योगासने, दीर्घश्वसन, प्राणायाम या पार्यायांनी पुढे जात शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण ॐकार जपला पाहिजे. म्हणजेच आपले ॐकार  स्वरूप व्यक्तिमत्त्व आपल्याला उमजेल. आपले मोठेपण आपल्यालाच समजेल.
पो लीस अधिकारी म्हणून मोठय़ा हुद्दय़ावरून निवृत्त झालेले, दक्षता मासिकाचे संपादक आणि वाचकप्रिय पोलीसचातुर्य कथाकार व. कृ. जोशी यांच्या आयुष्यात घडलेली ही विलक्षण गोष्ट. व. कृ. निवृत्त झाल्यानंतर वाचन, लेखन आणि थोडीफार समाजसेवा करण्यात दंग होते. एके दिवशी पहाटे झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली वाचा पूर्णपणे गेली आहे. कोणतीही पूर्वसूचना नसताना ही आपत्ती त्यांच्यावर कोसळली होती. पहिले चार दिवस घसा बसला असावा या समजुतीत राहून त्यांनी घरगुती उपायही केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या. त्यातून एकच निष्कर्ष निघाला, ज्या दोन व्होकल कॉर्ड्समुळे आपल्याला बोलता येते त्यापकी डाव्या बाजूची व्होकल कॉर्ड पूर्णपणे पॅरेलाइज्ड झाल्यामुळे त्यांची वाचा गेली होती. डॉक्टरांनी त्यावेळी परखडपणे सांगितले की, यावर अ‍ॅलोपॅथी शास्त्रात उपचार नाही. आपले पुढील आयुष्य मुकेपणात जाणार ही गोष्ट जशी धक्का देणारी तशी भयावहही होती. एका असह्य़ एकाकीपणाने व.कृ.ना घेरले. पण हार मानतील ते व.कृ. कसले?
    त्या काळी संगणक सहज, सुलभ उपलब्ध नव्हता. तरीही व.कृ.नी इंटरनेटवर स्वत:च्या आजाराची माहिती देऊन त्यावरील उपचारांचा शोध घेतला. अमेरिकेतील तज्ज्ञांनी या आजाराची कारणे, त्याची चिन्हे आणि उपचार याबद्दल दहा पानी प्रबंध पाठवला. त्यात या आजारावर औषध नाही हे मान्य करून त्यासाठी शस्त्रक्रिया आणि इंजेक्शन्स यांची माहिती दिली होती. ही सगळी माहिती घेऊन व.कृ. भारतातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले. पण त्यांचे अभिप्राय निराशाजनक होते. ही नवीन उपचारपद्धती अजून आपल्या देशात आली नव्हती. बुडत्याला काडीचा आधार म्हणून स्पीच थेरपी, अ‍ॅक्युप्रेशर, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधे यांचा प्रयोग केला, पण काहीही फायदा झाला नाही. वाचा जाऊन एक वर्ष झाले होते.
एके दिवशी व.कृं .चे डॉक्टर असणारे नातेवाईक मित्र त्यांना भेटायला आले. ते ज्येष्ठ डॉक्टर असले तरी त्यांचा वेद आणि योगशास्त्राचा गाढा अभ्यास होता. व.कृं.ची माहिती समजल्यानंतर ते म्हणाले ‘आपल्या योगशास्त्रात ॐच्या शास्त्रशुद्ध उच्चारणाने स्वरयंत्रावर अनुकूल परिणाम होतो. त्याचा प्रयोग करून पाहा.’ एवढे म्हणून ते थांबले नाहीत तर त्यांनी स्वत: पद्मासन घालून ॐचे व.कृं.च्या आजारावर उपयुक्त ठरतील, असे विविध उच्चार त्यांना म्हणून दाखविले. दुसऱ्या दिवशीपासून व.कृं .नी योगासने झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे  ‘ॐ’चा उच्चार करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. आशा न सोडता ते प्रयत्न करीत राहिले. आश्चर्य म्हणजे एके दिवशी त्यांच्या कंठातून स्पष्टपणे ॐ चा ध्वनी आला. हा प्रयोग ते अनेक दिवस करीत राहिले आणि त्यांची गेलेली वाचा परत आली. आज व.कृ. हयात नाहीत पण आपल्या आत्मकथनपर लेखात हा अनुभव व.कृं.नी सांगितला आहे. त्यांचे कुटुंबीय याचे साक्षीदार आहेत.
काय आहे हा ॐकार?
ॐकार हे अलौकिक सांस्कृतिक प्रतीक आहे. ते धर्मग्रंथाचे सार आहे. त्या एका अक्षरावर ऋचांची भव्य वास्तू उभी आहे. ओम् हा एक ध्वनी आहे. ओम् हे त्याचे लिखित चिन्ह आहे. त्याला कोणी दिव्य ध्वनी, प्रणव किंवा अनाहत नाद असेही म्हणतात. परब्रह्माच्या अभिव्यक्तीचे आद्य रूप म्हणजे ॐकार असे आर्य संस्कृतीत गृहीत धरले आहे.
भागवतात श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले, ‘ॐकार मी चक्रपाणी’ मदर म्हणून जगाच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय असलेल्या फ्रेंच विदुषी मीरा रिचर्ड यांनी पाच तपे पाँडिचेरीत राहून साधना केली. योगी अरिवदांच्या महानिर्वाणानंतर त्या साधकांच्या मार्गदर्शक बनल्या. त्या म्हणत, ‘ओम् इज दि सिग्नेचर ऑफ दि लॉर्ड’ ॐकार ही विधात्याची साक्षात स्वाक्षरी आहे.  ॐकाराचे मनातून चिंतन आणि मुखाने जप ही ब्रह्मविद्य्ोची द्वारे आहेत. विनोबाजी म्हणत, ‘ व्यक्त जग आणि अव्यक्त ब्रह्म यांना जोडणारा दुवा म्हणजे ॐकार.’
ॐकाराच्या अंतरंगात डोकावणाऱ्यांना त्याच्या प्रकृतीत साडेतीन मात्रांचे दर्शन घडते. मात्र ही संज्ञा कालसूचक आहे. एका अक्षराच्या उच्चारणास लागणारा वेळ म्हणजे एक मात्रा. ॐ म्हणजे अ+उ+म या तीन मात्रांचा आणि चंद्राकार अर्धिबबाचा समवाय आहे. वरची कोर ही अर्धी मात्रा मानली जाते. ॐकाराची महती सांगणाऱ्या अनेक आख्यायिका उपनिषदात आढळतात. छांदोग्य उपनिषदात एक कथा आहे. ती अशी, मृत्यूने देवांचा पाठपुरावा सुरू केला. देवांची गाळण उडाली. भयभीत झालेले देव वेदविद्य्ोच्या आश्रयाला गेले. पण मृत्यूच्या नजरेतून ते सुटले नाहीत. धावता धावता ते ॐकारच्या आश्रयाला गेले. तेथे मृत्यू थांबला. ॐकाराने देव अजर आणि अमर झाले.
भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पंडित महादेवशास्त्री जोशी म्हणतात, ‘ॐकारपूर्वक केलेले कोणतेही कर्म सात्त्विक बनते. अंधारात दिवा किंवा रानात वाट दाखविणारा सोबती तसा ॐकार आहे.’
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीदेखील ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘ओम नमोजी आद्या’ या शब्दांनी ॐकाराचा जयजयकार केला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात, ग्रंथात आणि पारायण पर्वात शुभकार्याच्या आरंभी आणि अंती ‘ओम् शान्ति: शान्ति: शान्ति:।’ असा शान्तिमंत्र जपतात. सरस्वती, लक्ष्मी आणि श्री शक्ती या तीन शक्तींचे आवाहन ॐकारामुळे घडते. ओम्तत् सत् सूत्राचे ते सार। कृपेचा सागर पांडुरंग॥ असे अभय तुकोबारायांनी दिले आहे.’’
हे सारे खरे असले तरी योग हे एक शास्त्र आहे. हा प्रचितीचा मार्ग आहे. ‘जाणावे आपणासी आपण।’ हाच या सर्वाचा आग्रह आहे. आपल्या आतला ॐकार समजून घ्या हाच या साऱ्यांचा आग्रह आहे.
आपल्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वत:साठी वेळ नाही. आपण डोळ्यांनी सर्व जग पाहून घेतो, पण आपल्या आत उघडय़ा डोळ्यांनी डोकावून पाहत नाही. भौतिक प्रगतीने आज शिखर गाठले असले तरी सुख, शांती आणि समाधानाच्या शोधार्थ माणसे वणवण भटकताना दिसतात. धावायचे कशासाठी आणि कुणासाठी हेच समजत नाही. व्यवधाने वाढल्यामुळे माणसांची एकाग्रता कमी झाली आहे. बाहेरच्या प्रचंड गोंगाटामुळे माणसे आपल्या आतला ‘ॐकार’ ऐकू शकत नाहीत.
अंतर्नाद ऐकण्यासाठी माणसाला एका वेगळ्या भावावस्थेत जावे लागते. म्हणून महायोगी अरिवद सांगतात, ‘‘ Remain quiet, open yourself and call for divine. Be yourself, transform yourself and transcend yourself.’’ शांत राहा, स्वत:ला मोकळे करा आणि दिव्यत्वाला आवाहन करा. स्वत:ला ओळखा, स्वत:मध्ये बदल करा, आहात त्यापेक्षाही अधिक उन्नत आणि परिपूर्ण अवस्थेला जा.’’
या वाटेने जाताना आपल्या जीवनाचा ॐकार आपणच शास्त्रज्ञांच्या वृत्तीने, तत्त्वज्ञानाच्या जिज्ञासेने आणि योग्याच्या आचरशीलतेने अभ्यासला पाहिजे. त्यासाठी प्रयोगशील झाले पाहिजे. योगासने, दीर्घश्वसन, प्राणायाम या पर्यायांनी पुढे जात शास्त्रशुद्ध पद्धतीने ॐकार जपला पाहिजे. म्हणजेच आपले ॐकार स्वरूप व्यक्तिमत्त्व आपल्याला उमजेल. आपले मोठेपण आपल्यालाच समजेल.
    (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा