३२ वर्षांपूर्वी केवळ २ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केलेल्या ‘बांधीलकी’कडे आज २७ सभासद व अनेक कार्यकर्ते आहेत. त्याच्या अथक प्रयत्नांमुळे २२०० आदिवासी मुलींच्या जीवनात शिक्षणाची पहाट उगवलीय. दारिद्रय़ात पिचलेल्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि उपासमारीच्या गर्तेत सापडलेल्या स्त्रियांना आत्मनिर्भर करणाऱ्या ८१ वर्षीय
स्मिता जोशी यांच्याविषयी..स्मि ता जोशी.. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत चारचौघींसारखी जगणारी एक स्त्री. तिचं बालपण दापोलीजवळील देगाव या खेडय़ात मध्यमवर्गीय परिस्थितीत
आपली वाट आपणच शोधायची हे पक्कंठरल्यावर तिने सव्वा वर्षांंच्या मुलीला आईकडे कोकणात ठेवून डी.एड. केलं. तेही डिस्टिंक्शनसह. या आधारावर तिला मुंबई महापालिकेच्या शाळेत नोकरी मिळाली. दम्यावर मात करण्यासाठी तिने नणंदेच्या सल्ल्याने योगाभ्यास सुरू केला. त्यात प्रावीण्य मिळवलं आणि स्वतंत्रपणे योगासनांचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हळूहळू दमा आटोक्यात आला. योगसाधनेमुळे आयुष्याला नवं वळण लागलं. हे सर्व व्याप सांभाळून, खेडेगावातून फायनल होऊन आलेल्या या मुलीने मानसशास्त्र विषय घेऊन बी. ए. पूर्ण केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागात व्याख्याती म्हणून तिची निवड झाली. ‘आरोग्य योगाभ्यास’ या विद्यापीठाने मान्य केलेल्या विषयाबरोबर व्रतवैकल्यं, नवा दृष्टिकोन, स्त्रियांपुढची आव्हानं, स्त्रियांचं वैयक्तिक स्वातंत्र्य.. अशा अनेक विषयांवर ती आपले विचार ठामपणे मांडू लागली. व्याख्यानांसाठी महाराष्ट्राच्या अंतर्भागात फिरताना दारिद्रय़ात पिचलेल्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि उपासमारीच्या गर्तेत सापडलेल्या स्त्रियांशी तिचा परिचय झाला आणि तिच्या जीवनाचं उद्दिष्ट तिला सापडलं. या स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचा तिने ध्यास घेतला आणि यातूनच उभी राहिली तिची ‘बांधीलकी’ ही संस्था. १५ ऑगस्ट १९८१ या दिवशी कोंदिवडे (ता. कर्जत, जिल्हा- रायगड) या गावात प्रभा देशमुख व प्रतिभा चितळे या दोन मैत्रिणींसह बालवाडी सुरू करून तिने बांधीलकीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील स्त्रिया व मुली यांच्या प्रगतीसाठी स्वत:ला अक्षरश: वाहून घेतलं.
गेली ३२ र्वष अविरत सुरू असलेल्या तिच्या या सेवायज्ञामुळे कोंदिवडे, सांगवी, खांडपे, सालपे, खरवंडी, मुंढय़ाची ठाकरवाडी.. या मागासलेल्या भागातील सर्व मुली आज शाळेत जातात. काही मुलींनी तर पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांपासून कर्जत, पालघर व दापोली भागातील २२०० मुलींना दत्तकपालक योजनेंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जातेय. स्त्रियांना भरतकाम, विणकाम याचं प्रशिक्षण दिलं जातंय, वस्तूंच्या विक्रीसाठी कार्यकर्त्यां सज्ज आहेत. वैद्यकीय शिबिराचं आयोजन आणि औषधी वनस्पतींची लागवड यामुळे इथल्या रहिवाशांचा जगण्याचा स्तर हळूहळू उंचावतोय. हा बदल घडवून आणणाऱ्या ८१ वर्षीय स्मिताताईच्या जीवनाचं ध्येय मात्र आजही तेच आहे. फरक इतकाच की, कर्जत परिसराची घडी काहीशी बसू लागल्याने आता त्यांनी दापोलीजवळील देगावमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल मुलींवर लक्ष केंद्रित केलंय.
ग्रामीण भागात बालपण गेल्याने तिथलं दारिद्रय़, दु:ख, अज्ञान, अंधश्रद्धा या गोष्टी स्मिताने अगदी जवळून पाहिल्या होत्या. अगदी तरुण वयात पाहिलेल्या एका प्रसंगाने तर तिच्या मनावर कायमचा ओरखडा उमटला. पावसाळ्यात भातशेतीत फेरफटका मारायची तिला प्रचंड आवड. एकदा ती अशीच एका शेताच्या बांधावर उभी होती. शेतमजूर बायका पेरणी करीत होत्या. तेवढय़ात एक बाई काम ठेवून आडोशाला गेली. बहुधा दोन जिवांची असावी. काही बायका तिच्या मदतीला गेल्या. थोडय़ा वेळाने त्या बायका परत येऊन कामाला लागल्या. स्मिताचं कुतूहल जागं झालं.. ती बाई कुठे गेलीय.. काय करतेय? ती त्या आडोशाकडे गेली. बघते तर ती बाई बाळंत झाली होती. तिने ते नवजात बालक एका फडक्यात बांधून ठेवलं आणि तासाभरातच ती कामावर हजर झाली. प्रश्न मजुरीचा होता. तिच्या रात्रीच्या मीठ-भाकरीचा होता. या प्रसंगाने स्मिता अंतर्बाह्य़ हादरून गेली. असं का.. या प्रश्नाचं उत्तर त्या वेळी तिच्याजवळ नव्हतं.
जे जे भेटे भूत, त्या त्या मानिजे भगवंत, हा वारसा स्मिता व तिच्या भावंडांना आपल्या वडिलांकडून- अण्णांकडून मिळाला. त्याबरोबर त्यांनी मुलांना आचारविचारांची नवी दृष्टीही दिली. पाटपाणी घेणं, पाणी भरणं, अंथरुणं घालणं ही कामं स्मिताचे भाऊ करीत असत. मुलींना पोहायचं, झाडावर चढायचं स्वातंत्र्य होतं. अण्णा म्हणत, ‘सणवार करा, पण आयुष्याचा मौल्यवान वेळ कर्मकांडात किंवा देव-देव करण्यात फुकट घालवू नका.’ त्यांचे हे शब्द स्मिताने कायम लक्षात ठेवलं. तिने तिचा देव माणसांमध्येच पाहिला.
वडिलार्जित जीवनमूल्यांचा ठेवा घेऊन स्मिताच्या धाकटय़ा भावाने- मुकुंद गोंधळेकर याने राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडी या गावी ग्रामसुधारणेचं काम हाती घेतलं. स्मिता व तिच्या मैत्रिणी त्याला मदत करण्यासाठी जात. राजमाची किल्ला उतरून खाली आलं की कर्जत तालुका सुरू होतो. वारंवार जाऊन त्यांचा तिकडच्या ग्रामस्थांशी परिचय झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की, कर्जतपासून अवघ्या १२ कि.मी.वर असलेली मुंढे, कोंढावणे, खरवंडी.. इ. गावं मूलभूत सुविधांपासून वंचित होती. स्मिता व तिच्या मैत्रिणींनी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी जाऊन या गावांमध्ये मुलींचं शिक्षण व जागृती यासाठी काम करायचं ठरवलं. त्यानुसार कोंदिवडे गावी पहिली बालवाडी सुरू झाली.
शाळेतील नोकरी, योगासनांचे वर्ग, व्याख्यानं आणि सुट्टीच्या दिवशी कर्जतला समाजकार्य अशा अनेक आघाडय़ांवर स्मिताची लढाई सुरू झाली. नवऱ्याची पोस्टातली नोकरी. त्यांनी बाहेर पडायला विरोध केला नाही, हेच त्यांचं सहकार्य.
बालवाडीत शिकण्यासाठी सुरुवातीला मुलांना घराघरांत जाऊन बोलवावं लागे. स्मिता दर रविवारी पहाटे साडेपाचची ट्रेन पकडून कर्जतला जाऊन तिथून बस पकडून पुढे २ कि.मी. चालत गावात पोहोचत असे. बालवाडीत येणाऱ्या मुलांच्या अंगावर धड कपडे नसायचे, त्याबरोबर नखं वाढलेली, नाक भरलेलं अशी अवस्था. त्यामुळे तिच्या रविवारच्या सामानाच्या पिशवीत खाऊबरोबर कंगवा, नेलकटर, टॉवेल, साबण या वस्तू हमखास असत. बालवाडीतून घरी जाणारी मुलं हसत-खेळत, स्वच्छ, नीटनेटकी होऊन जात. मुलं रविवारची वाट पाहू लागली..
या प्रतिसादामुळे बालवाडी रोज चालवावी असा विचार पुढे आला. शिक्षिका म्हणून गावातल्याच एकीला तयार केलं. मुलांचा खाऊ, खेळ व शिक्षिकेचं मानधन याच्या वर्षभराच्या अर्थसंकल्पाची तरतूद स्मिताला व्याख्यानातून आणि योगवर्गातून मिळणाऱ्या पैशांतून झाली. मुलांची प्रगती बघून पुढील २ वर्षांत इतर गावांत बालवाडी सुरू करताना शिक्षिकेची अडचण आली नाही. या शिक्षिकांकरिता कर्जतला १ महिन्याचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. आपण शिकवू शकतो त्याबरोबर चार पैसेही मिळवू शकतो ही तिथल्या स्त्रियांसाठी आत्मसन्मानाची गोष्ट होती. बांधीलकीची तीच तर अपेक्षा होती.
४ थी, ५ वीत शाळा सोडणाऱ्या मुलींचं प्रमाण या भागात ९९ टक्के होतं. कारण काय, तर आई मजुरीला गेल्यावर घर आणि लहान भावंडं सांभाळणं. यावर उपाय म्हणून स्मिताने बांधीलकीच्या कार्यक्षेत्रातील १० गावांत पाळणाघरं सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून समाजकल्याण खात्याकडे अर्ज केला. संस्थेतर्फे कोंदिवडे व खरवंडी येथे पाळणाघरं सुरू झाली. मुलांना सकस आहार मिळू लागला. अशा प्रकारे महिला व मुलं यांच्या जवळिकीतून बांधीलकी घराघरांत पोहोचली.
स्मिताचा जनसंपर्क दांडगा होता. तिने अनेक माणसं जोडली. त्यातलं एक नाव म्हणजे प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड. गेल्या ५ वर्षांपासून आपल्या प्रत्येक नवीन पुस्तकात चौकट टाकून त्या बांधीलकीच्या १००० आदिवासी मुलींना दरवर्षी दत्तक-पालक मिळवून देत आहेत.
१९८८ मध्ये कोंदिवडे गावात एक छोटं कार्यालय व एक निवासी खोली अशी संस्थेची वास्तू उभी राहिली. वाढत्या कामांसाठी आता पूर्ण वेळ देणं गरजेचं होतं. स्मिताताईंनी विचारपूर्वक स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडाची पै अन् पै ‘इदं न मम्’ म्हणत बांधीलकीला अर्पण केली. मु. पो. कोंदिवडे, ता. कर्जत, जिल्हा- रायगड हा त्यांचा पत्ता झाला. संस्थेला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. नव्या उत्साहाने नवे उपक्रम सुरू झाले.
कोंढावण्याच्या पुढचं मुंढा ठाकरवाडी हे गाव तर अत्यंत मागासलेलं. मुलं तर सगळीच खरजेनं भरलेली. स्मिताताई व त्यांच्या सहकारी डॉ. राजू चिले व डॉ. स्मिता सिनकर यांच्या मदतीने दर रविवारी मुलांना आंघोळ घालून खरजेवर औषध लावत. ही मोहीम वर्षभर चालवली तेव्हा कुठे खरूज आटोक्यात आली. इथल्या बायका तर लज्जारक्षणापुरतेही कपडे अंगावर नसल्यामुळे वैद्यकीय शिबिरात तपासून घ्यायला येत नसत. तेव्हा शिबिराआधी शहरातील महिला मंडळाकडून साडय़ा गोळा करणं हे प्रथम कर्तव्य असे. रस्त्यावर शौचाला बसणं ही त्या ठिकाणची एक प्रमुख समस्या. परसात आडोसा करून खड्डय़ाचं शौचकूप तयार केलं की सोनखतही मिळतं हा विचार पटवून देण्यासाठी स्मिताताईंनी जिवाचं रान केल्यामुळे आता या गोष्टीला बराच आळा बसलाय. स्वच्छता शिबिरासाठी आलेल्या कोंढावणे गावच्या एका बाईची प्रतिक्रिया या संदर्भात फार बोलकी आहे. ती म्हणाली, ‘जोशीबाईंना पाहून गाई-गुरंसुद्धा रस्त्यात हगायची थांबतील.’
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमांवर संस्थेने अधिक भर दिला. एकदा पावसाळ्यात कुंपणापाशीच्या गवतातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय म्हणून घाबरलेल्या बायकांना स्मिताताईंनी बाजूच्या झाडावर ओरडणारा कोकणकुंभा पक्षी (भारद्वाज) दाखवला. तो कसा आवाज काढतो याचं निरीक्षण करायला लावलं, तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली.
असं चौफेर काम सुरू असतानाच स्मिताताईंनी ‘आरोग्य, आहार आणि योगाभ्यास’, ‘मुलांसाठी योगाभ्यास’, ‘महिलांचा समान दर्जा’, ‘शिक्षण : मानसिक संपन्नता’ अशी चार पुस्तकं लिहिली. पथनाटय़ं तर किती लिहिली याची गणतीच नाही. आदर्श शिक्षक म्हणून मुंबई महापालिकेकडून (१९८४) व राष्ट्रपतींकडून (१९८६) मिळालेले २ पुरस्कार धरून पुरस्कारांची संख्या एकूण एकवीस.
३२ वर्षांपूर्वी केवळ २ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केलेल्या ‘बांधीलकी’कडे आज २७ सभासद व अनेक कार्यकर्ते आहेत. त्याच्या अथक प्रयत्नांमुळे २२०० आदिवासी मुलींच्या जीवनात शिक्षणाची पहाट उगवलीय. मुख्य म्हणजे स्मिताताईंची मुलगी वृषाली कान्हेरे व सून पद्मा जोशी या घरच्या शिलेदारांची भक्कम साथ लाभल्याने गेल्या ५/६ वर्षांपासून ताईंनी आपल्या मूळ गावातील म्हणजेच देगाव भागातील ८/१० खेडय़ांतून ‘बांधीलकी’चं काम सुरू केलंय.
किरकोळ चण, सडसडीत देहयष्टी, चमकदार डोळे आणि नसानसात भरलेला उत्साह अशा स्मिताताईंना पाहताना त्यांचं वय ८१ आहे हे खरंच वाटत नाही. ही त्याच्या आईची देणगी. ताईंच्या १०१ वर्षांच्या आई, इंदिराबाई गोंधळेकर आजही खाली बसून वेळेला ५ किलो कांदे चिरतात. ५/६ नारळ खवणतात, माडाची झापं सोलून त्याचे खराटे बनवतात आणि लेक गावातील मुलींची पथनाटय़ं बसवते, त्यातही डोकं घालतात. या मायलेकी दिवसाच्या २४ तासांत ७२ तास कसे बसवतात हे एक कोडंच आहे. चैतन्याच्या या झऱ्यांकडे पाहताना आपणही त्या प्रवाहात मिसळून जावं असं वाटतंय ना? त्यासाठी एवढंच करायचं.. एका आदिवासी मुलीच्या शिक्षणाचा खर्च वर्षभरासाठी करायचा.. कसा? ५०० रुपयांचा एक क्रॉस चेक (एका मुलीसाठी) ‘बांधीलकी’ या नावाने, चेकच्या मागे नाव, पत्ता, फोन नंबर लिहून पुढील पत्त्यावर पाठवायचा-
बांधीलकी, द्वारा- स्मिता जोशी, १७ रामचंद्र भुवन, गणेश गावडे रोड (क्रॉस सुभाष रोड), मुलुंड पश्चिम, मुंबई- ४०००८०. संपर्क- ९९३०३७५६०७.
माणसात पाहिला देव
३२ वर्षांपूर्वी केवळ २ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केलेल्या ‘बांधीलकी’कडे आज २७ सभासद व अनेक कार्यकर्ते आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-06-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandhilki god seen in human being