तुम्ही केवळ वयाने मोठे आहात म्हणून तुम्हाला सन्मानाची वागणूक सर्वानी द्यावी, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शिवाय केवळ वयामुळे तुम्हाला कोणावरही डाफरायचा आणि कोणाचाही पाणउतारा करायचा परवाना मिळाला आहे, असे समजू नका. त्यामुळे तुम्ही लोकांच्या मनातून उतरता. आदर आणि सन्मान ही मागून मिळवण्याची गोष्ट नाही तर तुमच्या वागणुकीमुळे तुम्हाला लोकांनी आपणहून देण्याची गोष्ट आहे हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हीच ठरवा, तुम्हाला कशा प्रकारची ज्येष्ठ व्यक्ती झालेले आवडेल. आदरणीय की तिरस्करणीय ?
त्या दिवशी मी बेस्ट बसने प्रवास करत होतो आणि मला एकाच प्रवासात दोन ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या स्वभावांचा अनुभव आला. आणि नंतर आठवले ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगात अनुभवलेले बरेच प्रसंग. जेष्ठांच्या तऱ्हेवाईकपणाचे, काही परिपक्वतेचे!
त्या दिवशीचा प्रसंग आधी सांगतो. बसमध्ये फार गर्दी नव्हती. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली एक सीट रिकामी होती. नंतरच्या एका थांब्यावर चढलेल्या एका तरुणाने बसमध्ये कोणीच ज्येष्ठ नागरिक उभ्याने प्रवास करत नसल्याची खात्री केली आणि त्या जागेवर बसला. दोन-तीन थांबे गेल्यावर एक ज्येष्ठ प्रवासी बसमध्ये चढला. तो मार्गिकेमधून सरकत त्या तरुणाच्या बाजूला येऊन उभा राहिला, त्याला उद्देशून म्हणाला ‘‘ऊठ ऊठ, या जागेवरून. ऊठ, तुला वाचता येत नाही? ही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहे ते?’’ तो तरुण लगेच ‘सॉरी’ म्हणून उठला आणि त्याला बसायला जागा करून दिली. पण त्या ज्येष्ठाचे त्याचे समाधान झाले नाही. तो त्या तरुणाला अत्यंत लागट शब्दांनी फैलावर घेत राहिला. तुला कळत नाही का? ही जागा जर ज्येष्ठांसाठी राखीव आहे ते. तू इथे बसलासच कसा? तुम्हा आजकालच्या तरुणांना शिस्त नाही. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेले नाहीत, वगरे वगरे. आणखी बरेच बडबडत राहिला. इतर प्रवासी त्याच्याकडे अत्यंत तिरस्कारयुक्त नजरेने पाहत राहिले. त्याची बाजू घ्यायची सोडाच सोडाच, पण तो वयोवृद्ध इतर प्रवाशांसाठी एक चेष्टेचा विषय ठरला. थोडक्यात त्याच्या वागणुकीमुळे तो इतरांना तिरस्करणीय ठरला, ज्येष्ठपणाचा सन्मान त्याच्या वागणुकीमुळे तो गमावून बसला.
काही थांबे गेल्यानंतर योगायोगाने अगदी तशीच परिस्थिती त्याच बसमध्ये निर्माण झाली. ज्येष्ठांसाठीच्या राखीव रिकाम्या जागी एक तरुण बसला होता. नंतर बसमध्ये चढलेले वयस्कर गृहस्थ त्याच्या जवळ येऊन उभे राहिले. त्या तरुणाकडे त्यांनी नुसतेच हसून पाहिले आणि चेहऱ्यावर असे भाव दाखवले की तो मुलगा लगेच ‘सॉरी’ म्हणून उठला. ते वयस्क गृहस्थ त्याला म्हणाले, ‘‘अरे सॉरी कशासाठी, तू काही मोठी चूक केलेली नाहीस. तू बराच लांब जाणार आहेस का? मीही शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार आहे. तुला दुसरी जागा नाही मिळाली तर आपण ही जागा आलटून पालटून शेअर करू. काय करणार गर्दीच्या वेळी आम्हालाही कधी तरी प्रवास करणे भाग पडतेच रे!’’ त्या ज्येष्ठ नागरिकांनी आमची सर्वाचीच मन जिंकून घेतली. त्याच्याबद्दल इतर प्रवाशांना आपोआप आदर वाटू लागला. या बसच्या प्रवासात मग मला असे अनेक प्रसंग आठवले..
मी एकाच्या घरी धार्मिक कार्यासाठी गेलो होतो. जेवण्याची पंगत बसली होती. यजमानांची नवविवाहित सून पंगतीत वाढायला आली. एका ज्येष्ठ मावशीबाईंच्या पानात ती उजव्या बाजूला चटणी वाढू लागताच त्या गरजल्या, ‘‘थांब, हिची आई आली आहे का? बोलवा तिला बाहेर.’’ तिची आईही आलेली होती. त्या एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करत होत्या, त्यांची मुलगीही खूप शिकलेली होती. त्या मावशींनी त्यांना दमात विचारले, ‘‘तुम्ही तुमच्या मुलीला काही रीत-भात शिकवली आहे की नाही? धड तिला जेवणाचे पान कसे वाढतात ते माहीत नाही. पानावर उजव्या बाजूला कोणते पदार्थ वाढायचे आणि कुठले पदार्थ डाव्या बाजूला वाढायचे हेदेखील तिला कळत नाही. काय करायच्यात त्या मोठमोठय़ा डिग्य््राा मिळवून!’’ सगळी पंगत एकदम स्तंभित झाली. सगळ्यांचा जेवणातला उत्साह निघून गेला. नवीन लग्न झालेली मुलगी खट्ट झाली. तिची आई कष्टी झाली आणि यजमानांना कशीबशी सारवासारव करून वेळ मारून न्यावी लागली. तो सगळा सोहळा गंभीर आणि कष्टी करण्यासाठी त्या ज्येष्ठ नागरिक – मावशी – कारणीभूत ठरल्या आणि इतर सर्वाच्या मनातून साफ उतरल्या.
असाच एक जेवणावळीचा प्रसंग मला आठवला. त्यात त्या वेळी पंगतीत बसलेल्या एका वृद्ध काकूंनी वाढायला आलेल्या मुलीला अगदी समजुतीच्या सुरात पानात चटणी कुठे वाढायची ते सांगितले आणि या वाढण्यासंबंधीची गम्मत तुला मी नंतर सांगेन म्हणाल्या. त्या मुलीने जेवणे झाल्यावर मुद्दाम येऊन त्यांना त्याची आठवण करून दिली आणि म्हणाली, ‘काकू, तुम्ही ती पानात कुठले पदार्थ कुठे वाढायचे त्याची गम्मत सांगणार होतात ना? ते सांगाना आम्हालाही ऐकायला आवडेल.’ मग त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने त्या पाठीमागचा शास्त्रीय उद्देश सांगितला. आणि म्हणाल्या, ‘‘अशा पंगती वैगरे वाढताना हे शक्य आहे गं. नोकरीत असताना आम्ही ऑफिसमध्ये डबे नेऊन उघडून खायचो. तेव्हा काय आम्ही उजवे डावे पाहून जेवत होतो? शक्य तिथे या गोष्टी पाळायच्या एवढेच.’’ त्या काकूंविषयी सगळ्यांना आदर वाटला हे सांगणे नकोच.
असाच एक प्रसंग एका विवाह सोहळ्यातलाच, काही ज्येष्ठ नागरिकांना आपल्या ज्येष्ठतेचा उपयोग एखाद्याचा भरसमारंभात सवार्ंसमोर पाणउतारा करण्यासाठी करावासा वाटतो. अगदी मामुली कारणासाठी संबंधितांना ते फैलावर घेतात आणि दुधात मिठाचा खडा टाकण्यात आनंद मानतात. असे एक ज्येष्ठ त्या लग्न सोहळ्यात आलेले होते. मुहूर्ताच्या वेळेला अगदी थोडाच अवधी होता. वधूपिता आल्या गेल्याचे स्वागत करण्यात, सगळ्यांची विचारपूस करण्यात व्यग्र होता. गर्दी खूप झाली होती आणि तो त्या गर्दीत शक्य तेवढय़ांना आनंदाने भेटत होता. एका आजोबांनी आवाज चढवला तेव्हा सगळे एकदम स्तब्ध झाले. कोणाला कळेना या म्हातारबाबांना एकदम काय झाले? त्यांनी तेथूनच त्या वधूपित्याला दरडावणीच्या सुरात जवळ बोलाविले, आणि हातातील आमंत्रणपत्रिका फडकावीत विचारते झाले, ‘‘या पत्रिकावर पत्ते कुणी लिहिले? त्याला माझ्यासमोर आणा. त्याला विचारायचंय, असलं मराठी तो कुठल्या शाळेत शिकला. साधे ऱ्हस्व-दीर्घाचे नियम त्याला माहीत नाहीत.’’ तो वधूपिता मनातून त्यांच्यावर संतापला होता, पण काय करणार? आजूबाजूच्या सर्वच लोकांच्या मनातून तो तिरसट म्हातारा उतरला. आणि आपल्या असल्या अनाठायी स्पष्टवक्तेपणामुळे त्याच्या बरोबर आलेली पत्नी, मुलगा आणि सूनही त्याच्यापासून हळूच दूर गर्दीत निघून गेली. पुढे समारंभात कोणीही त्याची दखल घेतली नाही की त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला नाही. तो गर्दीतही एकटा पडला.
एक प्रसंग माझ्यावरही आला. माझ्या नातवाच्या मुंजीत मीच निमंत्रणपत्रिकांवर पत्ते लिहिले. पण माझा खास मित्र मात्र मुंजीला आला नाही याचे मला मोठे नवल वाटले. मी काही दिवसांनी त्याच्याकडे गेलो आणि त्याला कारण विचारले. त्याने मला हळूच मीच पाठविलेली निमंत्रणपत्रिका दाखविली आणि म्हणाला, ‘‘गडबडीत तुझ्याकडून पत्ता लिहिण्यात अनवधानाने काही तरी चूक झाली असावी कारण मुंज झाल्यावर दोन दिवसांनी मला पत्रिका मिळाली. होते रे घाई घाईत असे कधी तरी. कार्य व्यवस्थित पार पडले ना! बस, तुझ्या नातवाला माझे आशीर्वाद जरूर सांग, आणि म्हणावे, संध्या वगरे नीट करत जा. चांगले संस्कार असतात रे ते.’’ नंतर तो माझा वयस्कर मित्र आमच्या घरी आला तेव्हा सर्वानी त्याचे अगत्याने स्वागत केले. आणि नातवांनी आठवणीने त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. आमच्या सर्वाच्याच मनात त्यांनी न मागताही सन्मानाचे स्थान मिळाले.
आणखी दोन ज्येष्ठ नागरिक असेच आमच्या कायम लक्षात राहिलेले. माझ्या मुलाच्या मित्राने मुंबईमध्ये उपनगरात लांब ठिकाणी ब्लॉक विकत घेतला. त्याने सर्वाना पूजेला आमंत्रित केले होते. मी आणि माझा मुलगा तेथे आवर्जून गेलो. मुलाच्या मित्राची बायको आणि तो मित्रसुद्धा अगदी यंत्रवत आल्यागेल्यांचे स्वागत करत होते. बायकोच्या चेहऱ्यावर ती कुठे तरी खूप दुखावली गेली आहे हे भाव स्पष्ट दिसत होते. खरे म्हणजे कोणालाही त्यांनी घेतलेल्या वस्तूची किंमत विचारू नये. पण मुंबईतील घर ही अशी एक गोष्ट आहे, आणि त्यांचे आकडे असे धडकी भरविणारे आहेत की नाही म्हटले तरी त्याची किंमत विचारल्याशिवाय राहवत नाही. मी मुलाच्या मित्राला हळूच तो प्रश्न विचारलाच, तो म्हणाला, ‘‘काका ते काही विचारू नका, कोरून कोरून पसे उभे केले. बाबांनीही थोडी मदत केली.’’ त्याचे वडील जोरात म्हणाले, ‘‘अहो यांच्यासाठी ती रक्कम थोडी हो, पण माझा बँक बॅलन्स साफ झाला. प प करून जमवलेला पसा जागेच्या बोडक्यावर घातला. आम्ही परत रिकामे ते रिकामे.’’ त्या मुलाची आई म्हणाली, ‘‘कशाला प्रत्येकाजवळ हे सांगत बसता, सगळ्यांना सगळे माहीत असते.’’ ते तिच्यावरही मुलाची आणि सुनेची बाजू घेते म्हणून उखडले. त्यांनी दिलेली गोड पक्वान्ने असलेली डिश आम्हाला खावावेना. त्या तरुणाचे कौतुक करून त्याला नवीन घरातील वास्तव्याला शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर पडलो.
मला दोन वर्षांपूर्वीचा असाच एक प्रसंग आठवला. माझ्या ऑफिसमधल्या मित्राच्या घरी मी काही कामानिमित्त मी गेलो होतो. तो सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुलासोबत राहत होता. नवीन जागेवरून, मुंबईतील जागांच्या किमतीवरून विषय निघाला. तो मला म्हणाला, ‘‘अरे मुलाचे लग्न झाल्यावर मला जाणवत होते की आमची जागा लहान पडते आहे. आम्ही दोन खोल्यांत संसार कसाबसा रेटला. ते दिवस आठवले तरी आमची दोघांची घुसमट कशी होत होती ते आठवणे नको वाटते. आता मुलालाही चांगली नोकरी आहे. आमची सूनही बँकेत नोकरी करते. मीच त्यांना म्हटले आपण कुठे तरी उपनगरात थोडी मोठी जागा बघू. कर्जासाठी प्रयत्न करू, थोडेफार काही कमी-जास्त लागले तर मी मदत करतो. आणि आमच्या प्रयत्नांना यश आले. आणि मुंबईत आमची मालकीची जागा झाली.’’ तेवढय़ात त्याची सून चहा घेऊन पुढे आली. ती स्वत:हून म्हणाली, ‘‘बाबांनी त्या वेळी जोर लावला म्हणून ही आमची जागा झाली हो. त्यांची रक्कम थोडीच होती पण आम्हाला त्या वेळी मात्र ती अक्षरश: डोंगराएवढी होती.’’ मित्राची बायको म्हणाली, ‘‘अहो मदत काही दुसऱ्याला केली का आम्ही? आमच्या मुलाच्या सुखासाठीच केली ना! सगळेच आईवडील ते करतात.’’ ते सर्वच कुटुंबीय तणावमुक्त आनंदी जीवन जगत होते याची स्पष्ट जाणीव तेथे होत होती.
माझ्या ज्येष्ठ मित्रांना मला सांगावेसे वाटते. तुम्ही केवळ वयाने मोठे आहात म्हणून तुम्हाला सन्मानाची वागणूक सर्वानी द्यावी, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शिवाय केवळ वयामुळे तुम्हाला कोणावरही डाफरायचा आणि कोणाचाही पाणउतारा करायचा परवाना मिळाला आहे, असे समजू नका. त्यामुळे तुम्ही लोकांच्या मनातून उतरता. आदर आणि सन्मान ही मागून मिळवण्याची गोष्ट नाही तर तुमच्या वागणुकीमुळे तुम्हाला लोकांनी आपणहून देण्याची गोष्ट आहे हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हीच ठरवा, तुम्हाला कशा प्रकारची ज्येष्ठ व्यक्ती झालेले आवडेल. आदरणीय की तिरस्करणीय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा