प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

बिहारची ‘मधुबनी चित्रशैली’ सर्वपरिचित आहे, परंतु त्याच प्रदेशातली ‘मंजूषा चित्रशैली’ तितकीशी परिचयाची नाही. बिहारमधल्या ‘बिहुला बिशहरी’ या लोककथेशी ही ‘मंजूषा’  चित्रशैली जोडलेली आहे. लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या चित्रशैलीला पुनरुज्जीवन देण्यात दिवंगत चित्रकर्ती चक्रवतीदेवींचा मोठा वाटा आहे. तर उलुपी झा आणि रोहिणीदेवी रमा यांसारख्या आजच्या चित्रकर्ती या कलेला वेगळं रूप देऊन तिचा प्रसार करत आहेत, अनेक स्त्रियांना आत्मनिर्भर बनण्याचं एक साधन मिळवून देत आहेत..

आपल्याकडे जशी सावित्री आणि सत्यवानाची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीची एक लोककथा बिहारमध्येही लोकप्रिय आहे.  बिहुला आणि तिचा पती बाला लाखेंद्रची ही कथा ‘बिहुला बिशहरी’ या नावानं प्रचलित आहे. शंकराच्या पाच मानसकन्यांपैकी,  म्हणजे विषहरी, जया, मैना, पद्मा आणि आदिती, यांपैकी विषहरीला वाटतं, की आपली पूजा शिवभक्त चांदू सौदागर यानं करावी. परंतु तो तिच्या इच्छेला नकार देतो. याचा राग येऊन ‘तुझे पुत्र मृत्यू पावतील’ असा शाप विषहरी त्याला देते. त्याप्रमाणे त्याच्या सहा पुत्रांना जलसमाधी मिळते. एक पुत्र लाखेंद्र मात्र वाचतो. याचा विवाह बिहुला या रूपवान तरुणीशी होतो, परंतु विषहरीनं लग्नाच्या पहिल्या रात्री पाठवलेल्या विषारी सर्पाच्या दंशानं त्याचा मृत्यू होतो. बिहुला ‘मंजूषानुमा’ नावाची नौका तयार करते आणि पतीच्या मृतदेहासह जलमार्गे स्वर्गलोकी जाऊन त्याचे प्राण परत मिळवते. त्यामुळे मनसादेवी (पाच कन्या एकत्रित रूपात असतात ती देवी) प्रसन्न होते, अशी ही संपूर्ण कथा आहे. ती पूर्णत: चित्ररूपात चित्रित केली आहे, तिला ‘मंजूषाचित्र कथा’ म्हणतात. मंजूषागुरू मनोज पंडित यांच्या अभ्यासानुसार ही मंजूषा चित्रशैली विश्वातली पहिली संपूर्ण कथाचित्र स्वरूपातील शैली आहे.  ‘मंजूषा’ याचा अर्थ छोटी पेटी असा होतो.

बिहारची ‘मधुबनी चित्रशैली’ सर्वपरिचित आहे. परंतु ‘मंजुषा चित्रशैली’ त्याच प्रदेशातली असूनही त्या तुलनेत ती लोकांना फारशी माहीत नाही. ‘मधुबनी’ आणि ‘मंजूषा’मध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे ‘मधुबनी’ शैलीत अनेक रंग वापरतात, तर ‘मंजूषा’ शैलीत फक्त गुलाबी, हिरवा आणि पिवळा हे तीनच रंग वापरले जातात. ‘मधुबनी’त रामायण, महाभारत यांतील विषय चित्रविषय असतात त्याचबरोबरीनं पक्षी,प्राणीही चितारले जातात. तर ‘मंजूषा’मध्ये फक्त ‘बिहुला बिशहरी’ ही कथा आणि त्यातील प्रतीकं चित्रित केली जातात. प्रथमदर्शनी दोन्ही शैलींमधला फरक जाणवत नाही. पण निरीक्षणाअंती लक्षात येतं, की ‘मधुबनी’त दुहेरी बाह्य़रेषा, तर ‘मंजूषा’मध्ये हिरव्या रंगाची एकेरी बाह्य़रेषा असते. विशेष म्हणजे ‘मंजूषा’तील मनुष्याकृतींमध्ये चेहरा एका बाजूनं असून भुवई नसलेला मोठा डोळा आणि टोकेरी नाक दिसतं, पण कानाचं चित्रण मात्र दिसत नाही. या सगळ्या मनुष्याकृती पाय फाकवून आणि दोन्ही हात हवेत उडवताना- इंग्रजी ‘एक्स’ अक्षराच्या रचनेप्रमाणे दिसतात.

‘मंजूषा’ शैलीत रंगांना प्रतीकात्मक संकेत आहेत. पिवळा रंग म्हणजे आनंद, तारुण्य, उत्साह. गुलाबी म्हणजे नातेसंबंध, विजय आणि प्रेमाचा रंग, तर हिरवा रंग शांततेचं प्रतीक असून नैराश्य, चिंता दूर करतो. चित्रात पाच प्रकारच्या किनारी आढळतात. पहिली बेलपत्र- शंकराला प्रिय म्हणून, दुसरी किनार जीवनातील चढउताराचं सत्य सांगणारी – पाण्याच्या लहरींसारखी दिसणारी-लहरिया, तिसरी प्राचीन काळातल्या घरांसाठी केल्या जाणाऱ्या नक्षीकामासारखी समांतरभुज चौकोन जोडून तयार होणारी मोखा किनार, चौथी ‘सर्प की लडी’- एका मागोमाग रांगेत जाणारे साप आणि पाचवी त्रिकोणी आकारांची पुनरावृत्ती असलेली त्रिभुज किनार. या शैलीत सर्प, चाफ्याचं फूल, सूर्य, चंद्र, हत्ती, कासव, मत्स्य, मैनापक्षी, कमलपुष्प, कलश, धनुष्य-बाण, शिवलिंग, वृक्ष अशी प्रतीकं आढळतात.

दर वर्षी १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत भागलपूर येथील मनसादेवी मंदिरात ‘सर्प उत्सव’ अथवा ‘मंजूषा उत्सव’ साजरा केला जातो. बिहारमधील जवळपास ११६ मनसादेवी स्थानांवर हा साजरा केला जातो. नवस फेडण्यासाठी, तसंच कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करण्यासाठी हजारो स्त्रिया या उत्सवात भाग घेतात. बांबूच्या पट्टय़ा किंवा सोलावुडच्या पट्टय़ांचा पेटीसारखा सांगाडा बनवून त्यावर पतंगाचे रंगीबेरंगी कागद चिकटवून एक ते तीन फुटांच्या ‘मंजूषा’ बनवितात. त्यावर सर्पप्रतिमा चित्रित करतात. या ‘मंजूषा’ पाहून आपल्या दिवाळीतल्या आकाशकंदिलांची आठवण  होते. याखेरीज मातीच्या घटांवरही सर्पप्रतिमा चित्रित करून ते डोक्यावरून घेऊन जातात. ही शोभायात्रा फारच विलोभनीय दिसते. देवीला अर्पण केलेल्या ‘मंजूषा’ देवळात कलात्मक पद्धतीनं टांगून ठेवतात. हा रंगोत्सवही मन मोहून टाकतो. यंदा हा उत्सव होण्याची शक्यता कमीच.

‘मंजूषा कला’ लुप्त होण्याच्या मार्गावर होती. तिचं पुनरुज्जीवन करण्यात चक्रवती देवींचं नाव आदरानं घेतलं जातं. १९८० मध्ये त्यांनी प्रशासनाच्या साहाय्यानं  राष्ट्रीय स्तरावर ‘मंजूषा’कलेची ओळख करून दिली त्यामुळे त्यांना ‘मंजूषा’ कलेची जननी म्हणतात. त्यांनी या कलेतली प्रतीकं लोकप्रिय केली. कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी स्वकष्टानं या कलेसाठी कार्य केलं. २००८ मध्ये वैशाली (बिहार) येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवात त्यांच्या ‘मंजूषा’ चित्रांचं प्रदर्शन झालं. त्याच वर्षी १ डिसेंबर २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. २०१२ मध्ये त्यांना ‘मंजूषा’ कलेतल्या कामगिरीबद्दल मरणोत्तर ‘बिहार कला पुरस्कार’ देण्यात आला.

शिक्षिकेची नोकरी सोडून ‘मंजूषा’ कलेचा प्रचार आणि प्रसार हेच ध्येय जपणाऱ्या चित्रकार उलुपी झा यांचं कार्यही उल्लेखनीय आहे. ‘महिला आणि बालविकास मंत्रालया’तर्फे देशातल्या शंभर यशस्वी स्त्रियांची निवड केली जाते. त्यांपैकी या एक आहेत. ‘मंजूषा’ कलेवरचं पहिलं चित्रकथा पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. त्यायोगे लोकांपर्यंत ही कला पोहोचली. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या छोटय़ा छोटय़ा वस्तू- उदा. घरासाठीच्या शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, कीचेन इत्यादी ‘मंजूषा’ कलेनं अलंकृत करण्यासाठी उलुपी झा यांनी नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या. भागलपूर महोत्सवाच्या वेळी त्यांना खास प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. अजूनही अनेक प्रसंगी याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आमंत्रण असतं. दोनशे स्त्रिया त्यांच्याशी ‘मंजूषा’ कला चित्रनिर्मिती आणि हस्तकलेच्या निमित्ताने जोडल्या गेल्या आहेत. त्यांना वेळोवेळी काम मिळवून देण्यासाठी उलुपी झा प्रयत्नशील असतात.

‘मंजूषा’ कला म्हणजे ‘सर्पाकृती’ हवीच, अशी जी एक प्रथा होती, तिला थोडंसं वेगळं वळण देण्याचं महत्त्वाचं काम उलुपी झा यांनी केल्यामुळे या कलेच्या कक्षा रुंदावल्या. त्यांच्या मते झोपण्याच्या चादरीवर, साडीवर, कुर्ता, दुपट्टा यांसारख्या वस्तूंवर सर्पाकृती असली की त्या विकत घेणं लोक तितकंसं पसंत करत नाही. म्हणून इतर प्रतीकांचा वापर करण्याचा नवा पायंडा उलुपी झा यांनी पाडला. त्यामुळे फक्त ‘भिंतीवरील चित्रं’ किंवा ‘चित्राकृती’ या मर्यादा ‘मंजूषा’कलेनं ओलांडल्या. चित्राचे विषय उलुपी झा यांचे स्वत:चे असतात आणि ते ‘मंजुषा’ शैलीमध्ये त्या चित्रित करतात. त्यांची रेषाही प्रभावी आहे. अनेक स्त्रिया घरबसल्या चित्रं, उपयोगी आणि शोभेच्या मंजूषा शैलीत चित्रित केलेल्या, रंगवलेल्या वस्तू तयार करत आहेत आणि आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होत आहेत.

भागलपूरची रोहिणीदेवी रमा ही आणखी एक ‘मंजूषा चित्रकर्ती’. गृहिणी असल्यामुळे घरकाम, मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळून चित्रं काढते. आपल्या आईकडून तिला चित्रकलेचा वारसा मिळाला आहे. रोहिणीचा पती सैन्यात असल्यामुळे तिच्यावर घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी असते. ती अनेक स्त्रियांना प्रशिक्षण देते, त्यांना आत्मनिर्भर बनवते आणि स्वत:ही पेंटिंग करण्याची कामं घेऊन त्यात व्यग्र असते. विमानतळ, ‘विक्रमशीला पूल’  रेल्वे स्थानकाजवळील  सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या विविध कार्यक्रमात उत्साहानं भाग घेऊन इतर स्त्रियांना प्रेरित केलं आहे.

तिचं खास वैशिष्टय़ म्हणजे कपडय़ावरील पेंटिंग. ‘मंजूषा’ शैलीत ती अतिशय नाजूक, सुंदर नक्षीकाम करते. तिच्या मते या कलेनं अनेकांना आत्मनिर्भर बनवलं हे खरं, पण मेहनतीच्या तुलनेत मिळणारं मूल्य कमी असतं. ते मिळालं तर अधिकाधिक स्त्रिया या कलेचं प्रशिक्षण घेतील आणि ‘मंजूषा कला’ खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवित होईल.

विशेष आभार-चित्रकार – डॉ. अशोक बिस्वास – बिहार