भगवद्गीता हे पुस्तक नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, स्वधर्माची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. आयुष्यात अनेक समर प्रसंगांना तोंड देताना आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस अर्जुनाप्रमाणे गलितगात्र होतो. नैराश्य दाटून येते. कुठे तरी पळून जावेसे वाटते. आपला हा विषाद रोगात किंवा भोगात परिवíतत होतो पण अर्जुनाला मात्र त्याच्या स्वत:च्या मर्यादांची जाणीव असली, तरी कृष्णावर विश्वास होता. अहंकार बाजूला ठेवून कृष्ण काय सांगतो आहे ते ऐकून घेण्याची, शरण जाण्याची मनापासून तयारी होती. म्हणूनच त्याच्या विषादाचे परिवर्तन ‘योगा’त होऊन जीवनाचे चिरंतर, शाश्वत तत्त्वज्ञान जन्मास आले. आपल्याही काळज्या, चिंता यांकडे जरा वेगळया दृष्टीने पाहायचा प्रयत्न करू या. आपल्याला कृष्ण भेटतो का ते पाहू या.
पर्वतासन
आज आपण पर्वतासनाचा सराव करू या. बैठक स्थितीतील वज्रासनातून या आसनाकडे वाटचाल करू या. वज्रासनात दोन्ही हात पायांच्या पुढे जमिनीवर एकमेकाला समांतर ठेवा. आता सीटचा भाग दोन्ही पावलांवरून वर उचला.(ही स्थिती मार्जारासन पूर्वस्थितीप्रमाणे होईल.) आता दोन्ही पावले चवडय़ांवर उचलून हळूहळू अशा रीतीने पुढे आणा की, पाठकण्याचा व सीटचा भाग वर उचलला जाईल. दोन्ही पावलांचे तळवे जमिनीला टेकलेले असतील. डोक्याचा टाळूचा भाग दोन्ही हातांच्या मध्ये जमिनीपर्यंत येईल. पायांच्या पश्चिम भागावर बऱ्यापैकी ताण जाणवेल. आसनाच्या अंतिम स्थितीमधे दोन्ही हात व पाय अनुक्रमे कोपरात व गुडघ्यात सरळ असतील. जमेल तितके डोके गुडघ्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नको. अंतिम स्थितीत लक्ष श्वासांवर एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. या आसनाच्या सरावाने हाता-पायांतील स्नायू, पाठकणा यांचे आरोग्य सुधारते. मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो. काही त्रास असल्यास देखरेखीखाली सराव करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खा आनंदाने! : घोटभर चहा!
 वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ  vaidehiamogh@gmail.com
पाऊस म्हटला की गरम गरम भजी आणि फक्कड चहा हे समीकरण वर्षांनुवर्षे ठरलेलंच! आजी-आजोबांना सोसत नाही म्हणून भजीविषयी लिहिण्यापेक्षा मी ठरवलं की चहा स्पेशल लेख लिहू या. निमित्त अमोघने दिलेला ‘तुलसी टी’! गरम पाण्यात तुळशीची पाने, लिंबू आणि गूळ घालून केलेला खरा म्हणजे काढाच! पण चव अप्रतिम. वय झाल्यानंतर ह्या ना त्या कारणाने साखर किंवा दूध किंवा चहा पावडरच वापरायची नाही असं फर्मान निघालं तर होते ना पंचाईत? बरं चहा तर सोडवत नाही मग पर्याय काय? भरपूर आहेत –
एनर्जी चहा  
साहित्य- आले – १/२ तुकडा , दालचिनी – छोटा तुकडा, वेलची- २/ ४ , मिरपूड- १/४ चमचा, लवंग- १/२, केशर- थोडे, पाणी-४  कप.
कृती- सर्व साहित्य उकळत्या पाण्यामध्ये घाला आणि २ कप पाणी उरेपर्यंत उकळा म्हणजे पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. वरून केशर घालावे. चवीसाठी मध व गाईचे दूध घातले तरी चालेल.  
गवती चहा
१/२ कप लिंबाचं गवत, बारीक चिरून, १/२ कप पुदीना पाने, बारीक चिरून, गूळ चवीनुसार
कृती- एका पॅनमध्ये ५ कप पाणी घेऊन वरील साहित्य घाला. तीन कप पाणी होईपर्यंत उकळा.
स्वत:च तयार करा, तुमचा स्पेशल चहा फ्लेवर :
खाली पदार्थ व त्याचा वापर चहामध्ये कशासाठी होऊ शकतो, याची माहिती दिली आहे. तिचा वापर करून तुम्हाला हवा तसा चहा बनवा.
१. लिंबू- रिफ्रेशिंगसाठी  (लिंबूचे साल, आले, दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंगा)     
२. दालचिनी- उत्तेजक. (दालचिनी, सुंठ, वेलची, काळी मिरी, लवंगा).
३. पुदीना चहा- थंड. (पुदीना पाने).
४. चहा- वातनाशक (ज्येष्ठमध, आले, बडीशेप, दालचिनी, धणे, जिरेपूड, मेथी दाणे ).
५. चहा -पाचक. (ज्येष्ठमध, ओवा, गुलाब पाकळ्या, दालचिनी, धणे, आले).
६. चहा-  कफ नाशक (ज्येष्ठमध, आले, लिंबू गवत, दालचिनी, काळी मिरी, लवंगा, हळद, जायफळ.)छंदातून अर्थार्जनही!
विलास समेळ
निवृत्ती म्हटलं की, नोकरी-व्यवसायातील कामातून रजा घेणे, असाच समज असतो, पण मी मात्र एकदम आगळीवेगळी निवृत्ती सध्या अनुभवतो आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून मी निवृत्त झालोय. अर्धशतकाहून अधिक काळ प्रसिद्ध असलेलं लोकांचं विश्वासपात्र दुकान आणि वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय मी बंद केला आहे. अर्थातच रोज १६ ते १८ तास काम करणारा मी यापुढे काय करणार, हा प्रश्न माझ्यासह सर्वानाच पडला होता. माझा निर्णय धाडसी अन् धक्कादायकच होता.
 दुकानाचा व्याप सांभाळत असतानाच मी काही सुंदर छंद जोपासले होते. त्यात वाचन, लेखन, कविता करणं, कात्रणं जमविणं आणि दैवी देणगी लाभलेलं माझं सुंदर हस्ताक्षर यांचा समावेश होता. ‘आवड असली की, सवड नक्की मिळते’ या उक्तीनुसार मी या सर्वासाठी वेळ काढतच होतो.
निवृत्तीनंतर नातवंडांत रमताना माझ्या या छंदाकडे मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि त्याला प्रतिसादही सुंदर मिळाला. मुख्य म्हणजे या सर्व गोष्टींची दखल घेणाऱ्या शहरात-नवी मुंबईत मी वास्तव्यास आलो. निरनिराळी काव्यसंमेलनं-काव्यस्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहून प्रशस्तिपत्रकं तर मिळविलीच पण चांगले मित्रही जोडले. गुणांची कदर झाली. उत्साह वाढला. आज दिवस कसा संपतो हे कळतही नाही. आवडीच्या छंदामुळे मिळणारा आनंद वेगळाच असतो ना!
सध्या हस्ताक्षर, कॅलिग्राफी, कवितांबरोबरच ‘पोस्टकार्डावर विविध लेखन’असं प्रदर्शन भरवितो. नुकताच एक नवीन उपक्रम चालू केलाय. ‘पेपर बॅग्जवर सुलेखन!’ ज्याला जे हवं ते सुंदर हस्ताक्षरात लिहून द्यायचं. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे वेळ आणि अर्थार्जन दोन्हीचा मेळ घालणं जमतं आहे. नवीन युगामध्ये वावरताना संगणक महत्त्वाचा! गंमत म्हणजे वयाच्या साठीनंतर मी ‘एमएस-सीआयटी’चा कोर्स करून त्यातही आपण मागे नाही हे दाखवलं.
गेली आठ-दहा र्वष मी मधुमेहाचा रुग्ण असूनही अक्षरश: तो एन्जॉय करतोय. माफक गरजा, साधी राहणी, योग्य आहार आणि आनंदी मन अशा चारसूत्री वागण्यामुळे ‘निवृत्तीचा हा काळ सुखाचा’ होत असल्याचं समाधान आहे ते वेगळंच. नुकतीच सहजीवनाची सदतीस र्वष पूर्ण करून मुलं-सुना-नातवंडं यांच्यात मस्त रमलो आहे, अगदी मनापासून!
    
कायदेकानू : अंतरिम पोटगीचा हक्क
प्रीतेश सी. देशपांडे  -pritesh388@gmail.com
मागील भागात (१९ जुलै) आपण पोटगीच्या अर्जासंदर्भात माहिती घेतली. पोटगीचा अर्ज दाखल केल्यापासून त्याचा निकाल लागेपर्यंत पालकांस वा ज्येष्ठ नागरिकांस अंतरिम पोटगी मिळत राहते. या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ अंतर्गत दाखल केलेला पोटगीचा अर्ज हा ९० दिवसांमध्ये निकाली काढणे गरजेचे आहे. हा कालावधी काही अपवादात्मक परिस्थितीत एका वेळेस ३० दिवसांनी वाढविण्याचा अधिकार न्यायाधिकरणास आहे.
या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे पोटगीचा अर्ज दाखल केल्यानंतर गैरअर्जदार असणाऱ्या एखाद्या पाल्याचा मृत्यू झाल्यास इतर जीवित पाल्यांची पालकांप्रती अथवा ज्येष्ठ नागरिकांप्रती असणारी जबाबदारी सुरूच राहते. पाल्यांनी पोटगीची रक्कम न भरल्यास भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ च्या वसुलीसाठी ज्याप्रमाणे वॉरंटची तरतूद आपण पाहिली, त्या तरतुदी या कायद्यातही लागू आहेत.
या कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार व गैरअर्जदार यांना समुपदेशकाकडे पाठविण्यात येते. ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पाल्यामध्ये कटुता निर्माण न होता व परस्पर सामंजस्याने उभयतांमधील मतभेद मिटविण्याकरिता समुपदेशकांची मदत होते. ज्येष्ठ नागरिक व पाल्यांमधील समुपदेशनाचा व त्यातून आलेल्या निष्कर्षांचा अहवाल समुपदेशकास ३० दिवसांच्या आत सादर करणे गरजेचे आहे.
भारतीय फौजदारी संहिता कलम १२५च्या अर्जावरील सुनावणीदरम्यानची न्यायिक प्रक्रिया या कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाच्या सुनावणीस बहुतांशी स्वरूपात लागू आहे. या कायद्यान्वये ज्येष्ठ नागरिकांस पालकांस रक्कम १०,००० रुपयांपर्यंतची पोटगी मिळू शकते.

आनंदाची निवृत्ती – ८६ व्या वर्षीही कार्यप्रवण!
लक्ष्मण वाघ
अठ्ठावीस वर्षांपूर्वी साहाय्यक पोस्टमास्तर म्हणून पुण्याच्या सिटी पोस्टातून वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालो. आज वयाच्या ८६ व्या वर्षीही कार्यरत आणि कार्यमग्न आहे. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ तत्कालीन केंद्रीय दळणवळणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली माझा निरोप समारंभ झाला. निरोप समारंभामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी भाषणामधून इच्छा व्यक्त केली की मी निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता पोस्टातील कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी जमीन शोधण्याचा प्रयत्न करावा.
१९५९-६० साली कार्ल मार्क्‍स वाचला. रशियन क्रांती, चिनी क्रांती वाचली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रं वाचली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्टय़ा वैचारिक प्रगल्भता येत गेली, विचारात भिनत गेली.
निवृत्तीनंतर कामगारांसाठी काही तरी विधायक भरीव स्वरूपाचं कार्य करावं म्हणून १९८६ साली कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे तीन एकर जमीन गृहनिर्माण सोसायटीसाठी खरेदी केली. चतुर्थश्रेणी कामगार, पोस्टमन, कारकून, साहाय्यक पोस्ट मास्तरसह सर्वाना सभासद करून रजिस्टर्ड सहकारी सोसायटी स्थापन केली. आजूबाजूला अनेक उत्तुंग इमारतींचं बांधकाम चालू असल्याने या जागेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.
निवृत्तीच्या वेळी मिळालेली रक्कम आणि बचत केलेली रक्कम खूप मोठी वाटते. प्रस्तुत रक्कम सुरक्षित ठिकाणी मासिक व्याज मिळेल, अशी गुंतविल्यास आपली मूळ शिल्लक रक्कम तशीच राहते आणि दर महिन्याला व्याजातून आपली शिल्लक रक्कम प्रतिमहिना वाढते याचा प्रत्यय येतो. खर्च कमी आणि आर्थिक आवक जास्त असल्याने मनामध्ये उत्साह निर्माण होतो.
 जनतेच्या सार्वजनिक गाऱ्हाण्यांना प्रसिद्धी देण्यासाठी मी आज ८६व्या वर्षीसुद्धा वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात लिहीत असतो. आजपर्यंत  माझी सुमारे १५० ते २०० पत्रं आणि २५ ते ३० लेख विविध वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेले आहेत.
मी इच्छापत्र तयार करून ठेवलं आहे. मृत्यूनंतर माझं नेत्रदान आणि देहदान करावं असं लिहून ठेवलं आहे. कुठलेही धार्मिक विधी करू नयेत. श्राद्ध घालू नये, असा सल्ला घरातील मंडळींना देऊन ठेवला आहे. एकूण मी माझं आयुष्य अगदी छान जगत आहे.