पण आज आरशाचं गुपित, प्रियकराची नजर असल्या भानगडींच्या पलीकडं अनेकजण पोहोचले आहेत. स्वत:ला कायम आकर्षक ठेवायचं, तरुण ठेवायचं, शरीराचा डौल कायम ठेवायचा आहे तर सरळ सर्जरी करून मोकळं व्हायचं.. हा सोपा (?) पण खर्चीक उपाय सर्वमान्य झालाय.. पण तो जिवावरही बेतू शकतो.. हे नुकतंच घडलंय कॅथरीन कॅन्डो या सौंदर्यवतीच्या बाबतीत. इक्वादोरमधली १९ वर्षीय कॅथरीन गेल्या वर्षअखेरीस झालेल्या सौंदर्यस्पर्धेतली विजेती होती. क्वीन ऑफ डय़ुरान खिताब तिला मिळाला आणि त्याबरोबर तिला मिळाली एक कार, टॅब आणि ब्युटी ट्रीटमेंटचं फ्री पॅकेज. तेच फ्री लायपोसक्शन (शरीरातील चरबी वितळवणे वा काढून टाकणे) करायला गेलेल्या कॅथरीनला हृदयविकाराचा झटका येऊन ती शस्त्रक्रियेनंतर वारली आणि एका सौंदर्यस्वप्नांची राख झाली. तिच्या आधी ब्राझीलची टीव्ही मॉडेल पमेला नासिमेन्टो या २७ वर्षीय तरुणींचाही असाच करुण अंत झाला तोही सर्जरीच्या टेबलवरच. सर्जनला अटक केली गेली आहे. पण सौंदर्याच्या अतिहव्यासापोटी हे होतंय का? कारण पमेलाची पोट सपाट करण्याची ही म्हणे तिसरी शस्त्रक्रिया होती.
आधुनिक विज्ञानाची कास धरून विकसित झालेल्या सौंदर्यक्षेत्रातल्या या तंत्रज्ञानानं, कॉस्मेटिक वा अॅस्थेटीक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, लायपोसक्शन, लेझर ट्रिटमेंटने म्हणता म्हणता चिरतरुण राहणं शक्य केलं. जन्मजात व्यंग काढून टाकणं या शस्त्रक्रियांनी शक्य आहे, हे या संशोधनाचे उपकारच आहेत. मात्र त्याही पलीकडे केसांचं पुनरेपण, सुरकुत्या काढणं, गालाची ठेवण, नाकाचा आकार बदलणं.. (मायकल जॅक्सन पूर्वीचा आणि नंतरचा आठवून पाहिलं तरी हा फरक लक्षात येईल.) या गोष्टी सहज होऊ लागल्या. अर्थात काही हजार किंवा लाखो रुपये खर्च करू शकणारेच असे ‘सुंदर’ दिसू शकतात. परंतु आज जगभरातला हा मोठा ‘बिझनेस’ झाला आहे.
जगभरातल्या अशा कॉस्मेटिक सर्जरीज होण्याच्या आकडय़ांत वर्षोगणिक करोडोंनी वाढ होते आहे. आणि त्यामुळे त्यातल्या अर्थकारणातही! एकटय़ा अमेरिकेतच गेल्या वर्षी १२ अब्ज डॉलर्सचा बिझिनेस झालाय. आणि गमतीचा भाग म्हणजे तिथे अशा शस्त्रक्रिया करणाऱ्यांत ४३ टक्के पुरुष आहेत, आता बोला! म्हणजे हे वेड स्त्रियांपुरतं मर्यादित न राहता आता पुरुषांनाही त्याने आपल्या पकडीत घेतलेलं दिसतंय.
आणि भारताच्या बाबतीत बोलायचं तर जगभरातल्या पहिल्या दहा कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्या देशांमध्ये आपला क्रमांक दहावा आहे, पण अर्थातच थायलंड, तैवान नंतर!
सुंदर, डौलदार दिसायच्या नादात कॅथरिन, पमेलाचं आयुष्य खर्ची पडलं, तशी रिस्क आहेच, थोडे-अधिक दुष्परिणामही आहेत, पण ती जोखीम पत्करून चिरतरुण राहू शकण्याची सोय झालीय..
वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, ययातिच्या काळात अशा शस्त्रक्रिया असत्या तर निदान पुरुलाही आपलं तारुण्य योग्यवेळी उपभोगता आलं असतं! ..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा