सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
काही वेळा गरज म्हणून, नाइलाज म्हणून पालकांना आपल्या मुलांना घरापासून दूर ठेवावं लागतं. तेही लहान वयात, त्यांच्या पंखात पुरेसं बळ येऊन ती उडू शकण्यापूर्वीच. अशावेळी त्या मुलांना नेमकं काय वाटतं हे सांगणारे मुलांचे अनुभव..
‘घरात हसरे तारे, पाहू कशाला नभाकडे?’ म्हणणारी आई किंवा ‘बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून..’ अशी अनेक गाणी आपल्या मनात रुजलेली असतात. कारण आपलीही भावना यापेक्षा वेगळी नसते. म्हणूनच तर ८-१० दिवसांच्या निवासी शिबिराला पाठवायलादेखील काही पालक तयार नसतात. पण काही वेळा गरज म्हणून, नाइलाज म्हणून पालकांना आपल्या मुलांना घरापासून दूर ठेवावं लागतं. तेही लहान वयात, त्यांच्या पंखात पुरेसं बळ येऊन ती उडू शकण्यापूर्वीच. अशावेळी त्या मुलांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत अशा मुलांकडून.
शाळा सुरू झाली, पण नेहमी मी दिसताच धावत येणारी, बाबा माझ्या स्वप्नात येतात म्हणून सांगणारी, निरागसपणे आई-बाबांचं कोर्टात मॅटर सुरू आहे.. असं म्हणणारी अश्विनी मला दिसलीच नाही. खूप लाघवी म्हणून आम्हा सर्वाना खूप जवळची असणारी, मामा-आजी यांच्याबद्दल भरभरून बोलणारी अश्विनी नाइलाजानं बाबांकडे नसेल ना गेली राहायला, असं मनात आलं आणि मग मनात आठवणींची उजळणी झाली आणि आसपासच्या अशा मुलांचा शोधही.
अशा मुलांपैकी पहिला गट होता, ज्यात मुलांना दूर ठेवणं ही गरज होती. मुलांनी ते वास्तव स्वीकारलं होतं. परिस्थितीशी छान जुळवून घेतलं होतं. अशोक, सरिताच्या आई-बाबांनी विरारला जागा घेतली, पण आसपास मराठी शाळा नव्हत्या म्हणून त्यांनी मुलांना आजी-आजोबांकडे ठेवलं होतं. उमेशच्या बाबांची नोकरी गेली. दुसरी मिळेना. मग त्यांनी भावाकडे दोन्ही मुलांना ठेवलं आणि गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. तनूच्या पाठीवर जुळी भावंडं वर्षांच्या आत झाली. आईला मुलांना सांभाळायला जमेना. तिनं आपल्या आईच्या हवाली तनूला केलं आणि ती निर्धास्त झाली. रोशनी आणि दिव्या यांच्या गावी चौथीनंतर शाळाच नव्हती. मग त्या मुंबईला आत्याकडे आल्या. या आणि अशा अनेकांनी सांगितलं, आमची छान काळजी घरातले सगळे घेतात. त्यांची मुलं आणि आम्ही यात भेदभाव करीत नाहीत. काहीवेळा तर आजीलाच आई-बाबा बजावतात, जास्त लाड करू नकोस, जड जाईल. असं असलं तरी त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं, ‘बाई कुठेतरी अप्रत्यक्ष दडपण असतेच. आपण दुसऱ्याकडे राहतो, थोडंसं नरमाईनं घेतलंच पाहिजे हे समजत असतं. सुट्टीत गेल्यावर आई-बाबा, भावंडं सारी कसर भरून काढतात. खूप लाड करतात, पण निघताना बजावायला विसरत नाहीत. ‘नीट वागा, मोठय़ांचं ऐका, हट्ट करू नका, त्रास देऊ नका इ.इ.’ काही वेळा एखादी बातमी, आसपासची घटना हे निमित्त होतं आणि मग काका, मामा.. बजावतात, बाबांनो सांभाळून, आमचं नाक कापलं जाईल असं वागू नका. तुम्ही लांब राहाल पण तुमच्या आई-बाबांना आम्हाला जबाब द्यावा लागेल, असं झालं की मग घराची आठवण येते. कधी शाळेतले मित्र, बाई, सर काही तरी सांगत असतात, अर्धवट ऐकल्यावर आमचे कान बंद होतात. आम्ही मनानं गावाला पोहोचतो. बक्षीस मिळो, शिक्षा होवो किंवा कौतुक होवो, खूप हळवं व्हायला होतं. पण आम्हाला शिकायचं, मोठं व्हायचं आहे तर असं होणारच हे आम्ही मान्य केलंय. शशीला अशावेळी स्वप्नं पडतात. स्वप्नात आई-बाबा भेटतात व कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाल्मलीनं वही बनवली आहे.‘पोस्ट न केलेली पत्रं’ तिच्या गावी फोन नाही. मोबाइलची रेंज मिळतेच असं नाही. मग ती आपल्या भावना वहीतच उतरवते. गावी गेल्यावर आईला मोठय़ानं वाचून दाखवते.
दुसऱ्या गटातली मुलं अशी होती की त्यांना विश्वासात न घेता, समजावून न सांगता निर्णय घेतला गेला होता. दोन्ही घरातल्या वातावरणात खूप फरक होता. त्यामुळे ज्या हेतूने मुलांना लांब ठेवावं लागलं तो हेतू साध्य होत नव्हता. ती ज्यांना प्रॉब्लेम चाइल्ड म्हणतात अशी बनली होती. त्यांना ऐकताना किंवा इतर त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलं की त्या मुलांची चिंता वाटत होती. परशूला शाळाच नकोशी वाटत होती. शाळा बुडवून आसपास भटकत राहणं त्याला आवडे. कारण या शाळेनं त्याला घरापासून तोडलं असं त्याला वाटे. त्याचे बाबा अंथरुणाला खिळले होते. घरची स्थिती आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास म्हणतात तशी. त्याच्या आत्यानं भावाला मदत म्हणून परशूला मुंबईला आणलं. तिचं छोटं घर, घरातली मोठी दादा-ताई, शाळेतलं वातावरण सारंच वेगळं. अभ्यास तर त्याच्या डोक्यावरून जाई. सारी बजावत, ‘अरे वाच, लिही, अभ्यास कर..’ पण त्याला सातवीत आल्यावरही धड लिहिता येत नव्हतं ना वाचता. हे कोणाला सांगता येत नव्हतं. मग शाळा बुडवणं, शाळा वारंवार बुडवली म्हणून दादानं वा काकानं मारणं, तो छोटा जीव गुदमरून गेला होता.
तृप्तीच्या वागण्यानं सारे हैराण झाले होते. मुला-मुलींना मार, त्यांच्या वस्तू लपवून ठेव,  खाली फेक, वह्य़ा फाड, डबे फस्त कर. शिक्षकांना ती जुमानत नव्हती. त्यांचं ऐकत नाही. कधी-कधी शहाण्यासारखी वागे, पण तिची चंचल नजर सांगत असे हिच्या मनात काहीतरी सलतंय. गेले एक वर्षभर गावी शाळा करून तृप्ती परत आली होती. मी दिसताच ती धावत आली. माझ्या कमरेला विळखा घालत, डोळ्यात पाणी आणत ती सांगत होती, ‘बाई, आत्याला समजावा. मी नीट वागेन, द्याल ती शिक्षा मला चालेल, पण परत बाबांकडे पाठवू नका.’ अशा अनेक तृप्ती असतील. ज्यांच्या आई-बाबांचं परस्परात पटत नाही म्हणून वा कोणीतरी एखादं संसाराचा सारीपाट अर्धवट सोडून गेलं म्हणून  मुलांना त्यांच्यापासून दूर राहावं लागत असे. तृप्ती तिसरीत. तिला तिच्यापेक्षा लहान तीन बहिणी. छोटय़ाशा आजाराचं निमित्त झालं आणि आई देवाघरी गेली. बाबांनी चार मुलींना आपल्या चार भावंडांकडे सोडलं, आपण लग्न केलं आणि आपला प्रश्न सोडवला. अचानक हे सारंच वेगळं विश्व चिमुरडय़ांना सामोरं आलं. मुलं गांगरली नसती तरच नवल. तृप्ती प्रथमच आत्याकडे राहात होती. वर्षभर तृप्तीला सांभाळल्यावर तृप्तीच्या व्रात्यपणाला आत्याही कंटाळली. सुट्टी लागताच तृप्तीला घेऊन तिनं भावाचं घर गाठलं. पण तृप्तीला तिथे तिचं घर गवसलंच नाही. बाबा-आई तिच्याशी बोलले नाहीत. तिला छोटा भाऊ झाला होता. त्याला कोणी हात लावू देईना. आईचं जेवण तिला आवडत नव्हतं, नव्हे तिला आई म्हणणंच तृप्तीला जड जाडत होतं. एक वर्षभर ती गावी राहिली पण परत आत्याकडे आली. एकदम मोठी होऊन आणि परत गावी बाबांकडे न जाण्याचा निश्चय करून. पण दरवेळी असं होतंच असं नाही.
प्रकाश आणि त्याच्या होस्टवरच्या काही मुलांची हीच कथा आहे. वेगळं विश्व दाखवलं, स्वतच्या हौशी- मौजीला मुरड घालत आई-बाबांनी त्यांना महागडय़ा होस्टेलमध्ये ठेवलं. आसपासच्या मुलांना जे शिकता येणार नाही असं, उदा. पोहोणं, हॉर्स रायडिंग, ग्लायडिंग हे त्यांना शिकता आलं. याबद्दल ते आई-बाबांचे आभार मानतात. पण ते प्रामाणिकपणे कबूल करतात. त्यांचं विश्व आता खूप वेगळं झालंय. घरी त्यांना करमत नाही. आई-बाबांशी मोकळेपणानं बोलू शकत नाही. त्यांचे विचार वेगळ्याच पातळीवर सुरू असतात. नातेवाईक, इमारतीतील जुने मित्र यांच्याबरोबरचा जुना जिव्हाळा आता राहिलेला नाही. होस्टेलवरचे मित्र खूप जवळचे वाटतात. सुरुवातीला खूप जड गेलं अगदी. पण आता वाटतं आई-बाबांना ही भन्नाट कल्पना सुचली कुठून. त्यांच्या होस्टेलवर खूप श्रीमंतांची मुलं बहुसंख्येनं आहेत. ही मात्र उच्च मध्यमवर्गातली. आई-बाबा नोकरी करणारे. स्वत करिअरमध्ये गुंतलेले. घरी मुलांना सांभाळणारं कोणी नाही. नोकरांच्या हाती वा डे-केअर सेंटरमध्ये मुलांना ठेवणं पटत नव्हतं. मग त्यांनी हा पर्याय निवडला. नातं जवळचं की दूरचं हे मानण्यावर असतं आणि आज ज्यांच्याजवळ मुलं आहेत ती पण शिक्षणासाठी वा नोकरीसाठी दूर जातीलच अशी ते स्वतची समजूत  घालतात. घरापासून शिक्षणासाठी दूर राहून शिकणारे आणि पुढे नाव काढलेले अनेकजण त्यांना माहीत आहेत. तेव्हा..
गौरी, तुषार, स्वप्नाली अशांचा तर आग्रह आहे की ज्या पालकांना परवडतं त्यांनी किमान दोन वर्षे मुलांना होस्टेलवर वा नातेवाईकाकडे ठेवावं. यांचे बाबा उच्चपदस्थ, आई प्रोफेशनमध्ये. जवळच राहणारे दोन्हीकडचे आजी-आजोबा. मुली खूप लाडावल्या आहेत. हे आई-बाबांना पटत होतं. आई-बाबांशी वाद घालणं व्यर्थ होतं, कारण ते प्रेमानं सारं करीत होते. बाबांनी आणि आईनं दोन वर्षे परदेशी काम स्वीकारलं. दोघांची समजूत घातली आणि दोन वर्षांसाठी मुली होस्टेलवर राहिल्या. त्या म्हणतात, तिथली शिस्त, नियमितपणा, वेळ पाळणं, मिळेल ते जेवणं, प्रेमळ पण धाकात राहणं हे आम्हाला कळलं. माणसांना आम्ही ओळखायला शिकलो. थँक्स टू आई-बाबा.
शिवाजी, इयत्ता पाचवीला सातारच्या सैनिक स्कूलमध्ये दाखल झाला आणि निनाद, अमित औरंगाबादच्या मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलमध्ये. कारण त्यांचं आणि त्यांच्या आई-बाबांचं स्वप्नं होतं एन.डी.ए. म्हणजेच नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमीत प्रवेश घेण्याचं. आर्मी, नेव्ही वा एअरफोर्समध्ये अधिकारी व्हायचं होतं. नव्हे ते त्यांचं पॅशन होतं. काहीतरी कमवायचं तर काही तरी गमवावं लागतं. खडतर वाट तुडवल्याशिवाय यशाचा आनंद लुटता येत नाही हे त्यांना पटलंय. शिवाय हल्ली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, फेसबुक, मोबाइल किती संपर्क साधनं आहेत. त्यानं आपण दूर गेलोय असं वाटत नाही, असं त्यांना वाटतं.
थोडक्यात, मुलं जवळ असोत की लांब, ती आनंदी असणं गरजेचं नाही का? तारे घरात असोत वा आकाशात; हसत असले म्हणजे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा