सुमित्रा भावे
एक प्रकारे चित्रपटात जे स्थान संपूर्ण शांततेचं आहे, नि:शब्दतेचं आहे, तेच स्थान पार्श्वसंगीताचं आहे. चित्रपटातली भावना जपणं हे त्याचं काम. स्वराला स्वत:ची एक आस असते. म्हणजे एक प्रकारे इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे तो स्वर, हळूहळू फिका होत-होत अलगद नाहीसा होतो. स्वर संपल्याच्या पूर्णविरामावर बोट ठेवता येणार नाही. तसं घटनेतल्या भावनेची संवेदनांची आस पार्श्वसंगीताने साधली जाते.
‘संगीताचं चित्रपटात स्थान काय?’ हा प्रश्न मला पहिल्या चित्रपटापासूनच पडला होता. म्हटलं, लहानपणी आपल्याला शब्दाची भाषा कळण्यापूर्वीच सूर आणि तालाची भाषा कळायला लागते. त्या भाषेनं शरीरात हलका ताल तयार होतो. ‘रिलॅक्स’ व्हायला होतं. अंगाई कानावर पडल्यावर बाळं कशी गुडुप झोपतात. म्हणजे सूर-ताल आपल्या जगण्याचा भाग बनवलाय माणसानं. भारतीय माणसानं तर नक्कीच. तेव्हा संगीत आपल्या चित्रपटात आपसूकच येणार.
‘बाई’ चित्रपटाच्या वेळी मी ज्या झोपडपट्टीत जात असे तिथे भिक्षा मागणाऱ्या दोन ‘यल्लमा’ यायच्या. तुणतुण्यावर रेकून कानडी भक्तिगीतं (बहुधा- कारण मला कुठे कानडी येतं) म्हणायच्या. त्या झोपडपट्टीच्या सतत कानावर पडणारं तेच संगीत होतं. मग आम्ही तेच चित्रपटात वापरलं. त्यांना तिथेच झोपडीशी बसवून त्यांचं गाणं ध्वनिमुद्रित करून वापरलं. स्टुडिओ वगैरे काही नाही. त्या बायकांच्या आवाजाची धार स्टुडिओत गोड गळ्याच्या गायिकांकडून गाऊन आणणं फार कठीण झालं असतं.
असाच प्रश्न ‘वास्तुपुरुष’च्या वेळी आला. मी आईच्या तोंडून ऐकलं होतं, की मामा महारवाडय़ावर ‘गाणी बजावणी’ करायला जायचे. तिथेच त्यांना त्यांच्या कलावंत जातीचे मित्र भेटायचे. खुलेपणाने टिपेला आवाज लावून ‘झणझणीत’ गाणी गायचे. पायात चाळ बांधून नाचायचे. हे वातावरण, ती गाणी, ते टिपेचे आवाज, आम्हाला चित्रपटात आणायचे होते. अशी गाणारी माणसं आणि ती गाणी यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण सापडेनात. मग कुणी तरी सांगितलं, आळंदीला नेहमीच्या भजनीमंडळाच्या बाहेर एकतारीवर टिपेला आवाज लावून एकेकटी गाणारी काही मंडळी आहेत. मग त्यांच्या शोधासाठी आळंदीला गेलो. बरीच पायपीट केल्यावर असे दोन महाभाग भेटले. हा उद्योग करणारे आम्ही तिघे. मी,
सुनील सुकथनकर आणि माझा भाऊ
श्रीरंग उमराणी – या चित्रपटाला तोच संगीत देणार होता. तो की-बोर्ड, पेटी, ढोलकं, बासरी, सरोद, माऊथ ऑर्गन.. सगळंच वाजवायचा. त्या आळंदीच्या दोघा महाभागांना घेऊन आम्ही पुण्याला आलो. त्यांच्याकडे ‘शिकवणी’ घेऊन श्रीरंग त्यांच्यासारखा आवाज काढायला शिकला (श्रीरंग गायचासुद्धा). मग चित्रपटातली गाणी त्यांच्या पद्धतीने तोच गायला. आता प्रश्न होता तो गाण्याच्या मजकुराचा. गाणी शोधायला लागलो. ‘सुंदरा मनामध्ये..’च्या धर्तीची, जुन्या शाहिरांची कवनं शोधली. पण आवडेनात. मग सुनीलला म्हटलं, ‘तूच लिही.’ तो म्हणायचा, ‘मी काही कवी नाही.’ त्यानं ‘दहावी फ’साठी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या संवादांची गाणी लिहिली होती. पण त्या गाण्यापेक्षा त्यानं ‘दहावी फ’साठी जी प्रार्थना लिहिली होती, ती कविताच होती.
‘बुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना.. शक्ती दे, मुक्ती दे, आमुच्या मना..’ असंच प्रार्थनावजा गाणं त्यानं ‘नितळ’ साठी लिहिलं.
‘पानीसा निर्मल हो, मेरा मन, मेरा मन,
धरतीसा अविचल हो, मेरा मन, मेरा मन
सूरज सा तेजस हो मेरा मन,
चंदासा शीतल हो मेरा मन’
पुढे ‘किसीसे द्रोह ना करे मेरा मन’ वगैरे.. तो म्हणायचा, ‘‘मी नुसता ‘ट’ ला ‘ट’ जोडतो.’’ पण या दोन्ही प्रार्थनांमध्ये खूप काही होतं. अनेक शाळांनी ‘दहावी फ’ मधील प्रार्थना आपल्या शाळेची प्रार्थना म्हणून स्वीकारली. अनिल अवचटांच्या आणि मुक्ता पुणतांबेकरांच्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रात ‘नितळ’ची प्रार्थना अजूनही म्हटली जाते. तेव्हा हे काही नुसतं ‘ट’ ला ‘ट’ नव्हतं. या मन हलवणाऱ्या कविता होत्या. मग सुनीलनं ‘वास्तुपुरुष’साठी दोन गाणी लिहिली.
‘रातीच्या पोटामधी, अंधाराच्या वटामधी,
वाजतोय हरीचा पावा, जीव जाळितो मनीचा दुरावा.’
दुसरं, घरचा मुलगा आता शिक्षणासाठी घर सोडून, गाव सोडून परगावी जाणार आहे, त्या हुरहुरीचं गाणं,
‘कान्हा असा कसा जाशी,
दूर देशी.. गोपी लोटल्या रे येशीपाशी’
असा तो गोपींचा विलाप. श्रीरंगानं आळंदीच्या गायकांचा टिपेचा आर्त आवाज लावून ते गायलं. चाल त्याचीच. आळंदीच्या गायकांनी कोरस लावला. ते गाणं ऐकताना अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं. अनेकांनी विचारलं, की इतकी चपखल जुनी गीतं तुम्हाला कुठे मिळाली? कवीचं नाव सांगितल्यावर रसिक थक्क होत. हेच घडलं ‘संहिता’च्या वेळी.
‘संहिता’त बनारसहून आलेली मुस्लीम गायिका आहे. स्वत:चा जीव, एरवी नाजूक असला, तरी अनपेक्षित काळीज चिरत नेणारा आवाज लावून गाणारी. त्यात ती आशयगर्भ उर्दू शायरी. या चिजा कुठून मिळवायच्या? लखनौचा राजा वाजिद अली शहा, यांच्याही सुंदर चिजा आहेत. पण माझा आग्रह होता की, चित्रपटातल्या प्रसंगात शोभतील अशा चिजा, सुनीलनंच लिहाव्यात. अस्सल उर्दूत सुनीलनं शायरी केली.
* ‘अलफाजों को मंजूर है दस्तूर-ए-जमाना,
सूर तो नासमझ हैं गुमराह हो गए’
* ‘लुटा दू जाँ यही अरमान, दिलनवाजीमें,
वरना, बेदाग दिवानापन कुबुल हमें
तलाश हैं मदहोश सजा-ए-आशिकी की,
वरना, तनहाई का ये जश्न भी कुबुल हमें’
* क्या यही था जुल्म की
हम उन्हे दिलो जाँसे ना भुला सकें
उसूल-ए-उलफत में कहीं
ना करार हैं ना करार हैं
उन्हे हक ही था वो निशानिया
दिले उलझनों की मिटा सकें’
आरती अंकलीकरांच्या सुरेल, तीव्र आवाजानं या गाण्याचं सोनं केलं. त्यांना गायिका म्हणून आणि शैलेंद्र बर्वेला संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात त्यातली उत्तम शायरी ही सुनील सुकथनकर या कवीनं केली होती, हे निसटूनच गेलं. सगळ्यांना वाटलं, या जुन्या, पारंपरिक उर्दू चिजा आहेत. या उर्दू चिजांबरोबर गायिका बनारसची आहे म्हणून एक ब्रजभाषेतलं गीतही सुनीलनं लिहिलं आहे. त्यातल्या न विसरता येण्याजोग्या दोन ओळी –
‘अखियन की झील में प्यासी गहराई
अंतरघट मैं भरन को आई’
‘कासव’मध्येही जानकी, चित्रपटाची नायिका, हिनं काही लोकगीतं जमा केली आहेत. लोकगीतांचा बाजच वेगळा. अनुभवसिद्ध, साधा, तरल, निसर्गाशी थेट नातं जोडणारा. सुनीलला म्हटलं, ‘तूच लिही.’ सुनीलनं दोन गाणी लिहिली. एक –
* ‘लहर समंदर रे, कहांसे तू आई रे,
छिनक भरमाई रे,
ईक पल आई, पल में पराई’
दुसरं –
* ‘अपनेही रंगमें नहाऊं मैं तो,
अपने ही संग मं गाऊं.’
ही दोन्ही गाणी सायली खरे या वेगळ्या आवाजाच्या गायिकेनं गायली आहेत. सायलीचा आवाज हातमागावरच्या सुंदर भरभरीत वस्त्रासारखा. वेगळं, रखरखीत सौंदर्य मांडणारा. शब्दांना न्याय देणारा. संगीत आहे, साकेत कानेटकरचं. हा मुलगा कवी आहे. ‘अॅबस्ट्रॅक्ट’ कविता लिहितो. त्याच्या अभिव्यक्तीत तुम्हाला अडकवतो आणि संगीत अनपेक्षित, नाजूक देतो. संगीत तरलपणे चित्रपटातल्या जगण्यात मिसळून गेलं पाहिजे, असं मला वाटतं. ते साकेतला बरोबर उमजतं.
‘वेलकम होम’मधे मृणाल कुलकर्णीच्या सासूबाईंचं आणि तिचा जुना मित्र यांच्या दोस्तीचं नातं दाखवायचं होतं. तो पूर्वी घरी आला, की आईंना वैष्णव, बंगाली धर्तीची (बाऊल चालीची) गीतं म्हणून दाखवायचा. आज सासूबाईंचं वार्धक्याने स्मरण गेलं आहे. पण मित्रानं जुनं, दोघांचं आवडतं गीत म्हणून दाखवल्यावर त्या गाण्यामुळे त्यांना त्याची ओळख पटते. वैष्णव गीत! सुनीलला म्हटलं लाव तुझं कवित्व पणाला आणि त्यानं बंगालीचं भाषांतर वाटावं असं गाणं लिहिलं – ‘राधे राधे गोविंद बोले रे जमुनातिरी गोपीसंग डोले रे’ त्या संपूर्ण गाण्याला आवाज पार्थचा पण काही ओळी सुमित राघवन या गुणी, गाणाऱ्या अभिनेत्यानं प्रत्यक्ष पडद्यावर गायल्या आहेत. चित्रपटातलं गाणं नीट जमलं, की तो चित्रपट आपल्या मनात गुणगुणायला लागतो.
अशीच, ‘एक कप च्या’मधे स्त्रीगीतं म्हणता येतील अशी, कोकणी लहेजात दोन गीतं सुनीलने लिहिली. चित्रपटाच्या सुरुवातीलाच पहाटेच्या वेळी सगळं कुटुंब साखरझोपेत असताना गृहिणी अश्विनी गिरी न्हाऊन प्रार्थनावजा गाणं म्हणते आहे. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव, कुटुंबातलं समाधान आपल्यापर्यंत पोहोचवतं.
‘येवा पुरवेच्या देवा
तुका अंधाराची आण
डोळियाच्या भावलीक
द्यावं उजेडाचं दान’
दुसरं गाणं, आईवडील पशांच्या चिंतेने बेजार झाले आहेत आणि त्यांना कळू न देता त्यांची चिंता कमी करावी म्हणून आजी गाणं गाते आणि नाती तिला साथ देतात. सुप्रसिद्ध लेखिका कमल देसाई आजी होत्या; आणि नाती पर्ण पेठे आणि मृण्मयी देशपांडे. हे गाणंही त्या तिघींनी स्वत:च गायलं आहे. खूप मोठा आशय असलेलं साधं, साध्या चालीचं गाणं..
‘साता सिमदरा पार
असे अज्ञाताची सृष्टी
सृष्टीचा गो व्याप मोठा
आकळेना माझ्या दृष्टी
युगे युगे चाले खेळ
खेळा कोण चालवीता
जे का नियम उमजे
त्येका मग खैंची चिंता’
खेळ कुठलाही असो, संवादाचा, मनोरंजनाचा, नात्यांचा. खेळाचे नियम समजून खेळ खेळला, की त्याला खरी रंगत येणार. मला असंही नेहमी वाटतं, की चित्रपटातलं गाणं शक्यतो त्या-त्या नटानंच गावं. आता सर्वच नटांना सुरांची देणगी असेलच असं नाही. पण ‘नितळ’ चित्रपटात असे दोन गायक-नट सापडले. डॉ. शेखर कुलकर्णी आणि अमृता सुभाष. शेखरचा सूर प्रसन्न आणि ‘ऊनवेडय़ा पावसाचं’ गाणं म्हणणारा आणि अमृताचा गहिरा (शब्द सुनीलचेच). माझ्या असं लक्षात आलं, की हे नट-गायक त्या भूमिकेच्या, त्यावेळच्या मन:स्थितीत जाऊन अभिनय करत गातात. म्हणून ते गाणं आणखीनच परिणामकारक वाटतं. अमृताला ‘वेलकम होम’ चित्रपटात पडद्यावर भूमिका नाही पण तिनं गाणी गायलीत, नायिका मृणाल कुलकर्णीची मन:स्थिती बरोब्बर जाणून. ‘किर्र रान, स्तब्ध कोरडा साकळला रस पानोपान’ सुनील सुकथनकर या कवीचे चपखल शब्द. जसं नट-गायकाला व्यक्तिरेखेची मन:स्थिती नेमकी कळते
तसंच सुनील दिग्दर्शक असल्यामुळे शब्द लिहिताना त्याला ती घटना आणि मन:स्थिती पूर्ण कळलेली असते.
तसं तर, ‘संहिता’तली राजेश्वरी आणि ‘कासव’ मधली इरावती दोघीही चांगलं गातात पण मला त्या भूमिकांसाठी विशिष्ट आवाज हवे होते. नटांना सूर आणि गळा असला तर शूटिंगच्या वेळी लिपसिंग देताना मी त्यांना मोठय़ांदा गायला सांगते. कारण खरं गाताना गळा, छाती, पोट सगळ्यांवर सूक्ष्म हालचाल दिसते. नुसते ओठ हलवले तर गाण्यात जीव येत नाही. त्यामुळे इरावती आणि राजेश्वरी या दोघींचंही गाणं अगदी सच्चं वाटतं.
एक प्रकारे चित्रपटात जे स्थान संपूर्ण शांततेचं आहे, नि:शब्दतेचं आहे, तेच स्थान पार्श्वसंगीताचं आहे. चित्रपटातली भावना जपणं हे त्याचं काम. स्वराला स्वत:ची एक आस असते. म्हणजे एक प्रकारे इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे तो स्वर, हळूहळू फिका होत-होत अलगद नाहीसा होतो. स्वर संपल्याच्या पूर्णविरामावर बोट ठेवता येणार नाही. तसं घटनेतल्या भावनेची संवेदनांची आस पार्श्वसंगीताने साधली जाते. आधी म्हटल्याप्रमाणे या ‘आस ओढण्या’त प्रेक्षकांचा सहभाग तयार होतो. पण मग काय त्या तेवढय़ा भावनेला पूर्णविराम येतो का? तर नाही. ही आस संपल्यावर उरतो तुमचा उच्छ्वास..तो पार्श्वसंगीत हलकेच चालू ठेवतो.
कथानक घडत असताना ते पुढं चालूच असतं पण नायक-नायिकेच्या तोंडी असेल किंवा मागे असेल, गाणं सुरू झालं, की एकप्रकारे प्रेक्षक त्या कथानकातल्या खेळात स्वत: शिरतो आणि त्यातल्या भावनेशी एकरूप होऊन स्वत:च निवेदक म्हणून गाण्यातून स्वत:ला आणि इतर प्रेक्षकांना विश्वासात घेतो. मग खरा कलावंत आणि प्रेक्षक यांचा गोफ विणल्यासारखा खेळ सुरू होतो. प्रेक्षकाला त्या खेळात भाग घेता येतो. मी काय म्हणते ते समजण्यासाठी माझ्याबरोबर चालत, तुमचा तुमचा अनुभव घेऊन पाहा. असं काही वाटायला लागल्यावर गाण्यांची आणखी मजा यायला लागली.
मी काही संगीततज्ज्ञ नाही. या कवितेला कुठला राग शोभेल किंवा या भावनेला कुठलं वाद्य हवं हे मला नेमकं कळत नाही पण मला कान आहे. त्यामुळे संगीतकाराबरोबर माझं ‘नेती नेती’ करत काम चालतं. ‘मनाला आलं,’ ‘मनाला नाही आलं’ या दोन कप्प्यांमध्ये मी ऐकलेले संगीताचे तुकडे टाकते. सुनीलला माझ्यापेक्षा जास्त चांगला कान आहे. काही कविता तर त्याला चालीतच सुचतात. तो संगीतकारांबरोबर कवी आणि दिग्दर्शक अशा दोन्ही नात्यांने काम करतो आणि चित्रपटातल्या संगीताची रंगत वाढवतो.
तेव्हा पार्श्वसंगीतानं किंवा गाण्यांनी चित्रपटातल्या भावनांना अलंकार चढवल्यासारखं होतं. मेकअप खूप करण्यानं काय किंवा खूप अलंकार घातल्यानं काय, मूळ सौंदर्य झाकोळल्यासारखंच होतं. म्हणून जितकं नेमकं आणि मोजकं अलंकरण, तितका त्या भावनांना न्याय, असं मला वाटत असल्यामुळे आमच्या चित्रपटात मोजकं आणि सौम्य पार्श्वसंगीत असतं. इंडस्ट्रीत सर्वसाधारणपणे, गाण्याची किंवा पार्श्वसंगीताची लेवल, संवादाच्या वर ठेवायची प्रथा आहे. मला ती रुचत नाही. त्यानं माझा रसभंग होतो. हे म्हणजे, मला प्रेक्षकाला ढकलून, ओढून त्या भावनेत घातल्यासारखं वाटतं. सरावातून प्रेक्षकाला तो धक्का कदाचित हवाही असतो पण पारिजातकाच्या फुलाला झेंडूच्या फुलासारखं वागवून कसं चालेल? जीव रमवणाऱ्या खेळात भाग घ्यायचा तर भलत्या सवयी लावून घ्यायच्या नाहीत. ‘ज्याचे त्याला’ देण्याने खेळाची रंगत वाढते. नाही तर व्यसनासारखी नुसती झिंग.
sumitrabhavefilms@gmail.com
chaturang@expressindia.com