डॉ. तारा भवाळकर
माझ्या लहानपणी आमच्या दारात एक मोठं वडाचं झाड होतं. त्या वेळी तिन्हीसांजेला त्या झाडाखालनं जायचं झालं तर प्रचंड भीती वाटायची. ‘राम राम’ म्हणत आम्ही कसंतरी ते पार करायचो, पण त्या वेळी कुणीतरी कंठ आवळतोय, असं खरंच वाटायचं, कारण त्या वडाच्या झाडावर भूत बसलंय असं कुणीतरी सांगितलं होतं आणि ते मनात घट्ट रुतून बसलं होतं. ही वाटलेली आठवणीतली पहिली भीती.
गावातल्या एका चिंचेच्या झाडाखालनं जायला लागलं तिन्हीसांजेचं, तरीही तसंच वाटायचं, कारण कुणीतरी सांगितलं होतं, की त्या झाडावर हडळ आहे. त्याच्यापुढे पिंपळाचं झाड लागायचं, त्यावर म्हणे मुंजा होता. भुतांच्यासुद्धा निरनिराळया जाती असतात ते तेव्हा कळलं. गावाकडे गेल्यावर आमचा मामा गोष्टी फार रंगवून सांगायचा. त्यातल्या भुतांच्या कथा आम्हाला फार आवडायच्या. थोडक्यात, भीतीच्या कथा. अनेकदा त्या गोष्टी नकोशाही वाटायच्या आणि हव्याहव्याशाही!
लहानपणीच्या भुतांच्या कथांतून बाहेर आल्यानंतर आणखी थोडं पुढे गेलं, की मग लोक देवाची भीती घालायला लागले. ‘अमुक कर, नाहीतर देवाचा कोप होईल.’ तरुण वयामध्ये तर बायकांना प्रचंड भीती असते अशा गोष्टींची. म्हणजे भीती फक्त भुतांची असते असं नाही, तर देवांचीसुद्धा भीती घातली जाते. संतसाहित्याचा अभ्यास करत असताना डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी काही उल्लेख केलेत. त्यात एक महत्त्वाचा उल्लेख आहे, ‘भूत जबर मोठं गं बाई, झाली झडपण करू गत काही.’ भुतानं झपाटावं तसं भक्ताला जणु काही देव झपाटतो. त्याला त्या देवाशिवाय काही सुचत नाही. म्हणून देव आणि भूत एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत की काय, असं वाटायला लागतं.
आणखी वाचा-सन्मानाचं जिणं हवंच!
लोकसंस्कृतीच्या दृष्टीनं अभ्यास करायला लागल्यानंतर, समाजाच्या चालीरीती, रुढी पाहिल्यानंतर काही चमत्कारिक गोष्टी सापडल्या. माणूस मेल्यानंतर त्याचं भूत होऊ नये म्हणून काही क्रियाकर्म केली जातात. त्याच्या विश्लेषणाला सध्या जागा नाहीये, पण मानववंशशास्त्राच्या दृष्टीनं बघायला लागल्यावर मजेशीर गोष्टी आढळल्या. देव या संकल्पनेचा उदय माणसाच्या मनात कसा झाला असावा, तर एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी माणूस समूहानं काही तरी कृती करत होता आणि समूहामध्ये आपण देवाची आळवणी केली तर देवाचं अवतरण होतं असं लक्षात आलं असावं. समूहानं देवाची प्रार्थना करणं, एखादं क्रियाकर्म करणं, अगदी जागरण, गोंधळ हे जे काही विधी आहेत ते अशाच कुठल्या तरी भावनेतून आले असावेत असं म्हटलं जातं. कारण माणसाच्या जगण्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन या मूलभूत प्रेरणा असतात आणि त्या प्रेरणांच्या आधारानंच माणूस जगत असतो. जगायचं असेल तर आहार घ्यावा लागतो. झोप, विश्रांती तर पाहिजे देहाला. या गोष्टी देहाशी निगडित आहेत. भय मात्र मनाशी निगडित आहे. आणि मैथुन देह-मनाशी निगडित. वंश पुढे चालला पाहिजे, ही सगळया सजीवांची प्रेरणा असते. त्यामागे आहे भय. एकटेपणाचं भय. आपण एकटं पडू नये यासाठी मदतीला देव आला असावा. यातूनच अनेक गोष्टी निर्माण होतात. कर्मकांडं निर्माण होत जातात. निरनिराळया चालीरीती, रूढी निर्माण होतात. मंदिरं निर्माण होतात. मग काही कौटुंबिक विधी, काही सामाजिक विधी, काही सबंध गावानं एकत्र येऊन करायचे विधी, काही जातीजमातीपुरते विधी निर्माण होतात. माणसं सोबत पाहिजेत आपल्या, म्हणून एकत्र येऊन अनेक विधी केले जातात. चांगल्या-वाईट गोष्टी करण्यासाठी जे विधी केले जातात, त्याला आदिम काळामध्ये ‘मॅजिकल राइट्स’ (यातुविधी) म्हटलं जायचं. चांगल्यासाठी केली जाणारी जी विधीविधानं आहेत ती शुक्ल यातु आणि कोणाचं तरी वाटोळं व्हावं, म्हणजे भानामतीसारखे प्रयोग असतात किंवा मूठ मारण्यासारखे प्रयोग असतात ती कृष्ण यातु.
आणखी वाचा-चिरकालीन यशाच्या दिशेने..
या सगळया बाबी निर्माण होतात त्या मनातल्या भय या भावनेपोटी. माणसाच्या संपूर्ण विकासामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसते, की माणसाला एकटं राहणं नको असतं. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीच्या ज्या कथा-गोष्टी सांगितल्या जातात. त्यात भारतीय संकल्पना अशी, की परमेश्वर पूर्वी फक्त एकच होता. त्याला अनेक व्हावंसं वाटलं. ‘एकोऽहं बहुस्याम’. मग त्यानं भोवतालची सृष्टी निर्माण केली. ख्रिश्चन धर्मियांमध्ये एक संकल्पना आहे, की पहिल्यांदा आदम नावाचा माणूस- म्हणजे पुरुष निर्माण झाला. त्याला फार एकटेपणा वाटायला लागला म्हणून त्यानं देवाची प्रार्थना केली. आणि मग त्याच्या बगरडीतून स्त्री- मैत्रीण निर्माण केली ती ईव्ह. म्हणजे आद्य स्त्री आणि आद्य पुरुष. आपल्याकडे, भारतात इला आणि मनु अशी आद्य जोडी मानली जाते. मनु हा पहिला पुरुष. इला ही त्याला सोबतीण किंवा मैत्रीण. हे स्त्री-पुरुष एकमेकांना मिळालेले पहिले सोबती आहेत आणि त्यांच्यापासून वंशसातत्यामुळे हा फार मोठा पसारा निर्माण झाला.
आदिम भयाचं विरेचन (कॅथार्सिस) करण्यासाठी माणसाच्या संस्कृतीमध्येही खूप गोष्टी घडत आलेल्या आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या, आनंद आणि शोक, भीती आणि सुटका याही. मध्यंतरी मला एका मुलीनं सांगितलं, की तिच्या आईचं आकस्मिक निधन झालं. मृत्युपूर्वी तिला खूपच यातना होत होत्या, मात्र ज्या क्षणी तिचं निधन झालं त्याक्षणी आईच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं. हे हास्य कुठून आलं? मला असं वाटतं, वेदनायुक्त जगण्याच्या भयातून सुटका झाल्याचा तो आनंद असावा बहुधा.
या सगळयांमधून जसा एकीकडे देवाचा आविष्कार दिसतो तसा दुसरीकडे दुष्ट शक्तींचाही आविष्कार आपल्याला दिसतो. अगदी मंत्रतंत्र, जादूटोणा इथपर्यंत. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर लहान मुलांची दृष्ट काढणं. कशासाठी दृष्ट काढायची? तर भय असतं पोटामध्ये, की हे बाळ सुखरूप राहील की नाही याचं. एकूण भय ही गोष्ट अशी आहे, की ज्यानं अनेक गोष्टींना जन्म दिलाय. तत्त्वज्ञान निर्माण झालं. पुढे जीवनाचा पसारा वाढत गेला. त्यातून सुरक्षितता हवीशी झाली. देहाच्या सुरक्षिततेसाठी अवजारं शोधली गेली. तेव्हा माणसाच्या लक्षात आलं, की आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त साधनं असतील तर आपलं भय तेवढया प्रमाणामध्ये कमी होतं. म्हणजे खाण्यासाठी जास्त अन्न वेचलं तर उद्याचं भय कमी होतं. मग माणूस साठवण करायला लागला. शेतीचा शोध लागला तशी वर्षांची साठवण सुरू झाली. त्यातून संचय सुरू झाला. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं, तर गरजेच्या गोष्टी अतिरिक्त झाल्या की त्या ‘वरकड संपत्ती’चा संचय सुरू होतो. संचय ज्याच्याजवळ जास्त तो बलिष्ठ होतो, समाजावर सत्ता गाजवायला लागतो. अनेकांचे कळप तो आपल्या ताब्यात ठेवायला सुरुवात करतो. मग सत्ता, संपत्ती, राजसत्ता अशा गोष्टी विकसित होत जातात. त्याच्या पोटामध्ये एकाच गोष्टीचं भय असतं, सुरक्षितता जतन करण्याचं. जगण्याची जी सगळी धडपड असते ती असुरक्षिततेच्या भयापासून मुक्त होण्यासाठी.
आणखी वाचा-एक दुर्लभ लोकगीत
माणसाला दु:ख नको असतं. त्रास नको असतो. सुखाचा आनंद घ्यायचा असतो. भय निवारण्यासाठी, सुख मिळण्यासाठी माणूस भावनिक गोष्टी निर्माण करतो. विशेषत: साहित्यामधून आणि कलांमधून या आदिम भावनांचं विरेचन होतं. यातूनच विज्ञानकथांचीही निर्मिती झालेली दिसते. एकीकडे प्राचीन काळापासून पुराणकथा, भयकथा, भूतकथा होत्या लहानपणीच्या. नंतरच्या काळामध्ये नारायण धारप, रत्नाकर मतकरींसारख्या लेखकांनी भयकथा मोठया प्रमाणावर लिहिल्या. हे साहित्यातून विरेचन होण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. ते फक्त भय या भावनेचंच नव्हे, अगदी सुख-दु:खादी भावनांचंही विरेचन करतात. म्हणून साहित्यामध्ये जी नवरसाची संकल्पना आहे ती येते. सर्व भावनांचं विरेचन, या सगळया कलांमधून कसं होतं त्याची अनेक उदाहरणं आपल्याला काव्यशास्त्रानं दिलेली आहेत. आपण नेहमी म्हणतो, दु:खामुळे अश्रू येतात आणि आनंदामुळे हर्ष फुलतो. हे दरखेपेला खरं असतंच असं नाही. त्याचा अतिरेक झाला की उलटंही होतं. म्हणजे अति दु:खं झालं की कदाचित माणसाला मौन येतं आणि कदाचित आनंदातून सावरण्यासाठी हर्षवायूही होतो, अश्रूही येतात. म्हणजे तोही पुन्हा वेदनेकडे जात असतो. तेव्हा आपलं हे विरेचन होण्यासाठी माणूस निरनिराळया गोष्टी करत असतो. कधी कधी प्रत्यक्ष कृती करत असतो. विध्वंसक कामं करणं, खून करणं, आक्रमण करणं वगैरे. अनेकदा त्याला एक उदात्त रूप देण्याचा प्रयत्न समाजात केला जातो. त्या उदात्तीकरणामध्ये क्रीडा ही उपजत प्रवृत्ती असते. शरीराची ऊर्जा खर्च करणाऱ्या क्रीडाप्रकारांमधून अतिरिक्त बळाच्या प्रवृत्तीचा विकास होत जातो. आज आपण बघतो, की क्रीडासंस्कृती ही महत्त्वाची संस्कृती आहे. आणि विशेषत: मैदानावर जी ऊर्जा खर्च होते, फुटबॉल, बॅडिमटन किंवा क्रिकेट, कबड्डीसारखे देशी खेळ, यांमधून ही ऊर्जा खर्च होते. त्याच्यातूनच आक्रमकतेचं भय तेवढया प्रमाणात कमी होत असतं.
आणखी वाचा-वळणबिंदू : ‘दुसरी बाजू’ उलगडताना..
आपलं एकाकीपण दूर करण्यासाठी माणसानं इतक्या गोष्टी निर्माण केल्या खऱ्या, पण आजकाल प्रकर्षांनं जाणवतंय ते म्हणजे माणसाचं एकाकी होत जाणं. माणसांची गर्दी आहे, पण अंतर्गत सुरक्षितता देणारं सोबतीला कोणी नाही. म्हणून सगळेजण सारखे मोबाइलमध्ये असतात. माणसं माणसांशी बोलत नाहीत. कुटुंबव्यवस्था विस्कळीत झालीय. पूर्वी पाणवठयावर गेलं तरी बायका एकमेकींशी बोलायच्या. आता घरात नळ आले, सोयी झाल्या. आता ‘मला कोणाची गरज नाही,’ असं म्हणण्यातून अहंकार वाढतो. त्यातून माणूस एकाकी होतो की काय? मग त्याच्यासाठी तो पुन्हा तंत्रज्ञानाच्या आहारी जातो. पुन्हा तो मोबाइलमध्ये गुंततो, प्रसारमाध्यमामध्ये गुंततो. आणि शरीरानं एकटा होत, मनानंही एकाकी होतो की काय, असं वाटायला लागतं. पुन्हा एकदा भय ही भावना अनेक अंगांनी माणसाला घेरून राहिलेली आहे की काय असं वाटायला लागतं. यातून सुटका माणसांनीच करून घ्यायची आहे..
chaturang@expressindia.com