प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

मध्य प्रदेशातले ‘बैगा’ आदिवासी निसर्गातली लय आपल्या चित्रांमध्ये अचूक टिपतात. पक्षी, प्राणी, झाडं, जलाशय आणि माणूस यांचं सहजीवन रंगीबेरंगी चित्रांत दाखवणारी ही कला मध्य प्रदेशातल्या उमरिया जिल्ह्य़ात फुलत आहे. सत्तराव्या वर्षी कुंचला हाती घेतलेल्या आणि प्रतिभेच्या जोरावर इटलीच्या चित्रप्रदर्शनात पोहोचलेल्या जुधईयाबाई, तसंच चित्रांच्या जोरावर घराला आर्थिक हातभार लावून घरच्यांचा कलाविरोध मोडून काढलेली त्यांची नात रिंकू बैगा, अशा अनेक चित्रकर्ती इथे तयार होत आहेत, ‘बैगानी चित्रपरंपरा’ जपत आहेत..

मध्य प्रदेशातल्या बांधवगड भागातील उमरिया जिल्ह्य़ात असलेल्या लोढा गावात प्रवेश केल्यानंतर वाटेवरच एक फलक दिसतो. त्यावर लिहिलं आहे, ‘जनगण तस्वीरखाना- कला और कलाकारों का घर’. हे नाव आहे गावातल्या कलाशाळेचं.  २००८ मध्ये चित्रकार आशीष स्वामी यांनी ही शाळा सुरू केली. या गावात प्रामुख्यानं ‘बैगा’ आदिवासी जमातीची वस्ती आहे. या आदिवासींची ‘बैगानी चित्रपरंपरा’ या शाळेच्या माध्यमातून वाढली.. सर्वदूर पसरली..

रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या प. बंगालमधल्या जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’चे आशीष हे विद्यार्थी! मूळचे उमरियाचे! मुंबईत चित्रकार म्हणून काम करत असताना मन रमलं नाही म्हणून परत येऊन त्यांनी उमरिया येथे कलाशाळा सुरू केली. विशेष म्हणजे या शाळेत विनामूल्य शिकता येतं. वयाची अट नाही. अमुक दिवस हजेरी हवीच असंही नाही. वेगवेगळ्या वयोगटातले स्त्री-पुरुष, मुलं-मुली इथे येतात. रचनात्मक काम करतात. इथेच सगळ्यांसाठी स्वयंपाक केला जातो. इथंच जेवायचं, चित्रं, शिल्पं करायची, गाणी म्हणायची, गप्पागोष्टी करायच्या. लेकुरवाळ्या स्त्रियाही आपल्या मुलांना घेऊन येतात. एक कला परिवारच आहे हा. आशीष गुरुजींच्या मते प्रत्येक जण चित्रकार व्हावा हा ‘तस्वीरखाना’चा उद्देश नाही. पण बैगांची उच्च प्रतीची सांस्कृतिक कलापरंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ती चित्रांच्या माध्यमातून जिवंत ठेवता येईल, असं त्यांना वाटतं. काही रीतिरिवाज, सण, लोककथा, प्रसंग, हे चित्रांद्वारे जपण्याचा ते प्रयत्न करतात. विशेष कल असलेल्या मुलांना शहरात चित्रकलेतलं शिक्षण घेता यावं यासाठी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतात.  इथे येणाऱ्या स्त्रिया आणि मुलींनी काढलेली चित्रं कला-

विक्रे त्यांपर्यंत पोहोचवून त्या विक्रीतून येणारे पैसे त्या स्त्रियांना देतात. गेली दहा र्वष नियमितपणे कलाशाळेत येऊन काम करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. लग्न होऊन गेलेल्या मुली माहेरपणाला आल्या की चित्रं काढायला इथे येतात. सासरच्या मंडळींना ‘जनगण तस्वीरखाना’ दाखवायला घेऊन येतात. एखादं प्रेक्षणीय स्थळ असावं तसं अनेक लोक इथे भेट द्यायलाही येतात.

बैगा आदिवासींच्या कल्पना, ते वापरतात ती रंगसंगती यात वेगळेपणा असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो, असं आशीष गुरुजी सांगतात. आदिवासींनी काढलेलं झाड इतरांपेक्षा वेगळं असतं. बैगा लोकांना लुप्त होणारी झाडं, वनस्पती, पक्षी, प्राणी यांची चित्रणं करायला गुरुजी आवर्जून सांगतात, जेणेकरून त्यांची चित्रांद्वारे नोंद ठेवली जाईल. बैगा आदिवासी ही पृथ्वीवर रहाणारी आद्य जमात असून हे स्वत:ला ‘भूमीजन’ म्हणवतात. ते शेत नांगरत नाहीत. धरतीमाता अन्न देते, त्यामुळे त्यांच्या मते तिला नांगरणं हे तिच्या शरीरावर ओरखडे ओढण्यासारखं आहे. ते बदलती शेती (‘शिफ्टिंग अ‍ॅग्रीकल्चर’) करतात. ‘बैद्य’ या हिंदी शब्दावरून ‘बैगा’ हा शब्द आला असं म्हणतात. कारण यांना आयुर्वेदाचं उत्तम ज्ञान असून पुढील पिढीकडे ते हे ज्ञान सोपवतात. ‘वाघ देव’ हा त्यांचा देव. वाघाच्या रूपातली लाकडी मूर्ती प्रत्येक गावाच्या वेशीवर स्थापन केलेली दिसते. बैगा अतिशय शूर, निर्भीड, कष्टाळू असतात. आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं हे त्यांचं तत्त्व.  संगीत, नृत्यकला त्यांच्या जीवनाचाच भाग आहे, पण अलीकडे तेही कमी होताना दिसतं.

‘बैगानी चित्रशैली’चं पुनरुज्जीवन करण्याचं महत्त्वाचं काम आशीष स्वामी यांनी केलं असं म्हणणं योग्य ठरेल. इतकंच नाही, तर जागतिक स्तरावर ही कलाशैली पोहोचली आहे. सत्तर वर्षांच्या जुधइयाबाई बैगा त्यांचं दीडशे रुपयांचं सरकारी निवृत्तिवेतन मिळत नव्हतं म्हणून त्या

‘पढे-लिखे’ आशीष गुरुजींची मदत मागण्यासाठी आल्या. आपण मदत करू, असं आश्वासन गुरुजींनी दिलं, पण त्याच वेळी त्यांनी जुधइयाबाईंना एक कागद देऊन त्यावर चित्र काढायला सांगितलं. अजिबात अक्षरओळख नसलेल्या जुधइयाबाईंनी कधी पेन्सिल हातातदेखील धरली नव्हती, पण वयाच्या सत्तराव्या वर्षी कुं चला धरला. त्यांनी जे चित्र काढलं त्यातली त्यांची प्रतिभा, रंगज्ञान, रेखाटनातली सहजता पाहून गुरुजींनी त्यांना थोडं थोडं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. जुधइयाबाई म्हणतात,‘‘ज्या वेळी मी कागदावर चित्र काढायला सुरुवात केली, त्या वेळी पक्ष्यांप्रमाणे मुक्तपणे उडत असल्यासारखं वाटायचं.’’ पुढची दहा र्वष त्यांनी सातत्यानं चित्रं काढली. त्यानंतर चमत्कार घडावा अशी घटना घडली. जुधइयाबाई बैगा या जागतिक कीर्तिच्या चित्रकर्ती म्हणून नावारूपाला आल्या.  इटलीमधील मिलान इथं ‘कोरोसो डी पोर्टा व्हिजेंटिना’  इथे त्यांची चित्रं जगातल्या प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांच्या शेजारी प्रदर्शित झाली. विशेष म्हणजे या प्रदर्शनाच्या आमंत्रण पत्रिकेवरही जुधइयाबाईंचं चित्र छापलं गेलं.  परदेशात जाण्यापूर्वी भारतात दिल्ली, भोपाळ, खजुराहो, उज्जन, मांडवी (धर) अशा अनेक ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शनं भरली. त्या सांगतात, ‘‘परदेशी लोक माझी चित्रं खूप वेळ पाहात उभे राहातात आणि विकतही घेतात.’’ मध्य प्रदेशातल्या जनजातीय संग्रहालयात त्यांनी मोठं भित्तिचित्र रंगवलं आहे. आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या आशीष स्वामी गुरुजींबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्या बोलतातही मार्मिक! समर्पक उदाहरणं, म्हणींचा वापर करतात. त्यांचं म्हणणं असं, की वय आणि प्रसिद्धी यांचा कलेतील चुकांशी संबंध नाही. परिपूर्णता ही कलेत शक्य नाही, कारण कलेत नेहमीच सुधारणा आणि प्रगतीला वाव असतो. चित्रं परदेशात प्रदर्शित झाल्याचा त्यांना आनंद झालाच, परंतु त्याहीपेक्षा जास्त आनंद त्यांची सून चित्रकलेत रस घेऊ लागली तेव्हा झाला. ‘‘ती सुंदर चित्रं काढू लागली आहे. मला अधिक महत्त्व वाटतं ते आमचं बैगांचं लोढा गाव जगाच्या नकाशात दिसू लागलं हे.’’ असं त्या सांगतात. त्यांच्या गुरुजींच्या मते, जुधइयाबाई आपल्या चित्रांत गुलाबी आणि लाल या रंगाचा जो वापर करतात तो त्यांच्या चित्रांचं खास वैशिष्टय़ आहे. हे रंग हाताळणं फार कठीण आहे. मान्यवर यशस्वी चित्रकारही ही गोष्ट मान्य करतात. पण ही चित्रकर्ती मात्र हे रंग चतुराईनं, सहजतेनं हाताळते. ‘मिलान’चं चित्रप्रदर्शन ही त्यांच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची घटना असली तरी एवढय़ावर थांबून चालणार नाही.  पुढे जायलाच हवं. तशा त्या जातही आहेत.

बैगांच्या चित्रकलेची आवड वाढवण्यासाठी अशा घटना इतर बैगा चित्रकारांच्या आयुष्यात घडल्या तर खऱ्या अर्थानं ‘बैगानी चित्रपरंपरा’ जिवंत राहील. जुधइयाबाईंना चित्र काढताना पाहिलं तर वाटतं की त्या एका वेगळ्याच दुनियेत वावरत आहेत. त्यांची क्षमता पाहिल्यावर त्यांना जागतिक स्तरावर न्यायचं स्वप्न गुरुजींनी पाहिलं होतं. ते पूर्णत्वाला गेलं.  हे ऐकत असताना माझ्या डोळ्यांसमोर पु. ल. देशपांडे यांची ‘फुलराणी’ आली.  हे आशीष यांना सांगितल्यावर त्यांनीही तोच दाखला दिला. ढगांमध्ये दिसणारी निर्मलता, निसर्गातली लय, पक्षी, प्राणी, झाडं, जलाशय यांचं सहजीवन जुधइयाबाई सहजतेनं रंगवतात. त्या सांगतात, ‘‘मी साधी रोजगारावर जगणारी बाई, या रंगाच्या दुनियेत चुकून आले.. पण आता मात्र मी फक्त चित्र रंगवते.’’ त्यांचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच वारले. ऐन तारुण्यात पतीचा मृत्यू झाला. दोन मुलगे आणि एक मुलगी यांना वाढवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पण या साऱ्या वेदना, दु:ख चित्र काढताना त्या विसरून जातात.  लहानपणीच्या त्यांच्या दोन सख्या आहेत. झुलनबाई आणि समनीबाई. या तिघींच्या हातावर तिघींची नावं लहानपणीच त्यांनी गोंदवून घेतली आहेत. आता वयोमानानुसार सुरकुत्या पडल्यामुळे ही नावं जरी स्पष्ट दिसत नसली तरी त्यांचं मैत्र मात्र अजूनही घट्ट आहे.

याच जुधईयाबाईंची नात रिंकू बैगा. गोड आवाजात बैगा लोकगीतं म्हणणारी, लयबद्ध ‘कर्मा नृत्य’ करणारी आणि कागद, कॅनव्हास बरोबरच वाळलेला दुधी भोपळा आणि दोडक्यावर सुंदर चित्रं रंगविणारी! ही आताच्या तरुण पिढीतली चित्रकर्ती. दहावी पास झालेली रिंकू मुद्देसूद बोलते. तिच्याशी बोलताना तिच्या आयुष्यातल्या दोन घटना ऐकल्या आणि आदिवासींच्या खडतर जीवनाची कल्पना आली. िरकूचं लग्न झालं अठराव्या वर्षी. ती गर्भवती असताना विहिरीतून पाणी आणताना तोल जाऊन विहिरीत पडली पण वाचली. पुढे तिचं बाळ छोटं असताना तिला सर्पदंश झाला आणि तिनं बाळाला दूध पाजल्यामुळे त्यालाही विषबाधा झाली. वेळेत उपचार मिळाल्यानं दोघंही वाचली. लग्न होऊन सासरी गेल्यावर त्या लोकांना चित्रांचं महत्त्व समजत नव्हतं. त्यामुळे तिला विरोध होऊ लागला. पण घरची सारी कामं आटोपून ती निग्रहानं चित्रं काढायला बसत असे. हळूहळू चित्र विकून पैसे मिळतात हे समजल्यावर घरून होणारा विरोध मावळला. ती स्वत: सगळा संसार सांभाळते. नवऱ्यालाही तिनं चित्रकला शिकवली. तोही तिला आता मदत करतो. दोघंही ‘जनगण तस्वीरखाना’मध्ये जातात. जानेवारी २०२० मध्ये एका कलामेळ्यात स्टॉलवर चित्रं विकून तिनं सतरा हजार रुपये मिळविल्याचं ती खुशीत येऊन सांगत होती. तिला खूप चित्रं काढायची आहेत. चित्रं काढल्याशिवाय चैन पडत नसल्याचं ती सांगते. ती तेवीस वर्षांची असावी. चित्रकलेत प्रगती करून जगात नाव कमवायचं तिचं स्वप्न आहे, तिच्याकडे बघून ते नक्कीच पूर्ण होईल याची खात्री वाटते.

रवींद्रनाथ टागोर यांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी चित्रं काढण्यास सुरुवात केली. जुधइयाबाईनं वयाच्या सत्तराव्या वर्षी चित्र काढायला प्रारंभ केला. कला शिकायला आणि जोपासायला वयाचं बंधन नसतं हेच खरं!

विशेष आभार

चित्रकार आशीष स्वामी, उमरिया, मध्य प्रदेश