वयाचं मान म्हणजे नक्की काय असतं? सगळीच मुलं जर वयाच्या मानाने हुशार, जास्त समजदार, जास्त स्मरणशक्ती असलेली असतील तर नक्की त्या वयात तितकीच समज असणारं मूल कुठं असतं का? तसंच साठी, सत्तरी, चाळिशी, पन्नाशी वगैरेंच्या व्यक्तींनी नक्की केवढं दिसावं, अशी अपेक्षा असते?
शेजारच्या साने आजींचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होता. सोसायटीच्या हॉलमध्ये समारंभ सुरू होता. आम्ही काही जणी  हातात प्लेट घेऊन गप्पा मारीत बसलो होतो. तेवढय़ात शेजारच्या ग्रुपमधून एक अपेक्षित शेरा ऐकू आला. ‘‘वाटत नाही ना साने आजी ऐंशीच्या असतील.’’ ‘‘हो नं. खूपच खुटखुटीत आहेत वयाच्या मानाने!’’
साने आजी दिसायला छान आहेत, यात वादच नाही. पण त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, ऐकायला खूप कमी येतं. मणक्याच्या त्रासामुळे कमरेला पट्टा आहे. वाकून, हळूहळू सोसायटीच्या बागेत फिरताना दिसतात. याला नक्की खुटखुटीतपणा म्हणायचं का? पण असे शेरे गांभीर्याने घ्यायचे नसतात, हे मी आता अनेक प्रकारच्या अनुभवांनी शिकले आहे.
काही वर्षांपूर्वी मी ६० वर्षांची झाले. आमच्याकडे वाढदिवस साजरे करायची पद्धत नाही. काही जवळच्यांना माहीत होतं, त्यांचे फोन आले. तिन्ही-चारी फोन्समध्ये शुभेच्छांशिवाय एक गोष्ट कॉमन होती, ‘‘वाटत नाही हं तुम्ही (किंवा तू) साठीच्या/ची! वयाच्या मानाने खूपच तरुण दिसता.’’ मी सुहास्य वदनाने (फोनवर दिसत नसलं तरी) कॉम्प्लिमेन्ट्स स्वीकारल्या आणि विचारात पडले, माझंही मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि गुडघेदुखीसुद्धा आहे. याला वयाच्या मानाने तरुण म्हणता येईल का? पण वयाचं मान म्हणजे नक्की काय, हाच खरं तर शोधाचा विषय आहे!
जे.आर.डी. टाटांना आमच्यापैकी कोणीही बघितलं नसताना ते गेल्यावर, त्यांच्या टीव्हीवर बघितलेल्या छबीच्या आधारे आम्ही कित्येकांनी ‘वाटत नव्हतं ना जे.आर.डी. नव्वदीचे!’ अशी कॉमेन्ट केली होती. अजून शंभरीचा माणूस माझ्या पाहण्यात नाही. अण्णा कर्वे गेले तेव्हा मी फारच लहान होते, पण माझ्या आईने त्यांना पाहिलं होतं. विचारावं का तिला, की अण्णा शंभरीचे दिसत होते का? हो, आणि माझी आई नव्वदीची असली, व्हीलचेअरवर असली तरी वयाच्या मानाने खुटखुटीत(!) आहे हं!
या वयाच्या मानाची सुरुवात वयाच्या नक्की कुठल्या अवस्थेत सुरू होते, याचा मला नुकताच अनुभव आला. माझ्या डॉक्टर मैत्रिणीला नातू झाला होता. बघायला गेले. आजींनी पाळण्यातील नातू दाखविला. मी काही म्हणायच्या आतच ती म्हणाली, ‘‘वयाच्या मानाने खूप समज आहे हं त्याला.’’ मी चकितच झाले. १३ दिवसांच्या मुलाला नक्की किती समज असते? मग तीच पुढे म्हणाली, ‘‘अगं, आत्तापासूनच हात ओळखतो तो. माझ्या हातात मस्त राहतो, पण शिल्पाच्या नणंदेने घेतलं की लगेच भोकांड पसरतो.’’  खरं म्हणजे यातली गोम अशी होती की, बाळाची आजी होती साठीची बालरोगतज्ज्ञ आणि शिल्पाची नणंद होती विशीतली कॉलेज तरुणी. त्यालाही तो स्पर्श जाणवत असेलच की.
माझ्या एका भाचे जावयांनी मला फोन करून ‘‘आत्या, तुम्ही एकदा याच गौरवचं ड्रॉइंग बघायला. यंदा आमच्या क्लबच्या स्पर्धेत बक्षीसही मिळालंय त्याला,’’ असं आग्रहाने सांगितलं. अंधेरी ते पनवेल प्रवास करून मी या ‘भावी हुसेन’चं कौतुक करायला गेले. गौरवचं पारितोषिकप्राप्त चित्र कुठल्याही चार वर्षांच्या मुलाने काढावं तितपतच होतं. ‘‘परीक्षक म्हणाले, ‘वयाच्या मानाने खूपच चांगला हात आहे त्याचा,’’’ जावई सांगत होता. तो प्रशासकीय सेवेत. सार्वजनिक बांधकाम विभागात मोठय़ा हुद्दय़ावर आहे आणि परीक्षक होता त्याच्या बिल्डिंगसाठी मंजुरी हवी असणारा बिल्डर, ज्याने कधी तरी ड्रॉइंगच्या काही परीक्षा दिल्या होत्या..
ही उदाहरणं एकदा अनुभव आल्यावर माझा पिच्छाच सोडायला तयार नाहीत. नणंदेला नातू झाल्याचं कळलं. तो वयाच्या मानाने किती हुशार आहे हे कधी तरी ऐकावं लागणारच होतं, म्हणून भाची दवाखान्यातून घरी आल्याबरोबर सहाव्या दिवशीच जाऊन थडकले. बाळराजे पाळण्यात झोपलेले होते. आई-लेकीची कुठलीही कॉमेन्ट यायच्या आत मीच म्हणून घेतलं, ‘‘चंट दिसतो नाही?’’ माझं वाक्य संपायच्या आत नणंद म्हणाली, ‘‘हो, अगं वयाच्या मानाने झोपही कमीच आहे त्याला. आत्ताच डोळा लागलाय, नाही गं?’’ ती लेकीकडे बघत म्हणाली. आता खरं म्हणजे इतक्या लहान बाळाच्या झोपेच्या वेळा बदलत असतात हे या पन्नाशीच्या पुरंध्रीला माहीत नसावं?
हे वयाचं मान म्हणजे नक्की काय असतं? सगळीच मुलं जर वयाच्या मानाने हुशार, जास्त समजदार, जास्त स्मरणशक्ती असलेली असतील तर नक्की त्या वयात तितकीच समज असणारं मूल कुठं असतं का? तसंच साठी, सत्तरी, चाळिशी, पन्नाशी वगैरेंच्या व्यक्तींनी नक्की केवढं दिसावं, अशी अपेक्षा असते? कोणी या विषयावर माझं प्रबोधन करू शकेल का?    
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा