जेफ यांनी संभाषणाला सुरुवात केली. ‘‘महान नेत्यांच्या यशाचे गमक काय? हा तुमचा प्रश्न होता. मला वाटतं हा खूप छान प्रश्न आहे, पण त्याआधी सुरुवात करण्याआधी तुम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा का आहे ते सांगा.’’
‘‘म्हणजे मी महान नेता होऊ शकेन,’’ अजिबात न अडखळता डेबी उत्तरली.
जेफ यांनी त्यांच्या ड्रॉवरमधून एक कागद काढला. ‘‘हा तुमच्या मेंटरशिप प्रशिक्षणाचा अर्ज आहे,’’ ते म्हणाले. ‘नेता म्हणजे काय’ या प्रश्नाचे तुम्ही दिलेले उत्तर असे आहे, ‘नेता म्हणजे अधिकारपदावरील व्यक्ती जिच्यावर तिच्या आदेशानुसार काम करणाऱ्या लोकांकडून उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी असते.’
डेबीने मान डोलावली. ‘‘मला अगदी संयुक्तिक वाटतं ते’’ ती म्हणाली.
‘‘तसं बघितलं तर डेबी, खरं म्हणजे नेतृत्वाचा आणि ती व्यक्ती संस्थेत कुठल्या पातळीवर आहे याचा काहीही संबंध नसतो. जगात अशी अनेक माणसं आहेत की, जी नेतृत्वाच्या पदावर नसतानाही सतत नेतृत्व करत असतात. तसंच अशीही बरीच माणसं असतात की जी नेतृत्वाच्या पदावर असतात; पण नेतृत्व करण्याचे अजिबात कष्ट घेत नाहीत.’’
दुसरं विधान डेबीला त्रासदायक वाटलं, कारण जेफ आपल्याबद्दल बोलत आहेत, हे तिला माहीत होतं. ती नेतृत्वाच्या पदावर विराजमान होती; पण तिच्या टीमच्या कामगिरीकडे बघितल्यावर ती पुरेसे नेतृत्व करत नव्हती, हे उघड होतं.
डेबी क्षणभर अडखळली. ‘‘ते जर एक पद नसेल तर नेतृत्व म्हणजे काय?’’
भिंतीवरच्या फळ्याकडे जात जेफ म्हणाले. ‘‘नेतृत्व हे बरंचसं हिमनगासारखं असतं. त्याचे दोन मुख्य भाग असतात. पाण्याच्या पृष्ठभागावरील तुम्ही बघू शकता तो भाग व पाण्याखालचा भाग, जो तुम्ही बघू शकत नाही. तुम्ही विज्ञानात शिकलेला हा सिद्धांत तुम्हाला कितपत आठवतो ते बघूया. हिमनगाचा कितवा हिस्सा बहुधा पाण्याच्या वर दिसतो?’’
‘‘मला असं वाटतं की, हिमनगाचा २० टक्क्य़ांपेक्षा कमी भाग पाण्यावर दिसतो,’’ ती म्हणाली. ‘‘तुमचा अंदाज बरोबर आहे. नेतृत्वालाही तेच तत्त्व लागू आहे. नेतृत्वाबद्दल लोकांना जो दिसतो, त्यापेक्षा त्यांना न दिसणारा भाग जास्त असतो.’’
 ‘‘पाण्याच्या खाली नेत्याचे चारित्र्य असते. पाण्याच्या वर असतात नेत्याची कौशल्यं. ते काय काम करतात हे त्यावरून कळतं. याकडे दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे म्हणता येईल की, नेतृत्वाचे दोन भाग असतात. असणे व करणे.
शंभर वर्षांपूर्वीचा विचार करूया. उत्तर समुद्रातून जाणाऱ्या जहाजांपैकी बरीचशी हिमनगाला बळी पडत असत. ‘‘या बऱ्याचशा अपघातांमध्ये जहाजं कशी बुडाली? हिमनगाच्या दिसणाऱ्या भागामुळे का पाण्याखालील न दिसणाऱ्या भागामुळे?’’
डेबी म्हणाली, ‘‘बहुधा पाण्याखालील भागामुळे.’’
‘‘बरोबर,’’ जेफ म्हणाले. ‘‘चारित्र्य, किंबहुना चारित्र्याचा अभाव हे आजही जगातील अनेक नेत्यांच्या अधोगतीचे कारण आहे. प्रभावी नेतृत्वासाठी कौशल्य तर आवश्यक आहेतच; पण त्याबरोबरच चारित्र्यदेखील आवश्यक आहे. जर एवढी कौशल्यं आत्मसात केली तर आपण प्रभावी नेते होऊ असं अनेकांना वाटतं. काहींचा असा विश्वास आहे की, त्यांनी फक्त चारित्र्य जोपासलं तर ते महान नेते होऊ शकतील. दोघंही चूक आहेत. प्रभावी नेतृत्वासाठी कौशल्य व चारित्र्य या दोहोंची आवश्यकता आहे.’’
 ‘‘तर मग जेफ, महान नेत्यांच्या यशाचे गमक काय आहे?’’ तिने विचारले.
‘‘हे गमक म्हणजे, महान नेते सेवा करतात,’’ आपले शब्द तिच्यापर्यंत पोहोचावेत  म्हणून जेफ जरासे थांबले.
‘‘मदत करतात? तुम्हाला काय म्हणायचं आहे?’’ डेबीच्या सुरातून अविश्वास दिसून येत होता.
एक मुख्य प्रश्न तुम्ही सतत स्वत:ला विचारायला हवा, ‘‘मी केवळ स्वत:ला मदत करणारा नेता आहे, का लोकांना मदत करणारा नेता आहे?’’
‘‘फक्त कौशल्याच्या पातळीचा विचार न करता नेत्यांनी सतत स्वत:ला एक प्रश्न विचारायला हवा, ‘‘मी का नेतृत्व करतो आहे?’’ माझ्या सहकाऱ्यांची आणि संस्थेची सेवा करण्याच्या उद्देशाने जर मी नेतृत्व करत असेन, तर मी मूलत: माझा उद्देश केवळ स्वत:पुरताच असताना वागेन त्यापेक्षा वेगळा वागेन. एक मुख्य प्रश्न तुम्ही सतत स्वत:ला विचारायला हवा की, ‘‘मी स्वत:चा स्वार्थ साधणारा नेता आहे की सेवा करणारा नेता आहे?’’
‘‘मी गोंधळून गेले आहे.’’ डेबी अगदी सरळपणाने म्हणाली. ‘‘सेवेची ही प्रेमळ, अस्पष्ट कल्पना माझ्या टीमला लागू करणे मला जड जाते आहे. माझा हेतू चांगला आहे आणि माझ्या स्वभावामुळे मला लोकांची सेवा करायला जमते, असे गृहीत धरले तर चांगले नेतृत्व करायला मी काय करायला हवे?’’
‘‘सेवेची संकल्पना बरोबर आपल्या हिमनगाच्या पाण्याच्या वरील भागात येते. तुम्ही नेता म्हणून जे करता त्यावर सेवेच्या संकल्पनेचा कसा प्रभावी उपयोग करता येईल, याचा आपण दोघं मिळून शोध घेणार आहोत.’’
‘‘महान नेते एका क्षणात किंवा एका महिन्यात अथवा एका वर्षांत महान बनत नाहीत. ते त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात दररोज आणि सतत महान नेते बनत असतात. तुमचा हा प्रवास कधीही संपणारा नसतो. तुम्ही सर्व मिळवले असे कधीच होत नाही. तुम्ही कायम आणि सातत्याने सेवा करण्याचे नवीन मार्ग शोधत राहाल आणि अशा प्रत्येक वेळी तुमची नेतृत्व कौशल्ये विकसित होत राहतील आणि तुम्ही एक अधिक चांगला नेता बनाल.’’

पुढील बैठकीत जेफ यांनी विचारले, ‘‘आता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या टीमसह कुठे चालला आहात?’’
‘‘म्हणावी तितकी सुधारणा नाही.’’ डेबीच्या बोलण्यातून तिची असाहाय्यता दिसत होती.
‘‘काळजी करू नका,’’ जेफ म्हणाले. ‘‘मला विश्वास आहे की तुम्हाला ते समजायला लागले आहे. तुमच्या लोकांना मदत करण्याचे मार्ग शोधत राहा, तरीपण याशिवाय आणखी एक गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. अशी चांगली कृत्यं आणि मदतीच्या कामांमुळे तुम्ही महान नेता होणार नाही. जिच्याबरोबर काम करणे चांगले वाटेल अशी व्यक्ती तुम्ही असू शकाल; पण एक महान नेता असणार नाही.’’
एखादा माणूस नेतृत्व न करता मदत करू शकतो; पण मदत न करता नेता नेतृत्व करू शकत नाही.
‘‘आता सांगा नेत्याला ध्यास कसला हवा ?’’
‘‘साध्य व्हायलाच हवे असे स्वप्न तुमच्यात ध्यास निर्माण करते. ते तुमच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही कोण आहात, कुठे जात आहात आणि कशामुळे तुमच्या वागणुकीला चालना मिळते हे सांगते. तुमच्या विक्रेत्यांना आणि ग्राहकांना समाधान देण्याचा ध्यास तुम्हाला लागला आहे का?’’
भविष्यातील एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला ध्यास लागलेला नसेल, त्यामुळे तुमच्यात चेतना जागृत होत नसेल आणि तुम्ही सकाळी अंथरुणातून याच विचाराने बाहेर पडत नसाल, तर तुम्ही हे पक्कं समजून चला की तुमच्या टीमलादेखील ध्यास लागणार नाही.’’
‘‘नेतृत्व म्हणजे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. आपल्या टीमला आपण कुठे चाललो आहोत ते समजेल ही नेत्याच्या अनेक प्राथमिकतांमधील एक मुख्य बाब असली पाहिजे. भविष्याचा वेध घेणे म्हणजे एक आग्रही स्वप्न बघणे होय आणि ही नेत्याच्या अनेक विशेषाधिकारांमधील एक बाब आहे. तशीच ती नेत्यांकडून असणारी एक महत्त्वाची अपेक्षा आहे. संस्था कुठल्या दिशेने जावी हे ठरवणे काही वेळा अवघड असू शकते; पण कुठल्या दिशेने जात राहणे हे आवश्यक आहे. स्वप्न बघणं आणि अशी भविष्याधारित स्वप्नांची सर्वाना माहिती करून देणं हा नेतृत्वाचा फार मोठा भाग आहे.
आपल्या लोकांना आपण कुठल्या मार्गाने जातो आहोत याची कल्पना देणे आवश्यक आहे. म्हणून नेत्यांनी आपल्या वेळेतला काही वेळ भविष्याचा वेध घ्यायला वापरला पाहिजे. हे आपण करतो. कारण कालांतराने ही दूरदृष्टी लोप पावते. म्हणून आपण ही दूरदृष्टी ‘‘सतत जागृत ठेवली पाहिजे, कारण ती हळूहळू नाहीशी होते. आणि ते नेत्याला परवडणारे नाही’’
(‘द सीक्रेट’ या साकेत प्रकाशनाच्या डॉ. अ.मो.जोशी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)    
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा