शिक्षकी पेशातील अपुरे वेतन, त्यात खाणारी तोंडे पाच. पण आमच्या सौभाग्यवतीच्या सौजन्यपूर्ण स्वभावामुळे सर्व निभावून गेले. गावाकडील बरीच मंडळी नोकरीनिमित्त मुंबईत आलेली होती. ती आणि मी एकाच गावातील! सर्व परिचित नात्यागोत्यातील! एकदोन बैठकींतच गावचे मंडळ स्थापन झाले.
माघी गणपतीचा उत्सव पूर्वी साजरा होत होताच, पुन:श्च हरी ओम करायचं ठरवून उत्सव सुरू झाला. गावात सर्वाची घरे होती. पण वास्तव्य नाही त्यामुळे ओसाड होती. उत्सवाच्या निमित्ताने तीन/चार दिवस राहायचं म्हणजे अडचण होती. म्हणून एकत्र भोजन व्यवस्था सुरू केली. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व तयार मिळे. २०/२५ वर्षांचा हा काळ सर्वानाच मोठा आनंदाचा गेला. नवी ऊर्जा घेऊन मंडळी मुंबईस परतत. अगदी माहेरवाशिणीसुद्धा. १९९७ मध्ये बोरिवली पूर्व येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. आज दर बुधवारी ९० ते १०० स्त्री-पुरुष आम्ही एकत्र जमतो. या संघामुळे खूप परिचय वाढला. आपुलकी वाढाली. संघातील बरीच मंडळी आमच्या गणपती उत्सवालाही येतात. १२ वर्षे या संघाचे कार्यवाह पद सांभाळले. आता निवृत्त!
आता वय झाले! दोन कर्ते मुलगे. सुविद्य आणि समंजस सुना, चार हुशार नातवंडे सर्व एकत्र कुटुंबात आहोत. आम्हा उभयतांची प्रकृतीही ‘चांगली’ आहे. एकत्र कुटुंबातील सर्व सुख उपभोगत आम्ही भरभरून जगतो आहोत!
– रामकृष्ण महादेव देशमुख, मुंबई</strong>
छंदामुळे आयुष्य सुखकर
मे २००० मध्ये मी ६० वर्षांचा झालो आणि क्षणात नैतिकदृष्टय़ा निरुपयोगी झाल्याची जाणीव झाली. आता पुढचे आयुष्य कसे काय घालवावे याची चिंता होतीच, कारण म्हातारपणात येणारा आजारपणाचा खर्च, मुलींची लग्ने यातून काहीतरी मार्ग काढणे हाच एकमेव उपाय होता. माझ्या तांत्रिक शिक्षणाचा आधार घेऊन मी मग रोज जाहिराती बघू लागलो. मला नोकरीची संधी चालून आली अन् मग २००७ पर्यंत ती केली, परत काय करावे? हा यक्षप्रश्न उभा ठाकला! अचानक एके दिवशी माझ्या जुन्या ऑफिसातील एक व्यक्ती भेटली व त्याने सांगितले की, त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला बंगल्याचा प्लॅन करून हवा आहे त्याप्रमाणे प्लॅन करून दिला. तो बांधून तयार झाल्यावर मालक खूश झाला. त्यानंतर अशाच प्रकारे कामं केली, त्यातून बऱ्यापैकी पसा मिळाला, सोबत छोटी-मोठी कामे मिळत होती आणि मी ती पूर्ण करीत होतो.
वयोमानाप्रमाणे आता तरी तशी कामे करण्याचे मनही अन् धाडसही होत नाही. पसा जेवढा कमवाल तेवढा तो कमीच पडतो. निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या गणितात काहीही केले तरी पुढे काय? ती बाकी राहतेच. नोकरी सुटण्याआधी व नंतरच्या काळात मला इमारतीचे मॉडेल करण्याचा छंद होता, निरनिराळ्या आर्किटेक्टकडे जाऊन व बिल्डर्सना भेटून मी पूर्वी केलेल्या मॉडेल्सचे फोटो दाखवून बरीच कामे मिळवली. बऱ्यापैकी पसा मिळाला. ड्रॉइंगकडे कल व हात असल्याने स्केचेस व रेखाटने करून दिली. या सर्व कलांचा आधार घेऊन निवृत्तीनंतरही हा छंद जोपासला परंतु आता ते शक्य होत नसल्याने हे काम बंद करणे भाग पडले.
वेळ जाण्यास काहीतरी छंद मागे लावून मन गुंतवून ठेवावे असे वाटत होते, पण काय करावे हे काही सुचेना. एके दिवशी वाचनात आले की पेपरचा लगदा न करता शोभिवंत वस्तू तयार करण्यात येतात, त्याप्रमाणे जुजबी माहितीवरून मग हा प्रयोग करून पाहिला, पुढे नेटवरून माहिती घेऊन आज मला खूप काही जमले असे वाटते. आता माझा रोजचा कंटाळा जाऊन एक छंद वाढीला लागला. याप्रमाणे हवा तसा बदल करून मी आजमितीत जवळजवळ ४० शोभिवंत वस्तू तयार केल्या आहेत. एकटय़ाने चालू केलेला हा प्रवास असाच पुढे चालू ठेवून वेळेचा सदुपयोग करून पुढील आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. आज वयाची ७८ वर्षे आनंदात घालविली याच ध्येयाने पुढील आयुष्याची सांगता होवो.
– अरविंद खानवलकर
स्वप्नवत प्रवास
खासगी कंपनीत १९५७ मध्ये प्रवेश करून तेथील २६ वर्षांच्या वास्तव्यात स्टेनो ते पर्सोनेल ऑफिसर असे सोपान चढलो. काही हितशत्रूमुळे ही नोकरी बदलावी लागली. पुढील १० वर्षांत दोन विभिन्न क्षेत्रातील कंपन्यात नोकऱ्या केल्या. शेवटी डेप्युटी जनरल मॅनेजर पदाचा राजीनामा देऊन स्वतंत्र व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘कामगारविषयक’ सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. २०१० पासून म्हणजे वयाच्या साधारणत: पंचाहत्तरीपासून मी प्रकृती आणि प्रवृत्तीला मानवेल असे समाजकार्य, संगीत, खेळ, वाचन इत्यादी छंद जपत निवृत्ती जीवन जगत आहे.
८३ वर्षांच्या दीर्घ जीवन प्रवासात बी.ए., एलएल.बी. व व्यवस्थापन विषयातील पदविका मिळविली ज्यात कंपनीच्या व्यवस्थापनाने सक्रिय प्रोत्साहन दिले. बऱ्या-वाईट अनुभवांचे फलित म्हणजे विचारांच्या दिशा रुंदावल्या. पदवी नसल्याने बढतीला नकार, माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाला कारणीभूत झाला तर हितशत्रूमुळे नोकरी बदलून उत्कर्षांचा मार्ग चोखाळला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला दहा माणसांच्या एकत्र कुटुंबाचा दोन खोल्यांचा अनुभव व आता अखेरीला विभक्त कुटुंबाच्या चालू जमान्यात मोठय़ा मोकळ्या सदनिकेत राहण्याचा आनंद माझ्या वाटय़ाला आला हे माझे भाग्यच म्हणावे. सौभाग्यवतीच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे मार्गक्रमण सुकर व सुखावह झाले. एकत्र कुटुंबात आमच्या सहा भावा-बहिणींत निर्माण झालेले सौहार्द पुढील पिढय़ांत झिरपले आहे ही आजच्या जमान्यातील एक दुर्मीळ गोष्ट म्हणावी लागेल.
आयुष्यात पसा हे ध्येय कधीच नव्हते. उधळ-माधळ व नको तितकी काटकसर न करता योग्य तो खर्च करूनही आनंदाने जगण्यापुरता (निवृत्तीनंतरही) पुरेसा पसा मिळाला. दोनही मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता आले. आपआपल्या व्यवसायात ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. मुलेच नव्हे तर सुनाही आम्हा दोघांचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जावे यासाठी तत्परतेने काळजी घेत असतात. नातवंडेही त्यांचे शिक्षण संपवून आपले भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. सुख व भरभरून जीवन जगणे यापेक्षा वेगळे ते काय?
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मला माझा हा प्रवास केव्हा केव्हा स्वप्नवत वाटला तरी ते एक सत्य आहे व ते मी जगलो आहे.
– चंद्रकांत खरे, मुंबई
निवृत्तीचा काळ सुखाचा
सेवानिवृत्त होऊन आज १८ वर्षे पूर्ण होताना मागे वळून बघताना भरभरून जगल्यासारखे वाटत आहे. समाजसेवा वगैरे केली नाही, पण व्यक्तिगत पातळीवर कर्तव्य व गरजूंना थोडी मदत केली.
रेल्वे मंत्रालयाच्या ‘रिसर्च अॅण्ड डिझाइन’ विभागात लखनौ येथे ३३ वर्षे नोकरी केली. अनेक ठिकाणी अनेक वर्षे राहिल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा विशाल झाला. आयुष्यात संकटेही आली. २००९ ते २००१५ या काळात पत्नीच्या पाच मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या. सुदैवाने ती या सर्वातून बरी होऊन पुन्हा स्वावलंबी झाली. आमच्या घराजवळ ‘वात्सल्य ट्रस्ट’ आहे. पत्नीसाठी घेतलेली वैद्यकीय उपकरणे या संस्थेला दिली. कपडे व इतर उपयोगी वस्तू वेळोवेळी देत असतो.. गेली १८ वर्षे आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो आहोत. नोकरीचा ३३ वर्षांचा काळ उत्तर प्रदेशात घालवूनही येथे नवी मुंबईत बऱ्यापैकी मित्रमंडळ जमले आहे. इंटरनेटवरती पुस्तकं वाचतो. ७९ वर्षांत प्रवेश करताना प्रकृती ठीक आहे. आणखी काय पाहिजे?
– पद्माकर औटी (नवी मुंबई)
अवघे वयोमान १०१
जीवनातील सुखदु:खाच्या प्रत्येक प्रसंगाकडे तटस्थ वृत्तीने पाहून आनंदी आणि समाधानी वृत्तीने जीवन व्यतीत करणं मनावर आणि शरीरावर ताण येऊन देणाऱ्या उपक्रमामध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणं आणि नियमित व्यायाम करून शरीरस्वास्थ्य टिकवणं हे माझ्या दीर्घायुष्याचं रहस्य असावं.
१८ मार्च २०१८ रोजी मी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षांत पदार्पण केलं. माझ्या अंदाजाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे लाखातून एखाद्याच व्यक्तीला शंभर वर्षांचं आयुष्य लाभत असावं. आज वयाच्या १०१ व्या वर्षी माझ्या शंभर वर्षांच्या जीवनपटाचं सिंहावलोकन करताना काही ठळक गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. वयाच्या अंदाजे
२५ व्या वर्षी चांदा-बल्लारशाह (महाराष्ट्र राज्य) येथे माझी शिवकुमार शास्त्री या योग्याशी भेट झाली. त्यांच्याकडून शिकवल्या गेलेल्या व्यायाम पद्धतीप्रमाणे तेव्हापासून आजतागायत मी सकाळी नियमित व्यायाम करतो. या व्यायामात शारीरिक व्यायामाबरोबरच (शारीरिक व्यायामात पायांच्या बोटांपासून, खांदे मान वगैरे सर्व सांध्यांचा तसेच कान, नाक, डोळे, जीभ इत्यादी पंचेंद्रियांच्या व्यायामाचा समावेश असून त्या त्या अवयवांच्या ठिकाणी त्या त्या अवयवांच्या व्यायामाच्या वेळी मन एकाग्र करणे आणि काही निवडक आसने करणे अशा प्रकाराची ही व्यायाम पद्धती आहे.) त्यानंतर सुखासन करतो. शवासनाला मन तंदुरुस्त राखण्याकरता दिलेलं पर्यायी नाव म्हणजे सुखासन.
मला वाटतं की शारीरिक व्यायाम आणि त्याच्या जोडीला मनाला चांगलं वळण लावणं या आणि एवढय़ाच गोष्टी दीर्घायुष्यासाठी पुरेशा नसाव्यात. पतीला, पत्नीची आणि पत्नीला पतीची लाभलेली भक्कम साथ, कुटुंबातील सदस्यांकडून मिळणारी प्रेमादरयुक्त वागणूक, इतर नातेवाईक, शेजारीपाजारी इत्यादींच्या सदिच्छा प्रेम या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असाव्यात. स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाचा एक सर्वसाधारण सभासद असल्याचा अपवाद सोडून मी कोणत्याही सामाजिक / अशासकीय संस्थेशी बांधला गेलेलो नाही, तरीही मी जवळजवळ पूर्ण दिवस कार्यमग्न असायचो – वयाच्या ९७ /९८ व्या वर्षांपर्यंत. माझा मित्रपरिवारही खूप मोठा नाही, मात्र मी अजातशत्रू आहे.
आज वयाच्या १०१ व्या वर्षीही सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधी आटोपल्यावर माझ्या दिवसाची सुरुवात ‘आनंद’ या शब्दाने होते. त्यानंतर व्यायाम, शुभभावना, प्राणोपासना, सुखासन, नंतर अर्धा ते पाऊण तास झोप, नंतर चहापान, वृत्तपत्र वाचन इत्यादी झाल्यावर दुपारचं जेवण, नंतर भरपूर झोप (एवढं वय झाल्यावर साहजिकच थकवा जाणवतो त्यामुळे झोपेचं (किंवा नुसतं पडून राहण्याचं) प्रमाण वाढलंय). उरलेल्या वेळात अवांतर वाचन (ग्रंथालयातून पुस्तकं घरी आणून). (मी बी.सी.एस.अॅण्ड टी.मधून मार्च १९७६ मध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झालो.)
९५ व्या वर्षांनंतर माझ्या कानात दोष निर्माण झाला. श्रवणशक्ती कमी होऊ लागली. आता मला खूप कमी ऐकू येतं आणि पाय/गुडघे दुखतात आणि चालही खूप मंदावली आहे. चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो. परंतु आजच्या माझ्या वयाचा विचार करता हे स्वाभाविक आहे. अशा स्थितीतही मी आठवडय़ातून चार-पाच वेळा आमच्या घराचे दोन मजले चढतो. आमच्या सोसायटीच्या आवारात (खूप मोठं आवार आहे) फेरफटका मारतो आणि क्वचित सोसायटीबाहेर काही किरकोळ वस्तू आणण्यासाठी तसेच काही कामानिमित्त पोस्ट ऑफिसात आणि क्वचित बँकेतही जातो. आज वयाच्या १०१ व्या वर्षी मी जीवनाबद्दल कृतज्ञ आणि खूप आशावादी आहे. या वयातही मला मधुमेह, उच्च / कमी रक्तदाब हृदयविकार यापैकी कुठलाही विकार नाही. या वयातही मी भरपूर गोड खातो. आयुष्यातील गोडवा टिकवून कमीतकमी १०५ वर्षांची मजल गाठण्याची आशा मी बाळगून आहे. फक्त याकरता मला साथ हवी सर्वाच्या सदिच्छांची आणि हो नियतीचीही!
विश्वनाथ जनार्दन पोतदार
जगावेगळा बोनस
निवृत्तीनंतर काय करायचे याची योजना बहुतेक लोकांनी निवृत्तीपूर्वीच केलेली असते. त्याप्रमाणे मीही शिक्षकी पेशातून निवृत्त होताच अनेक गोष्टी करण्याचे आणि शिकण्याचे ठरवले होते. पण आपल्या योजनेप्रमाणे सर्व होतेच असे नाही!
निवृत्त होताच थोडय़ाच काळात मला किडनीच्या विकाराने ग्रासले. त्याच्या अनुषंगाने येणारे महागडे उपचार आणि खाण्या-पिण्याची बंधने सुरू झाली. याकडे जराही दुर्लक्ष करून चालणार नव्हते, कारण डायलिसिसच्या दुष्टचक्रात अडकण्याचा धोका डॉक्टरांनी दाखवला होता. त्यामुळे सर्व काही काटेकोरपणे करणे भागच होते. या सर्व दु:खात एकच आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे माझे संगीताचे वेड!
खेडेगावात गेलेले बालपण आणि लहान वयात झालेल्या विवाहामुळे शिक्षण पूर्ण करण्याच्या नादात संगीतप्रेम बाजूलाच पडले होते. नोकरीत आणि संसारात स्थिरस्थावर होताच गाणे शिकायला सुरुवात केली होती. हळूहळू गळा तयार होऊ लागला. स्वरांची आणि तालाची समज येऊ लागली. अॅक्युप्रेशर उपचार पद्धती शिकून घेतली. गरजू लोकांना मोफत सेवा देऊन बरेही केले. पौरोहित्याचे शिक्षणही घेऊन घरात त्याचे पठण सुरू ठेवले. हे सर्व उद्योग चालू असताना प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागत होते. पण मुलांच्या सहवासात माझ्या दुखण्याचा मला विसर पडत होता. सुरुवातीला आलेली निराशा दूर पळाली होती. निवृत्तीनंतरच्या दिनचर्येला सुरुवात झाली होती. आणि अचानक एक दिवस शाळेने एक प्रस्ताव मांडला. तो असा की माझ्याच शाळेच्या मुलांना दैनंदिन प्रार्थना शिकवावी आणि आंतरशालेय समूहगीत स्पर्धासाठी मार्गदर्शन करावे. आमच्या शाळेत रोज नवीन आणि निरनिराळ्या भाषांतील प्रार्थना असतात. माझ्या आवडीचे काम असल्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मी लगेच कामाला लागले. विद्यार्थ्यांचा सहवास पुन्हा मिळू लागला. शाळेतले सहकारी भेटू लागले. हे काम आजही सातत्याने विनामोबदला चालू आहे. शाळेने यंदा स्नेहसंमेलनात बोलावून व्यासपीठावर माझा बहुमान करून माझे कौतुक केले. यामुळे अजूनच हुरूप आला आहे. आता पंच्याहत्तरीकडे वयाची वाटचाल सुरू आहे. आणि डायलिसिसची नौबत अजूनही आली नाही आणि ती कधीच येऊ नये याची पूर्ण दक्षता मी घेत आहे. मुलांच्या गोड, फुलपंखी रंगीबेरंगी सहवासात आणि सुरेल स्वरांमुळे मिळालेले हे आयुष्य म्हणजे संगीताने मला दिलेला बोनसच आहे.
– मीनाक्षी सावरकर, मुंबई
व्यग्र जीवनशैली
शारीरिक श्रमाची सवय, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये वावर, सामाजिक कार्याकडे ओढा, प्रवासाची आवड, निरीक्षण शक्ती, वाचन, लेखन या गोष्टींचा पूर्वायुष्यात पाया रचला गेला. २००१ मध्ये बँकेचा निरोप घेतला. आजमितीस चेहऱ्यावर अथवा हालचालीत निवृत्तीचा ठावठिकाणा दिसत नाही. नोकरीत असतानाच डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेशी निगडीत होतो. त्यानंतर गेली ७-८ वर्षे संघाच्या जनकल्याण समितीबरोबर ग्रामीण भागात काम केले. या कामांशिवाय नातेवाईकांच्या सहली काढणे, निरनिराळे उपक्रम करणे, सेवा कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्यक्षेत्रस्थानाला भेटी देऊन त्यांना अर्थसहाय्य करणे सुरू असते. त्याचप्रमाणे डोंबिवली, ठाणे आणि पुणे येथील बँकेतील माजी सहकाऱ्यांच्या गाठीभेटी, पर्यटन इत्यादी गोष्टीही चालू असतात. पंचाहत्तरीचा कार्यक्रम न करता येत्या वर्षभरात शालेय जीवनापासून माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची वीस गटांत विभागणी करून त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी आणि चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्याबरोबर मी वाचन, लेखन हे छंदही जोपासले आहेत.
– अच्युत खरे, डोंबिवली