‘मनके किनारे बैठ’, हे वचन प्रत्यक्षात आणण्याचा या सगळ्या मैत्रिणींचा प्रयत्न आहे. कारण ते सोपे नाही. बघता बघता आपण राग, लोभ, आसक्ती, अपेक्षांच्या लाटांवर स्वार होतो. अशा वेळी आयुष्यातल्या छोटय़ा-मोठय़ा संकटांना अनेकदा आधार सापडतो तो अध्यात्माचा. भागवत असो की समर्थ रामदासांचा दासबोध त्याच्या वाचण्यातून या मैत्रिणींना गवसली ती मनशांती. या ग्रंथाच्या वाचनासाठी गेली आठ वर्षे एकत्र येऊन जगण्याच्या सर्व व्यवहारांना अर्थ देणाऱ्या शांततेचा शोध घेणाऱ्या या मैत्रिणींविषय़ी!
त्यावयाची  जेमतेम चाळिशी ओलांडलेल्या, सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गातील दहा-बारा मैत्रिणी आठवडय़ातून तीन वेळा अडीच-तीन तास एकत्र भेटतात. काय उपक्रम करीत असतील त्या? कशावर गप्पा मारत असतील? मुलांची शिक्षणं, त्यांचे प्रवेश, घरातील वृद्धांची आजारपणे, नवऱ्याच्या करिअरमधले चढउतार आणि त्याचे संसारावर- घरावर होणारे परिणाम.. असे कितीतरी प्रश्न आयुष्याच्या त्या त्या वळणावर भेटतात. काही काळ अस्वस्थ करतात आणि आपापल्या उत्तराच्या वाटेने निघून जातात. पण त्यानंतरही एकमेकींना भेटत राहण्याची ओढ या मैत्रिणींमध्ये आली कुठून? माझ्या प्रश्नांना उत्तर देत स्वाती म्हणाली, ‘‘खरं सांगू? आम्ही इतक्या असोशीने, आठवडय़ातून तीन-तीनदा एकमेकींना भेटतो ते ‘भांडी घासण्यासाठी’. क्षणाक्षणाला मनाच्या भांडय़ावर चढणारं किटन साफ करण्यासाठी..’’ स्वाती कुलकर्णी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी हा मनाच्या भांडय़ावरील किटन साफ करण्यासाठी हजारो लिंबांची शक्ती वगैरे असणारा साबण वापरत नाहीत. कारण ते त्यांच्या उपयोगाचेच नाही. त्यांना त्यासाठी लागते डोंगरे महाराजांनी निरूपण केलेले भागवत किंवा समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध! ‘नाही निर्मल मन, काय करील साबण,’ हे तुकारामांचे म्हणणे मनोमन स्वीकारलेल्या या मैत्रिणी मन शुद्ध, निर्मळ इच्छा, वासना, अपेक्षांच्या काजळीतून मुक्त करण्याच्या वाटेवरील प्रवासी आहेत. संसारात रमलेल्या आप्त स्नेह्य़ांवर प्रेम करणाऱ्या विरक्ती, मुक्ती बिक्तीच्या गप्पा न मारणाऱ्या. पण जगण्याच्या सर्व व्यवहारांना अर्थ देणाऱ्या शांततेचा शोध घेणाऱ्या.
स्त्रियांच्या या गटाला कोणतेही औपचारिक नाव नाही, पण ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी येण्याची ओढ प्रत्येकीला वाटेल असा दृढ बंध आहे त्यांच्यात. कोणताही उपक्रम सुरू होण्यासाठी एखाद्या निमित्ताचा टेकू लागतोच. इथे निमित्त झाले, स्नेहलच्या भावाच्या आजारपणाचे. मृत्यूची दाट काळी सावली या आजारपणामागे रेंगाळताना तिला दिसत असावी. त्यातच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली. अनेक कामात तिने स्वतला गुंतवले तरी मन सैरभैर होते. स्वातीशी ती हे बोलत होती तेव्हा स्वाती स्वत:च्या कॉलनीतील मैत्रिणींबरोबर भागवत वाचनाचा प्रयोग करीत होती. मग तो प्रयोग स्नेहलच्या घरी सुरू झाला आणि एकेक करीत मैत्रिणी जमू लागल्या. २००५ साली या मैत्रिणींनी आधी वाचायला घेतले ते डोंगरे महाराजांचे भागवत. ओवी वाचन त्यावर निरूपण करण्याचे काम स्वातीचे. या मैत्रिणींबरोबर ती नव्याने भागवत वाचत असली तरी या प्रवासात ती पुष्कळ पुढच्या टप्प्यावर असल्याने तिचे अनुभव, सांगत असलेली उदाहरणं, योग्य ते दृष्टांत ऐकणे हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा ठेवा असतो.
खरं म्हणजे या गटातील सगळ्या मैत्रिणी सुशिक्षित, बऱ्यापैकी आर्थिक संपन्नता उपभोगणाऱ्या. पैशाची ओढग्रस्तता, व्यसनी नवऱ्याकडून  होणारी मारहाण किंवा सासू-सासऱ्यांकडून होणारा छळ असे प्रश्न त्यांच्यासमोर नव्हतेच. पण याचा अर्थ मन स्वस्थ असणं, कोणाकडून काहीच अपेक्षा नव्हत्या आणि समोर येईल ते विनातक्रार स्वीकारण्याची क्षमता प्रत्येकीत होती असे नव्हते. किंबहुना या कोणत्याच गोष्टींपासून सुटका होत नव्हती. म्हणूनच त्रास होता. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे उसळणारा क्षोभ, अपेक्षांचे निरंतर आवर्तातून अपरिहार्यतेने वाटय़ाला येणारे अपेक्षाभंगाचे निराश क्षण, त्यातून होणारे उद्रेक हे प्रत्येकीच्या संसारात होतेच. सहज म्हणून कानावर भागवताचे निरूपण पडू लागले तेव्हा प्रत्येकीला जाणवू लागले. रोजच्या जगण्याला लय देणारा, शांत करणारा एक मंत्र या उपक्रमातून आपल्याला मिळतो आहे. राग येतो पण तो थोडा लवकर शांत  होतोय. या घटनेत आपली चूक असेल तर ती स्वीकारण्याइतका शहाणेपणा आपल्यात आलाय आणि हे करता करता आपल्याच मनाचे व्यवहार आपण थोडे दुरून, काहीशा तटस्थपणे बघू शकतोय. मुख्य म्हणजे मनाच्या आत खोलवर उमटणारी एखादी हिणकस भावना, काळाकुट्ट विचार हे सगळे बोलण्यासाठी एक हक्काची जागा या निमित्ताने प्रत्येकीला मिळाली आणि भागवताच्या आधारे संसारातील सुख-दु:खांची, व्यथा-वेदनांची चिकित्सा सुरू झाली. या मैत्रिणींना प्रगल्भ करू लागली.
अध्यात्माच्या वाटेला लागायचे ते निवृत्तीनंतर. सर्व सांसारिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यावर हा सोईस्कर, लोकप्रिय समज म्हणूनच या स्त्रियांना साफ नामंजूर आहे. उलट आम्ही चाळिशीनंतर याकडे वळलो, पण आम्हाला चांगला उशीरच झाला आहे, असे प्रत्येकीला वाटतेय. कारण संसारात  प्रत्येक वळणावर सामोऱ्या येणाऱ्या प्रश्नांचा जो मानसिक ताठरपणा येतो त्याचा शरीरावर परिणाम होऊन कित्येक व्याधींना आपण आमंत्रण देत असतो. मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी अशा शारीरिक पातळीवरील अनेक त्रासांना तोंड देता देता जीव थकून जात होता. हा थकवा आता मात्र जाणवत नाही. कारण त्याच्या मुळाशी असणारा मानसिक ताण या भागवतभेटीमुळे हलका  होतो. त्याचा पार  निचरा होतो. ‘कधी कधी घरी चिडचिड झाली तर नवरा विचारतो या आठवडय़ात ‘भागवत’ नव्हते वाटतं?’ अपूर्वा मिश्कीलपणे म्हणाली.
आत्मपरीक्षण, स्वदोषदर्शन, मनाच्या व्यवहारांकडे साक्षीभावाने बघणे वगैरे अनेक संकल्पना व्यवहारात वावरताना, वाचन करताना, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना कानावरून जातात. पण त्या कानाद्वारे थेट मनात उतरताना काय होते आणि त्याचे परिणाम जगण्यावर कसे होतात हे या मैत्रिणींना या गटातील प्राचीच्या आयुष्यात जे वादळ आले त्या वेळी प्रकर्षांने जाणवले.
प्राचीच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारे वादळ आले ते तरुण मुलाच्या, परितोषच्या अकाली मृत्यूमुळे. पट्टीचा पोहणारा मुलगा बुडून जावा हे तिच्यासाठी धक्कादायक होतेच, पण अतिशय सत्शील आणि शेजार-पाजाऱ्यांपासून एखाद्या दूरच्या मित्रालाही मदत करण्यासाठी धावणारा हा मुलगा. मग त्याच्या वाटय़ाला असे अर्धकच्चे आयुष्य यावे? हा प्रश्न प्राचीला अहोरात्र छळत होता. विनाझोपेच्या लांबलचक रात्री आणि तगमग वाढवणारा दिवस अशा धारदार कात्रीत तिला आधार मिळाला तो या गटाचा आणि इथे गिरवणाऱ्या धडय़ांचा. आयुष्यात जे समोर येते त्याचा विनातक्रार स्वीकार कसा करायचा, आसक्ती- विरक्तीच्या या खेळात स्वतला कसे सांभाळायचे हे प्राचीबरोबर सगळ्या मैत्रिणींना शिकायला मिळाले. सत्त्व-रम-तम गुणांचे विवेचन, दु:खाला दु:ख न मानण्याची शक्ती यावर तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींनी खूप चर्चा केली होती, पण परितोषच्या मृत्यूने ते सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा सगळ्याच मैत्रिणींनी या परीक्षेला उत्तमपणे तोंड दिले. प्राचीला जगण्याची, कामाची उमेद देत पुन्हा उभे केले. आमच्या सुख-दु:खाकडे आम्ही इतक्या प्रगल्भपणे बघू शकू असा विश्वास यानिमित्ताने प्रत्येकीला मिळाला. जे सुखाचे कारण असते तेच दु:खाचेही मूळ असते ते वयाच्या चाळिशीत समजणे फार बरे असते.
गेल्या आठ वर्षांपासून आठवडय़ातून तीन वेळा. दुपारी अडीच-तीन तास भेटणाऱ्या या मैत्रिणींनी दोनेक वर्षांपूर्वी एक वेगळा प्रयोग करून बघितला. तो तीन दिवसांच्या निवासी शिबिराचा. शिबीर ठरवताना संकल्प हाच होता, सांसारिक विवंचना आणि उखाळ्यापाखाळ्यांना या तीन दिवस थारा नसेल. त्यामुळे शिबिराचा निश्चित कार्यक्रम होता. स्वाती ज्या आनंदमूर्ती गुरु माँ ची शिष्या आहेत त्यांची प्रवचने ऐकणे, पुस्तकांचे वाचन आणि ध्यानाचे विविध प्रकार शिकण्यात तीन दिवस कसे गेले हे या मैत्रिणींना समजलेच नाही. अर्थात शिकण्यासाठी दरवेळी फक्त भागवत  किंवा प्रवचनच लागते असे नाही. एखादा ‘बनारस’सारखा किंवा ‘संत तुकाराम’सारखा चित्रपटही पुरेसा असतो, असा या मैत्रिणींचा अनुभव आहे. त्यामुळे असे प्रयोगही मग त्या आवर्जून करतात.
आमच्या गप्पा सुरू असताना माझे लक्ष वारंवार जात होते या मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या, पण रूढार्थाने त्यांच्यापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या एका स्त्रीकडे. काळीसावळी, अतिशय तरतरीत पण सगळ्यांमध्ये काहीशी अवघडून बसलेल्या त्या स्त्रीकडे बोट दाखवत स्नेहल म्हणाली, ‘आमच्या गटातील ही सर्वात कमी शिकलेली, पण सर्वात जास्त शहाणी मैत्रीण. माझ्याकडे साफसफाईचे काम करणारी जनाबाई. तिचे वडील कीर्तनकार. कीर्तनाला जाताना मुलीला बरोबर घेऊन जात. शिवाय रोज दोन तरी ओव्या वाचल्याशिवाय घरात जेवायचे नाही, त्यामुळे जनाबाईचा ‘बँक  बॅलन्स’ चांगला दांडगा आहे.’ स्वाती जेव्हा एखाद्या ओवीचे विवरण करते तेव्हा त्यातील आशयाला अतिशय अनुरूप अशी ज्ञानेश्वरांची एखादी ओवी वा तुकारामांचा अभंग जनाबाईला पटकन आठवतो व ती ऐकवते. याच ‘जनाबाई’कडे पंचीकरणावरील अतिशय प्रगत आध्यात्मिक असे पंचतत्त्वाचे वर्णन करणारे पुस्तक होते, असे स्वाती सांगते.
‘मनके किनारे बैठ’, असे स्वातीला तिचे गुरुमाँ म्हणाल्या होत्या. या सगळ्या मैत्रिणींचा तो प्रयत्न आहे. नदीच्या किनाऱ्यावर बसून समोर धावणारे प्रवाह बघणे सोपे नाही. बघता बघता आपण त्यातील लाटांवर स्वार होतो. राग, लोभ, आसक्ती, अपेक्षा, भूतकाळातील अपमान, भविष्याच्या विवंचना या मनात उसळणाऱ्या लाटा आपल्याला अशा लपेटून टाकतात की वर्तमानात राहून त्या व्यवहारांकडे बघणे आपल्याला अशक्य होते. ते शक्य करण्यासाठी लागणारी साधना या मैत्रिणी करतात. स्नेहल येवलेकर, रेखा काळे, वृन्दा गुडसूरकर, अनघा मोघे, प्राची कुलकर्णी, वासंती खाडिलकर, सुचेता सोनार, वन्दना जोशी, संगीता गोगटे, स्नेहा मदानी, अपूर्वा औरातकर, स्नेहल कुलकर्णी आणि जनाबाई मुटकुल. स्वाती कुलकर्णी या थोडय़ा अधिक जाणत्या, शहाण्या. मैत्रीचे बोट धरून सुरू झालेला हा प्रवास सध्या दासबोधातल्या मूर्खाच्या लक्षणापर्यंत आला आहे. साडेचार वर्षे ‘भागवता’चा अभ्यास झाल्यावर आता रामदासांचा रोकडा दासबोध जेव्हा मूर्खाची लक्षणे सांगतो तेव्हा शहाणपणाच्या वाटेवर अजून किती पल्ला गाठायचा आहे, हे या मैत्रिणींना नव्याने जाणवते.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Story img Loader