योगेश शेजवलकर

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. ‘गोड बोलणं’ हेही त्याला अपवाद नाही. गोड बोलणं जितकं नैसर्गिक तितका त्याचा आनंद इतरांपर्यंत पोहोचतो. मात्र त्यात कृत्रिमपणा आला तर त्यासारखी खोटी आणि बेचव गोष्ट नाही. अलीकडे आपल्या बोलण्या-वागण्यात ही कृत्रिमता वाढू लागल्याचं दिसतंय. का होतंय असं, याची कारणं शोधताना संक्रांतीनिमित्तानं गोड बोलाच, पण त्याचा अतिरेक नको असं सांगावंस वाटतंय..

mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Disruption, entrepreneur, startup ,
 Disruption- मन्वंतर: प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!

नव्या वर्षांतला पहिला सण म्हणजे संक्रांत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच संक्रांतीची जय्यत तयारी सुरू होते. मग संक्रांत ते रथसप्तमीचा कालावधी हा ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ म्हणत साजरा केला जातो. इतर सणांच्या तुलनेत संक्रांतीच्या शुभेच्छांचं खास वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे या साध्यासोप्या शुभेच्छा स्थलमाहात्म्यानुसारही दिल्या जातात. जसं की, काही विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या अवली लोकांना ‘तिळगूळ घ्या आणि आजच्या दिवशी तरी गोड बोला’ किंवा ‘तिळगूळ घ्या.. तुम्हाला अवघड आहे, पण गोड बोलून बघा’ असं सांगितलं जातं! त्याच्याच जोडीला याच अर्थाचे विनोद, मीम्स तयार करून पाठवले जातात. मग ‘आम्ही जे बोलतो तेच गोड मानून घ्या’, ‘तुम्हाला डायबेटिस होऊ नये.. म्हणून आम्ही गोड बोलत नाही’ असं प्रत्युत्तर या अवली लोकांकडून दिलं जातं आणि क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ रंगत जातो. अर्थात यातला मजेचा भाग सोडला तर एक मात्र नक्की आहे, की संक्रांत तिळगुळाबरोबरच गोड बोलण्याच्या शुभेच्छांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

आणखी वाचा – काच असलेला मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू

असं असलं तरीही ‘गोड बोलणं’ हा काही साधा, सरळ विषय नाही. कारण संवाद साधताना बोलणाऱ्यानं फक्त त्याच्या दृष्टीनं जे गोड आहे ते बोलून भागत नाही, तर ऐकणाऱ्यालाही ते त्याच्या व्याख्येनुसार गोड वाटणं महत्त्वाचं असतं. सध्या जर डोळसपणे अवतीभवती बघितलं, तर हेच सूत्र लक्षात घेऊन चारचौघांत संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. चारचौघांत म्हणजे फक्त बाहेरच्या किंवा त्रयस्थ लोकांबरोबरच नाही तर कुटुंबातल्या मंडळींबरोबर बोलतानाही याच पद्धतीनं संवाद साधण्याकडे कल असतो. थोडक्यात, संक्रांतीची वाट न बघता कायमच गोड बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहणं हाच सध्याचा ‘ट्रेंड’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

विश्वास बसत नसेल तर मित्रमंडळींचे, कुटुंबाचे व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप बघा. ‘सुप्रभात’ आणि ‘शुभरात्री’चे मेसेजेस सर्वात आधी टाकण्यासाठी तिथे चढाओढ लागलेली असते. कुणी भावनिक मेसेज केला, तर असतील-नसतील तेवढय़ा ‘इमोजीज्’ वापरून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात. भूतकाळातल्या एखाद्या साध्या फोटोवर डेलीसोपमध्ये नसतील असे मेलोड्रामॅटिक डायलॉग लिहिले जातात. साधा रोजचा चहा घेत असल्याच्या फोटोवरही ‘किती सुंदर’सह अनेक कॉमेंटस्चा पाऊस पडतो. तर काहीवेळा चांगल्या नसलेल्या कवितेवर, लेखावरही ‘मस्तच’चा अंगठा येतो. आपलाच ग्रुप कसा सॉलिड आहे, ग्रुपमधले मेंबर्स कसे एक नंबर आहेत, जनरेशन गॅपचा परिणाम न होता सर्वामधलं ‘बॉण्डिंग’ किती जबरदस्त आहे, हे सांगण्याची अक्षरश: स्पर्धा सुरू असते.

 इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट करायची आहे, की कोणत्याही वादात न पडता सर्वाशी संबंध चांगले ठेवायचे या हेतूनं जे कायम जिभेवर साखर ठेवून बोलतात, त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, कारण तो वैयक्तिक भूमिकेचा भाग आहे. त्याचबरोबर कायम अशा पद्धतीनं बोलत राहणं ही सोपी गोष्ट नाही. सर्वाबरोबर संपर्कात राहणं, हे कौशल्याचंच काम आहे. फक्त आक्षेप हाच आहे, की गोड बोलण्याचा अतिरेक कशासाठी? विषय कोणताही असला तरी ‘गुडी-गुडी’ वागण्याचा अट्टहास कशासाठी? नाती टिकवण्यासाठी, ऋणानुबंध जपण्यासाठी वारेमाप गोड बोलत राहणं हा एकमेव मार्ग शिल्लक आहे का? या सगळय़ामुळे काही टोकदार प्रश्न त्रास द्यायला सुरुवात करतात, जसं की कोणतंही नातं आकार घेण्यासाठी आणि घेतलेला आकार टिकण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ कुणाकडेही नाही. ही गोष्ट सर्वानाच कुठे ना कुठे तरी खात असते. त्या अपराधी भावनेमुळे कुणालाही दुखवायचं नाही, उलट सतत गोड बोलत राहायचं अशी भूमिका घेतली जात असेल का? किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर छान बोललो की प्रत्यक्ष भेटायची आणि नात्यांची गणितं सांभाळायची तितकी गरज उरत नाही असं वाटून गोड बोलून लोकांना गुंडाळलं जातं का? किंवा बोलण्याच्या नादात एखाद्या ठिकाणी शब्दानं शब्द वाढला आणि त्याची परिणती नातं तुटण्यात झाली किंवा गैरसमजुतीत झाली तर?  या भीतीपोटी जे बोलायचं ते गोडच हे मनाशी पक्कं केलं जात असेल का? अगोदरच असंख्य ताणतणाव सांभाळून जगत असताना त्यात नात्यातल्या वादावादीच्या ताणाची भर टाकायची सहनशक्ती उरलेली नाही का?

आणखी वाचा – मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

कारण जे काही असेल ते. मात्र त्याचा परिणाम हा नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. गोडवा जपण्याच्या नादात महत्त्वाच्या मुद्दय़ावर स्पष्ट बोलणं मागं पडतं आहे का, याचाही विचार व्हायला हवा. थोडंसं काही तरी बिनसलं तर हितसंबंध संपतील हे दडपण वाढत आहे. मतभेद स्वीकारून ठाम भूमिका मांडणं हे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं हे विसरलं जातंय का? संवादाची व्याप्ती ही फक्त ज्या गोष्टी आपल्याला मानवतात, सोयीस्कर वाटतात त्यांच्यापुरतीच राहते आहे. कदाचित यामुळेच आपल्या खासगी आयुष्याचा विचार केला तर तिथेही स्पष्ट बोलण्याच्या बाबतीत दुर्दैवानं अनेकांनी मौन धारण केलेलं दिसतं.  नोकरीच्या ठिकाणापासून सुरुवात करू या. तिथे विविध प्रकारच्या घटना होत असतात. काही वेळेला एखाद्या स्त्रीची किंवा नव्यानंच रुजू झालेल्या ‘ज्युनिअर’ची पिळवणूक होत असते.

वर्चस्व सिद्ध करण्याच्या अनाठायी स्पर्धेत लोक भरडले जात असतात. गेली अनेक वर्ष आपल्या खांद्याला खांदा लावून चांगलं काम करणाऱ्या एखाद्याला किंवा एखादीला कोणतंही ठोस कारण न देता अचानक काढून टाकलं जातं; पण त्याच्याबद्दल ‘एचआर’ला किंवा ‘सीनियर मॅनेजमेंट’ला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली जाते? नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे अनेकदा थेट हिंमत दाखवली जात नाही, हे जरी काही प्रमाणात मान्य केलं, तरी निनावी तक्रार करायच्या किंवा दबावगट तयार करण्याच्या पर्यायाकडे दुर्लक्ष का होतं? आज जे इतरांच्या बाबतीत होत आहे, ते उद्या आपल्याही बाबतीत होऊ शकतं हे माहिती असूनही ठोस कृती केली जात नाही. उलट आपलं सगळं व्यवस्थित राहावं म्हणून गोड गोड बोलून लाळघोटेपणा वाढतो. तेव्हा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती उरलेली नाही असं वाटायला लागतं. मग ही इच्छाशक्ती संपल्याचं प्रतिबिंब घरातल्या, नातेवाईक मंडळींशी निगडित असलेल्या विषयांवरही पडतं. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींची दाहकता आपल्याला कळते, पण वळत नाही.

आणखी वाचा – Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया

नात्यातला कुणी तरी पहिला पगार दहा हजार रुपये मिळाल्यावर पन्नास हजारांचा मोबाइल फोन कर्ज काढून घेत भविष्यातल्या उधळपट्टीचं सूतोवाच करतो. जवळच्या कुणाच्या तरी लग्नाची बोलणी आपल्यासमोरच अति हव्यासापोटी फिस्कटतात. आपल्याबरोबरच लहानपणापासून खेळत मोठा झालेला कुणी तरी आपल्या वयस्कर आई-वडिलांची प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो. ‘मुलगाच हवा’ या अट्टहासापोटी क्रूरतेच्या मर्यादा सोज्वळ वाटणाऱ्या कुटुंबाकडूनही ओलांडल्या जातात. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्यांना पदोपदी त्याची आठवण करून देण्याचा ‘टीम एफर्ट’ आपल्या डोळय़ांसमोर आकार घेत राहतो. मार्काच्या गणितात मागे पडणाऱ्याचं खच्चीकरण शक्य तितक्या पद्धतीनं करून त्या अपयशाचा शक्य तेवढा बोभाटा केला जातो. तेव्हा आपण काय करतो?  तिथे तरी जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची हिंमत दाखवतो का? की जे काही घडतं ते अंगाला लावून न घेता त्रयस्थाच्या भूमिकेतून चेहरा निर्विकार ठेवून सदसद्विवेकबुद्धी गोठवून बघत राहतो? आणि मग ‘रात गयी बात गयी’ म्हणत विसरून जातो? मुळात गेल्या अनेक पिढय़ांपासून विचित्र मानसिकतेमुळे तयार झालेले हे प्रश्न आहेत आणि ते कधी ना कधी सोडवले गेले पाहिजेत याची आपल्याला जाणीव आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. गोड बोलण्याच्या पलीकडे जाऊन स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी, असं खरोखर वाटत असेल, तर सर्वात पहिल्यांदा स्वत:बरोबरचा संवाद जास्तीत जास्त प्रामाणिक असायला हवा. कारण आपण स्वत:बरोबर बोलतानाही बहुतेक वेळा इतकं गोड बोलतो, की आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट योग्यच आहे असा आभास बेमालूमपणे तयार होतो आणि सुधारणा होण्याच्या शक्यताही कमी होतात. 

इतरांना आपली प्रतिमा कशी वाटते, यापेक्षा ती आपली आपल्याला कशी वाटते? हा निर्णायक प्रश्न असतो. तेव्हा इतरांच्या दृष्टीनं ती प्रतिमा जपण्याची कसरत करण्यापेक्षा स्वत: मूल्यांवर त्याची पडताळणी करणं हितकारक आणि सोपं असतं. एकदा ते जमलं की भूमिकेवर ठाम राहण्याचं बळ आपोआप मिळतं. अर्थात कोणतंही उत्तर शोधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे, की कोणताही प्रश्न हा एका दिवसात तयार होत नाही, टप्प्याटप्प्यानं तो आकार घेत राहतो आणि एक दिवस आपल्यासमोर आ वासून उभा राहतो. तसंच त्या प्रश्नाचं उत्तरही हळूहळू आकार घेतं. तेव्हा प्रश्न सोडवण्याच्या इच्छाशक्तीबरोबरच उत्तर शोधण्याची मानसिकता घडवण्यासाठी आपल्याला स्वत:ला वेळ द्यावाच लागेल. प्रसंगी स्पष्ट बोलण्याची किंमत मोजण्याची तयारीही ठेवावी लागेल. एकदा ते साध्य झालं की मग एक पूर्णपणे वेगळा प्रवास सुरू होईल.

आणखी वाचा – मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल

   कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा जीवघेणा ठरतो. ‘गोड बोलणं’ हेही त्याला अपवाद नाही. गोड बोलणं हे जितकं नैसर्गिक असेल तितका त्याचा आनंद इतरांपर्यंत पोहोचू शकेल. त्यात कृत्रिमपणा आला तर त्यासारखी दुसरी खोटी आणि बेचव गोष्ट नाही. तेव्हा काळ-वेळ बघून आणि प्रश्नाचं भान राखून गोड बोलण्याचं पथ्य पाळलं, तर मनाची संवेदनशीलता जपली जाईल आणि गोड बोलण्याच्या पलीकडे जात काही तरी चांगलं घडू शकेल यात शंका नाही.

yogeshshejwalkar@gmail.com

Story img Loader