योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Gadkari question is why caste is considered in elections
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

‘‘काही वेळा एखाद्या प्रश्नाचं ‘योग्य उत्तर’ हे त्या प्रश्नाचं ‘सर्वोत्तम उत्तर’ असतंच असं नाही. आजच्या दिवसाचा मुख्य प्रश्न काय होता? इंटरकॉलेज बॅडिमटन चॅम्पियनशिप कोण जिंकणार?’’ बाबांनी त्याला विचारलं.

तो चटकन म्हणाला. ‘‘मी जिंकणार.’’ ‘‘मग ते उत्तर जर तुला आज मिळालं असतं तर काय झालं असतं?’’ बाबांच्या या प्रश्नाचा रोख त्याला समजला. खरोखरच तो विचार करण्यासारखा मुद्दा होता.. पुढच्या यशासाठी अपयशाला भिडावं लागतं हे सांगणारा..

रात्रीचे नऊ वाजत आले होते.. फ्लॅट क्रमांक १०३ मधलं वातावरण क्षणाक्षणाला गंभीर होत होतं.. संध्याकाळपासून बरेच लोक घरी येऊन गेले होते.. त्याचे कॉलेजमधले मित्र-मत्रिणी, काही शिक्षक आणि काही नातेवाईकही.. बिल्डिंगमधले लोकही अधूनमधून डोकावून जात होतेच.. पण त्याचाच पत्ता नव्हता.. दुपारी चारच्या दरम्यान त्याला घाईघाईनं बिल्डिंगमधून बाहेर पडताना कोणी तरी पाहिलं होतं.. त्याची टू-व्हीलरही पार्किंगमध्येच होती. शिवाय त्याचा फोनही घरात चार्जिंग पॉइंटलाच असल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्याचं कोणतंही साधन नव्हतं. त्याच्या तीन-चार नेहमीच्या मित्रांना फोन करून झाले होते, पण कोणालाही त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. आता त्याची वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता..

खरं तर त्याला रोज घरी यायला साडेनऊ तरी व्हायचेच आणि मग सगळे मिळून जेवायला बसायचे. पण मुळात आजचा दिवसच वेगळा होता. त्या दिवशी सकाळी त्याची ‘इंटरकॉलेज बॅडिमटन चॅम्पियनशिप’ची फायनल मॅच होती. गेले वर्षभर या दिवसाची तो आतुरतेने वाट बघत होता आणि त्यासाठी कसून तयारीही करत होता. त्या मॅचचं बऱ्यापैकी महत्त्व होतं. वृत्तपत्रांतही त्या मॅचबद्दल छापून आलं होतं. ही मॅच बघण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी आज ऑफिसमधून खास सुट्टी काढली होती. स्पोर्ट्स इव्हेंट्सना हटकून गायब असणारे त्याच्या कॉलेजचे प्राचार्यही मॅच पाहायला आले होते. तर मित्रमैत्रिणींनीही बरीच गर्दी केली होती. शिवाय दोन महिन्यांनी बंगळूरुमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो भाग घेणार होता. त्यासाठीही ‘चॅम्पियनशिप’ हा मोठा ‘बुस्टर’ ठरणार होती.

अपेक्षेप्रमाणे मॅच तुफान झाली. एखाद्या स्पर्धेची फायनल मॅच जशी होणं अपेक्षित असतं अगदी तशी. दोन्ही खेळाडू एकमेकांना तुल्यबळ होते. दोघांनी एक-एक गेम जिंकला आणि मॅच तिसऱ्या निर्णायक गेममध्ये गेली. दोघांच्याही नावांनी जोरदार ‘चियरिंग’ सुरू होतं आणि फक्त एका पॉइंटच्या फरकाने गेम पुढे-मागे होत होता. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.. मात्र एका निर्णायक क्षणी मॅचच्या अम्पायरने दोन वादग्रस्त निर्णय दिले आणि मॅच फिरली. हातातोंडाशी आलेली मॅच गेल्यामुळे तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. मॅचनंतर तो कोणाशीच फारसं काही बोलला नाही.

त्याला मिळालेली रनर-अपची ट्रॉफी आता हॉलमधल्या त्याच्या ट्रॉफीजच्या कपाटात मधोमध ठेवलेली होती. भेटायला येणारा प्रत्येक जण ती ट्रॉफी कौतुकाने बघून जात होता. पण त्याचा अजूनही पत्ता नव्हता. सव्वानऊ वाजले. भेटायला आलेले लोक कंटाळून निघून गेले होते. आता त्याचे आई-बाबा आणि शेजारचे काका-काकू इतकेच हॉलमध्ये होते. बराच वेळ कोणीच एकमेकांशी काही बोललं नाही. बहुतेक ती भयाण शांतता असह्य़ होऊन आई म्हणाली, ‘‘माझा दुपारी पंधरा मिनिटांसाठी डोळा लागला आणि तेवढय़ात तो बाहेर पडला.’’

‘‘आज सुट्टी घेतली होती त्यामुळे बँकेचं एक काम करण्यासाठी मी फक्त अर्धा तास बाहेर होतो.’’ बाबाही काहीसे अपराधी भावनेने म्हणाले. सर्वाच्याच मनात नाही नाही ते विचार थमान घालत होते. अपयश सहन न होऊन तरुणतरुणी उचलत असलेल्या टोकाच्या पावलाबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या बातम्यांत त्याचा चेहरा दिसू नये यासाठी सगळे जण मनोमन प्रार्थना करत होते.

‘‘साडेनऊपर्यंत वाट बघू नाही तर मग एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येऊ. अगदी ‘मिसिंग’ची कम्प्लेंट द्यायची गरज नाही पण निदान तो न सांगता घराबाहेर पडला आहे याची पोलिसांना कल्पना तरी देऊन ठेवू.’’ असं शेजारच्या काकांनी सुचवलं. आई-बाबांनी त्यावर फक्त होकारार्थी मान हलवली.

नऊ वाजून पंचवीस मिनिटं झाली. पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी त्याचा एक फोटो घ्यावा या विचाराने बाबा उठून आतल्या खोलीत जायला लागले तेवढय़ात तो आला. अगदी रोजच्यासारखाच. ‘‘आई, मी आज एक पोळी जास्त खाणार आहे. संध्याकाळचं खाणं आज राहिलंच माझं.’’ अशी आल्या आल्या त्यानं आईला ऑर्डर दिली. इतका वेळ वेगवेगळ्या विचारांत गुरफटलेली आई त्याला आता नेमकं काय म्हणावं? हे न समजून तशीच बसून राहिली. तेवढय़ात हॉलमध्ये शेजारचे काका-काकूही आहेत हे त्याच्या लक्षात आलं. मग त्यांना ‘‘हॅलो’’ म्हणून ‘‘आलोच’’ असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेला.

जेवताना आई-बाबा त्याच्याकडेच बघत होते. तर इतका वेळ मोबाइलपासून दूर असल्यामुळे आलेले मेसेजेस बघण्यात आणि त्यांना रिप्लाय करण्यात तो दंग होता. काही वेळाने फोन बाजूला ठेवत तोच म्हणाला, ‘‘दुपारी पिटय़ा आला म्हणून खाली गेलो. मग आम्ही तसेच बाहेर गेलो त्यामुळे चार्जिंगला लावलेला फोन घ्यायचाच राहिला.’’

‘‘हो रे पण, तू इतका वेळ होतास कुठे?’’ बाबांनी काहीसं रोखून बघत त्याला विचारलं.

‘‘आमच्या कॉलेजच्या कोर्टवर.’’

‘‘पण तुझ्या रॅकेट्स, स्पोर्ट्स शूज तर घरातच आहेत.’’ आता इतक्या वेळ गप्प असलेली आईसुद्धा चच्रेत उतरली.

‘‘आई, तू आता एकदम ‘शेरलॉक मोड’मध्ये जाऊ नकोस.’’ तो काहीसा बेफिकिरीने म्हणाला. त्याच्या या उत्तराने आई वैतागून म्हणाली, ‘‘फोन विसरला होता हे समजल्यावर तू पिटय़ाच्या फोनवरून का नाही कळवलंस? कोणालाही न सांगता तू असा निघून गेलास, त्याने किती गोंधळ झाला ते माहिती आहे का?’’

‘‘अगं पण कसला गोंधळ? मी तर किती तरी वेळा फोन विसरून जातो. तेव्हा कुठे कळवतो? आणि येतोच ना नेहमीच्या वेळी घरी?’’

शेवटी बाबांनी त्याला आजची मॅच हरल्याच्या पाश्र्वभूमीवर असं अचानक ‘गायब’ होण्यामुळे सगळ्यांचाच किती घोळ झाला आणि चित्रविचित्र विचारांचं चक्र मनात कसं सुरू झालं ते समजावून सांगितलं. तेव्हा त्यालाही परिस्थितीतलं गांभीर्य जाणवलं.

आता त्या सगळ्यावर तो काही बोलणार तेवढय़ात पुन्हा आईचा प्रश्न आलाच, ‘‘तू कॉलेजच्या कोर्टवर कशासाठी गेला होतास.’’

‘‘सांगतो.. सगळं सांगतो,’’ असं म्हणून त्यानं सांगायला सुरुवात केली, ‘‘पिटय़ाचा एक भाऊ ‘नॅशनल प्लेअर’ आहे. पण तो दिल्लीत असतो. गेले किती तरी महिने आमचं फक्त भेटू-भेटू इतकंच सुरू होतं. आज काही तरी कामासाठी तो इथं आला होता आणि रात्री परत जाणार होता. ते पिटय़ालाही माहिती नव्हतं. त्याचं काम संपल्यावर त्याने पिटय़ाला फोन केला. तेव्हा नेमके आम्ही खालीच गप्पा मारत उभे होतो. शिवाय सकाळच्या मॅचचं रेकॉìडगही पिटय़ाच्या मोबाइलमध्ये होतं. मला त्याला ते दाखवायचं होतं. त्यामुळे आम्ही लगेच त्याला भेटायला गेलो. कॉलेजपासून स्टेशन जवळ आहे. तेव्हा आम्हाला भेटून रेल्वे पकडणं त्यालाही सोयीस्कर होतं म्हणून कॉलेजच्या कोर्टवर भेटलो.. पण हे खूप बरं झालं की आम्ही आज भेटलो. निदान मी अम्पायरमुळे हरलो नाही हे तरी मला पटलं.’’

‘‘म्हणजे?’’ आई-बाबांनी दोघांनी एकदम विचारलं.

‘‘जेवण झाल्यावर सगळं नीट सांगतो,’’ असं म्हणून त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली.

जेवण झाल्यावर सगळे जण हॉलमध्ये बसले आणि गप्पा सुरू झाल्या. दुपारी पूर्णपणे दुर्मुखलेला तो अचानक मोकळेपणाने बोलतो आहे याचं आईबाबांना बरं वाटत होतं. पण त्याचबरोबर पिटय़ाच्या भावानं त्याला असं काय सांगितलं? हेही ते त्यांना जाणून घ्यायचं होतं.

मॅचचं रेकॉर्डिंग बारकाईनं पाहून, पिटय़ाच्या भावानं काही कमालीच्या गोष्टी सांगितल्या. पण सर्वात महत्त्वाचं हे होतं की मोक्याच्या क्षणी, फक्त विरोधात गेलेल्या अम्पायरच्या निर्णयांमुळे मॅच फिरली नव्हती. त्या संपूर्ण सामन्यात अनेक वादग्रस्त निर्णय दिले गेले होते आणि त्याचा समसमान फायदा खेळणाऱ्या दोघांनाही झाला होता. पण मनुष्यस्वभावानुसार, फक्त शेवटच्या गेममध्ये दिले गेलेले निर्णय आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्याला झालेला फायदा फक्त लक्षात राहिला होता.

त्याचबरोबर टाळता येण्यासारख्या चुकाही दोघांनी मुबलक प्रमाणात केल्या होत्या. कदाचित त्या मॅचचं महत्त्व, ‘चियरिंग’मुळे वाढलेलं दडपण त्यासाठी कारणीभूत होतं. ती फायनल मॅचही नेहमीसारखीच एखादी मॅच आहे, असं समजून खेळ केला गेला असता तर मॅच आणखी रंगतदार आणि चुरशीची झाली असती, मात्र खेळाच्या तंत्रापेक्षा भावनेला प्राधान्य दिलं गेलं आणि त्यामुळे ज्या दर्जाचा खेळ नेहमी होतो त्या दर्जाचाही खेळ होऊ शकला नाही. बहुतेक वेळा दोघांनीही आपली बरीच शक्ती प्रतिस्पर्धी काय विचार करतो आहे, याचा विचार करण्यात खर्च केली. त्यामुळे कित्येक वेळा स्वत:चा असा स्वतंत्र विचार कमी पडला.. आणि आपण बरोबर काय करू शकतो? यापेक्षा दुसरा चुकीचे काय करू शकतो? याबद्दल विचार करण्यात आणि वाट बघण्यात वेळ खर्ची पडला. त्यामुळे दोघांचाही खेळ कमालीचा बचावात्मक झाला. अशा अनेक बारीकबारीक पण महत्त्वाच्या गोष्टी पिटय़ाच्या भावाने नेमकेपणाने दाखवून दिल्या.

ते ऐकल्यावर आई शांतपणे म्हणाली, ‘‘त्यांनी जे सांगितलं ते ऐकल्यावर तुझं आज हरलेल्या मॅचबद्दल काय म्हणणं आहे?’’ त्यावर हसून तो म्हणाला, ‘‘पुढचे काही दिवस तरी मी जेव्हा जेव्हा रॅकेट हातात घेईन तेव्हा तेव्हा ही मॅच मला आठवणार आहे. आज खूप लोक मी जिंकावं यासाठी आले होते. त्यांच्यासमोर हरलो याचं मला खरोखर वाईट वाटतंय. फक्त मॅच हरल्यावर मला जे ‘आता सगळं संपलं’ असं फिलिंग आलं होतं, तसं आता वाटत नाहीये. कदाचित इतकी मोठी फायनल मी पहिल्यांदाच हरलो त्यामुळे ते जरा जास्त जाणवलं. पण आता दोन महिन्यांनी मी बंगळूरुला स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. तिथं मला याचा नक्की फायदा होईल.’’

त्यावर इतका वेळ शांत असलेले बाबा म्हणाले, ‘‘थोडक्यात, काही वेळा एखाद्या प्रश्नाचं ‘योग्य उत्तर’ हे त्या प्रश्नाचं ‘सर्वोत्तम उत्तर’ असतंच असं नाही.’’

‘‘म्हणजे?’’ काहीही न समजून तो म्हणाला.

‘‘आजच्या दिवसाचा मुख्य प्रश्न काय होता?’’ बाबांनी त्यालाच प्रश्न विचारला.

‘‘इंटरकॉलेज बॅडिमटन चॅम्पियनशिप कोण जिंकणार? तो चटकन म्हणाला.

‘‘बरोबर. आणि त्या प्रश्नाचं तुझ्या दृष्टीने योग्य उत्तर काय होतं?’’ बाबांनी पुढचा प्रश्न विचारला.

‘‘मी जिंकणार.’’ तो लगेच म्हणाला.

‘‘मग ते उत्तर जर तुला आज मिळालं असतं तर काय झालं असतं?’’ बाबांकडे त्याच्या पुढचाही प्रश्न तयार होता.

त्याला बाबांच्या प्रश्नाचा रोख समजला. खरोखरच तो विचार करण्यासारखा मुद्दा होता. आजची मॅच जिंकली असती तर स्वाभाविकपणे अनेक चुकांकडे परखडपणे बघितलं गेलं नसतं. कदाचित आजच्या सारखं ‘प्रायोरिटी’वर पिटय़ाच्या भावाला भेटलंही गेलं नसतं. त्या यशाच्या धुंदीतच बंगळूरुच्या स्पर्धेची तयारी केली जाण्याची शक्यता होती आणि तिथं पहिल्याच काही फेऱ्यांतच बाहेर पडण्याची वेळ आली असती हे त्याच्या लक्षात आलं. त्याला त्याच वेळी हेही समजत होतं की, ‘फायनल मॅच ही हरलीच पाहिजे,’ असं त्याच्या बाबांचं म्हणणं नव्हतं. पण अपयश आल्यावर भावनाविवश न होता त्याचा स्वीकार करून त्याची परखडपणे नेमकी चिकित्सा कशी करायची याचा दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे.

थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, ‘‘हरलेल्या मॅचमध्येही आपला ‘मॅच पॉइंट’ शोधता आला की कोणत्याही प्रश्नाचं सर्वोत्तम उत्तर मिळतं.. हे लक्षात येणं महत्त्वाचं नाही का?’’