‘‘आयुष्याच्या बाबतीतही जसं आयुष्य येत गेलं तसं ते घेत गेले. अडचणी आल्या, संघर्षही करावा लागला, पण मी त्याचा कधी बाऊ केला नाही. त्यामुळे माझ्या स्वभावात बिनधास्तपणा आपसूकच आला, थोडी दादागिरी आली. साहजिकच भावनाप्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला मला जास्त आवडल्या..’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेत्या भारती आचरेकर
जबलपूरला ‘हमीदाबाईची कोठी’ चा प्रयोग होता. प्रयोग संपला आणि साधारण सत्तरीची बाई आत आली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहूनच अंदाज आला की ही बाई राजघराण्यातली असावी. तिने विजयाबाईंना (मेहता)अगदी दंडवतच घातला. ती म्हणाली की साधारणपणे १९४२ चा तो काळ होता जेव्हा या कोठय़ा अस्तित्वात होत्या आणि मी स्वत: तो काळ पाहिलेला आहे. तुम्ही हा सगळा काळ इतका जिवंतपणे कसा काय उभा करू शकलात? आणि त्या सईदाचं काम केलेल्या मुलीला मला भेटायचंय असं म्हणत ती माझी चौकशी करत आली. माझ्या कामाची खूपच प्रशंसा करत म्हणाली, ‘‘अगं, अशीच एक सईदा माझ्याही घरी आहे. कोठय़ावर नाचता नाचता ती तिथून पळून आली आणि तेव्हापासून ती माझ्याकडे आहे. आज तुझ्या निमित्ताने तिची सगळी कथा पुन्हा एकदा माझ्या डोळय़ांसमोरून तरळून गेली. खूप छान पद्धतीने ही भूमिका तू पेललीस.’’ माझ्या अभिनयाच्या बाबतीत मला मिळालेली सगळय़ात महत्त्वाची पावती होती ती. इतकं आडवळणाचं कॅरॅक्टर अभ्यास करून इतकं चांगलं करता येईल, असं वाटलं नव्हतं. पण माझ्या हातून ते घडलं. सईदाने मला एक ओळख दिली, एक आत्मविश्वास दिला. नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी यांच्यासारखे जाणते सहकलाकार दिले आणि मुख्य म्हणजे विजयाबाईंसारख्या उत्तम शिक्षिका दिल्या. ज्यांच्यामुळे एक कलाकार म्हणून मी घडत गेले.
विजयाबाईंच्या विद्यापीठात शिकणं हा खरं तर एक कलावंत म्हणून समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांच्यामुळे भूमिकेचा विचार कसा करायचा, त्यात नेमकं महत्त्वाचं काय आहे, एखादी व्यक्तिरेखा उभी करताना अगदी छोटय़ा गोष्टींचा, हातवाऱ्यांचा कसा विचार करावा ते कळलं. ‘हमीदाबाईची कोठी’तली सईदा करताना मला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. सईदा ही तवायफ. तवायफ म्हणजे कोठय़ावर गाणारी. बाईंनी सांगितलं होतं की भूमिकेचा अभ्यास करून ये. पण मी तवायफ बघितली नव्हती. त्या वेळी मुंबईत ग्रॅण्ट रोडला अलंकार टॉकीजजवळ गाणाऱ्यांच्या कोठय़ा होत्या. मी माझ्या वडिलांना सांगितलं की काहीतरी ओळख काढा. मग पुढचे दोन दिवस आम्ही, बाबा आणि मी त्या गाणाऱ्यांच्या कोठय़ावर फिरत होतो. त्यांचं उठणं, बसणं, बोलणं, त्यांचा नखरा हे सगळं मी पाहत होते, त्यांच्या लकबी टिपत होते. त्याप्रमाणे मी जाऊन रिहर्सल करायला लागले. त्यात मी माझ्या परीने भूमिका करत होतेच पण तरीही बाई अशी एखादी गोष्ट सांगायच्या की त्या भूमिकेचा नूर बदलून जायचा. एक प्रसंग होता, त्यात मी एक पाय दुमडून त्यावर कोपर टेकवून अडकित्ता हातात घेऊन सुपारी कातरत असते. तेवढय़ात तिथे अशोक सराफ अर्थात लुक्का येतो आणि मी कोपर तसंच पायावर टेकवून नुसता हात त्याच्याकडे करते आणि त्याला रांगडय़ा आवाजात हाक मारते, लुक्का.. पण यावर बाई म्हणाल्या की नुसता त्याच्याकडे हात करून हाक नाही मारायची तर हात खांदय़ातून उचलून त्याच्या दिशेला ने आणि मग त्याला हाक मार. अर्थात बाईंनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि केवढा तरी फरक पडला. त्या हाक मारण्यात एक फोर्स आला. मुळात त्या बायका बिनधास्त असतात, पण चिपनेस नसतो त्यांच्यात,  खानदानी असतात त्या. सईदा उभी करताना अशा अनेक गोष्टी बाईंनी सांगितल्या म्हणून ही सईदा मी उत्तम साकारू शकले. महत्त्वाचं म्हणजे बाईंमुळे स्टेजक्राफ्ट कळला. त्या सतत स्टेजवर वावरत असल्यामुळे खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टी सहज बघता आल्या, शिकता आल्या. एखादं नाटक बसवताना बाई मेहनतही खूप करवून घेत असत. रिहर्सलच्या वेळी आम्ही सगळय़ांनी तिथे असणं महत्त्वाचं असायचं. त्यामुळे सगळ्या व्यक्तिरेखा एकमेकांना माहिती असायच्या, वाक्यं पाठ असायची, अॅक्शन-रिअॅक्शनला महत्त्व असायचं. त्या आम्हाला गृहपाठ दय़ायच्या आणि आम्ही तो करूनही यायचो. म्हणून विजयाबाईंचं काम साचेबंद आणि चोख मिळायचं.
त्या वेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ६ ते ७ रंगीत तालमी व्हायच्या. त्यामुळे पहिला प्रयोग अगदी दणक्यात व्हायचा. त्या वेळी अनेक दिग्गज कलावंतांना बाई रंगीत तालमींना बोलवायच्या, त्यांची मतं घ्यायच्या. ‘महासागर’च्या वेळी मला आठवतं, नाना, मी, नीना, विक्रम गोखले, मिच्छद्र कांबळी, उषा नाडकर्णी अशी मस्त टीम जमली होती आमची. या नाटकाच्या तालमीला एक मोठे कलाकार आले होते. ते म्हणाले होते की हे नाटक चालणार नाही. खरं तर आम्ही खूप नव्र्हस झालो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे पहिले २०-२५ प्रयोग नाटक जरा इकडेतिकडे झालं, पण नंतर मात्र हे नाटक तुफान चाललं. महिन्याला ३०-३० प्रयोग आम्ही केले. सव्वा वर्षांत ३००-३५० प्रयोग केले. लोक या नाटकाने भारावून जायचे. माझी बिनधास्त चंचल सुखवस्तू नायिका सुमी सगळय़ांना आवडत होती. अर्थात ती थेट माझ्यासारखी होती. म्हणून मी छान करू शकले, असं मला वाटतं.
या कलाप्रवासातल्या बऱ्याचशा माझ्या भूमिका या माझ्या धाटणीच्या, माझ्या स्वभावाशी जुळणाऱ्या बिनधास्त होत्या, त्यामुळे त्या जशा समोर आल्या तशा त्या मी करत गेले किंवा अनेकदा त्यात असलेल्या गाण्यामुळे भूमिका मिळाल्या, त्यामुळेही मी त्या सहजपणे करत गेले. ‘नस्तं झेंगट’ या नाटकातही गाणी होती, त्यामुळे त्यात टेन्शन नव्हतं. ‘दुभंग’मध्ये मात्र वनमालाबाईंची भूमिका मला करायची होती. त्यांच्याविषयी मला फारसं माहिती नव्हतं, पण एकदा ते कळल्यावर सगळं जमलं आणि डॉ. लागूंबरोबर त्यात काम करायला मिळतंय ही सगळय़ात जमेची बाजू होती. त्यांची भाषा, त्यांचे उच्चार, डिक्शन, त्यांचं स्टेजवर वावरणं या सगळ्याचे संस्कार कळत-नकळत माझ्यावर होत गेले. मला असं वाटतं की सुरुवातीपासून खूप मोठय़ा व्यक्तींबरोबर काम करायची संधी मला मिळाली, त्यामुळे या सगळय़ांना खूप जवळून बघता आलं, अनुभवता आलं. त्यांचा रंगभूमीवरचा सहज वावर नकळत माझ्यातही भिनला आणि म्हणून असेल कदाचित मला भूमिकेचा वेगळा अभ्यास फारसा करावा लागला नाही. तसाही बिनधास्तपणा माझ्या स्वभावात मुळातच होता, त्यामुळे या मोठय़ा व्यक्तींबरोबर वावरण्याचं टेन्शन कधीच आलं नाही. आईच्या (ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा) गाण्याच्या निमित्ताने अनेक मोठी मंडळी नेहमीच आमच्या घरात येत होती. ही मंडळी बाहेर कितीही मोठी असली तरी आमच्यासाठी ती घरचीच होती. म्हणजे ‘धन्य ते गायनी कळा’च्या वेळी भीमसेन जोशी गाणी बसवणार होते. ते आमच्या घरी नेहमीच येत असत, त्यामुळे त्यांचं कलाकार म्हणून दडपण मला कधी आलं नाही. शिवाय त्या वेळी मी खूप लहान होते, त्यामुळे लौकिकार्थाने ही मंडळी किती मोठी होती, हे मला तेव्हा माहीतच नव्हतं. ‘अज्ञानात सुख असतं’ असं म्हणतात तसं काहीसं झालं. मकरंद सोसायटीत आम्ही बसवलेल्या ‘तुझं आहे तुजपाशी’तल्या बेबीराजेच्या भूमिकेसाठी जेव्हा मला राज्य नाटय़ स्पध्रेत उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मो. ग. रांगणेकरांच्या हस्ते मिळाला आणि मग मला रांगणेकरांनी ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकासाठी विचारलं. तेव्हा रांगणेकर किती मोठे हे मला माहीतच नव्हतं किंवा गोवा हिंदू असोसिएशनचं ‘तुझा तू वाढवी राजा’चे
मा. दत्ताराम दिग्दर्शक किती मोठे आहेत हे त्या वेळी कळलं नव्हतं, त्यामुळे वाटय़ाला आलेल्या भूमिका मी करत गेले, एवढंच मला माहिती आहे. त्याचा अर्थातच फायदा मला नंतर रंगभूमीवर झाला.
आयुष्याच्या बाबतीतही तेच झालं. जसं येत गेलं तसं ते घेत गेले. अडचणी आल्या, संघर्षही करावा लागला, पण मी त्याचा कधी बाऊ केला नाही. आम्ही चारही बहिणी, मामेभावंडं सगळी एकत्र पुण्याला आजोळी वाढलो. मी सगळय़ात मोठी त्यामुळे अगदी सगळय़ांचे डबे भरण्यापासून, वेण्या घालण्यापासून ते शाळेत फी भरण्यापर्यंत सगळय़ांची सगळी जबाबदारी माझ्यावर होती, पण आमच्यावर कुणाची जबरदस्ती नव्हती. आमचे निर्णय आम्ही घेत होतो. पण त्यामुळे माझ्या स्वभावात एक बिनधास्तपणा आपसूकच आला, थोडी दादागिरी आली. अर्थात त्यामुळेच माझ्याजवळ सहज कुणी यायचं नाही. मी इतकी र्वष एकटी राहत असूनही उगाचच जवळ येण्याचा कुणी प्रयत्न केला नाही किंवा कुणी गृहीतही धरलं नाही. तो बिनधास्तपणा माझ्या स्वभावातच होता. साहजिकच भावनाप्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला मला जास्त आवडल्या. शिवाय माझ्या सगळय़ा भूमिकांमध्ये गाणं हे मध्यवर्ती होतंच. मी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केलं. आईला अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १०व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत आईबरोबर पहिला कार्यक्रम केला. खरं तर त्या वेळी मी काही शास्त्रीय शिक्षण घेत नव्हते. मला राग-तालही ठाऊक नव्हते. पण आईने लावलेला स्वर मी जसाच्या तसा लावत होते किंवा तालाचे बोल, मात्रा माहीत नसल्या तरी समेवर अचूक येत होते, अगदी तिहाईदेखील घेता येत होती. गाण्याचं हे अंगही उपजतच मला होतं, त्यामुळे आई नेहमी म्हणायची की, ‘माज आहे तुला. अगं, इतकं येतंय तर गाणं कर.’ पण आईच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे मला गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. पण या गाण्याचीही गंमत आहे. नाटकात जेव्हा मी गाणं गाते तेव्हा मी बिनधास्तपणे गाते, पण गाण्याच्या कार्यक्रमाचं गायचं मात्र थोडं दडपण येतं माझ्यावर. अर्थात जवळजवळ २०-२२ र्वष मी आईबरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केलेत. माझा आवाजही आईच्या आवाजासारखाच असल्यामुळे मी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं. पण वयाच्या ३४व्या वर्षी माझ्यावर जी जबाबदारी येऊन पडली, त्यामुळे मनात असूनही मी गाणं पुढे करू शकले नाही. माझे पती डॉ. विजय आचरेकर अचानक गेले आणि छोटय़ा ९ वर्षांच्या सिद्धार्थला मोठं करण्याची जबाबदारी माझ्यावर एकटीवर आली. माझा मुलगा ही माझी पहिली प्राधान्याची गोष्ट होती. मी हिंदी मालिका, सिनेमा करत गेले, त्यामुळे ही जबाबदारी पार पाडू शकले. त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. आयुष्यभर काम करत राहिले. फक्त गाण्याने मी हे करू शकले नसते. आज सिद्धार्थ स्पेशल इफेक्ट्समध्ये मास्टर आहे. कॉम्प्युटर गेम्समध्ये त्याने स्पेशलायजेशन केलंय. त्यात गोल्ड मेडल मिळवलंय त्याने. माझी सून स्वरूपा उत्तम चित्रकार आहे. आचरेकरांचा कलेचा वारसा ती पुढे चालवतेय. आज दोघंही परदेशात स्थायिक झालेत.
आता मला हवं तसं, हवं तेव्हा आणि हवं तेवढंच काम मी करते. पण या कामाने समाधान आणि प्रसिद्धी ही तितकीच दिली. सगळे कलाकार आणि शिक्षकही चांगले मिळाले. जसं विजयाबाईंमुळे खूप शिकता आलं तसं ‘वागळे की दुनिया’च्या वेळी आर.के.लक्ष्मण यांच्यासारख्या ग्रेट माणसाकडूनही अनेक धडे गिरवता आले. ही मालिका एवढी गाजली की या मालिकेमुळे माझी एक वेगळी प्रतिमा लोकांसमोर आली. माझं मलाच आश्चर्य वाटतं की अत्यंत सभ्यपणे नवऱ्याशी बोलणारी या मालिकेतली अत्यंत संयमी राधिका मी कशी काय साकारली? अर्थात त्याचं सगळय़ात जास्त श्रेय आर. के. लक्ष्मण यांना जातं, कारण अत्यंत बारकाईने त्यांनी प्रत्येक भूमिकेचा विचार केला होता. ते स्वत: प्रत्येक कलाकाराला त्याची भूमिका समजावून सांगताना अभिनय करून दाखवायचे. इंग्रजीतून समजवायचे आणि मग आमच्याकडून करून घ्यायचे. प्रत्येक गोष्टीत त्यांचं लक्ष असायचं. प्रत्येक एपिसोडच्या तालमी व्हायच्या आणि मग त्याचं शूटिंग व्हायचं. म्हणून ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन’ची ही मालिका इतकी उत्तम होऊ शकली. फक्त १९ एपिसोड प्रसारित होऊनही या मालिकेला भरपूर प्रसिद्धी मिळाली. प्रत्येक एपिसोडमधला विषय इतका साधेपणाने मांडलेला असायचा की सर्वसामान्य माणसांना तो आपलासा वाटायचा. तेव्हा लक्षात आलं की आर्.के. लक्ष्मण यांचं कार्टून आपण पाहायचो पण त्यामागे त्यांचा किती विचार होता. त्यांच्यामुळे माझाही प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन मोठा झाला. २५ वर्षांपूर्वीच्या या मालिकेमुळे आजही अनेक प्रेक्षक मला ‘राधिका’ म्हणून ओळखतात. त्याचं उदाहरण नुकतंच घडलं. मी लंडनला एका मॉलमध्ये गेले होते. मी आणि माझी भाची एकमेकांबरोबर बोलत होतो. तेवढय़ात एक अफगाणी बाई मागून आली आणि थेट विचारलं,‘‘आप ‘वागळे की दुनिया’ की राधिका हो?’’
अशा वेगळय़ा भूमिकांच्या बाबतीत माझे दिग्दर्शक आणि माझे सहकलाकार यांनी मला खूप मदत केली. ‘आधे अधुरे’चं जेव्हा आम्ही ‘मुखवटे’ हे नाटक केलं तेव्हा अमोल पालेकरने माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली किंवा ‘मार्ग सुखाचा’मधली अत्यंत महत्त्वाकांक्षी बाई साकारताना माझा सहकलाकार असलेल्या दिलीप कुलकर्णीने मला खूप मदत केली. प्रत्येक भूमिकेने मला नवीन नवीन माणसं दिली. ‘चारचौघी’ नाटकाच्या वेळीही चंदू कुलकर्णीने माझ्याकडून उत्तम काम करवून घेतलं. पण खरं सांगायचं तर तो मात्र माझा ड्रीम रोल होता. दीपा लागू जेव्हा ही भूमिका करत होत्या तेव्हाच मला वाटत होतं की कधीतरी ही भूमिका करायला मिळावी आणि तसं झालंही. एक तर वंदनाच्या (गुप्ते)आईची ती भूमिका होती आणि इतक्या शेड्स होत्या त्या व्यक्तिरेखेला की त्याच्या मोहातच पडले मी. कधीही रिप्लेसमेंट न करणारी मी त्या भूमिकेच्या प्रेमामुळे विचारल्याबरोबर लगेच स्वीकारली. तसच सुहास जोशी, स्मिता तळवलकर आणि मी करत होतो ते ‘सख्या’. त्यातली ओव्हर पझेसिव्ह व्यक्तिरेखा साकारताना आमची तिघींची मेहनत कामी आली.
तसं पाहायला गेलं तर ‘बुनियाद’पासून ‘कच्ची धूप’, ‘आ बैल मुझे मार’, ‘दर्पण’, ‘चेहरे’, ‘अपराधी कौन’ किंवा सध्या चालू असलेली ‘चिडियाघर’ अशा अनेक मालिका किंवा ‘चमेली की शादी’,‘बेटा’,‘संजोग यासारख्या हिंदी चित्रपटांमधून आणि‘महासागर’,‘हमीदाबाईची कोठी’,‘दुभंग’,‘नस्तं झेंगट’, ‘मुखवटे’, ‘हा मार्ग सुखाचा’,‘पप्पा सांगा कुणाचे’,‘विठोबा रखुमाई’, ‘चारचौघी’ या सारख्या नाटकांतल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मी लक्षात राहिले. मलाही या भूमिकांनी खूप शिकवलं आणि या भूमिकांमुळे मी जगायला शिकले. आणि पुढे या माझ्या कामानेच मला एकटं लढण्याची ताकद दिली. ज्याच्या बळावर आजपर्यंत कामही केलं. ‘कथा’सारख्या काही मालिका, ‘सरीवर सरी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. गाणं मात्र तितकं करता आलं नाही, ही खंत आजही मनात आहे. पण वेळ मिळेल तेव्हा आवर्जून रियाज करते आणि शक्य तितकं मम्मीचं गाणं जपण्याचा प्रयत्नही करते. तेच एक समाधान!      
( शब्दांकन : उत्तरा मोने )
Uttaramone18@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा