मुलगी चांगल्या घरातली म्हणजे नेमकं काय? सुखवस्तू? सुशिक्षित? सुसंस्कारित? आणि मुलगा दिसायला साधा, कळकट, अनपढ म्हणून तो थेट ‘वाईट’ घरातला? चांगली माणसं / वाईट माणसं, चांगलं घर/वाईट घर या संकल्पना आपण कोणत्या तकलादू पायावर उभ्या करतो? आणि अशा तथाकथित ‘वाईट’ घरांतली माणसं एकजात वाईटच, असं आपण कसं ठरवतो?
संध्याकाळ टळून गेलेली. स्टेशनरोड माणसांनी गजबजलेला. घराच्या ओढीने माझ्याही पायांनी वेग घेतलेला. अचानक एक कोवळा आवाज कानांवर पडला. ‘दीदी ऽ ओ ऽ दीदी ऽ’ क्षणभर दुर्लक्ष केलं. पण मग लगेच लक्षात आलं. अरे! ही हाक आपल्यासाठीच आहे. थबकले. वळून पाहिलं. तर एक चौदा-पंधरा वर्षांचा काळसर वर्णाचा मुलगा, डोक्यावरचं बिनतेलाचं केसांचं छप्पर हातानं सावरत मलाच हाक मारत होता. मी थांबले. बरोबरच्या मैत्रिणीनं हात खेचला. ‘कुठला कोण कळकट मुलगा तुला बोलावतोय आणि चाललीस लगेच!’ तिला हातानंच खूण केली, तू हो पुढे. मी आलेच. गर्दीला बाजूला सारत मी त्या मुलाच्या दिशेने वळले. ती चमत्कारिक नजरेने मला बघत क्षणभर थांबली आणि नाक मुरडून भराभर पावलं उचलत पुढे निघून गेली. तिच्या पावलांतली लगबग मला जाणवली. तिला त्या ‘कळकट’ मुलापासून लवकरात लवकर दूर दूर जायचं होतं.
मी जवळ जाताच एका बँकेच्या कुंपणाला टेकून ठेवलेल्या काही फ्रेम्सपैकी एक फोटोफ्रेम त्याने उचलली. माझ्यापुढे धरली. ‘दीदीऽ ये आप के लिएऽ’ त्याने फोटोफ्रेम पुढे केली आणि त्याच्या हातावरच्या भाजल्याच्या खुणांनी चटकन त्या मुलाची ओळख पटवली. तो हमीद होता. हमीद. वय वर्ष पंधरा. वडिलांचा पत्ता नाही. जन्मापासून काही र्वष आईनं स्टेशनवर भीक मागत कसंबसं त्याचं पोट भरलं. पुढे तीही मरून गेली. मग स्टेशनवर ओळख झालेल्या थोडय़ा मोठय़ा वयाच्या निबर मुलांसोबत तोही राहू लागला. त्यांच्या सोबत कधी बुटपॉलीश कर तर कधी काच-पत्रा गोळा कर असं करत स्वत:चं पोट भरू लागला. ही जाणती मुलं त्यांच्या वासना शमवायला कोवळ्या हमीदचा वापर करायची. त्यांचं शरीराशी खेळणं संपलं की रस्त्यावरच्या एखाद्या कोपऱ्यात नाही तर दुकानाच्या पायरीवर हमीद दुखऱ्या अंगाचं मुटकुळं करून पडून रहायचा. पण त्याच्या नशिबात जमिनीचा तेवढाही चतकोर तुकडा नसायचा. कारण रात्रीच्या गस्तीवरील शिपाई दंडुका मारून त्याला उठवायचे, हुसकावायचे. एकदा तर पोलिसांनी कहरच केला. काच-पत्रा गोळा करणाऱ्या हमीदच्या रक्तबंबाळ हातांवर फटक्यांचे आसूड ओढत त्याला पोलीस स्टेशनवर नेण्यांत आलं. त्यानं न केलेल्या चोरीचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याने चोरी कबूल करावी म्हणून त्याला पट्टय़ानं फोडून काढण्यात आलं आणि तुरुंगात डांबण्यात आलं. तिथून त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली. तिथेच रस्त्यावरच्या बेघर मुलांसाठी काम करणाऱ्या ‘आसरा’ संस्थेच्या फादरशी त्याची भेट झाली. हमीदला पुढे शिकायचं नव्हतं. त्याचा हट्ट एकच होता. ‘मुझे भिख माँगनी नही! मुझे इमानदारीसे जीना है। मेहनतकी रोजी रोटी कमानी है।’
बस्स! ‘आसरा’ने त्याला छप्पर दिलं. फोटोफ्रेम्स विकून पैसे कमवण्याचा, पोट भरण्याचा मार्ग दाखवला. ‘आसरा’ संस्थेवर आकाशवाणीसाठी बाह्य़ ध्वनिमुद्रणाचा कार्यक्रम केला. त्या वेळी हमीद, आकाश, बलबीर अशी किती तरी मुलं भेटली. प्रत्येकाचं रंगरूप, प्रत्येकाची कहाणी जवळपास सारखीच! त्यांच्याशी जरा जिव्हाळ्याने बोललं, पाठीवर हात ठेवला, वडापावचा खाऊ हातांवर ठेवला की, ती मुलं कुठेही रस्त्यात तुम्हाला ओळख दाखवतात. थांबून दोन शब्द बोललं की त्यांच्या निबरलेल्या निरागस काळ्यासावळ्या चेहऱ्यावर मनभर हसू पसरतं. असंच हसत हमीदने एक फ्रेम माझ्या पुढय़ात धरली. ‘दीदीऽ ये आप के लिए मेरी तरफसे भेंट!’ त्याच्या दिलदारीने डोळ्यात पाणी आलं. मला फ्रेमचे पैसे विचारून त्याच्या दिलदारीचा अपमान करायाच नव्हता. पण त्या फ्रेमच्या विक्रीतून त्याची रात्रीची भूक भागणार होती. याची मला जाणीव होती. मी मुकाटय़ाने रस्ता क्रॉस केला. हॉटेलमधून त्याच्यासाठी पोटभर खाणं घेतलं. त्याने आनंदाने ते घेतलं. फ्रेम निगुतीने कागदात बांधली..  माझ्या डोळ्यांतल्या अश्रूंनी हमीदचा चेहरा पुसून टाकला. मनात अपार कणव दाटून आली. हमीदसाठी? मुळीच नाही. हमीदचं हे रूप आणि जगण्याचं वास्तवं नजरेआड करणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी!
हमीदचा हा प्रसंग घडला तेव्हा एका लांबच्या प्रवासातला प्रसंग आठवला. दीर्घ पल्ल्याच्या गाडीमध्ये कळकट कपडय़ातला असाच एक मुलगा गाडी फडक्याने पुसत होता. अगदी लोकांनी सीटखाली भिरकावलेले बिस्कीटच्या पुडय़ाचे, चॉकलेटस्चे रंगीत कागद फळांची सालपटं, बिया सगळं गोळा करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीत नीट भरत होता. बाकं साफ झाली की पोटासाठी पैसे मागत होता. प्रत्येक बाकाखाली साफ करताना बाकावरचा प्रवासी पाय वर घेता घेता अगदी बारीक नजरेनं त्याच्यावर लक्ष ठेवत होता. बायका एकमेकींना खाणाखुणा करून त्याच्यापासून सांभाळा सांगत होत्या. मला कळेना, त्याला चोरीच करायची असती तर त्याने गाडी स्वच्छ करायचा हा मार्ग का बरं पत्करला असता?
पांढऱ्याफेक परीटघडीच्या कापडय़ांतला वजनात काटा मारून कबुतरांना दाणे घालणारा व्यापारी साव आणि तेलपाणी नसलेले केस, न धुतलेले कपडे आणि अस्वच्छ शरीराचा झाडूवाला मुलगा मात्र चोर?
आपल्या मनातली ही समिकरणं तरी कुठली?
‘सावधान’ संस्थेतल्या नेपाळी वेश्यांच्या मुलाखती घेत असताना तिथल्या भयानक पिळवणुकीच्या हकीकतींनी अंगावर काटा येत होता. नुकतीच त्या मुलींची पोलिसांनी सुटका केली होती. पण एकीच्याही चेहऱ्यावर सुटकेचा अथवा घरी जाण्याचा आनंद काही दिसत नव्हता. मुलाखती संपत आल्या. निघताना न राहवून जरा मैत्रीपूर्ण वाटणाऱ्या मुलीला सहज म्हटलं, ‘अब तो तुम खूश होगी ना! इस नरकसे तुम्हे छुटकारा मिला! अब इमानदारीकी रोजीरोटी कमाओगी!’
‘‘कैसे कमाऊंगी दीदी? हम पढेलिखे नहीं है।’’
‘‘तो क्या हुआ? किसीके घर में झाडुफटका करके तो पेट भर सकती हो!’’
‘‘तुम मुझे अपने घर में रखोगी दीदी?’’
तिचा धारदार प्रश्न माझं काळीज कापत गेला. मला पूर्ण निरुत्तर करून गेला.
आपण अवघड गणितं किती सहज सोडवून टाकतो! पण आयुष्याला अवघड गणितांची सोपी रीत ठाऊकच नसते. शरीरविक्रयाचा ठप्पा लागलेल्या कुठल्या बाईला आपण कामावर ठेवू? किंबहुना तिचा नवरा, बाप, भाऊ तरी तिला तिच्या हक्काच्या घरात निवारा देतील?
मैत्रिणीबरोबर मॉर्निग वॉक घेताना तळ्यावरच्या कट्टय़ावर अनेकदा सकाळच्या प्रहरी एकमेकांत मश्गूल झालेल्या जोडय़ा दिसतात. एकदा मैत्रीण सहज बोलून गेली, ‘ती मुलगी पाहिलीस? माझ्या दूरच्या नात्यातली आहे. मी ओळखते तिला! बघ ना इतकी चांगल्या घरातली मुलगी कसल्या गचाळ मुलाबरोबर बसलेय! कुरिअर बॉय नाही तर भंगीकाम करणारा वाटतोय तो मुलगा! शी!’
मैत्रिणीच्या स्वरातला राग, चीड, संताप आणि कळकळसुद्धा समजत होती. पण मुलगी चांगल्या घरातली म्हणजे नेमकं काय? सुखवस्तू? सुशिक्षित? सुसंस्कारित? आणि मुलगा दिसायला साधा, कळकट, अनपढ म्हणून तो थेट ‘वाईट’ घरातला? परिस्थितीवश कदाचित तो घरचा ‘वाईट?’ आणि कॉलेज बुडवून सकाळच्या प्रहरी मित्रासोबत प्रणयचेष्टा करणारी मुलगी मात्र ‘चांगल्या घरातली?’
चांगली माणसं / वाईट माणसं, चांगलं घर/वाईट घर या संकल्पना आपण कोणत्या तकलादू पायावर उभ्या करतो? आणि अशा तथाकथित ‘वाईट’ घरातली माणसं एकजात वाईटच असं आपण कसं ठरवतो?
माझी आई एक किस्सा सांगायची. ती शाळेत असताना म्हणजे जवळजवळ साठ-सत्तर वर्षांपूर्वी त्यांच्या मुरुडमधल्या शाळेची आमराईत सहल गेली होती. खूप खेळून, हुंदडून झाल्यावर एका आंब्याच्या झाडाखाली खाऊ एकमेकींना दिला, घेतला. एक मुलगी तिच्या डब्यातली झुणकाभाकर सगळ्यांच्या पुढे करत होती. पण ती घ्यायला कोणीही हात पुढे करत नव्हत. शेवटी न जेवता तिने मुकाट डबा बंद केला. कोमेजल्या मनाने, उपाशीपोटी ती घरी परतली. कारण ती हरीजन होती. प्रत्येक वेळी ही आठवण सांगताना आई अगदी गहिवरून जायची.
एक वा अर्ध-शतकापूर्वीची आईची पिढी असो की आजची एकविसाव्या शतकातली माझ्या मुलीची पिढी आपण आपल्या मनाला घातलेली काटेरी कुंपण अद्यापही भक्कम आहेत. माणसांना कुंपणाबाहेर ठेवण्याचे निकष कदाचित आपण बदलले असतील. पण कुंपणाचं दार साधं किलकिलं करण्याचा उमदेपणा आजही आपण स्वत:मध्ये रुजू दिलेला नाही. म्हणूनच काही माणसांना आपण आजही आपल्या मनात, घरात स्थान देत नाही. तर समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Story img Loader