जो पर्यंत तुम्ही वर्तमानात असण्याची वारंवारिता प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत सगळी नाती आणि विशेषत: जिवलग नाती खोलवर सदोष आणि अंतिमत: कुचकामी बनलेली असतात. काही काळ अशी नाती निर्दोष वाटतात. जसं तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडले; पण एकदा का वाद, मतभेद, संघर्ष, असमाधानाचे प्रसंग येऊ लागले की, त्या वेळेस अशी निर्दोष नाती बिघडायला उशीर लागत नाही. कधी कधी तर शारीरिक किंवा भावनिक हिंसेपर्यंतही ती पोहोचतात.
बरेचसे ‘प्रेमसंबंध’ बऱ्याच लवकर प्रेम-द्वेष संबंधाचं रूप धारण करतात, असं आपण पाहतो आहोत. मग झटक्यात प्रेमाचं रूपांतरण रानटी आक्रमकतेत होतं, वैमनस्याची भावना निर्माण होते किंवा प्रेमसंबंध पूर्णपणे तुटतात आणि ही सर्वसामान्य स्थिती असते, असं आपणास वाटतं. तुम्ही प्रेम करता आणि प्रेमविरोधी भावनाही बाळगता. याचा अर्थ तुमच्यात अहंकार आणि तुमचं आसक्तीपूर्ण प्रेम याची गल्लत होऊ लागते.
आक्रमकता, भावनिक अत्याचार इत्यादी प्रेमविरोधी भावना आपलं अस्तित्व दाखवू लागतात. तुम्ही तुमच्या मित्रावर/मैत्रिणीवर एकाक्षणी प्रेम करता आणि दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीविषयी आक्रमक बनता. हे कसं शक्य असतं? खऱ्या प्रेमात अशा परस्परविरोधी भावना नसतात. तुमच्या प्रेमाला विरोधी बाजू असेल तर ते प्रेम असत नाही. ती तुमची प्रचंड अहंकाराची गरज असते. त्यातून तुम्ही ‘स्व’ची गरज भागवू पाहता. समोरची व्यक्ती तुमची ही गरज तात्पुरती पूर्ण करते. तुमच्या अहंकाराला यातून आनंद मिळतो, काही काळ तर तुम्हाला ती मुक्तीच वाटते; पण नंतर अशी एक वेळ येते की, त्या वेळी तुमचा जोडीदार असे काही वागतो की, त्यातून तुमची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळं तुमच्या अहंकाराला धक्का बसतो असंही म्हणता येईल. भयाची भावना, यातना, कसली तरी उणीव असल्याची भावना या सगळ्या बाबी तुमच्या अहंकाराच्या जाणिवेचा आंतरिक भाग असतात. त्याला तुम्ही प्रेमाचं आवरण दिलेलं असतं. थोडय़ाच काळात तुमच्या अहंकाराचं खरं रूप उचल खाऊ लागतं.
काही काळानंतर यातनादायक भावना पुन्हा अवतरल्या, तर त्यांची तीव्रता आधीच्या यातनादायक भावनेपेक्षा कितीतरी जास्त व्हायला लागते आणि हे जे काही होतं त्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला जबाबदार धरता. म्हणजे तुमच्या भावना बहिर्गामी बनतात आणि तुम्ही आपल्या जोडीदारावर रानटीपणे हल्ला करू लागता. हा तुमच्या यातनेचा भागच असतो.
तुम्ही अबोधपणे स्वत:च्या यातनेला सामोरं जाणं नाकारता, यातनेपासून दूर पळता आणि तुमच्यात व्यसनाचा प्रादुर्भाव होतो. प्रत्येक व्यसन यातनेतून जन्माला येते आणि यातनेतच त्याचा अंत होतो. व्यसन कोणत्याही वस्तूंचं असो. जसं मद्य, अन्न, वैध-अवैध मादक पदार्थ किंवा एखादी व्यक्ती- तुम्ही स्वत:ची यातना विसरण्यासाठी अशा एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा उपयोग करता.
म्हणून आरंभीची धुंदी उतरल्यानंतर तुमच्या दु:खात अधिक भर पडते आणि निकट संबंध अधिक यातनामय होऊ लागतात. खरं तर ते नव्यानं यातना किंवा असमाधान देत नसतात, तर आधीच तुमच्यात छुप्या रूपानं असलेली यातनाच आणि असमाधान उफाळून बाहेर येऊ लागतं. प्रत्येक व्यसन हेच करीत असतं. प्रत्येक व्यसनाचा एका मर्यादेनंतर अंमल कमी व्हायला लागतो आणि मग तुमची यातना पूर्वीपेक्षा कधी नव्हे इतकी जास्त तीव्र होऊ लागते.
याच कारणामुळं बहुतेक जण वर्तमानापासून पळ काढून भविष्यात रमायला लागतात. त्यातून यातनामुक्ती शोधायला लागतात. वर्तमानाकडे लक्ष केंद्रित केलं तर आधी त्यांचं लक्ष स्वत:च्या यातनेवर केंद्रित होतं आणि नेमकी याचीच भीती त्यांना वाटत असते.
सहज उपलब्ध वर्तमान क्षणाच्या सामर्थ्यांची त्यांना जाणीव असती तर भूतकाळ आणि त्याच्या यातना किती सहजपणे विलय पावतात हे त्यांना उमजलं असतं. वास्तव भ्रमाचा निरस करतं हे जाणवलं असतं; मात्र वास्तवाच्या आपण किती जवळ असतो, ईश्वराच्या किती निकट असतो याची जाणीव त्यांना असावी.
यातनेतून मुक्त होण्यासाठी संबंध तोडणं हा काही मार्ग नसतो. तुम्ही एकटं राहत असा किंवा जोडीदाराबरोबर, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, वर्तमानात असणं आणि वर्तमान क्षणावर खोलवर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचं असतं!
प्रेम फुलायचं असेल तर तुमचं गाढपणे वर्तमानात असणं आवश्यक असतं. ते इतकं गाढ असावं की, त्या स्थितीवर तुमच्या विचारांनी मात करू नये. यातना क्षेत्र प्रभावी ठरू नये. नसता विचार किंवा यातना क्षेत्राशी तुम्ही एकरूप होऊ लागता.
विचारकर्त्यांच्या तळाशी असणारं तुमचं अस्तित्व जाणून घेणं मानसिक गोंधळाच्या तळाशी नि:स्तब्धता आणि वेदनेखालील प्रेम आणि आनंद जाणून घेणे हेच स्वातंत्र्य, मुक्ती आणि आत्मबोध आहे.
यातना क्षेत्रापासून अलग होणं म्हणजे यातनेत वर्तमान क्षण आणणं आणि अशा प्रकारे यातनेचं रूपांतरण करणं. विचारांच्या मिठीतून मुक्त होण्यासाठी विचारांना निमूटपणे पाहत राहणं, आपलं वर्तन पाहत राहणं.
विशेषत: मनाच्या त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत बसण्याचा स्वभाव आणि तुमचा अहं पार पाडत असलेल्या भूमिकांकडे साक्षीभावानं पाहत राहणं. मन किंवा अहंकार यात तुम्ही स्वत:ला गुंतवणं थांबवलं तर मनाचा तुमच्यावरचा दबाव कमी होत जातो. एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करण्याची उबळ असते, त्यातून जे आहे ते तुम्ही नाकारू लागता. त्यामुळं संघर्ष निर्माण होतो, नवीन नाटय़ सुरू होतं, नवीन यातना जन्माला येते.
वास्तविकत: जे आहे त्याचा स्वीकार करण्यातून त्याचं मूल्यमापन करण्याची वृत्ती थांबते आणि त्या क्षणी तुम्हाला मुक्ती मिळते. प्रेम, आनंद आणि शांती यांना अवकाश प्राप्त होतो.
आधी तुम्ही स्वत:चं मूल्यमापन करणं थांबवा; मग जोडीदाराचं मूल्यमापन करणं थांबवा. आपल्या संबंधात बदल करण्यासाठी आपला जोडीदार जसा आहे तसा त्याचा संपूर्ण स्वीकार करणं उपयोगी ठरतं. त्याचं मूल्यमापन करत बसू नका किंवा त्याच्यात बदल करण्याचा कोणताही प्रयत्न करू नका.
त्यामुळं तुम्ही तात्काळ अहंच्या पलीकडे जाल. मनाचे सगळे खेळ थांबतील, आसक्तीपूर्णरीत्या एखाद्या गोष्टीला चिकटून राहणं थांबेल. मग कोणी जुलमी राहणार नाही किंवा कोणी जुलमाचा बळी असणार नाही. आरोप करणारा नाही आणि आरोपीही नाही.
यातून तुम्ही परस्परावलंबित्वही संपुष्टात आणाल. इतरांच्या स्वभावबंधांत गुंतणं आणि त्यातच सतत अडकत जाणं थांबेल. त्यामुळं एकतर तुम्ही प्रेमातून मुक्त तरी व्हाल किंवा पूर्णपणे वर्तमानात संयुक्तपणे उपस्थित राहाल. स्वत:च्या अस्तित्वात राहाल. हे इतकं सोपं आहे काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. याचं उत्तर, हे खरंच साधं आणि सोपं असतं, हे आहे.
तुम्ही वर्तमानात स्तब्धपणे उपस्थित असता त्यावेळी तुम्हाला तुमच्या निराकार, कालमुक्त वास्तवाची जाणीव होते. हे अमूर्त जीवन तुमच्या शरीररूपानं मूर्त बनत असतं याची जाणीव होते आणि मग इतर प्रत्येकात, इतर प्राण्यातही असं खोलवरचं जीवन तुम्हाला जाणवू लागतं. रूप आणि वेगळेपण याच्या आवरणापलीकडे तुम्ही पाहायला लागता. अद्वैताची हीच अनुभूती असते. हेच प्रेम असतं.
तुम्ही वस्तुस्थिती मान्य करा, ती स्वीकारा म्हणजे त्यातून काही प्रमाणात मुक्ती मिळू शकेल. जसं तुमच्या नात्यात विसंवाद असेल आणि त्याची जाणीव तुम्हाला असेल तर त्यातून नवीन घटक जन्माला येईल आणि विसंवाद आहे तसा राहू शकणार नाही.
तुम्ही शांत नाही याची जाणीव तुम्हाला असते, ही जाणीवच तुमच्यातील अशांतीला प्रेमपूर्वक व हळुवारपणे मिठीत घेते आणि त्याचं रूपांतर शांतीत करते. तुम्ही स्वत:ला बदलू शकत नाही आणि तुमच्या जोडीदाराला तर नक्कीच नाही. तुम्ही फार तर परिवर्तन होईल अशी परिस्थिती निर्माण करू शकता. उदात्त भावना आणि प्रेम यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकता.
जेव्हा तुमच्या नात्यात बिघाड होईल, तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात बेबनाव निर्माण होऊन तुम्ही अगदी बेचैन व्हाल, त्याही स्थितीत आनंद माना. कारण तुमच्या आत जे अबोध अवस्थेत आहे ते बाहेर यायला लागेल. ही मुक्तीच्या क्षणाची संधी असते.
प्रत्येक क्षणाची, जाणीव जागृत ठेवा. जागृत राहून तो क्षण पाहत चला. विशेषत: तुमच्या अंतर्मनात जे घडतंय ते जाणून घेत चला. तुमच्या आत क्रोध असेल, तर जाणून घ्या की, हा क्रोध आहे. तुमच्यात मत्सर-भावना जागी झाली, बचावाचा पवित्रा घ्यावासा वाटत असेल, वाद घालण्याची ऊर्मी असेल, आपलंच बरोबर आहे असं वाटत असेल, तुमच्यातील बालक प्रेमाची अन् आपल्याकडे लक्ष दिले जावे याची मागणी करीत असेल, एखादा भावनिक उद्रेक असेल- काहीही असेल तर त्या क्षणाचं वास्तव समजून घ्या आणि काही काळ समजून घेण्यात घालवा.
मग तुमचं नातं तुमची साधना बनतं, आध्यात्मिक साधनेचा भाग बनतं. तुमच्या जोडीदाराचं वर्तन राग, द्वेष, तिरस्कार या अबोध भावनेने होत असेल तर तुमच्या जाणिवेच्या प्रेमदृष्टीनं ते पाहू लागाल, म्हणजे तुमच्या मनात विरोधाचे तरंग उठणार नाहीत.
(‘द पावर ऑफ नाऊ’ या साकेत प्रकाशनच्या प्रा. दिनकर बोरीकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील संपादित भाग. साभार)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा