‘जीवनाच्या त्या वळणावर काहीही न बोलता, न सांगता, भाषणबाजी न करता फक्त कृतीतून माझ्या मैत्रिणीने माझा स्वत:विषयीचा विश्वास जागवला होता. मैत्रीचं एक सुंदर रूप माझ्यासमोर उमलून आलं!..
माझी आणि तिची मैत्री, ऑफिसमधली! खरं तर दोघी सर्व बाबतीत भिन्न! ती माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान. नुकतीच २-३ वर्षांपूर्वी बँकेत लागलेली. हसरी, बडबडी, चंचल, सडेतोड, बिनधास्त! नवीन पिढी ची प्रतिनिधी.
मी बँकेत १०-१५ वर्षे नोकरी केलेली. घर, ऑफिस सर्वत्र स्थिरावलेली आणि व्यवहारी. कॉलेजमधले भावुक हळवेपण मागे पडलेली, घडणाऱ्या गोष्टीकडे त्रयस्थ नजरेने बघू शकणारी. विचारी, सल्ला देणारी. ती मात्र लग्नही न झालेली अननुभवी नवथर, चंचल तरुणी! दोघींच्या आजच्या स्थितीत तसं बघायला गेलो तर फार तफावत. एक झगमगतं चैतन्य! तर एक समईची ज्योत! पण बहुतेक त्यामुळेच एकमेकींची ओढ वाटू लागली. आपल्यापेक्षा सर्वस्वी वेगळी असणारी. व्यक्तिमत्त्व एकमेकींना खुणावू लागली. एकमेकींना आजमावत हळूहळू जाणवायला लागली. एकमेकींची काळजी घेतली जाऊ लागली. डब्यातला आवडता पदार्थ एकमेकींसाठी आवर्जून राखला जाऊ लागला. ती आपली तरुणांचे छोटे छोटे प्रश्न मला सांगू लागली. मी मोठेपणाने विचारी व्हायचा सल्ला देऊ लागली. मला वाटतं, मी १०-१२ वर्षांपूर्वीच्या ‘मला’ तिच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करत होते आणि ती काही वर्षांनंतर आपण शांत, संयमी कसं व्हायचं नि माझ्यासारखं कसं व्हायचं याचा विचार करत असावी. हळूहळू मैत्रीची वीण पक्की होत होती.
दरम्यान, आमच्या शाखेतून तिची बदली झाली. ती हमसून हमसून रडली. मी तिला समजावलं. ती दूर गेली तरी पत्राद्वारे फोनवरून आमची मैत्री चालूच होती. नंतर तिचं लग्न झालं. नव्या नवलाईत तीही गुरफटली. तरी बारीकसारीक गोष्टीसाठी फोन करायची. मला सांगून कधी लाजायची, कधी रुसायची, तर कधी रडायची. तिच्या प्रत्येक भावनेची मी पहिली साक्षीदार. कधी-कधी माझ्याकडून फोन करणं व्हायचं नाही, पण ती भक्तिभावाने मला फोन करायची, कविता पाठवायची. माझ्याशी बोलून तिला खूप हलकं वाटायचं. मलाही तिच्या प्रत्येक क्षणांत तिच्या बरोबर जगायला मजा यायची.
होता होता माझी चाळिशी कधी उलटली कळलं नाही. अचानक एकाकीपण दाटून आलं. खूप निराश वाटायचं. कंटाळा यायचा. मुलं मोठी झालेली, नवरा आपल्या विश्वात दंग. घरी आलं की एकटं एकटं वाटायचं. मनात नको नको ते विचार यायचे. वाटायचं आपण कुणालाच नको आहोत. रडू यायचं. बरं हे कुणाला सांगून न समजण्यासारखं. पण माझ्या बोलण्यावरून तिला ते समजलं, उमजलं. मी स्वत:वरचा विश्वास गमावून बसले होते. तिने मला काही जाणवू दिले नाही. अचानक एक दिवस मला म्हणाली, ‘मी स्कूटर शिकतेय’- मग रोज फोनवरून त्या शिकण्याचे वर्णन. पहिल्या दिवशी अंग दुखणे, दुसऱ्या दिवशी थकणे, तिसऱ्या दिवशी पाय घसरत चालवणे, चौथ्या दिवशी पडणे, पाचव्या दिवशी पायावर घेऊन तोल साधून स्कूटर कशी चालवली आणि तिला काय काय वाटलं याचं इतकं छान वर्णन केलं की मीच वाऱ्यावर फिरू लागले. मग एके दिवशी मला सहज विचारलं ‘तुला शिकायची आहे स्कूटर? इथे एक बाई शिकवते! खूप आत्मविश्वास येतो, केवढी जिद्द येते, काहीतरी केल्यासारखे वाटते, जग जिंकल्यासारखं वाटतं. किती मोठय़ा बायका शिकतात. मी त्या शिकवणाऱ्या बाईंकडे तुझ्यासाठी सांगून ठेवले, तू फक्त लर्निग लायसन्स काढ.’’ वगैरे वगैरे. आधी नकोच म्हणणारी मी शेवटी कसं माहिती नाही, पण तयार झाले. मनात फारच धाकधूक होत होती. स्कूटरच्या मागच्याही सीटवर बसायला घाबरणारी मी, पहिल्या दिवशी चावी फिरवून जेव्हा स्कूटर स्टार्ट केली तेव्हा वाटलं पळून जावे, आपल्याला काही जमायचं नाही. पण शिकवणाऱ्या बाईंनी भरपूर विश्वास दिला आणि चार-पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर मी स्वत: एकटीने पाय वर घेऊन तोल साधून जेव्हा पहिल्यांदा स्कूटर चालवली तेव्हा माझा माझ्यावरच विश्वास बसेना. मैत्रीण दररोज माझी प्रगती विचारत होती. मला चिअर अप करत होती. माझ्या प्रत्येक क्षणांचा आनंद मी तिच्याबरोबर शेअर करत होते, ती मला शब्दाशब्दांनी प्रोत्साहन देत होती.
नंतर मला अचानक जाणवलं, ‘आपण अगदीच काही टाकाऊ झालेल्या नाही आहोत. या वयातही आपण, आतापर्यंत कधीही न केलेली गोष्ट शिकू शकतो!’ माझी मरगळ, उदासी, कंटाळा, एकाकीपण अचानक दूर झालं. आत्मविश्वास जागृत झाला. जीवन जगण्याची एक नवीन आशा फुलून आली.
जीवनाच्या या वळणावर काहीही न बोलता, न सांगता, भाषणबाजी न करता फक्त कृतीतून माझ्या मैत्रिणीने माझा स्वत:विषयीचा विश्वास जागवला होता. मैत्रीचं एक सुंदर रूप माझ्यासमोर उमलून आलं..
आजचा अंक मैत्रीदिन विशेषांक असल्याने नियमित प्रसिद्ध होणारी काही सदरे अंकात प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.
तिची-माझी मैत्री
‘जीवनाच्या त्या वळणावर काहीही न बोलता, न सांगता, भाषणबाजी न करता फक्त कृतीतून माझ्या मैत्रिणीने माझा स्वत:विषयीचा विश्वास जागवला होता. मैत्रीचं एक सुंदर रूप माझ्यासमोर उमलून आलं!..
आणखी वाचा
First published on: 02-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful face of friendship