून वडिलांनी योगेशला शिव्यांची लाखोली वाहत बेदम चोपलं. मारत असताना ‘‘अशाने तू लवकर मरशील, लग्न करू शकणार नाहीस, स्त्रिया तुझा तिटकारा करतील, तुला षंढपणा येईल, हे पाप आहे, तू विकृत आहेस,’’ अशा जहाल विधानांची सरबत्ती वडील करत होते. या हिंसक व धमक्यांनी भरलेल्या आक्रमणानंतरही अनेक दिवस या प्रकरणाचा पुनरुच्चार वडील सातत्याने करत राहिले व दरवेळी नवनवीन धमक्या व हस्तमथुनामुळे होणाऱ्या तथाकथित घातक परिणामांची लाखोली योगेशला ऐकून घ्यावी लागली. भेदरलेला योगेश या अनुभवानंतर पूर्णपणे हादरला. स्वत:बद्दलच्या हीन भावनेने खचला. ‘आपण विकृत व पापी आहोत’ अशा धारणेने भरून गेला. जेव्हा कधी लैंगिक इच्छा भावना उचंबळून येई तेव्हा तेव्हा ती त्वेषाने दाबून टाकण्याचा प्रयत्न तो करू लागला.
साधारणपणे वर्ष गेलं व एकदा आईवडील बाहेरगावी गेले असताना पुन्हा एकदा योगेशने हस्तमथुन करण्याची तीव्र वासना अनुभवली. स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा मनोनिग्रह कुठेतरी ढिला पडला व योगेशने पुन्हा एकदा हस्तमथुन केलं. असं करताच अपराधीपणाच्या तीक्ष्ण भावनेने तो ग्रासला गेला. वडिलांचा मार, त्यांनी दिलेल्या धमक्या-शिव्या-शापांची आठवण पुन्हा ताजी झाली व आपण येवढं सगळं होऊनही तीच-तीच चूक पुन्हा करतोय या विचाराने योगेश व्यथित झाला, आत्मग्लानीने (गिल्ट) भरला. आपण कमकुवत आणि विकृत आहोत व आपण आपलं मानसिक संतुलन गमवतोय असा भास त्याला होऊ लागला.
या प्रकारचं वर्तन पुढे अनेक वेळा पुन:पुन्हा योगेशकडून होत गेलं. कामवासना उफाळून येताच पूर्वीचे सगळे निश्चय व निग्रह कमकुवत होत असत आणि हस्तमथुन करण्याची एक असह्य़, आग्रही ओढ त्याच्या आतून निर्माण होत असे. तो ते करून बसत असे. पण असं करताच आत्मघृणेचा घणाघाती आघात त्याच्या आतून होत असे. ‘आपण आपली लैंगिक क्षमता यामुळे गमावत आहोत, आपण स्त्रीला कधीच तृप्त करू शकणार नाही’ असे खोल रुजलेले समज मग त्याच्या मनात वेगाने प्रतिध्वनित होत असत. हे दुष्टचक्र योगेशच्या बाबतीत कधी थांबलंच नाही व कालपरत्वे तो या आत्मघातकी विचारांचा कायमचा कैदी झाला.
अनेक वर्षांनी योगेशच्या वाचनात एका प्रतिष्ठित डॉक्टरांचं लिखाण आलं. त्यात त्या डॉक्टरांनी हस्तमथुनावर सविस्तर विवरण केलं होतं. त्याचा मागोवा घेत योगेशने त्या डॉक्टरांची भेट घेतली व या विषयाला समोरासमोर समजून घेतलं. डॉक्टरांनी नि:संदिग्धपणे योगेशला स्पष्टीकरण दिलं, ‘‘हस्तमथुन ही एक सर्वसामान्य, नैसर्गिक व निष्पाप अशी क्रिया आहे. तिच्यापासून कुठलाही शारीरिक अपाय तो करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. उलट या क्रियेचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यास उपयोगी ठरतील असे अनेक फायदे आहेत. व्यक्ती प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवण्याच्या वयाची होईपर्यंत व तशी सुयोग्य संधी त्यांच्या जीवनात येईपर्यंत, हस्तमथुन हा सहज उपलब्ध असलेला एक सोपा, सुरक्षित व निरूपद्रवी असा मार्ग आहे. ते करण्याचा व्यक्तीच्या लैंगिक क्षमतेवर, प्रजनन क्षमतेवर किंवा शारीर तब्येतीवर काहीही दुष्परिणाम होत नाही. निसर्गाने देऊ केलेलं ते एक प्रभावी व सुलभ असं साधन आहे. जगातल्या सर्व सामान्य व्यक्ती, स्वत:च्या गरजेनुसार, लैंगिक भावनांचा उद्रेक शमवण्यासाठी वेळोवेळी हस्तमथुनाचा अवलंब करतात. त्यात गैर किंवा हानीकारक असं काहीच नाही.’’ हे ऐकून योगेशला क्षणभर विश्वासच बसेना. इतकी वर्ष ज्या गोष्टीला आपण पाप, चुकीचं व हानीकारक मानत आलो, त्यात गैर किंवा चुकीचं असं काहीच नव्हतं, हे ऐकून अनेक वर्ष मनावर असलेलं खूप मोठ्ठं ओझं उतरल्याचा अनुभव योगेशला आला.
डॉक्टरांनी दिलेल्या एका साध्या व समर्पक उदाहरणाने योगेश अधिकच स्थिरावला. डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रेशर कुकरची शिट्टी वाजावी आणि त्यात दाटलेल्या वाफेची वाट मोकळी व्हावी हेच अपेक्षित असतं. गरजेनुसार वेळोवेळी शिट्टी वाजणं हा जसा प्रेशर कुकरच्या कार्यक्षमतेचा एक गुणधर्म व गरजेचा पलू आहे तसाच भर तारुण्यात वेळोवेळी व वारंवार उफाळून येणाऱ्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी हस्तमथुनाचा यथोचित व सुरक्षित मार्ग अवलंबणं हासुद्धा एक गरजेचा पलू आहे. प्रेशर कुकरच्या शिट्टीला वाजू देण्यास जर आपण मज्जाव केला तर जसं प्रेशर कुकरसाठी ते घातक ठरू शकत, तसंच दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला वाट मोकळी करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.’’ हस्तमथुनाबाबत आणखीन काही खास सूचना द्यायला डॉक्टर विसरले नाहीत. ‘‘हस्तमथुन हे कधीही एकटय़ानं व एकांतातच करावं, कारण ते एक अत्यंत खासगी कृत्य आहे. ते करताना नीट स्वच्छता बाळगावी. इंद्रियाला दुखापत होणार नाही अशा प्रकारे ते करावं. एखादी गोष्ट कितीही सुरक्षित असली तरी त्याचा इतका नाद वा ऑबसेशनही असू नये की ज्यामुळे जीवनाच्या इतर गरजेच्या बाबींकडे दुर्लक्ष होईल. शिक्षण, काम, व्यवसाय, पारिवारिक व सामाजिक जबाबदाऱ्या, गरजेची अशी नियमित दिनचर्या – या गोष्टी विस्कळीत न होऊ देता जर व्यक्ती स्वत:च्या एकांतात हस्तमथुनाचा आनंद घेत असेल तर त्यात काहीच गैर नाही.’’ डॉक्टरांचा प्रत्येक शब्द योगेशला धीर देत होता. एका बाजूला आयुष्यभर बाळगलेली अपराधीपणाची झोंबणारी वेदना तर दुसऱ्या बाजूला जखमेवर फुंकर मारणारी डॉक्टरांची शीतल वाणी!
हस्तमथुन इतकं नैसर्गिक व प्रचलित असेल तर मग योगेशच्याच बाबतीत त्याचा असा विपर्यास का झाला? योगेशलाच एक रूक्ष व उदास असं एकलकोंडं जीवन का जगावं लागलं? याचं कारण अगदी स्पष्ट होतं – योगेशच्या आई-वडिलांचं याबाबत असलेलं अज्ञान, घातक गैरसमज, दूषित पूर्वग्रह आणि त्याबाबत त्यांनी अवलंबलेला आक्रमक पवित्रा! जी चूक योगेशच्या पालकांनी केली ती आजही असंख्य पालक करताना दिसतात. आजही मुलांच्या मनात हस्तमथुनाबद्दल भीती, घृणा किंवा जरब निर्माण होईल अशी शिकवण पालक व शिक्षक देताना बघायला मिळतात.
पौगंडावस्थेत येताच मुलांच्या शरीरात संप्रेरकांचा एक नवीन संचार झपाटय़ाने सुरू होतो. ही संप्रेरकं त्यांच्या शरीरात, मनात व प्रवृत्तींमध्ये अनेक बदल वेगाने घडवून आणतात. हे बदल बरेचसे लैंगिक स्वरूपाचे असतात. या संप्रेरकांमुळे मुलाच्या शरीरात ‘पुरुषत्वाचे’ गुण उमटू लागतात तर मुलीच्या शरीरात ‘स्त्रीत्वाचे’ गुण उभारू लागतात. मनात वारंवार कामुक भावना दाटून येणं, लैंगिक विचार उफाळून येणं, तीव्र वासना जागृत होणं या गोष्टी वेग धरू लागत. एका बाजूला निसर्गरित्या हे लैंगिक परिवर्तन त्यांच्यात होत असतानाच दुसरीकडे ‘आपल्याला अजून किमान दशकभर तरी लग्नाचं वय होईपर्यंत याची वाटच बघावी लागणार आहे,’ हा विचार त्यांना सतावत असतो. अशा वेळी मनात आणि शरीरात दाटून येणारी असह्य़ कामवासना मुलांना अस्थिर व अस्वस्थ करत असते. अशा परिस्थितीत त्यांना गरज असते ती उफाळलेल्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्याची. आणि ही गोष्ट त्यांना सहज उपलब्ध होते ती हस्तमथुनाच्या स्वरूपात. जे करण्याने कुठला संसर्गजन्य असा गुप्तरोग होणार नाही; जे करण्यासाठी काहीही पैसे खर्च करावे लागणार नाहीत; जे करण्यासाठी दुसऱ्या कुणाची साथ असावी लागत नाही. असा हा निसर्गाने दिलेला एक सुलभ आणि सुरक्षित असा पर्याय आहे. त्याचा अनुरूप असा अवलंब जगातली तमाम मंडळी कमीजास्त प्रमाणात सतत करतात आणि त्यात काहीही गैर नाही. अतिरेक मात्र कशाचाच करू नये. वेळ, काळ, कर्तव्य विसरून एखाद्या तथाकथित चांगल्या कृत्याचा जरी कुणी अतिरेक केला तर ते घातक ठरू शकते. हस्तमथुन त्याला नक्कीच अपवाद नाही.
योगेशच्या वडिलांकडून झालेली दुसरी मोठी चूक म्हणजे शिस्त लावण्यासाठी त्यांनी निवडलेली हिंसक व आक्रमक पद्धत. शारीरिक मार, टोकाच्या क्रूर धमक्या, जिव्हारी लागणारे निष्ठुर अपमान यातून मुलांना कदापी शिस्त लागत नाही. होतात त्या मात्र ‘जखमा’. ज्या अनेक वेळा व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्त्व व आयुष्यच उद्ध्वस्त करू शकतात.
मारणाऱ्या व अपमानित करणाऱ्या पालकांबद्दल मुलांच्या मनात कधीही आदर व प्रेम निर्माण होत नाही हे अनेकांना माहीत नसतं. निर्माण होते ती फक्त घृणा, भीती व तिरस्कार. पुढे आयुष्यात स्वतंत्र होताच अशी मुलं आई-वडिलांपासून अलिप्त होतात. उतारवयात जेव्हा आपल्याला मुलांच्या आधाराची खरी गरज असते तेव्हा दुरावलेली मुलं नव्याने जवळ आणणं कठीण होतं व जरी ती जवळ आली तरी त्यात कर्तव्याची भूमिका व सोपस्काराचा भागच अधिक असतो.
‘मुलं आपल्यावर अवलंबून आहेत याचा अर्थ त्यांच्याशी वागताना आपल्यावर काहीच निर्बंध असण्याची गरज नाही. आपण जे बोलू ते त्यांनी निमूटपणे स्वीकारलं व अवलंबलं पाहिजे. आपल्याला उलट प्रश्न किंवा जाब विचारण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही.’ असा उन्मत्त आविर्भाव काही पालकांचा असतो. त्यातूनच मुलांना मारणं, त्यांना घालून पाडून बोलणं, शिव्याशाप देणं, त्यांचा वारंवार आणि क्षुल्लक गोष्टींसाठी अपमान करणं असं काही पालक वागतात. अशा वागण्याचे किती खोल व दूरगामी परिणाम होऊ शकतात याचंच एक उदाहरण म्हणजे योगेशचे प्रकरण. यानिमित्ताने पालकांचे काही अपसमज व पूर्वग्रह दूर व्हावेत व ज्या चुका त्यांच्या आधीच्या पिढीने केल्या त्या आधुनिक पालकांनी निदान करू नये एवढीच एक मनीषा!
(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)
rajanbhonsle@gmail.com
chaturang@expressindia.com