‘मुलांच्या विचारात परिवर्तन घडवून आणणं, ही असते मोठी गुंतवणूक. जिचा परतावा समाजाला आणि राष्ट्राला मिळणार असतो गुणाकार श्रेणीनं.’ हाच धागा पकडून ज्यांनी किशोरवयीन मुलांमध्ये आशा जागृत करण्याचं, त्यांना स्वप्न दाखवण्याचं आव्हान पेललं, अशा काही व्यक्तींची व त्यांच्या अनोख्या उपक्रमांची ही माहिती. अशा व्यक्ती आयुष्यात आल्याने अनेक किशोरवयीन मुलांचं आयुष्यच बदलून गेलं आहे.
आज आपण भेटणार आहोत स्वप्न पेरणाऱ्या माणसांना. त्यांचं स्वत:चं आयुष्य म्हणजेही झगडा, संकटांवर मात आणि मग भरभरून मिळालेलं यश! यशाच्या शिखरावर असतानाच वाटतं, आता वेळ आली आहे आपल्या जन्मभूमीला, कर्मभूमीला आणि ज्या समाजानं आपल्याला घडवलं त्या समाजाला भरभरून परत देण्याची!
जे द्यायचं ते असं हवं की घेणाऱ्याचं आयुष्यच बदलून जावं ‘देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत’ असं! आणि घेणाऱ्यांचं वय असावं असं की, ज्या वयात मनात असतो गुंता, मार्गदर्शन करणारं योग्य माणूस आसपास नसतं. आपल्या जवळ काय आहे याची जाणीव होत नाही तर काय नाही याचीच टोचणी मनाला लागून राहते. स्वप्न, वास्तव, आदर्श, भास, आभास यांची आवर्त गोंधळवून टाकतात. अशा १४-१५ वर्षांच्या इयत्ता ९ वीच्या वर्गातील मुलांना आताच सावरायला हवं असतं. एकदा त्यांना मार्ग दाखवला की मग ती स्वप्नांचे पंख लेवून हवेत झेपावतात.
अशा किशोरवयीन मुलांच्या मनात स्वप्न पेरणाऱ्या माणसांमध्ये आहेत यशस्वी उद्योजक जितेंद्र खेर व त्यांची फॅशन डिझायनर पत्नी शिल्पा खेर, केमिकल इंजिनीअर असणारे डॉ.पी.एन. सिंग तर विविध उपक्रमांसाठी स्टँडर्ड चार्टर्डसारख्या बँकेतील नोकरी सोडून मुलांत रमलेल्या ज्योतीताई कुराडे! आणि त्यांचे असंख्य सहकारी.
खेर दांपत्याने ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ची स्थापना केली. वात्सल्य ट्रस्ट, शिवाई विद्यालय, केणी विद्यालयात त्यांचे काम चालते. प्रत्यक्ष भेटींशिवाय मुलांचे नेमके प्रश्न आपल्याला नेमकेपणानं करणार नाहीत म्हणून त्या मुलांच्या घरी जातात. त्यांना भेटतात. या मुलांना सांगतात, ‘भाग्यश्री तुमची सखी. पण तुमचं भाग्य घडवायचं तुम्हीच.’ हातावरच्या रेषा नाहीत तर तुमची स्वप्न, जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिश्रम करण्याची वृत्ती, चिकाटी तुमचा भाग्योदय घडवून आणेल.’
डॉ. पी.एन. सिंग फाऊंडेशनही ’३- लॉट अर्थात लिडर्स ऑफ टुमारो, नावाचा कौतुकास्पद उपक्रम राबवते. घडवणं हेच त्यांचं ध्येय. हे काम करावं असं वाटणारेही असंख्य जण असू शकतील. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात दिली जाते. तिला प्रतिसाद देणाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतला जातो. त्यांनी स्वत: एचआरडी म्हणजेच ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये पीएच.डी.केलेली. त्यांनीच एक पुस्तिका बनवली आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम तयार केला आहे. प्रशिक्षण घेणारे आपल्या घराजवळील शाळा निवडतात. शाळाच मुलांचा एखादा वर्ग/ गट निवडून देते. दर रविवारी वर्षभर मुलांशी संपर्क ठेवला जातो.
ध्येय ठरवल्यावर ते गाठण्यासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टी आत्मगौरव, आत्मविश्वास, शुद्ध चारित्र्य, संपर्क आणि संभाषण कला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, मनावर ताबा मिळवणं, सर्जनशीलता अशा असंख्य गोष्टी सांगितल्या जातात. सुरुवातीला थोडी लाजरी-बुजरी असणारी मुलं नंतर खुलत जातात. मोकळी होतात. उपक्रमाचं यश असतं शाळा आणि खासकरून मुख्याध्यापक यांच्या सहकार्यावर! काहींना शाळेला आर्थिक मदत हवी असते. जी मिळू शकत नाही. कारण ट्रस्टच्या ध्येयधोरणात हे बसत नाही. मुलांच्या विचारात परिवर्तन घडवून आणणं, ही असते त्यातली गुंतवणूक. जिचा परतावा समाजाला आणि राष्ट्राला मिळणार असतो गुणाकार श्रेणीनं. काही शाळांतून मुलं गळतात. पण जी कोणी उरतील त्यांच्यासाठी कार्यकर्ते वर्षभर जात राहतात. व्रतस्थाप्रमाणे.
आज जवळजवळ ५८ शाळांत हे काम चालतं. बहुसंख्य शाळा या मराठी माध्यमाच्या, अनुदानित शाळा आहेत. मुलांचे पालक आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील आहेत. आता हे काम इतर माध्यमाच्या शाळा आणि मुंबईबाहेरही विस्तारत आहे. शाळांची संख्या दरवर्षी शाळा आणि कार्यकर्ते यांच्या उपलब्धतेप्रमाणे कमी-जास्त होत राहते. सतत कसल्या ना कसल्या स्पर्धा घेतल्या जातात. चित्र काढणं, हस्ताक्षर, कविता गोळा करणं, रचणं, उताऱ्याचं पाठांतर, गोष्टी सांगणं अशा अनेक. यात मुलं सतत व्यस्त राहतात. आपल्यातील क्षमतांची त्यांना जाणीव होते. प्रत्येकाला भाग घ्यावाच लागतो. कारण स्पर्धेतील हार-जीत यापेक्षा भाग घेणं महत्त्वाचं असतं. यशाची झिंग मग चढत जाते. अपयशानं खचायचं नाही हे कळतं. आपल्या झालेल्या कौतुकानं मुलं सुखावतं तर इतरांचं कौतुक करण्यातला आनंदही लुटतं.
सर्वात महत्त्वाची असते वक्तृत्व स्पर्धा! वेळोवेळी बोलण्याची दिलेली संधी, चालू घडामोडींवरची चर्चा यातून वेगळा विचार करणारा वक्ता घडत जातो. आपण जे बोलतो तसं वागण्याचा निश्चय मग मनोमनी केला जातो. म्हणून ही स्पर्धा प्रथम प्रत्येक शाळेतून घेतली जाते. शाळेत क्रमांक मिळवणाऱ्यांची परत स्पर्धा होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ खूप मोठय़ा स्वरूपात केला जातो. मोठा हॉल घेतला जातो. विविध मॅनेजमेंट स्कूलचे विद्यार्थी उपस्थित असतात. नामवंत पाहुणे, यशस्वी व्यक्ती उपस्थित असतात आणि कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतो पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी! त्याला लाइफटाइम स्कॉलरशिप दिली जाते. याशिवाय कार्यकर्ते आपल्या शाळेतील खास चुणूक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधतात. डॉ. सिंग यांच्याशी स्वत: बोलतात. त्यांना आश्वासन दिलं जातं. तुम्ही कितीही, काहीही शिका. परिश्रम तुमचे आर्थिक पाठबळ आमचं. आयटीएमचे रामन्ना गरीब, कष्टाळू, हुशार मुलांना आर्थिक बळ पुरवतात. काही विद्यार्थी याचा छान लाभ उठवतात. लॉट’बरोबर काम करणाऱ्या ज्योती कुराडे या उपक्रमाबाबत भरभरून बोलतात. २००४ पासून त्या हे काम करतात. सांताक्रूझ येथील रामेश्वर विद्यालय आणि मरोळ प्रागतिक विद्यालयात त्या जातात. गेल्या ७ वर्षांत संपर्कात आलेली प्रियंका तोडकर, सुषमा जाधव, संपदा, श्रेया, काजळ, प्रज्वल अशी अनेक मुलं त्यांना आठवत असतात. त्या सांगतात, ‘‘मी ‘लॉट’च्या संपर्कात आले आणि माझं जगच बदललं. जणू मला हवं होतं ते गवसलं. इतक्या वर्षांच्या बँकेच्या नोकरीनं मला जे दिलं त्याच्या कितीतरी पट मी गेल्या दहा वर्षांत कमावलं. अगदी अल्पशिक्षित, अल्प उत्पन्न गटातील मुलांचं आयुष्य आपण केवळ आपल्या काही तासांच्या संपर्कानं, बोलण्यानं बदलू शकतो. हे केवढं भाग्य. मी मुलात गुंतत गेले. माझ्या मनाला उभारी मिळाली आणि एकेदिवशी मी मोठय़ा पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. आणखी मुलांसाठी, आणखी वेळ देता यावा म्हणून. इतरांनी मला वेडय़ात काढलं. पण मी मात्र पूर्ण समाधानी आहे. मुलांना आपण नाही, तर मुलं आपल्याला शिकवतात. मुलं शांत होत जातात. निरनिराळ्या गोष्टीत रस घेतात. पालक आणि शिक्षकांच्या तक्रारी कमी होतात. अभ्यास मनापासून करू लागतात. त्यांचे मार्कही वाढतात.’’
मुलांना गरज म्हणून ज्योतीताईंनी व्यवसाय मार्गदर्शन, सेक्स एज्युकेशनचा कोर्स केला. त्या बी.एस्सी. असूनही त्यांनी एम.ए. केलं. संमोहनशास्त्र शिकल्या. शरीरापेक्षा मनावर ताबा मिळवणं गरजेचं. मग शरीर आपोआप मनाचं ऐकू लागतं. हे त्यांनी मुलांना पटवून दिलं. सध्या त्या ‘फूड अॅण्ड न्यूट्रिशिअन’चा कोर्स करीत आहेत. मुलांच्यात वावरताना त्यांच्या लक्षात आलं की आपण रविवारी दोन तास त्यांच्याबरोबर असणं पुरेसं नाही. पण आपल्यासारखाच मित्र, मार्गदर्शक, गुरू म्हणजे पुस्तक. ती वाचायला दिली तर!
स्वयंप्रेरणेने त्यांनी विविध विषयांवरची पुस्तकं खरेदी केली. विज्ञान, तंत्रज्ञान, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, टाटांचं चरित्र, कलामांचं ‘इग्नायटेड माइंड.’ त्याचं रजिस्टर बनवलं आणि पुस्तक मुलांच्या ताब्यात दिली. ती कशी वापरावी, हाताळावी हे समजावून दिलं. ते वाचतात का? नोंदी ठेवतात का? हे पाह्य़लं. वर्षांच्या शेवटी प्रत्येकानं, ‘आपल्याला आवडलेलं पुस्तक’ याविषयी बोलायचं असतं. प्रथम वाचनाचा कंटाळा करणारी मुलं विशिष्ट पुस्तकांची मागणी करू लागतात आणि प्रामाणिकपणे वर्षांच्या शेवटी पुस्तके परत करतात. हा त्यांचा अनुभव.
मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना इंग्रजीचा गंड असतो हे लक्षात येताच इंग्रजी संभाषणाचा तास सुरू झाला. डिक्शनरी, छोटेखानी संभाषणाची पुस्तके त्या मुलांना वर्षभर वापरायला देतात. स्वत:ला आवडलेले वाचून दाखवतात. मुलं ते तन्मयतेनं ऐकतात. कारण आपली तळमळ त्यांना समजत असते. वर्षांच्या सुरुवातीला जेव्हा ‘तुम्हाला काय आवडतं?’ या प्रश्नाला ‘मस्ती!’ उत्तर देणारी मुलं जेव्हा,
वर वर हसणं आतून रडणं यालाच जगणं म्हणतात का?
वर वर फुलणं आतून कोमेजणं यालाच फूल म्हणतात का?
वर वर पिकणं आतून कुजणं यालाच फळ म्हणतात का?
यासारखी गंभीर कविता सादर करतात तेव्हा काय म्हणायचं?
हे सारं ऐकलं की या स्वप्न पेरणाऱ्या माणसांना म्हणावंसं वाटतं, ‘तुम्ही ज्या मुलांना भेटलात ती मुलं भाग्यवान हेच भाग्य आणखी अनेकांना लाभू दे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा