‘‘बाबांची अपेक्षा- माझाही त्यांच्या कामात सहभाग असावा. नाराजीने म्हणतात, ‘‘शीला फक्त सत्काराला येते.’’ हे ऐकून नागपूरच्या डॉ. रूपा कुलकर्णीनी बाबांना सुनावलं, ‘‘बाबा, शीलाताईंनी तुम्हाला सांसारिक जबाबदारीतून मुक्त ठेवलंय, हेच त्यांचं केवढं मोठं काम. आणखी किती अपेक्षा करता?’’ गेल्या वर्षी मला ‘समर्पिता’ पुरस्कार मिळाला. पतीला पत्नीने भक्कमपणे साथ दिली तर तो कठीण संकटे पार करून भव्यदिव्य काम करू शकतो व प्रकाशझोतात येतो. अंधारात राहून त्याग करणाऱ्या अशा स्त्रीचा सत्कार करून गौरव करावा ही कल्पनाच मुळी अफलातून. या समारंभात मुद्दाम हजर राहून जाहीररीत्या बाबांनी माझे कौतुक केले.’’ सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्याबरोबरच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या आपल्या सहजीवनाबद्दल त्यांच्या पत्नी लेखिका शीला आढाव.
बाबांचे व माझे सहजीवन अठ्ठेचाळीस वर्षांचे. लग्न नोंदणी पद्धतीने, दहा रुपयांत. जबाबदाऱ्यांची त्याच वेळी वाटणी झालेली. बाबांनी समाजकार्य, मी अर्थार्जन व घरसंसार सांभाळणे. माहेरचा लग्नाला विरोध. कारणही त्या काळानुरूप तसंच. बाबांनी स्थापन केलेल्या हडपसरच्या शंभर कॉट्स असलेल्या दवाखान्याचा ट्रस्ट केलेला. साधे ट्रस्टीही राहिले नाहीत. नगरसेवकपदाच्या मानधनाखेरीज दुसरं उपजीविकेचं साधन नाही, पूर्णवेळ समाजकार्यात वाहून घेतलेलं, असं स्थळ कोणत्या पालकांना रुचणार? बाबांच्या मित्राने माझे स्थळ सुचवले. त्या वेळी हे केंद्र सरकारच्या मध्य रेल्वे विभागाच्या भुसावळ येथील दवाखान्यात नोकरीला होते. भाई वैद्य व बाबा मला पाहून गेले. दिवंगत एस. एम. जोशी यांनी जळगावला राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरात मला पाहिले व पसंती दिली. बाबांनी स्पष्ट केले, ‘‘मी वैद्यकीय व्यवसाय सोडून पूर्ण वेळ समाजकार्यात वाहून घेतलंय. लग्नानंतर अर्थार्जन करून संसार सांभाळावा लागेल. मान्य असेल तर होकार दे.’’ ऐकून सुन्न झाले. बाबांप्रमाणे माझ्यावरही राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झालेले. ऐषआरामी संसारसुखाची कल्पना कधी शिवलीच नव्हती. बाबांचं समाजकार्यात स्वत:ला झोकून देण्याच्या ध्येयाविरुद्ध मी नव्हतेच. होकार दिला. वाटलं, चार माणसांचा संसार चालवण्यात कसली अडचण!
बाबांचं कार्यक्षेत्र पुणे. दोन ठिकाणी संसार. मुलगा लहान. स्वत:च्या देखरेखीखाली मूल वाढवणं व खर्च वाचवणं यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यात महापालिकेत नोकरी धरली व नाना पेठेत बाबांच्या घरी राहावयास आले. मग मला हळूहळू वास्तवाचं भान येऊ लागलं. माझी खरी कसोटी लागली. घरात सासूबाई, बाबा, मी, मुलगा असीम, बाबांची भाची, मावसभाऊ, शिवाय पुण्यातील सारे कष्टकरी हमाल बांधव आमच्या कुटुंबातीलच. घर सदा गजबजलेलं. बाबांची मामेभावंड, भाचरं, भावाची मुले, आमची दोन अशा पंधरा मुलांचा वावर असे. अगदी गोकुळच. मी नोकरीनिमित्त घराबाहेर, तरी घरच्या मंडळींची सर्वावर देखरेख असायची. त्यामुळे मी निश्चिंत असे. बाबांचं ऑफिस घरातच. पुणे, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. चहा तर हॉटेलसारखा चालू. बाहेरगावचे कार्यकर्ते दुपारी आले तर जेवूनच जाणार, रात्री आले तर मुक्कामाला. पुढच्या मोठय़ा हॉलमध्ये बाबांचा बाह्य़ रुग्णांसाठी दवाखाना होता, हमाल पंचायतीने हमालांसाठी चालवायला घेतलेला. तो संध्याकाळी सात ते दहा या वेळात असे. घराचा मुख्य दरवाजा रात्री सहा तास बंद. बाकी वेळात सर्वासाठी खुला. किरकोळ चोऱ्या व्हायच्याच.
 पुण्यातल्या नोकरीआधी रेल्वेच्या पासेसवर संपूर्ण भारत पाहून घेतला. पुण्यातील नोकरीत पहिली सेवा दहा मैलांवरील मुंढवा गावात सुरू झाली. दोन बसेस करून, जेवणाचा डबा बनवून सकाळी आठला हजर व्हावे लागे. वेळ वाचवण्यासाठी स्कूटरवरून जाऊ लागले. घरच्यांसाठी स्वयंपाकाला बाई होती. संध्याकाळचा स्वयंपाक, मुलाचं हवं नको पाहून हमालांच्या दवाखान्यात मदत करीत असे. सारखी आत-बाहेर कसरत चाले. खरं तर बाबा नगरसेवक असताना वरिष्ठांना शब्द टाकून माझी बढती पुण्यात करून घेता आली असती; पण ते त्यांच्या व माझ्याही तत्त्वात बसणारे नव्हते. वर्ष काढले. १९७२ सालात दुसऱ्या मुलाचा- अंबरचा जन्म झाला. मग शहरात बदली करून घेतली. बाबांनी नंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. कित्येक वर्षे हमाल पंचायतचे अध्यक्ष असूनही मानधन घेत नव्हते. अशा स्थितीत योग्य नियोजन करून संसार रेटला. कोणापुढे हात पसरला नाही, कोणी मदत देऊ केली ती घेतली नाही. आणीबाणीत हमाल पंचायत, प्रा. ए. बी. शाह यांनी मदत देऊ केली, पण मी नाकारली. आणीबाणीची झळ सोसलेल्या, ज्यांना उत्पन्नाचं साधन नाही अशा कुटुंबांना मदत करावी असं सुचवलं. मीच गरजूंना, नातेवाइकांना अडीअडचणीला मदत केली. बाबांच्या मित्राने मला आधीच सावध केले होते, ‘‘वहिनी, बाबा फकीर माणूस आहे. त्याला पैशाची पर्वा नाही.’’ मी एकदा काळजीने बाबांना म्हटलं, ‘‘माझ्या एकटीच्या पगारात आपलं कसं निभावेल?’’ त्यांनी उत्तर दिलं, ‘‘काळजी करू नकोस. माझे हमाल बांधव आपल्याला उपाशी ठेवणार नाहीत.’’ केवढा हा विश्वास!
अंबरचा जन्म झाला त्या वर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्या वेळी बाबा ‘एक गाव एक पाणवठा’ मोहिमेसाठी बाहेर पडले. दोन वर्षे त्यांनी पायी, बैलगाडी, एस.टी. अशा मिळेल त्या वाहनाने सारा महाराष्ट्र पालथा घातला. खेडय़ापाडय़ात गावकुसाबाहेर मुक्काम, मिळेल ते खात, कधी उपवास घडे. याच काळात त्यांचं पोट बिघडलं ते कायमचं. कोलायटीसने त्यांना आजन्म पथ्य पाळायला लावलं. या अनुभवांवर ‘एक गाव एक पाणवठा’ हे पुस्तक बाबांनी लिहिलं. म. फुले, डॉ. आंबेडकर, सत्यशोधक समाजाचे कार्य बाबा करत असतात, त्यांचे आदर्श पुढे चालवतात, म्हणून त्यांना लोकांकडून दलित, माळी अशा जाती चिकटवल्या जातात. बाबांना त्याचा राग नाही उलट अभिमान वाटतो.
१९७५ साली आणीबाणीत बाबांना सव्वा वर्ष जेलमध्ये राहावे लागले. याच काळात धाकटा अंबर काविळीने गंभीर आजारी झाला. एस. एम. जोशींचे सुपुत्र डॉ. अजेय यांनी आपल्या दवाखान्यात महिनाभर ठेवून उपचार केले. डॉक्टर आमच्या कुटुंबातीलच. त्यांचा मोठेपणा असा की बाबांना म्हणाले, ‘‘शीला वहिनींनी उत्तम नर्सिग केले म्हणून अंबर वाचला.’’ हमाल मंडळींनीही हवं नको पाहिलं. खरंच बाबांची ही माणसं त्यांच्या गैरहजेरीत आम्हा कुटुंबीयांचा सांभाळ किती मायेने करतात!
बाबांचा एक पाय घरात तर दुसरा दारात. सतत मोर्चे, सभा, सत्याग्रह, भटकंती, जेलवाऱ्या यात व्यग्र. जेलवाऱ्या आतापर्यंत पन्नासवर घडल्या. असं आमचं कमी सहवासात असलेलं सहजीवन. पुण्यात असतील तर अचानक जेवायला घरी माणसं आणणं, कोणाला परस्पर जेवणाचं आमंत्रण देऊन मला न सांगणं असे उद्योग चालायचे. मला त्यांनी गृहीतच धरलेलं. माझं काम आणखी वाढवून ठेवण्यात त्यांना काही वाटायचं नाही. घर नीटनेटके असावे यासाठी मी आग्रही, बाबांचं त्याउलट. पुस्तके, कागद यांचा घरभर पसारा करून ठेवणार. जाणीव करून दिली तर चिडणार. कुणाची बांधीलकी ते सहन करत नाहीत. आपल्या मतांशी पक्के. माझ्या दृष्टीने प्रेझेंटेशन महत्त्वाचे. ताट वाढून घेताना पदार्थ योग्य ठिकाणी असावेत असं माझं मत. बाबांचं म्हणणं कुठेही वाढले तरी शेवटी पोटात एकत्रच होतात ना! मला, कधीतरी घरचं आवरून कामावर जायला उशीर होई. अशा वेळी बाबांनी स्कूटरवरून सोडावे वाटे. पण त्यांच्या ते जिवावर येत असे. चिडून म्हणत, ‘‘तुला चालायचा कंटाळा!’’ मुलांची तर मी सिंगल पॅरेंट. बाहेर मात्र बाबा माझं भरभरून कौतुक करत असतात.
वर्षांतून मात्र चार-आठ दिवस एखादं निसर्गरम्य पर्यटनस्थळ बाबा आम्हा सर्वाना दाखवून आणीत असत. वॉशिंग मशीन येईपर्यंत स्वत:चे कपडे स्वत: धूत. इस्त्री तर अजूनही करतात. दोघांना स्वच्छतेची आवड. बाबा रोज घर झाडतात. ऑफिसबाहेर कचरा दिसला की खराटा हातात घेऊन झाडणं सुरू. पहाटे पाचला उठून वाचन, लेखन, व्यायाम उरकतात. झोप अत्यंत सावध. गजराची कधीच गरज भासत नाही. वेळेबाबत काटेकोर. दिलेली वेळ पाळणारच. संप वगैरे कठीण परिस्थितीत त्यांच्या घशाखाली घास उतरत नाही. अशा या कामाच्या ध्यासामुळे आम्ही घरच्या व्यापातून त्यांना दूर ठेवतो. मुलं आमची ही कसरत बघता बघता मोठी होत होती. जबाबदारीने वागत प्रगती करत होती. या साऱ्या धबडग्यात मुलांचं, बाबांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी माझी केविलवाणी धडपड चाले. स्वत:कडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होई. असमतोल आहार, विहार व ताणतणावामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात मला मात्र मधुमेहाने गोड मिठी मारलीच. त्याचंही स्वागत करत वाटचाल चालू ठेवायची. मुलांना काही आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून त्यांचे वाढदिवस जोरात साजरे करायचो. त्यांचे छंदही जोपासले. मासे, ससे पाळणे. नव्या घरात आल्यावर कुत्रं पाळलं. मात्र या साऱ्यांची देखभाल मलाच करावी लागे.
१९८९ साली बिबवेवाडीत नवीन घरात सासूबाईंच्या हस्ते रामफळाचं झाड लावून प्रवेश केला. नंतर एस. एम. जोशी, मधु दंडवते, ना. ग. गोरे यांच्या हस्तेही बरीच झाडे लावली. दोघेही धार्मिक विधी, कर्मकांड विरोधात. सासूबाईंची मतेही हळूहळू बदलत गेली. माझ्यावर त्यांनी आपली मते लादली नाहीत. मरणापूर्वी त्यांनी स्पष्ट केले, ‘‘मला विद्युतदाहिनीत जाळा. धार्मिक विधी करू नका. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही.’’ बाबांचं स्वतंत्र ऑफिस झालं. हमाल पंचायतने गाडी दिली. येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ रोडावली. घराभोवती खपून बाग  केली. बागेतील सोनचाफा भरभरून फुले देतो. गच्चीवर जाऊन फुलं काढायचं काम बाबांचं आणि दिवसभर वाटायचंही. फूल घेणारा हातगाडीवाला हमाल प्रसन्न हसतो. ते हसू बाबांना आनंद देतं.
बाबांची अपेक्षा- माझाही त्यांच्या कामात सहभाग असावा. नाराजीने म्हणतात, ‘‘शीला फक्त सत्काराला येते.’’ हे ऐकून नागपूरच्या डॉ. रूपा कुलकर्णीनी बाबांना सुनावलं, ‘‘बाबा, शीलाताईंनी तुम्हाला सांसारिक जबाबदारीतून मुक्त ठेवलंय, हेच त्यांचं केवढं मोठं काम. आणखी किती अपेक्षा करता?’’ खरंतर मीसुद्धा असं मानते- केवळ बाबांची पत्नी म्हणून त्यांच्याबरोबरीने सत्कार घेण्याचा मला अधिकार नाही. पण गेल्या वर्षी मला ‘समर्पिता’ पुरस्कार धनकवडीच्या कुलकर्णी परिवाराने सार्वजनिकरीत्या आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ देऊन स्वतंत्रपणे गौरविले. पतीला पत्नीने भक्कमपणे साथ दिली तर तो कठीण संकटे पार करून भव्यदिव्य काम करू शकतो व प्रकाशझोतात येतो. अंधारात राहून त्याग करणाऱ्या अशा स्त्रीचा सत्कार करून गौरव करावा ही कल्पनाच मुळी अफलातून. या समारंभात मुद्दाम हजर राहून जाहीररीत्या बाबांनी माझे कौतुक केले.
बाबा गेली साठ वर्षे कष्टकरी, हमाल, पथारीवाले, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, बालकामगार, धरणग्रस्त, देवदासी, कागदकाचपत्रा वेचणारे, अपंग यांच्यासाठी काम करत आहेत. त्यांचे शोषण होऊ नये, न्याय मिळावा, राहणीमान दर्जा वाढावा, स्वत:चं घर, मुलांना शिक्षण, अडचणीला आर्थिक मदत, उत्तम आरोग्य मिळावे यासाठी झगडत आले. आज त्या प्रयत्नांना यश आलंय. हमाल पंचायत कष्टाची भाकर संस्था गेली चाळीस वर्षे, ना नफा ना तोटा तत्त्वावर विनाअनुदान चालवत आहेत. कष्टकऱ्यांना स्वस्तात स्वच्छ, सकस अन्न उपलब्ध होते. शिवाय पतपेढी, शाळा, दवाखाना, सदनिका, हमाल भवन या सुविधा मिळाल्या. कष्टकऱ्यांची पत वाढली.
 रिक्षापंचायत २० वर्षांपूर्वी स्थापन झाली. बाबा अध्यक्ष. माझा विरोध होता. रिक्षावाल्यांची उर्मट, गुंड अशी मलीन प्रतिमा होती. बाबांचं यावर मत, ‘‘कुटुंबातील पाच मुलांत एखादं नाठाळ निघतं. पालक त्यांना घराबाहेर हाकलत नाहीत. प्रयत्न करून त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतातच ना? मी आशावादी आहे. काही काळ जावा लागेल.’’ त्यांच्यामध्येही सुसंस्कृत, सुशिक्षित, सज्जन आहेत.  स्थापनेनंतर काही वर्षे रिक्षाचालकांविषयी तक्रारी, शिव्याशाप, अर्वाच्य भाषा फोनवर ऐकावी लागली. धरणग्रस्तांच्या चळवळीत त्या वेळचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते कुकडी धरण भूमिपूजनाच्या कार्यक्रम बाबांनी उधळून लावताना डाव्या डोळ्यावर पोलिसांची काठी बसली व डोळा गमावला. बहुजन समाजातील परित्यक्तांना वसतिगृह, रोजगार मिळवून देण्यासाठी बाबा प्रयत्नशील आहेत. त्यांची कामे न संपणारी आहेत.
आमची मुलं सॉफ्टवेअर इंजिनीअर झाली. लग्ने नोंदणी पद्धतीने झाली. सुना उच्चशिक्षित मिळाल्या. मोठा अमेरिकेत, धाकटा कॅनडात कुटुंबासह. दोघेही निव्र्यसनी. मोठय़ाला दोन मुली. धाकटय़ाला एक मुलगा. मोठी नात अस्मानी सॉकरपटू व मेडिकलला. तिला राज्य सरकारची स्कॉलरशिप मिळाली. धाकटी अंतरा सहावीत, जिम्नॅस्टिकपटू. गेल्या जूनमध्ये झालेल्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी दोघे अमेरिकेत गेलो होतो. अंतरा संपूर्ण देशात पहिली आली. तिला सुवर्णपदक मिळाले. ती अभ्यासातही हुशार. नातू अमन नववीत शिकतो. कुशाग्र बुद्धीचा, खेळातही पुढे. भारताचा झेंडा नातवंडे परदेशात उंचावत आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान व कौतुक वाटते.
आम्ही दोघेच भारतात. या उतारवयात. मुलांना तिकडे काळजी वाटते. आज ८३ व्या वर्षीही बाबांचा कामाचा झपाटा तरुणांना लाजवणारा आहे. अशा व्यग्र दैनंदिनीतून असीमने वेळ काढायला लावून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, इंग्लंड, संपूर्ण अमेरिका आम्हाला दाखवली. अंबरने थायलंड-मलेशिया- सिंगापूर देश दाखवले. बाबांच्या कार्याविषयी आदर असणारी कितीतरी मंडळी आमची मायेने काळजी घेत असतात. आरोग्य उत्तम ठेवण्याचं काम डॉ. अभिजित वैद्य व डॉ. नितीन केतकर हे आमचे मानसपुत्र करतात. पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मीनारायण, शारदा वाडेकरसारख्या कितीतरी कार्यकर्त्यां, शिवाय सुना, नातसुना, पुतण्या, भाच्या आम्हाला मुलीची उणीव भासू देत नाहीत. दिवाळीचा फराळ, बागेतील फळे यावर त्यांचा हक्काचा वाटा असतो.
सेवानिवृत्तीनंतर मी बाबांना म्हटलं होतं, आता मला माझं आयुष्य मनाप्रमाणे जगू द्या. माझे छंद पुरे करायचेत. सकाळच्या साखरझोपेचं सुख अनुभवायचंय. याला बाबांचा कधीच विरोध नव्हता, मलाच वेळेअभावी जमत नव्हते. आता मात्र वाचन, लेखन, पाकशास्त्र, बागकाम या छंदांसाठी मला वेळ मिळतो. केलेल्या प्रवासाची वर्णने लिहिलीत. ‘अमेरिकेचे अंतरंग’ हे माझं पुस्तक प्रसिद्ध झालंय.
आमचं सहजीवन परस्परांवरचा विश्वास, आदरभाव, प्रामाणिकपणा, प्रेम, जिव्हाळा यावरच चालू आहे. दुसऱ्याला आनंद देत, स्वत: आनंद घेत जगायचं हे आमचं तत्त्व. पूर्वी भोगलेले क्लेश आठवत, भूतकाळातील घटना उगाळत सुखद वर्तमानकाळ हरवून बसायचं नाही. एकमेकांच्या जमेच्या बाजू, आवड-निवड यांची सांगड घालत उर्वरित बोनस आयुष्य सुसह्य़ करायचंय.