तिचं मन रात्रीच्या प्रकारात घुटमळत होतं..विचारात पडलं, ‘काय भयंकर अवस्था  होती तिची!.  आपण मात्र भिऊन, नसती भानगड म्हणून निघून आलो, स्वत:चीच लाज वाटत राहिली तिला..
रात्रीचे दहा वाजत आलेले. कृतार्थ अपार्टमेंट्सच्या गेटपाशी दोन रिक्षा थांबल्या. सहाजणी उतरल्या. गेट उघडं होतं. वॉचमन जागेवर नव्हताच.
‘केव्हाही बघा, वॉचमन गेटवर कधी दिसणारच नाही. कुठं गायब होतो कोणास ठाऊक. एवढाले पगार मोजायचे यांना.’
‘नाही तर काय, काय उपयोग यांचा मग!’
‘कित्ती दिवसांनी छान नाटक बघायला मिळालं. मीनाताई, तुम्ही आग्रह केलात ते बरं झालं. त्यामुळे तर..’
‘आई, अगं किती मोठय़ानं बोलतेस रात्र झालीय’
‘हो, माझं बोलणं घराची दारं-भिंती फोडून आत पोचणार आहे अन् लोकं जागी होणारेत.. तुमचे हे शहरी मॅनर्स, एटिकेट्स नाही जमत. जे वाटतं ते बोलून करून मोकळे आम्ही..’
बोलत बोलत सगळ्याजणी लिफ्टपाशी आल्या आणि..
‘बापरे, हे काय! ही कोण.’
‘अशी का इथं ही पडलीय!’
‘काय, काय झालं!.’ करीत मागच्याही पुढे आल्या आणि जागच्या जागी खिळून राहिल्या. लिफ्टच्या दारात एक तरुण मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. कपडय़ांची शुद्ध नव्हती. केस पिंजारलेले, लागल्याच्या, मारल्याच्या खुणा दिसत होत्या. घाणीचे, रक्ताचे डागही कपडय़ांवर होते. काहीतरी घडलं होतं.
‘कोण आहे ही ? इथं कशी आली?’
‘वॉचमन कुठं आहे? त्याला कळलं नाही?’ एकीचा आवाज
‘वॉचमन. वॉचमन.’ आता दुसरीला कंठ फुटला. तिनं जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली.  वॉचमन धावत आला.
‘वॉचमन, काय हे! ही कोण, कशी आली इथं! तुम्ही गेटवर नव्हता! ’.. वॉचमनवर प्रश्नांच्या तोफा डागल्या जाऊ लागल्या.
‘आता करायचं तरी काय!’
‘आपण काय करणार? आपला काय संबंध?’
‘अहो पण. तिची काहीतरी चौकशी तरी करायला नको?’
‘कशाला? पोलिसांच्या तावडीत अडकायला?’
‘अजिबात नको. मुकाटय़ानं घरी चला आपापल्या.’
मॅनर्स, एटिकेट्स वगैरे सर्व विसरून आता सगळ्याजणी मोठमोठय़ानं बोलू लागल्या होत्या. परिणामी मग फ्लॅट्समधून दिवे लागले, दारं उघडली गेली आणि काय झालंय ते पाहायला गर्दी व्हायला लागली. आलेला समोरचं दृश्य पाहून गप्पच होत होता.
‘वॉचमन, त्या मुलीला बाजूला करा.’ कुणीतरी सुचवलं.
वॉचमननं तिला उठवायचा प्रयत्न केला. अर्धवट शुद्धीत असलेली ती कशीबशी उठून बसली.
‘अगं बोल ना तू. कुठून आलीस? नाव काय तुझं?’
‘काहीतरी करून इथं येऊन पडलीय.. का कोणी हिला काही केलंय!’ नाना तऱ्हेच्या शंकांची कुजबुज चालू झाली.
आता मात्र हा सगळा सीन पाहून त्यांना राहवेना. त्या पुढे झाल्या. तिच्या खांद्याला स्पर्श करून म्हणाल्या,
‘घाबरू नकोस. कोण तू? इथं कशी आलीस ?’
‘आई, तू कशाला तिच्याजवळ जातेयस आणि चौकशा करतेयस.’ त्यांची लेक कुजबुजली.
‘हो ना हो. नसत्या फंदात पडू नका. तुम्ही पाहुण्या आलेल्या  आहात इथं.’
‘जशी आलीयस इथं तशीच जा म्हणावं इथून.’ आणखी एक अनाहूत सल्ला.
कोणीतरी पाणी आणलं. पाण्याचा ग्लास तिच्या ओठाला लावत त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला..आणि तिला हुंदका फुटला. ‘मी. मी. नगरहून आले. इंटरव्ह्य़ूला. परत यायला उशीर झाला. रस्ताही सापडेना. अन् वाटेत.ते लोक.’ पुढे तिला बोलताच येईना.
‘हो, पण इथंच कशी आलीस तू! कोणाकडे आलीयस!’
‘सुशा.सुशीला कोरडे. माझी मावसबहीण. तिच्याकडेच..’
‘सुशीला.. कोरडे. अहो म्हणजे समोरच्या बी २ मध्ये, दुसऱ्या मजल्यावर..’
‘आता आपण इथून जावं हे बरं. नाही तर नसत्या गुंत्यात.’ म्हणता म्हणता बहुतेक सगळी पांगली.
‘आई, तू पण चल आता. येईल तिची बहीण आणि घेऊन जाईल तिला.’
‘नाही. मी नाही येणार. तिची बहीण येऊ दे. तिला घेऊन  जाऊ दे. तू जा. मी थांबणार आहे.’ त्यांनी निक्षून सांगितलं. बहीण आली. तिची ती अवस्था तिनं पाहिली. ‘लते, लते अगं हे काय झालं? अशी कशी कुठं पडलीस तू! केव्हाची वाट बघतोय आम्ही तुझ्या. आणि काय हे!’ बहिणीनं जवळ घेतलं मात्र. तिचा बांध कोसळला. बहिणीनं तिला हळूहळू घराकडे नेलं. त्याही मग वर मुलीकडे गेल्या.

‘गेली ती घरी?’ मुलीनं त्यांना विचारलं. ‘हं’ म्हणून त्या सोफ्यावर जाऊन बसल्या. मुलीनं दिलेला पाण्याचा ग्लास घेतला.
‘कशी आहे गं ती आता!’
‘फार.भयानक.. तिच्यावर..’ त्या सुन्न होऊन बसल्या. ‘पण. आता फार उशीर करूनही चालायचं नाही, वेळेवरच काहीतरी करायला हवं..’  त्या पुटपुटल्या.
‘समोर बी-२ मध्ये पहिल्या का दुसऱ्या मजल्यावर राहते ना गं ती कोरडे! जायला हवं आत्ताच तिकडे.’
‘आत्ता! आई, अगं रात्रीचे १२ वाजून गेलेत.’
‘हो, दिसतायत मला. पण आत्ताच काय ते करायला हवं.’
जावई बाहेर येऊन ऐकत होता. सासूबाईंची तगमग त्याला  स्पर्शून गेली. ‘चला, मी येतो तुमच्याबरोबर.’ तोही उठला.
बेल वाजली. धास्तावूनच कोरडय़ांनी दार उघडलं.
‘झाल्या गोष्टीत काही करायला हवं म्हणून आम्ही आलोय.’
‘हो, पण काय करणार काय आता!’ कोरडे.
‘हे बघा, काय झालंय ते लक्षात आलंय ना! मग लवकरात लवकर पोलिसांत कळवायला हवं.’ त्या.
‘पोलिसांत? नको नको. ते पोलीस, त्या चौकशा.. हज्जार भानगडी. नको. शरीर तर नासलंयच, अब्रूचे पण पार धिंडवडे   निघतील,’ बहीण म्हणाली.
‘अगं असं कसं म्हणतेस! ज्यांनी हे केलं त्या राक्षसांना सोडून द्यायचं? आणि हिनं काहीही दोष नसताना मुकाटय़ानं सोसायचं? वर्तमानपत्रं वाचता ना तुम्ही!’
‘हो, सगळं ठाऊक आहे. पण आपण सामान्य, गरीब माणसं. करणार काय! उद्या हिला आपली नगरला आईबापांकडे सोडून येतो. ’ बहिणीचा नवरा उद्वेगानं म्हणाला.
‘अहो, पण आपल्यावर आलेल्या प्रसंगाचा आपणच प्रतिकार करायला हवा. या प्रसंगाच्या बातम्यांबरोबर धारिष्ट करून पोलिसांत तक्रार नोंदवल्याच्या पण बातम्या येतातच की. तेच आपण करायचं. तेच सांगायला आलेय मी.’ त्या.
‘पण आत्ता, पोलिसात जायचं म्हणजे.हिला कशी नेणार! ती तर बापडी तोंड झाकून रडत पडलीय. सोसतीय सगळं.’
‘म्हणूनच तर.. उशीर होत गेला की पुरावा नाहीसा होत जातो. आत्ताच तिची तपासणी..’ जावई म्हणाला.
‘ माझा एक मित्र पीएसआय आहे. त्याला फोन लावतो.’
फोन लागला. जावई म्हणाला, ‘चला, मी गाडी काढतो. जाऊ या आपण पोलीस स्टेशनवर.’

सकाळी उशिरानंच तिला जाग आली. रात्री कधीतरी आई आणि नवरा घरी आले होते. आता नवऱ्याचं ऑफिस, मुलाची शाळा, त्यांचे डबे, चहापाणी. घाई सुरू झाली. मन मात्र रात्रीच्या प्रकारात घुटमळत होतं..विचारात पडलं, ‘काय भयंकर अवस्था  होती तिची! तिला तशी बघूनच मला धडकी भरली; तर तिचं काय झालं असेल त्यावेळी! आई पण ग्रेट. ओळख नाही पाळख नाही; पण पुढे सरसावली मदतीला तिच्या. आणि तिचा जावई- आपला नवरा. तोही तिला मदत करायला गेला. आणि आपण मात्र भिऊन, नसती भानगड म्हणून निघून आलो. स्वत:चीच  लाज वाटत राहिली तिला.
    त्या चहासाठी टेबलाजवळ आल्या. ‘आई, सॉरी. रात्री मी तुझ्याबरोबर यायला हवं होतं खरं तर. पण मला भीती वाटली. नसतं झंझट नको म्हणून. पण तो.. तो मात्र आला तुझ्याबरोबर.’
‘हं. अगं ज्याला जसं वाटतं तसा तो वागतो. तुला नाही, पण त्याला माझं करणं बरोबर वाटलं, तो आला. अगं, अक्षम्य गुन्हा घडलाय. पण दोष तिचा नाहीये, गुन्हेगार दुसराच आहे हे लक्षात घ्यायला हवं. शिक्षा, उपेक्षा, राग, तिरस्कार तिचा नाही, त्याचा करायला हवा.’
‘हो आई, खरंय तुझं. आता मात्र मी तुझ्याबरोबर..’

बाकी एकूण कॉम्लेक्समध्ये नेहमीप्रमाणे नित्य व्यवहार सुरूच होते. रात्रीचा प्रकार कित्येकांपर्यंत पोचलाही नव्हता. ज्यांच्यापर्यंत बातमी पोचली होती त्यांच्यात मात्र कुजबुज, टीकाटिप्पणी चालली होती. कानाला मोबाइल लावून, गाणी ऐकत मॉर्निगवॉकला बाहेर पडलेल्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, झाल्या प्रकाराबद्दल आपली मतं व्यक्त करीत होते.
‘काही खरं नाही बाई. कोणावर, काय प्रसंग येईल..’
‘झोपडपट्टीतलं लोण आता आपल्या कॉम्प्लेक्समध्ये पण यायला लागलं.’
‘पण मुलींनी रात्री-बेरात्री उशिरापर्यंत भटकावंच कशाला!’
‘स्वातंत्र्य-समान हक्क. पुरुषांची बरोबरी करायला बघतात. मग असे प्रसंग येणारच.’
‘अहो पण म्हणून मुलींना घरात का डांबून ठेवायचंय!’ एक ना अनेक कॉमेंट्स होतच होत्या. जिच्यावर प्रसंग गुदरलाय ती मात्र कोणाच्याच खिजगणतीत नव्हती. कशी असणार! ती कोण होती त्यांची?
संध्याकाळ झाली. मोकळ्या हवेत, बागेत बसण्यासाठी कोणी कोणी येऊ लागले होते. नातवाला घेण्यासाठी म्हणून त्याही तिथं आल्या. मग काय, प्रश्नांच्या तोफेचं तोंड त्यांच्याकडे वळलंच. ‘तुम्ही तिला मदत केलीत म्हणे! अगदी पोलिसांत जाईपर्यंत. धीट आहात बाई! पण अशा वेळी मदत करणाराच नसत्या भानगडीत अडकतो. पोलीस- त्यांच्या चौकशा.’
‘नको करायला? तिच्यावर एवढा भयंकर प्रसंग ओढवला, आणि नसती झंझट नको म्हणून मग आपण काहीच करायचं नाही? तिनं बिचारीनं काय करायचं?’
‘अहो ते तिचं ती बघेल ना! तिचे आईवडील, नातेवाईक त्यांची जबाबदारी ती.’
‘अस्सं! म्हणजे आपण फक्त प्रेक्षक! ते नाटक बघायचं आणि कॉमेंटस् करायच्या. माफ करा, आपल्यावर अशी वेळ आली तर? एवढा प्रश्न स्वत:ला विचारा बघू आणि द्या उत्तर.’
एकदम शांतता पसरली..
‘अवघड आहे ना उत्तर देणं?  माहीत आहे मला. पण मला काय वाटलं तेव्हा ते सांगते, मी आहे एका लहान गावातली निवृत्त शिक्षिका. शहरी लोकांसारखं मॅनर्स, एटिकेट्स संभाळून वागणं नाही जमत. वेळ आली की मदतीला हात पुढे करायचा ही जन्माची सवय. मला वाटलं, ती पण आपल्यासारखीच, आपल्यातलीच. तिच्यावर ही वेळ आली यात तिचा काय दोष?  बरं हे असं झालं म्हणून काय तिचं आयुष्यच संपलं का! नाही. एखादा अपघात, आजार व्हावा तसेच म्हणायचं हे. आजारी माणसाला, अपघात झालेल्याला जसे आपणहून, मनापासून उपचार करतो आपण तसेच तिलाही करायला हवेत म्हणजे ती त्यातून सावरेल, बरी होईल. हं, आजाराच्या जंतूंचा नायनाट करायला हवा, ज्याच्या निष्काळजीपणामुळं, हलगर्जीपणामुळं अपघात होतो त्याला शिक्षा व्हायला हवी, तसं इथेही व्हायला हवंच. अत्याचार करणाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हायला हवी. कायदा ती देतोही. पण त्याहीपेक्षा जिच्यावर ही आपत्ती कोसळते तिला धीर, मानसिक बळ देण्याची जास्त गरज आहे हे मला अगदी पटलं आणि म्हणूनच मी ते तिला देऊ केलं. काही विशेष नाही केलं.’
त्यांचं हे लांबलचक उत्तर, अनेक प्रश्नांचं उत्तरच होतं!    
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा