एप्रिल २००७ मध्ये मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. इंजिनीयर असल्यामुळे कामात व्यग्र असायचो. एकदम मुक्त झालो. दोन वर्षे भारतात / बाहेर फिरण्यात गेली. नंतर मात्र वेळ जाता जाईना. ओळखीने पुण्यातील चतुशृंगी मंदिरात ‘व्यवस्थापक’ झालो. व्यवस्थापन निगुतीने केले. पाच वर्षे सेवा केल्यावर तेथून निवृत्ती घेतली. पुन्हा मोकळा झालो. पुढे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीचे सर मला म्हणाले होते, ‘‘राजमाने, तुझे मराठी चांगले आहे. लिहीत राहा. तुला यश मिळेल.’’ सरांना मनोमन वंदन करून पुण्याच्या आघाडीच्या वर्तमानपत्रांत (मराठी) लेख लिहिण्यास सुरुवात केली. माझे लेख वृत्तपत्रात छापून येऊ लागले. आतापर्यंत साडेचार वर्षांत माझे ४४० लेख प्रसिद्ध झाले आहेत. जागतिक दर्जाचे जलतज्ज्ञ आणि महाराष्ट्र शासनाचे जलसंपदाचे निवृत्त सचिव माधवराव चितळे यांचे हस्ते मला २०१६ मध्ये ‘अभियंता-लेखक’ पुरस्कार मिळाला. मला गायनाचा छंद आहे. जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी मी ‘कराओके’वर म्हणतो. सोसायटीतील कार्यक्रमांत, गणपतीमध्ये, राष्ट्रीय सणाला, लग्नकार्यात मी आवर्जून गातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि मी कात टाकून पुन्हा तरुण होतोय. कुटुंबातही छान आहे सगळं. ‘मस्त चाललंय माझं’ या वाक्याने लेखन समाप्ती करतो.

– शिवलिंग राजमाने, पुणे

सकारात्मक विचारांची आत्मज्योत

मीलीला मोरेश्वर श्रोत्री. अवघे ब्याण्णव (९२) वयमान! सामान्यत: असे म्हटले जाते, हे वय म्हणजे हरीहरी करण्याचे! पण मी कोणतीही व्रतवैकल्य, देवधर्म, उपासतापास करत नाही. माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी हाच माझा देव व विद्यादान हीच माझी साधना!

विद्यादान आणि विद्यार्जन या दोन्हीसाठी वयाची अट नसते हेच खरे! म्हणूनच वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मी पेण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाले. त्यानंतर ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयातून शिक्षिका या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही पुढे २८ वर्षे इंग्रजी आणि गणिताच्या बाह्य़ परीक्षांचे नियोजन करत असल्याने एकूण गेली ७३ वर्षे विद्यादानाचे हे कार्य अखंड चालू राहिले आहे. आजही मी ८वी, ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांचे संस्कृतचे क्लासेस घेते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी घेते. गरीब मुलांना मात्र विनामूल्य शिकवते.

तरुण पिढीशी माझी नाळ कायमची जुळलेली असते. माझे विद्यार्थी मला या वयातही उत्साहाने जीवन जगण्याची ऊर्जा पुरवतात. विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करतात. म्हणूनच एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही वयाच्या चाळिशीनंतर मी बी.ए., एम.ए. आणि बी.एड्. या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. शिवणकामाच्या परीक्षा दिल्या. त्यामुळे मुलांचे कपडे, माझे कपडे आजही मी स्वत: शिवते. पेटीवादनाच्या परीक्षा दिल्यात. आजही पेटीवादनाच्या पुढील परीक्षा देण्याची तीव्र इच्छा आहे. वयाच्या

७५ व्या वर्षी मी गीता मंडळाची ‘गीताव्रती’ ही परीक्षा तसेच ज्ञानेश्वरी, दासबोध आणि संत तुकाराम यांच्या साहित्यावरील परीक्षा उच्च श्रेणीत पास झाले आहे. सध्या संत नामदेवांच्या साहित्याचा अभ्यास करत आहे. मी एकटी राहते. पण एकटेपण माझ्या वाटय़ाला कधीच येत नाही. माझे विद्यार्थी हवे नको बघतात. माझी देखभाल करतात. मला कोणताही आजार नाही. शिवाम्बु हे माझे टॉनिक!

स्वयंपाक, धुणीभांडी हा माझा व्यायाम! पाककलेची आवड इतकी की कोणाच्याही ५०व्या वाढदिवसाला ५० पक्वान्ने नेऊन देणे, बाळंत विडा करणे रुग्णांसाठी पौष्टिक पदार्थ करून खाऊ घालणे हा माझा छंद आहे. स्मरणशक्तीची उपजत देणगी लाभल्याने मी माझे विद्यार्थी, नातलग यांना न चुकता वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. जात्यावर दळण दळणे हीसुद्धा एक आवड! सतत कार्यमग्न राहणे हेच माझे जीवन!

मला नेहमी वाटते, अहंकाराचा वारा दूर गेला की आत्मज्योत उजळते. वयाच्या ९२व्या वर्षी सकारात्मक विचारांची ही आत्मज्योत संथपणे तेवत आहे आणि इतरांच्या आयुष्यात ज्ञानदिपाचा प्रकाश उजळवत आहे!

लीला मोरेश्वर श्रोत्री

शांत जीवन

मा  झी बदली धोबी तलाव येथे झाली असताना एकदा फावल्या वेळात तेथे फेरफटका मारताना माझी पावले आपसूकच तिथल्या ‘स्पोर्ट’च्या दुकानात गेली. तिथे मी अनेक व्यायामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्या. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी नियमित व्यायाम करतो आहे ते आजतागायत. या व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश असे ज्येष्ठांना जाणवणाऱ्या आजारांपासून मी दूर आहे.

वयाच्या पन्नाशीत मी स्कूटर चालवायला शिकलो आणि आजही सगळी कामे स्कूटरवरून ये-जा करून करत असतो. आमच्या शेजारी ८३ वर्षांच्या वृद्धा एकटय़ाच राहतात. त्यांच्या तुलनेत मी जरा बासष्ठीत असणारा ‘तरुण’ असल्याने त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांची डॉक्टरने लिहून दिलेली औषधे केमिस्टकडून आणणे, आवश्यक तेव्हा मंडईतून फळे, भाज्या आणणे अशी कामे त्तपरतेने करतो. त्या ताईंच्या डोळ्यातील आनंद पाहून मला खूप समाधान मिळते. मला जुणी गाणी ऐकण्याची आवड आहे. माझ्या मोबाइलमध्ये ती साठवून ती सकाळी व्यायाम करण्याच्या वेळी, दुपारी घरगुती काम करताना, रात्री जेवण झाल्यावर शतपावली करताना ऐकतो. अशाप्रकारे मनासारखे शांतपणे जगत असल्याने दिवस कसा उजाडतो आणि मावळतो हे समजतच नाही.

मंगेश पै, माहीम

हेवा वाटावा असे आनंदी सहजीवन

नुकताच माझा ८४वा वाढदिवस माझ्या मुलांनी साजरा केला. माझ्या सुदृढ प्रकृतीविषयी सर्वानी कौतुक केले. सदैव आनंदी, मदतीला धावणारा प्रेमळ वडीलधारी माणूस, असेही कुणी कुणी म्हटले. बरे वाटले. सध्याचे भरभरून जगताना माझे वेगळे व्यक्तिमत्त्व कसे घडले याचे सिंहावलोकन करावेसे वाटले म्हणूनच हा लेखप्रपंच!

वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकनंतर मी भारतीय वायूसेनेत साधा शिपाई म्हणून भरती झालो. पंधरा वर्षे खडतर जीवन जगून नागरी जीवनात परत आलो. त्या नोकरीत असताना बाहेरून पदवी मिळवली. पहिल्या सेवानिवृत्तीनंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये वयाच्या ४०व्या वर्षी कारकून म्हणून नोकरी पत्करली. मॅनेजरपदावरून वयाच्या ५६व्या वर्षी निवृत्त झालो. पुढे काय? हा प्रश्न होता. आता थोडी उसंत मिळाली. नियिमत व्यायाम, शाकाहारी जेवण, पत्नीची पूर्ण साथ. एक मुलगा आणि मुलगी शिकून नोकरीस लागली. विवाहितही झाली.

लहानपणापासून मला लेखन-वाचनाची आवड होती. दोन्ही नोकऱ्यांत बरे-वाईट अनुभव आले होते. कथालेखन सुरू केले. त्या अनुभवांवर कथा प्रथित मासिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. निवडक कथांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. पंचवीस बालकथा लिहिल्या. रोजच्या जीवनातील आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांवर वाचकांच्या पत्रांत शंभर एक लेख लिहिले. निरनिराळ्या सदरांतून मुलाखती, लेख लिहीत असतो वेळ फार छान जातो. आकाशवाणीवर कथावाचन केले; करत असतो.

माझी पत्नी आज ७९ वर्षांची आहे. माझ्या दुसऱ्या निवृत्तीच्या सुमारास ती ‘मसाला सुपारी’ तयार करून विकत असे. शिवाय पोस्टाची बचत एजंट म्हणून ती काम करत होती. माझ्या निवृत्तीनंतर मी तिला या दोन्ही व्यवसायांत मदत करत होतो. व्यवसाय वाढवला. दोघांचेही सहजीवन छान जात असे. लोकसंपर्क चांगला असल्याने वधू-वर सूचक म्हणून काम करून अनेकांच्या विवाहांस हातभार लागला. दोन्ही नोकऱ्यांतील सेवानिवृत्ती पेन्शन मिळत असल्याने आणि बचतीच्या सवयीमुळे आम्ही स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत. मुलांबरोबर न राहता स्वतंत्र जागेत त्यांच्या घराजवळच राहतो. त्यांनाही पूर्ण स्पेस देऊन संबंध प्रेमाचे आणि आपुलकीचे ठेवल्यामुळे मानसिक समाधान आहे. ताणतणाव तर बिल्कूल नाही. मुलांच्या, नातवंडांच्या चांगल्या कामाबद्दल शाबासकीची थाप सदैव असते. मागितला तरच सल्ला देतो.

असे आम्हा दोघांचे चिरतरुण जीवन जगताना मिळणारा आनंद काही आगळाच आहे. हेवा वाटण्यासारखा!

– मधुकर खोचीकर, कोल्हापूर</strong>

कृतार्थ आयुष्य

मीआज वयाच्या ७५व्या वर्षी जीवनाच्या सर्व अंगांचा रसरसून आस्वाद घेते आहे. बालपण, तारुण्य सुख-समृद्धीत गेल्यामुळे, वैवाहिक जीवन सुखी झाल्यामुळे निवृत्तीच्या आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यामुळे आयुष्य उदास, केविलवाणे झाले नाही. शिवाय प्रकृतीच्या काहीच तक्रारी नाहीत. त्यामुळे जगण्यात उत्साह आहे. सकाळी उठल्यापासून उत्साहाला सुरुवात होते. पहिली गोष्ट वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवणे. (आजही रोज तीन, चार वर्तमानपत्रे घरी येतात) नवीन शब्दांची माहिती होते. नवीन अर्थ कळतो. वाचनाची अतिशय आवड आहे. नवीन कथा, कादंबऱ्या वाचते. आत्मचरित्र, चरित्र वाचायला आवडते. आवडलेल्या कथा, कादंबऱ्या, माझी मते, आवड लेखक/लेखिकेला दूरध्वनी करून कळवते. तेव्हा त्यांना झालेला आनंद त्यांच्या धन्यवाद देण्यावरूनच लगेच कळतो.

माझी बहीण आणि वहिनी यांनाही वाचनाची आवड आहे. त्यांच्याशी चर्चा करते. जुनी पुस्तके माझ्या अतिशय आवडीची माझ्या संग्रही आहेत. उदाहरणार्थ डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. रखमाबाई, रमाबाई रानडे, स्मृतिचित्रे,

डॉ. केतकर ही पुस्तके परत परत वाचते. काही पुस्तके, विचार करायला प्रवृत्त करतात. वर्तमानपत्रातील पुरवण्यादेखील खूप वाचनीय असतात. त्या सर्वाचा आस्वाद घेते. कधी कधी घरकाम बाजूला ठेवून वाचते.

संगीत स्वर्गीय सुखाचा आनंद देते. आजही मी शास्त्रीय संगीताच्या मैफिली, जलसे वेळेप्रमाणे आणि सवडीप्रमाणे ऐकायला जाते. सिनेसंगीताच्या सुवर्णकाळातील तसेच अगदी सैगल, नूरजहां यांपासूनची गाणी ऐकते. माझ्याकडे गाण्याचा संग्रह आहे. सिनेसंगीताची पुस्तके माझ्याकडे आहेत. (पूर्वी मिळायची) तसेच ‘मराठी गोड गोड भावगीते’ ही पुस्तके आहेत. (आता जीर्ण झाली आहेत) गाणी इतकी आवडतात की कधी ती गुणगुणते तर कधी कधी मोठय़ाने स्वत:च्या आनंदासाठी म्हणते. मूडच बदलून जातो अगदी.

सासर-माहेर खूप छान. जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे सतत काही ना काही निमित्ताने एकत्र येतो. तेव्हा बऱ्यापैकी तयार होऊन जाते (छान छान साडय़ा, दागिने वगैरे) तेव्हा लोकांच्या डोळ्यांतले कौतुक नजरेने टिपते. जे वय विसरायला लावते. कधी कधी सहलीला जाते. आम्ही बाहेरगावी ट्रिप काढतो. तेव्हा चेष्टामस्करी, गप्पा गाणी होतात. सगळे जण भाग घेतात. नातेसंबंध आणखी घट्ट होतात.

मी देवाला मानते. माझी देवावर श्रद्धा आहे. झोपताना देवाचे आभार मानते. देवाला सांगते, माझ्या सर्व देशबांधवांना निदान दोन वेळेचे पोटभर जेवण आणि दोन जोडय़ा कपडे दे. आमची भूमी ‘सुजलाम् सुफलाम्’ होऊ दे. सर्वाना अव्यंग म्हणून जन्माला घाल. सर्वाना ही सृष्टी बघू दे. निसर्गाचे संगीत ऐकू दे. एकमेकांना बघू दे, बोलू दे, एकमेकांशी संवाद साधू दे. कुणालाही अनाथ म्हणून जन्माला घालू नकोस. बालक, बालिका, स्त्रियांना सर्वाना संरक्षण दे. एवढे म्हणून मी शांतपणे झोपेच्या आधीन होते.

– सरला डिसूझा, मुंबई

रिटायर्ड बट नॉट टायर्ड

मीकल्याणच्या सार्वजनिक जीवनात पूर्णपणे एकरूप झालो आहे. ३७ वर्षे यशस्वीपणे नोकरी करून, पदोन्नती घेऊन १९९३ मध्ये श्रेणी एक च्या पदावरून निवृत्त झालो. पत्नी सुगृहिणी आणि सुना सुस्वभावी असल्याने निवृत्तीनंतर सतत सामाजिक कार्यात गढून गेलो. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन विविध संस्थांमध्ये कामे केली. विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित छंद प्रदर्शनात माझे वृत्तपत्रीय कात्रणांचे संकलन ठेवले होते आणि त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यंतरामध्ये पत्नी आणि धाकटय़ा मुलाच्या वियोगाचे दु:ख सहन करावे लागले. मात्र त्यावर कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने धीराने मात केली. त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये अधिकच गुतंवून घेतले. विविध संस्थांमध्ये मी पदाधिकारी आहे. उद्यानात एकत्र जमणाऱ्या ज्येष्ठांचा संघ स्थापन केला. सदस्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सोडवण्यासाठी योग्य प्रयत्नही केले.

डायबेटिक क्लबचा मी कोषाध्यक्ष होतो. वयामुळे माझा उत्साह कमी होत नाही. जलद चालण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतला. पेन्शनर असोसिएशनचा मी आजीव सदस्य असून हिशेब तपासनीसही होतो.

कल्याण नागरिक साप्ताहिकाचे  काम मी १० वर्षे केले. काही वर्षांपूर्वी माहिती अधिकाराच्या कायद्याचा अभ्यास केला. पोलीस, महानगरपालिका अशा विविध प्रशासकीय व्यवस्थांकडे जाऊन लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. एकेरी वाहतूक व्यवस्था आमलात आणणे, फूटपाथ मोकळे करणे अशा समस्यांवर विविध मार्गानी उपाय शोधत आहे. उतारवयातील समस्यांपासून मी सध्या तरी दूर आहे.

रवीकांत गुमास्ते, कल्याण</strong>

मनाप्रमाणे जगणे

आयुष्याची सारी वर्षे शाळेत घालविल्यानंतर निवृत्तीच्या वेळी मी ठरवले की आपण आता कुणाचे बांधील राहायचे नाही. आपला छंद जोपासायचा आणि आपल्या मनाप्रमाणे आनंदाने जगायचे, भरभरून आनंद घ्यायचा.

लहानपणी नाटकांत काम करायचे, ते आठवून एकपात्री प्रयोग करायला सुरुवात केली आणि चक्क माझं वयच मी विसले. शाळेत जाऊन रामरक्षा शिकवू लागले. त्यांची परीक्षा घेऊन त्यांना बक्षिसे दिली.

नोकरीत असताना भारतीय संस्कृती पीठम्चा अभ्यास करण्याची संधी मिळाली होती. त्यावरून भारतीय संस्कार कोणते ते कसे अंगी बाणवावेत हे समजावून सांगण्याचा कार्यक्रम करते. निवृत्तीनंतर मी दादर येथील भारतीय कीर्तन संस्था येथे ३ वर्षांचा कोर्स करून कीर्तनालंकार ही पदवी मिळवील. आता घरातूनही निवृत्ती घेऊन घरातील सर्व जबाबदारी सुनेवर सोपवून मी कीर्तनाचा आनंद मिळवते आहे. मी भजनही शिकले.

मतिमंद मुलांच्या शाळेत रोज दोन तास जाऊन त्यांना इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग लिहिणे, रंग ओळखणे, हस्तकला शिकवणे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे आदी करत असे. सोसायटीत राहणाऱ्या एकटय़ा स्त्रियांच्या घरी जाऊन त्यांना गोष्टी सांगणे, भजन म्हणणे असे उपक्रम राबवून त्यांचा सोबत करते. त्यामुळे विचारांची देवाणघेवाणही होते.

 – सुमन याडकीकर, मुलुंड

मराठीतील सर्व भरभरून जगताना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement purposeful life after retirement successful retirement life