बायकोला ‘पगार’ देण्याचा कायदा येतोय अशी कुजबूज ताडफळे कुटुंबीयांच्या कानावर आली आणि सुरिताने- त्यांच्या कन्येने कायदा येईपर्यंत आपलं लग्नच लांबवलं. ती  म्हणते, बाहेरच्या नोकरीपेक्षा घरातलीच नोकरी काय वाईट? हे त्यांनी होणाऱ्या जावईबापूंच्या कानावर घातल्यावर ते घाबरले. आता जावईबापू काय करणार ?
खूप दिवसांनी ताडफळे भेटले. मागील भेटीत त्यांनी मुलीचं लग्न ठरल्याची बातमी दिली होती. पुढे काहीच कळलं नव्हतं. म्हणून मी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तारीखसुद्धा ठरली होती, पण सुरितानेच ब्रेक लावला. बायकोला ‘पगार’ देण्याचा कायदा येतोय ना?’’
‘‘हो, ऐकलंय खरं. पण माझ्या माहितीप्रमाणे नोकरी न करणाऱ्या बायकाच त्याच्या लाभार्थी ठरणार आहेत आणि तुमची सुरिता तर नोकरी करते.’’ मी म्हणालो.
‘‘पण ती म्हणते, बाहेरच्या नोकरीपेक्षा घरातलीच नोकरी काय वाईट? हे आम्ही होणाऱ्या जावईबापूंच्या कानावर घातल्यावर ते घाबरले. म्हणाले, ‘कायदा अद्याप आलेला नसला तरी भविष्यात तो येणारच नाही, याची शाश्वती काय?’ सध्या तो आपल्या लग्न करण्याच्या निर्णयाचाच फेरविचार करतो आहे.’’
‘‘आणि सुरिता?’’
‘‘ती कायदा येण्याची वाट बघते आहे. तो कायदा आला, की विवाह संस्थेला वेगळीच दिशा मिळेल.’’
‘‘दिशा? अहो, विवाह संस्थेची दशा दशा होईल. आधीच घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय. काही जोडपी प्रायोगिक तत्त्वावर एकत्र राहू लागतील. त्यात हे नवीन लचांड!’’ मी चिंतेच्या सुरात म्हणालो.
‘‘सुरिताचं काही चुकतंय असं मला वाटत नाही. सगळ्या गोष्टी आधी ठरवून घेतलेलं बरं असतं.’’
हा मुद्दा मात्र मला पटला. पगार ठरवल्याशिवाय माळेत मान अडकवणं हा जुगारच होता. ताडफळे पुन्हा भेटले तेव्हा म्हणाले, ‘‘बायकांवर कोणकोणती कामं पडतात याचा नवरेलोकांना अंदाज नसतो. म्हणून सुरिताने कामांची यादीच तयार केली आहे. त्यामुळे वराला तिचा पगार ठरवणं सोयीचं होईल. ही झेरॉक्स ठेवून द्या. सुयोग्य स्थळ आढळल्यास, सुरिताची ही यादी त्यांना द्या.’’
‘‘आपल्याकडे फोटोपत्रिका देण्याची प्रथा आहे.’’ मी म्हणालो. ‘‘फोटो आता फेसबुकवरच टाकतात. त्यामुळे एकाच वेळी खूपजण बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू शकतात. पगाराची किती तयारी दाखवतात ते बघून मगच आम्ही पत्रिका देऊ.’’ ताडफळेंनी प्रोसिजर सांगितली.
यादीत चि.सौ.कां. सुरिताने स्वयंपाकाच्या मथळ्याखाली- किराणा सामानाची यादी करणे, गहू-तांदूळ निवडणे, दळण दळायला देणे, प्रत्यक्ष पाककर्म, वगैरे कामं टाकली होती.
‘‘स्वयंपाकीणबाई हे काम तीन-चार हजारांत करत असेल.’’ मी अंदाज व्यक्त केला. त्यावर ताडफळे तडकले,
‘‘मग बाईच ठेवा म्हणावं! ‘बायकोचे  ‘रेट’ वेगळे असणार. सुरिताला आत्ताच पंचावन्न हजार पगार आहे. त्यापेक्षा कमी पगारावर ती तयार व्हायची नाही.’’ आकडा ऐकून मला ठसकाच बसला. यादी लांबलचक होती. त्यात नवऱ्याच्या मित्रांचं आदरातिथ्य, मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, पालकांच्या मिटिंगा, सासू-सासऱ्यांची सेवा, अशा अनेक कामांचा यादीत समावेश होता. इथपर्यंत ठीक होतं, पण महिन्यातून एका रविवारी नवऱ्याकडून पंखे पुसून घेणे, रद्दी द्यायला लावणे, सुट्टीच्या दिवशी त्याला बाथरूममध्ये ढकलणे ही कामं वाचून मी म्हणालो, ‘‘पण ही कामं तर नवरा करणार ना? त्याच्या कामांचा पगार तिला कसा मिळेल?’’
‘‘नीट वाचा. ही कामे नवऱ्याकडून करून घेणे असं लिहिलंय तिने! आणि हे काम अतिशय अवघड असतं.’’
‘‘हे सुरिताला काय ठाऊक?’’
‘‘तिने विवाहित मैत्रिणींच्या सल्ल्यानेच यादी पक्की केली आहे.’’
मग मीदेखील काही कामं सुचवली. नवऱ्याला पोटमाळ्यावर चढायला लावणे, दिवाळीत आकाश-कंदिल आणायला लावून आतल्या बल्बसकट तो लटकवून घेणे, वगैरे. तरी एक काम सुरिता विसरली असावी. माहेरचेच नव्हे, तर सासरचेसुद्धा नातेसंबंध जपण्याचं काम साधारणपणे स्त्रीच करत असते. त्याचं मूल्य कसं ठरवणार? की ते काम ती अंगीकारणारच नाही?..  माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ते पाहून ताडफळे म्हणाले, ‘‘तुम्ही कशाला रडताय? तुमची बायको पगार मागेलम्हणून घाबरलात की काय?’’
‘‘नाही हो! प्र. के. अत्र्यांच्या ‘दिनूचं बिल’मधल्या आई आणि मुलाच्या जागी ‘बायको नवरा’ टाकून मध्यंतरी मी मनातल्या मनात त्या गोष्टीचं पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची आठवण झाली. माहेरचे सर्व बंध तोडून येणारी नववधू आतापर्यंत हे घर आपल्याला आपलंसं करून घेईल का, हा विचार मनात घोळवत माप उलथून सासरी प्रवेश करत होती. यापुढे बहुधा, ठरलेला पगार वेळेवर मिळेल का? ओव्हरटाइम, बोनसचं काय होणार, या चिंतेतच गृहप्रवेश करील.’’
‘‘तुम्ही फार बुवा विचार करता! अहो, आपल्याकडे आता जागतिकीकरण बऱ्यापैकी रूळलंय. व्यापारीकरण हा त्याचाच पोटभाग आहे. या व्यवस्थेत भावनांना थारा नसतो. आणा ती यादी इकडे! तुमचं हे काम नाही.’’
‘‘यादी घ्या. पण जाता जाता एक उखाणा ऐकून जा. सुरिताच्या कामी येईल.
आणलं होतं श्रीफळ, त्याची केली चटणी
xxx चं नाव घेते, मी त्याची पगारी पत्नी.’’
ताडफळे खूश होऊन निघून गेले. मनात आलं. एकदा का हा कायदा आला, की तो शहरी-ग्रामीण असा भेद थोडाच करणार? मग तिथली एखादी गृहिणी,
‘आधी होते कारभारीण, आता झाले पगारी
xxx रावांचं नाव घेते, ही आयडिया लई भारी.’
असा एखादा उखाणा घेईल. पाठोपाठ अनेक प्रश्न मला सतावू लागले. खरोखरच असा कायदा आला तर? पगार नवरा-बायको दोघं मिळून ठरवतील? की सरकार तो ठरवणार? इथेही मिनिमम व्हेजिस अ‍ॅक्ट लागू होणार का? अंमलबजावणीच्या तपासणीकरिता इन्स्पेक्टर घरोघरी फिरणार का? नवरा पगारपत्रकावर रेव्हेन्यू स्टॅम्प लावून त्यावर बायकोची सही घेणार का? पुन्हा ते कागदपत्र जपून ठेवण्याची जबाबदारी नवऱ्याची? की तेही काम तो पत्नीवरच सोपवणार? लबाड नवरे पगार न देताच बायकोची खोटी सही घेऊन आयकरात सूट मात्र मिळवतील.
सरंजामेची बायको नोकरी करते, असा कायदा आल्यास, मी नोकरी सोडून घरात बसणार आणि तुझ्याकडून पगार घेणार, असं तिने सरंजाम्याला धमकावल्यापासून बिचारा हवालदिल झाला होता. पण सुदैवाने त्याच्या बायकोने पुन्हा तो विषय काढला नाही. तिच्या या अळीमळी गुपचिळीचं कारण सरंजाम्याला नुकतंच समजलं. त्याची मेहुणी स्त्री हक्क संघटनेचं कामबिम करते. सरंजाम्याचा साडू ‘त्या’ कायद्याची वाटच बघतो आहे म्हणे! त्याने बायकोला बजावूनच ठेवलं आहे, ‘‘तुम्हा बायकांच्या पगाराचा कायदा आला रे आला की, आपले संबंध मालक-मजूर असे असतील. लक्षात ठेव.’’ तेव्हापासून दोघी बहिणींची पाचावर धारण बसली आहे!
या कायद्याबद्दल माझ्या बायकोची प्रतिक्रिया विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘वरवर हा कायदा स्त्रीला तिच्या हक्काची जाणीव करून देणारा वाटला, तरी तुम्ही पुरुष स्त्रीला सुखाने जगू देणार नाही. आता कुठे पुरुषाने बायकोला घरकामात मदत करण्याचं चित्र कुठेकुठे दिसू लागलं होतं. एक गोड कळी उमलण्याच्या बेतात होती, पण ‘अदय कराचा अवचित घाला तिजवरी तो आला’ असं म्हणायची या कायद्याने पाळी येईल, दुसरं काय?’’

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Story img Loader