पिवळा रंग खरं तर उष्ण रंग आहे, पण बहाव्याची पिवळी छटा अपवाद ठरावी. किंचित फिकट पिवळ्या रंगाच्या इवल्या इवल्या असंख्य फुलांचे असंख्य घोस, आटोपशीर विस्ताराच्या झाडावरून ओथंबून ओघळत असतात. उन्हात पडणाऱ्या पावसाच्या सोनेरी सरीसारखे. पिवळ्या फुलांच्या डिझाईनच्या कापडाचा तागा उलगडावा तशी ऐन उन्हाळ्यातल्या दुपारच्या रणरणत्या उन्हात बहाव्याची पिवळी फुलं बघून डोळे निवतात.
साधारणत: १५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. कामानिमित्त व्ही.टी.ला गेले होते, नि कधी नव्हे ती गर्दीच्या वेळेआधी दिवसाउजेडी घरी ठाण्याला परतत होते. उन्हाच्या बाजूची का असेना, पण खिडकीजवळची सीट मिळाली होती. खिडकीबाहेर बघत असले तरी कामासंबंधीच्या विचारातच होते. मागे पळणाऱ्या झाडांकडे लक्षं नव्हतं. पिवळ्या फुलांनी लगडलेलं एखादं झाड नजरेसमोरून गेलं असतं तर काही माझी तंद्री भंगली नसती. पण इथे १-२ नव्हे, १०-१२ झाडं होती. सलग, एका ओळीत, पूर्ण बहरलेली. मोठय़ा पडद्यावर बघितलेल्या सिनेमातील एखादं भव्य दृश्य मनात ठसावं तसं हे दृश्य होतं. ते मी डोळ्यात साठवून घेत असताना, माझी ट्रेन धडधडत पुढे निघून गेली.
सकाळी ऑफिसला जाताना सायनला उतरायचं म्हणून ज्या बाजूने ही झाडं दिसली असती त्याच्या विरुद्ध बाजूच्या दाराजवळ उभं राहायला लागायचं. परत येताना अंधार झालेला असायचा. पुन्हा ती झाडं बघायची संधी मिळत नव्हती. २-३ आठवडय़ांनी ऑफिसला जाताना एकदा जेव्हा पश्चिमेकडची खिडकी मिळाली तेव्हा ठाण्यापासूनच खिडकीबाहेर लक्ष ठेवून होते. विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये झाडं दिसली खरी, पण फुलांचा बहर जरा ओसरला होता. माझ्या आठवणीत कोरल्या गेलेल्या दृश्याच्या पुन:प्रत्ययासाठी आता वर्षभर वाट बघायची होती.
ही पिवळ्या फुलांची झाडं मी पहिल्यांदा बघितली तो एप्रिलचा सुमार होता. पुढच्या वर्षी मी जानेवारीपासून या झाडांकडे लक्ष ठेवून होते. खिडकीलगतची जागा मिळाली तर सहज बघता यायचं. नाही तर जरा वाकून खिडकीतून डोकावायला लागायचं. कितीही गर्दी असली तरी बायकांच्या डब्यात बायकांच्या सर्वसाधारण उंचीच्या वरचा दाराचा फूटभर भाग कायम मोकळाच राहतो. बसायला जागा मिळाली नसेल तर सगळ्यांच्या डोक्यावरून दिसणाऱ्या या दाराच्या खिडकीतून बघायचं. एवढा खटाटोप करून कधी तरी नेमकी ऐन वेळी बाजूच्या ट्रॅकवरून जाणारी ट्रेन आडवी यायची!
फेब्रुवारीच्या मध्यावर थोडी थोडी फुलं दिसायला लागली. मी वर्षभर आठवणीत जपून ठेवलेलं, बहरलेल्या झाडांचं दृश्य मार्च महिन्यात मला पुन्हा एकदाचं दिसलं. अजूनही मला त्या झाडाचं नाव माहीत नव्हतं. माझ्यासाठी त्याची ओळख विक्रोळी-घाटकोपरच्या मधलं पिवळ्या फुलांचं झाड अशीच होती. अशातच वर्तमानपत्रातील एक लेख वाचनात आला. लेखातील वर्णन नि सोबतचा फोटो यांनी ओळख पटली. या झाडाला बहावा म्हणतात हे कळलं. लेखात ठाण्यातल्या घंटाळी मंदिराजवळच्या बहाव्याचा उल्लेख होता. वाट वाकडी करून घंटाळीला जाऊन मी ते झाड बघून आले. त्यानंतर जाता येता ठिकठिकाणी बहावा भेटू लागला.
मुलुंड चेकनाक्याहून अंधेरीला जाणारी बस १०-१५ मिनिटं मुलुंडमध्येच फिरत असते. निघायला आधीच उशीर झाला असेल तर हा वेळ अगदी वैतागवाणा असतो. अशातच एकदा, ही बस गाव भटकून पुन्हा हमरस्त्याला जिथे लागते, त्या कोपऱ्यावर एक बहरलेला बहावा दिसला. सगळा वैताग क्षणात विसरून, अगदी प्रसन्न वाटलं. तसंच एकदा डोंबिवलीहून कारने पुण्याला जाताना, कार एक्स्प्रेस वेला लागल्यावर, रस्त्याच्या कडेने बहाव्याच्या झाडांची लांबलचक रांग दिसली. पिवळ्या फुलांच्या डिझाईनच्या कापडाचा तागा उलगडावा तशी. ऐन उन्हाळ्यातल्या दुपारच्या रणरणत्या उन्हात बहाव्याची पिवळी फुलं बघून डोळे अगदी निवले!
पिवळा रंग खरं तर उष्ण रंग आहे, पण बहाव्याची पिवळी छटा अपवाद ठरावी. किंचित फिकट पिवळ्या रंगाच्या इवल्या इवल्या असंख्य फुलांचे असंख्य घोस, आटोपशीर विस्ताराच्या झाडावरून ओथंबून ओघळत असतात. उन्हात पडणाऱ्या पावसाच्या सोनेरी सरीसारखे. फुलंसुद्धा अगदी टप्पोऱ्या  थेंबांसारखी दिसतात. मी बहावा कायम लांबूनच बघितला होता. कधी तरी ही फुलं जवळून बघता यावीत असं वाटायचं. एकदा अचानकच तशी संधी मिळाली.
इंदौरच्या भाचरांना मुंबईदर्शन करवताना, नेहरू सायन्स सेंटरला गेले होते. तिथे पांढरा बहावा दिसला. जुन्या मुख्य इमारतीच्या अलीकडच्या मोकळ्या जागेत. हे झाडं असलेली जागा इमारतीच्या तुलनेत जरा सखल होती. त्यामुळे इमारतीच्या पुढय़ात उभं राहिलं की झाडाचा बुंधा खाली राहून, फुलं अगदी जवळून दिसत होती. हळूच त्यांना हात लावून बघायचा मोह होत होता. पण सार्वजनिक बागेतल्या झाडांना हात लावायचा नाही हा धडा भाचरांना स्वत:च्या वागणुकीतूनही द्यायला हवा म्हणून निग्रहाने हात मागे घेतला. २-३ वर्षांपूर्वी पुन्हा एकदा नेहरू सायन्स सेंटरला गेले असता आठवणीने हा पांढरा बहावा बघायला गेले. पण नवीन वाढीव बांधकामापायी तो नाहीसा झालाय.
एक बहावा मला ई-विश्वातही भेटला. काही वर्षांपूर्वी मराठी ब्लॉग्ज वाचताना, एका ब्लॉगने माझं लक्ष वेधून घेतलं. ब्लॉगवरील लेखांच्या पाश्र्वभूमीसाठी बहाव्याच्या बहराचा मस्त फोटो टाकला होता. प्रथमदर्शनी फक्त या फोटोमुळे जरी मला हा ब्लॉग आवडला असला, तरी पुढे हाच ब्लॉग मी इतर ब्लॉग्जपेक्षा जास्त नियमितपणे वाचला असेल. ब्लॉगचे साहित्यिक मूल्य वगरे फुटपट्टय़ा न लावता, मला तो ब्लॉग आवडला कारण बरेच वेळा त्या ब्लॉगवर माझ्या जिव्हाळ्याच्या विविध विषयांवर अगदी माझ्या मनातले लिहिले जायचे. मी या ब्लॉगची दखल घेण्यासाठी बहाव्याच्या फोटोचे निमित्त व्हावे या योगायोगाचे मला आश्चर्य वाटते.
एकदा एका मल्याळी मित्राशी बोलताना बहाव्याचा विषय निघाला. त्याने सांगितले की १४/१५ एप्रिलला त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. तेव्हा साजऱ्या केल्या जाणाऱ्या या ‘विषु’ नामक सणामध्ये या फुलांचे खूप महत्त्व असते. घरातील वडीलधारी व्यक्ती भल्या पहाटे उठून अय्यप्पाची पूजा करते. या पूजेसाठी जी पारंपरिक आरास करतात त्यात हीच फुलं वापरली जातात. पूजा झाल्यावर ती व्यक्ती एकेक करून इतर कुटुंबीयांना उठवते. त्यांचे डोळे झाकून त्यांना पूजेच्या खोलीत घेऊन जाते नि मगच त्यांचे डोळे उघडते. नवीन वर्षांची सुरुवात देवदर्शन, तसेच शुभशकुनाची आरास बघून व्हावी ही त्यांची प्रथा मला आवडली. बहाव्याची फुलं बघून वर्ष सुरू होणार असेल तर नक्कीच ते येणाऱ्या वर्षांला कायम उत्साहानेच सामोरे जात असतील.
बहाव्याबद्दल लेख लिहायचं गेले काही र्वष मनात होतं. वेगवेगळ्या स्थळी नि वेगवेगळ्या काळी विखुरलेल्या माझ्या बहाव्याच्या आठवणींना एकत्र गुंफणाऱ्या लेखासाठी मुहूर्तच लागत नव्हता. यंदाच्या वर्षी माझ्या आठवणीतल्या पहिल्या बहाव्यानेच, जो मी गेली अनेक र्वष नियमित बघत आले त्या बहाव्यानेच, हा लेख लिहून घेतला. यंदा अजून तरी विक्रोळी-घाटकोपर रेल्वेमार्गाच्या लगतचं एकही झाड यंदा अजून फुललंच नाही. रोज जातायेता ती भकास झाडं बघताना, बहाव्याच्या सगळ्या जुन्या आठवणी गोळा झाल्या नि ट्रेनच्या प्रवासातच त्या लिहून काढल्या!
लेख लिहून झाला तरी एक प्रश्न उरलाच आहे. अजून ही झाडं का फुलली नाहीयेत? आपल्या परिसरातील पुनर्वकिासाच्या कामांमुळे आपली गतसुद्धा त्या नेहरू सायन्स सेंटरमधील बहाव्यासारखी तर होणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटतेय की काय? माझी ही शंका अनाठायी ठरो, नि दोन आठवडय़ांनी येणाऱ्या ‘विषु’पर्यंत तरी ही झाडं त्यांच्या नेहेमीच्या दिमाखात फुलून येवोत!
२४ेि४@ॠें्र’.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा