आजचा दिवस अगदी वेगळाच गेला. हर्ष, दु:ख, आशा-निराशा, नाना अनुभवांचा. प्रत्येक दिवस काही वेगळं घेऊन येतो आणि दिवसाला दिवसाचा टाका घालीत आयुष्य पुढे सरकत राहते.
पहाटेच्या साखरझोपेतले दुसरे स्वप्न संपले आणि कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. थंडगार वाऱ्याचा झोत अंगावर आला आणि मी रजई घट्ट लपेटून घेतली. खिडकीचा पडदा सारला तर बाहेर पाऊस रप रप कोसळत होता. सकाळी डोळे उघडताक्षणी पाऊस दिसला की माझा मूडच जातो. बिघडलेल्या मूडमध्ये मी माझी कामं उरकत होते. बागेमध्ये माळीबुवांना सायकसची वाढलेली पाने छाटायला सांगत होते. तेव्हा फोनची कर्कश रिंग ऐकू आली. बागेतून धूम ठोकत, जिन्याच्या पायऱ्यांवरून पळत जाऊन मी रिसीव्हर उचलला.
‘‘दम खा, जरा शांतपणे आधी श्वास घे.’’ रेखा म्हणत होती.
‘‘श्वास चालू आहे, मी जिवंत आहे. तू बोल.’’ मी म्हणाले.
‘‘अगं, ती गेली बघ.’’ ती म्हणाली.
‘‘कोण गेली?’’ मी.
‘‘ती माझी बहीण गं.’’ ती.
‘‘कुठं गेली?’’ मी.
‘‘अगं गेली म्हणजे मेली ती,’’ ती.
‘‘काय सांगत्येस?’’ मी.
‘‘मेली एकदाची बघ. सगळेजण वाटच पाहत होते. गेले सहा महिने अंथरुणाला खिळून होती. सेवा करून करून सगळेच दमले होते.’’ तिने एका दमात सांगितले.
‘‘अगं बहीण होती ना तुझी. मग ‘एकदाची मेली’ असं म्हणत सुटकेचा नि:श्वास कसला टाकतेस?’’ मी चिडून म्हणाले.
एखादी बाई दुकानात गेली, सिनेमाला गेली, गावाला गेली, सहलीला गेली हे जितक्या सहज स्वरात आपण सांगतो ना तसे ती तिची बहीण गेल्याचे सांगत होती. तिच्या आणि बहिणीच्या नात्यात दुरावा कसा आला याची करुण कहाणी तिने मला ऐकवली. ते ऐकून मेल्यावरसुद्धा वैर संपत नाही, याचा प्रत्यय आला. रक्ताच्या नात्यातही इतकी तेढ असते की ती माणसाचे अस्तित्व संपल्यावरही शिल्लक उरते, याचे आश्चर्य वाटत होते. पाठच्या भावंडाबद्दलच्या भावना इतक्या बोथट होऊ शकतात का, की पापणीची कडही ओलावू नये की दु:खाचा एखादा आवंढाही गिळू नये. मी अगदी सुन्न झाले होते. माणसा-माणसातल्या नातेसंबंधांची गुंतागुंत अनाकलनीयच आहे. ती सोडवायला गेले तर गुंता अधिकच वाढत जातो. या वेळी मला वर्षां आठवली. तिचे आणि तिच्या सासूबाईंचे नाते बिनसलेलेच होते. त्यामुळे ते तसेच सगळ्यांनी स्वीकारलेले होते. एक दिवस फोनवर म्हणाली, ‘‘दोन दिवसांपूर्वी आमच्या हाय कमांड (सासूबाई) गेल्या.’’ वर्षां.
‘‘इतकं अचानक कसं सरकार कोसळलं?’’ मी.
‘‘किती वेळा अविश्वासाचे ठराव आणले, पण त्या कायम बहुमतात होत्या. शेवटी देवानेच खुर्ची काढून घेतली.’’ वर्षां म्हणाली.
‘‘मग आता तू गादीवर बसणार. तुझ्या शपथविधीला हजर राहते.’’ मी.
‘‘ए, तू मला भेटायला वगैरे येऊ नकोस हं. मला अजिबात वाईट वाटलेले नाही. त्या दिवशी मी जनलज्जेस्तव दोन अश्रू ढाळले आहेत.’’ ती म्हणाली.
तिचं ऐकून मला हसूच आलं. मग आम्ही दोघीही हसलो. नंतर मी रिसीव्हर ठेवला तेव्हा माझं मलाच ओशाळल्यागत झालं. तो गेलेला जीव हा टिंगल करण्याचा विषय नव्हे, असे मनाशी म्हणत मी माझ्याच गालावर एक चापट मारून घेतली आणि दोन मिनिटं स्तब्ध उभी राहून तिच्या सासूबाईंना श्रद्धांजली अर्पण केली होती. रेखा आणि वर्षां दोघीही अगदी खरं बोलल्या होत्या. कुठलाही मुखवटा त्यांनी धारण केला नव्हता, पण मनातलं इतकं स्पष्टपणं सांगण्याची दोघींची वेळ चुकली होती.
रेखाची बहीण सारखी डोळ्यांसमोर उभी राहत होती. त्यामुळं कामात लक्षच लागत नव्हतं. त्याच वेळी रस्त्यावरून ‘कोबी, फ्लॉवर, मटार भाजीयऽऽऽ’ अशी भाजीवाल्याची आरोळी ऐकू आली आणि मी भाजी घेण्यासाठी फाटकापाशी गेले.
‘‘ताई, टोमॅटो १० रुपये किलो लावलेत. दोन किलो घेऊन टाका. त्यात कांदा टाका, आलं टाका आणि साहेबांसाठी सूप बनवा. मटारचा सीझन सुरू झाला आहे. साहेबांसाठी मटार पॅटीस करा. दुधी एकदम स्वस्त देतो. साहेबांसाठी दुधी हलवा बनवा.’’ भाजीवाल्याची कॉमेण्टरी सुरू होती.
त्याच्या प्रत्येक शब्दागणिक माझा राग वाढत गेला आणि मी जोरात म्हणाले, ‘‘अरे ए, प्रत्येक पदार्थ काय साहेबांसाठी बनवा म्हणतोस. घरात काय इतर माणसं नाहीत का?’’
माझा चढलेला आवाज ऐकून तो वरमला. घरात आल्यावर फ्रिजमध्ये भाजी ठेवताना मनात विचार आला की, या घरात साहेबांचीच आवडनिवड जपली जाते. त्यांना जे हवं, जसं हवं तसेच पदार्थ माझ्याकडून केले जातात, मग त्या भाजीवाल्यावर आपण उगीचच चिडलो. तो जे बोलला ते खरंच होतं.
आपल्याच वागण्या-बोलण्यातली चूक आपल्याला समजली म्हणजे थोडा पश्चात्ताप होतो. यासंदर्भात एकदा संध्याशी बोलले तेव्हा तिची साजिरी म्हणाली, ‘‘मावशी, असा मूड ऑफ झाला म्हणजे शॉपिंगला जायचं.’’
‘‘हा कुठला तरी फोबिया आहे. लवकरात लवकर काढून टाक तो.’’ मी म्हणाले.
‘‘अगं तू प्रयोग करून बघ. एकदम मस्त वाटतं.’’ साजिरी आत्मविश्वासानं म्हणाली.
कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ठेवलेलं साजिरीचे हे वाक्य आठवलं आणि वाटलं, आपणही एकदा प्रयोग करून अनुभव घ्यायला काय हरकत आहे. पर्समध्ये पैसे कोंबून सुसाट वेगानं स्कूटर पळवीत मी लक्ष्मी रोडला साडीच्या दुकानापाशी उभी राहिले.
‘‘या मॅडम,’’ दुकानदाराने सुहास्य मुद्रेनं स्वागत केलं आणि ओरडून एकाला सांगितलं, ‘‘अरे, मॅडमना साडय़ांचा नवीन स्टॉक दाखव.’’
सेल्समननं माझ्यापुढं साडय़ांचा ढीग टाकला. प्रत्येक साडीचे वैशिष्टय़ तो सांगत होता. एक साडी उलगडून दाखवीत म्हणाला, ‘‘ही ऑलिव्ह ग्रीन कलरची धर्मावरम घेऊनच टाका, साहेबांनासुद्धा फारच आवडेल ही साडी.’’
त्याचं ते ‘साहेबांना आवडेल’ म्हणणं माझ्या डोक्यातच गेलं. त्या साडीकडं बघत मी मनाशीच म्हणायला लागले, ‘‘साहेबांना साडीच्या प्रकारातलं काहीही कळत नाही.’’ मागे हैदराबादहून येताना पोचमपल्ली तिकडे स्वस्त मिळते म्हणून आणायला सांगितली तर आल्यावर म्हणाले, ‘अख्खं हैदराबाद पालथं घातलं, पण तुझी त्रिचनापल्ली कुठ्ठं मिळाली नाही.’ मी डोक्याला हात लावला आणि ठरवून टाकले की, पुन्हा यांना साडीचं नाव सांगायचं नाही. फक्त ‘साडी आणा’ म्हणायचं. कारण हे गढवालची बुंदेलखंड आणि संबळपुरीची जगन्नाथपुरी करून मंोकळे होतील.
‘‘ही ब्लॅक कलरला ऑरेंज बॉर्डर तुम्ही घ्याच. तुम्हाला खूप छान दिसेल,’’ सेल्समन म्हणत होता.
काळी साडी बघितली की मला शोभाच आठवते. आमची एम.फिल.ची परीक्षा होती, त्या दिवशी मी काळी साडी नेसून गेले होते. मला बघताच शोभा ओरडली, ‘‘अगं गधडे, तुला काही लाज आहे का? आज आपली परीक्षा आहे आणि तू चक्क काळी साडी नेसून आली आहेस.’’
‘‘काळ्या साडीत मी छान दिसते. मग मला आतूनच उमलून आल्यासारखं वाटतं. त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढतो. मग काय पेपर खूप चांगला लिहिणार आहे.’’ मी म्हणाले.
तेवढय़ात तिकडून आमचे सर आले. आमच्याजवळ येऊन म्हणाले, ‘‘अभ्यास व्यवस्थित झाला आहे का?’’
‘‘सर, घरसंसार सगळं सांभाळून आम्ही शिकतो आहोत. नवऱ्याची तर काहीही मदत होत नाही,’’ शोभा म्हणाली.
‘‘मॅडम, तुमच्याबद्दल काय?’’ सरांनी मला विचारले.
‘‘सर, माझ्या नवऱ्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. उलट माझ्यावाचून त्याचं कसं अडेल हेच मी बघत असते,’’ मी म्हणाले.
‘‘वा! पक्क्य़ा धूर्त आहात.’’ सर हसून म्हणाले आणि निघून गेले. ते गेल्यावर शोभा चिमटा काढीत मला म्हणाली, ‘‘सर खूप मोठे कथाकार आणि कादंबरीकार आहेत माहीत आहे ना. कुठल्या तरी नायिकेच्या तोंडी तुझी ही वाक्ये घालतील.’’
‘‘घालू देत ना. त्या वाक्यावर माझा काही मालकी हक्क नाही.’’ मी निक्षून सांगितले.
‘‘अगं पण, अशी पुरुषशरणता दाखविलीस तर आपल्या स्त्रीवादाचे काय?’’ शोभा चिडून म्हणाली.
‘‘स्त्रीवादावर चर्चा करायची, त्यावर लिहायचे हे सगळं उंबऱ्याबाहेर. घराच्या चौकटीतून आत गेले की हाताची घडी आणि तोंडावर बोट,’’ मी म्हणाले.
‘‘मॅडम, ही धर्मावरम पॅक करू ना,’’ सेल्समन विचारीत होता. मी एकदम माझ्या तंद्रीतून जागी झाले. त्या काळ्या साडीचा धागा पकडून मनातल्या मनात कुठे भटकून आले होते.
साडी घेतली आणि सटरफटर खरेदी केली. आनंदानं तरंगतच घरी आले. दार उघडताना लेटर बॉक्सकडं लक्ष गेलं. त्यात कुणाचं तरी पत्र आलेलं दिसत होतं. पत्र फोडून अधीरतेनं वाचायला लागले. कोल्हापूरहून एम.ए. करणाऱ्या एका मुलाचं पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, ‘‘ताई, तुमचा लेख वाचला. उत्तम जमला आहे. याच शैलीत लिहीत जा.’’ हे पत्र माझ्या मनाला आणखी सुखावून गेलं. कारण दादसुद्धा देता आली पाहिजे आणि ती खुल्या मनानं दिली पाहिजे. ते काम या मुलानं केलं होतं. ते पत्र हातात धरून मी नर्तकी घेतात तशी एका पायावर छान गिरकी घेतली.
मनात आलं, आजचा एक दिवस अगदी वेगळाच गेला. सकाळपासून कधी हर्ष, कधी खेद, कधी निराशा, कधी आशा, सगळ्याच भावनांच्या चक्रातून गेलो. काही प्रसंग घडले, तर काही घडून गेलेल्या घटना पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. काही व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्या, तर काही मनात प्रवेश करून गेल्या. प्रत्येक दिवस काहीतरी घेऊन येतो आणि दिवसाला दिवसाचा टाका घालीत आयुष्य पुढे सरकत राहते..