एका गुरुंकडे एक मांजर होते. ते सतत त्यांच्या अवतीभोवती वावरत असे. गुरुजी ध्यानाला बसले की ते मांजरदेखील त्यांच्याजवळ ध्यान संपेपर्यंत डोळे मिटून बसून असे. त्यांच्या शिष्यांनी त्यांना मांजराशिवाय ध्यान करताना कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचे शिष्यदेखील ध्यान करताना आपल्या बाजूला एक मांजर ठेवू लागले. त्यातूनच पुढे त्या गुरुंच्या शिष्यसंप्रदायात एक प्रथा निर्माण झाली की ध्यान करताना नेहमी आपल्याजवळ एक मांजर ठेवावे. आपण करीत असलेले पारंपरिक ध्यान हे बव्हंशी अशा प्रकारचे असते. ध्यानाच्या कोणत्याही पद्धतीचे पूर्ण आकलन न करता आपण तिची केवळ पुनरावृत्ती करत असतो. त्यामुळे आपले ध्यान म्हणजे कोणत्यातरी प्रणालीचे केवळ अनुसरण बनून राहते. असे अनुसरण म्हणजे ध्यान नव्हेच. कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती ही मेंदूला बोथट व यांत्रिक बनवते. असे असंवेदनक्षम व यांत्रिक मन ध्यान कसे करू शकेल? ध्यानासाठी तर अत्यंत तरल, संवेदनक्षम व तरीही अत्यंत शांत अशा मनाची गरज असते.
ध्यानाच्या सर्व रूढ पद्धती सांगतात, की तुम्ही फक्त ध्यान करू लागा म्हणजे तुमचे मन आपोआपच शांत व संवेदनशील होत जाईल. परंतु आपले रोजचे जीवन हे धकाधकीचे व संघर्षमय असते. त्यातून आपल्या आत एक प्रकारची अव्यवस्था व गोंधळ निर्माण होत असतो. आणि असे अव्यवस्थित व गोंधळलेले मन जेव्हा ध्यान करू लागते तेव्हा ते ध्यानदेखील त्या गोंधळाचाच एक भाग बनून जाते व अनेक प्रकारच्या भ्रामक अनुभवांना जन्म देते. अशा भ्रामक अनुभवांमध्ये अडकलेल्या मनाने केलेले ध्यान म्हणजे स्वत:च इच्छिलेले अनुभव स्वत: घेत राहण्याची प्रक्रिया होय. त्यातून ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कोणताही मूलभूत बदल घडून येत नाही.
ध्यान म्हणजे केवळ एक विशिष्ट अवस्थेत डोळे मिटून बसून राहणे नव्हे. ध्यान हे कोणत्याही अवस्थेत केव्हाही होऊ शकते. कारण ध्यान ही करण्याची गोष्ट नसून ते व्हावे लागते. जाणूनबुजून हेतुपुरस्पर केलेले ध्यान म्हणजे ध्यान नव्हेच. असे ध्यान हे स्वकेंद्रित क्रियाकलापांचाच एक विस्तार असतो. ज्याक्षणी आपण ध्यान करीत आहोत याची तुम्हाला जाणीव होते त्याक्षणी ध्यान संपलेले असते. ध्याता आणि ध्यान या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसतात. जसा ध्याता तसेच त्याचे ध्यान. म्हणूनच ध्यान करण्यापूर्वी आपल्यात एक प्रकारची आंतरिक सुव्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. ही सुव्यवस्था कोणत्याही प्रकारच्या शिस्तबद्ध आचरणातून निर्माण होत नसते तर आपल्या जीवनातील र्दुव्यवस्था निर्माण करणारे घटक अवलोकनाद्वारे आकळून त्यांचा निचरा केल्याने होत असते. म्हणजेच ध्यान ही दिवसातला काही भाग म्हणून फक्त महत्त्वाचे नसून दिवसभरात आपण जे काही करतो ते सर्वच त्या ध्यानाचा भाग असते. असे ध्यानव्याप्त जीवन जगणाराच अस्तित्वाचा सखोलतेचा शोध घेऊ शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनात र्दुव्यवस्था निर्माण करणारे घटक कोणते? त्यातील सर्वात मोठा व महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संघर्ष. आपल्या रोजच्या जीवनात बाह्य़ व आंतरिक अशा दोन्ही पातळींवर विविध प्रकारचे संघर्ष सातत्याने चाललेले असतात. हे संघर्ष संपवून टाकणे शक्य आहे का? एक पूर्णत: संघर्षमुक्त असे जीवन जगता येणे शक्य आहे का? या प्रश्नाच्या अनुषंगाने घेतलेला शोध हाही ध्यानाचाच एक भाग आहे. आपले रोजचे जीवन हे भयग्रस्त असते. आपल्याला विविध प्रकारच्या चिंता सतावत असतात; अनेक गोष्टींचा तिटकारा वाटत असतो; कित्येक गोष्टींचा राग येत असतो. आपण सातत्याने काहीतरी बनण्याचा प्रयत्न करीत असतो, इतरांशी आपली तुलना करत असतो. आपल्या आत कित्येक परस्परविरोधी अशा इच्छा – आकांक्षा घर करून असतात. या सर्वाच्या परिणामस्वरुप आपल्या जीवनात र्दुव्यवस्था निर्माण होत असते. खरोखर या सर्व गोष्टींपासून मुक्त म्हणजेच एक सुव्यवस्थित जीवन जगता येणे शक्य आहे का? कारण असे जीवन जगणाराच ध्यान करू शकतो.
ध्यान म्हणजे विचार व ज्ञान यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला आपल्या अस्तित्वाचा शोध. आणि विचार व ज्ञान हेच या शोधातले प्रमुख अडथळे ठरत असतात. ज्ञान हे आपले मन पूर्वग्रहदूषित करत असते व विचार हा सातत्याने आपल्याला हवे असलेले अनुभव निर्माण करण्यात गुंतलेला असतो. विचाराच्या क्षेत्राच्या पलीकडे जाण्याची अभिलाषाच आपल्यातील विचारयंत्रणेला त्या क्षेत्रासंबंधीच्या कल्पना करण्यास उद्युक्त करत असते व असे तथाकथित काल्पनिक विचारहीन क्षेत्र मग विचाराच्या क्षेत्राचाच एक हिस्सा बनून जाते. म्हणूनच ध्यान करण्यापूर्वी त्या ध्यानातून काहीतरी अनुभवण्याची, काहीतरी मिळविण्याची अभिलाषा प्रथम लोप पावली पाहिजे. नाहीतर ही अभिलाषा वास्तवाचे जसेच्या तसे अवलोकन करण्यामध्ये मोठाच अडथळा ठरू शकते.
ध्यानातून काहीच मिळवायचे नसेल तर ते कशासाठी करायचे? त्याचा माणसाला फायदा काय? सर्वसाधारण माणूस हा फायद्याच्या दृष्टिकोनातूनच सर्व गोष्टींचा विचार करत असतो. नफा कमवण्यासाठी व्यवसाय करणारा व काहीतरी आध्यात्मिक अनुभवासाठी ध्यान करणारा या दोन्हीमागे तीच काहीतरी मिळवण्याची मानसिकता आहे. अशी मानसिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती निरपेक्ष कृतीचे रहस्य कसे उलगडू शकेल? जेव्हा काहीतरी साध्य करण्यासाठी ध्यान केले जाते. तेव्हा ते साध्य ध्यानापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण बनते व ध्यान हे केवळ ते साध्य प्राप्त करण्याचे एक दुय्यम साधन बनते. असे ध्यान हे अगदीच उथळ व सीमित असते. वास्तवापासून केलेले ते एक पलायन असते. त्यामुळेच त्याला ध्यान म्हणणेदेखील चुकीचे ठरेल.
ध्यान म्हणजे जीवनाच्या पावित्र्याचा घेतलेला शोध होय. असा शोध घेण्यासाठी व त्या पावित्र्याला स्पर्शण्यासाठी माणसाचे मनदेखील पवित्र असले पाहिजे. माणसाचे मन जर कलुषित असेल, जुनाट व बुरसटलेल्या विचारांनी भरलेले असेल, स्वकेंद्रित क्रियाकलापांमध्ये व्यग्र असेल तर ते पवित्र कसे अशू शकेल? अवधानाच्या प्रखर प्रकाशात आवड-निवडरहित अवलोकनाद्वारे जेव्हा या सर्व गोष्टींचे आकलन करण्यात येते, तेव्हा त्या सर्व गोष्टी सहजरित्या उन्मीलित होऊन अंत पावतात व मन त्यापासून पूर्णतया मुक्त होते. असे मुक्त मनच त्या शाश्वताप्रत, त्या पावित्र्याप्रत येण्यास सक्षम असते.
मग प्रार्थनेला ध्यानात काही स्थान आहे का? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला प्रथम प्रार्थना म्हणजे काय हे समजावून घ्यायला हवे. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण आराध्य देवतेकडे काहीतरी मागत असतो. विविध लोक विविध प्रकारे ही मागणी करत असतात. काही लोक नुसतीच याचना करतात; आपली केविलवाणी परिस्थिती पाहून देवतेला आपली दया येईल व ती आपली मागणी पूर्ण करेल अशी त्यामागे भावना असते. तर काही लोक प्रथम देवतेची स्तुती करतात व नंतर आपले मागणे मागतात. आपण केलेल्या स्तुतीमुळे खूश होऊन देव आपली मागणी पूर्ण करेल अशीच त्यामागची भावना असते. काही लोक आणखी पुढे जाऊन देवतेला आपल्या मागणीच्या मोबदल्यात काहीतरी देऊ करतात. हा त्यांनी देवतेबरोबर केलेला एक प्रकारचा करारच असतो. सर्व प्रकारचे नवस या प्रकारात मोडतात. ध्यानातून जर काही मिळवायचेच नसेल तर ज्या गोष्टीचे स्वरूपच मुळी काहीतरी मागणे आहे अशा प्रार्थनेला ध्यानात कोणतेही स्थान कसे असू शकेल? याचा अर्थ माणसाने प्रार्थनाच करू नये असा होतो का? एखाद्याने प्रार्थना करावी की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण प्रार्थनेला ध्यान म्हणणे म्हणजे ध्यानाच्या संदर्भात स्वत:चीच फसवणूक करणे होय. निसर्गरचनेमध्ये काहीही फुकट मिळत नसते. प्रत्येक गोष्टीची माणसाला किंमत मोजावी लागते. म्हणून प्रार्थनेद्वारा माणसाने काही मिळवले असेल तर त्याची किंमतही त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे द्यावी लागते. म्हणूनच सुज्ञ माणूस कधीच काहीही मागत नसतो. तो फक्त जीवनाच्या सखोल आकलानातून सुव्यवस्थित झालेले जीवन जगत असतो. अशा सुव्यवस्थित जीवनातच ध्यानाला बहर येऊ शकतो.
( जे. कृष्णमूर्ती यांच्या ध्यानविषयक विचारांचा, त्यांचे अभ्यासक किशोर खैरनार यांनी घेतलेला हा वेध)
ध्यान
एका गुरुंकडे एक मांजर होते. ते सतत त्यांच्या अवतीभोवती वावरत असे. गुरुजी ध्यानाला बसले की ते मांजरदेखील त्यांच्याजवळ ध्यान संपेपर्यंत डोळे मिटून बसून असे. त्यांच्या शिष्यांनी त्यांना मांजराशिवाय ध्यान करताना कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचे शिष्यदेखील ध्यान करताना आपल्या बाजूला एक मांजर ठेवू लागले.
आणखी वाचा
First published on: 15-12-2012 at 03:41 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodhivruksha