योगाचे महत्त्वाचे सूत्र आहे- जे अणूमध्ये आहे ते विराटामध्ये आहे. जे सूक्ष्मामध्ये आहे ते भव्यतेमध्येही आहे. जे सूक्ष्मातिसूक्ष्ममध्ये आहे ते विशालमध्येही आहे. जे थेंबात आहे ते सागरामध्ये आहे.
या सूत्राची योग सदैव घोषणा करीत आले आहे. विज्ञानाने नुकतीच कुठे त्याला मान्यता दिली आहे. अणूमध्ये इतकी ऊर्जा असेल, इतकी शक्ती असेल, अत्यल्पामध्ये इतकं काही लपलेलं असेल, काहीच नसल्यामध्ये सगळंच असल्याचा विस्फोट होईल, अशी त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. अणूचं विभाजन करून योगाची ही अंतर्दृष्टी विज्ञानानं सिद्ध करून दाखविली. परमाणू तर दिसतही नाही डोळ्यांना, पण या न दिसणाऱ्या परमाणूमध्ये, अदृश्यामध्ये विराट शक्तीचा संग्रह आहे. त्याचा विस्फोट होऊ शकतो. माणसामध्ये आत्मा तर दिसत नाही, पण त्याच्यामध्ये विराट ऊर्जा लपलेली आहे आणि परमात्म्याचा विस्फोट होऊ शकतो. क्षुद्रतेमध्ये विराटतम आहे. कणा-कणामध्ये परमात्मा आहे. योगाच्या घोषणेचा हाच अर्थ आहे.
योगानं या सूत्रावर का भर दिला असेल? एक तर अशासाठी की, ते सत्य आहे आणि दुसरं अशासाठी की, अणूमध्ये परम लपलेलं आहे याची एकदा का जाणीव झाली, की आपल्या आत्मशक्तीचा जागर करण्याचा तो मार्ग बनून जातो. आपण क्षुद्र आहोत असं मानण्याचं काही कारण नाही. क्षुद्रतम असणाऱ्यालाही क्षुद्र आहोत, असं समजण्याचं कारण नाही. याच्या उलटसुद्धा असं म्हणता येईल की, विराटतम असलेल्यानं अहंकार बाळगण्याचं काही कारण नाही, कारण जे त्याच्याजवळ आहे ते क्षुद्रतमापाशीसुद्धा आहे. सागराला अहंकार वाटत असेल तर तो वेडेपणा आहे, कारण सागराजवळ जे आहे ते लहानशा थेंबामध्येही आहे. क्षुद्रतमाने स्वत:ला हीन समजण्याचं काही कारण नाही. विराटतमाला अहंकार बाळगण्याचं काही कारण नाही. हीनतेला काही अर्थ नाही आणि श्रेष्ठतेलाही काही अर्थ नाही. दोन्ही व्यर्थच आहेत. या सूत्रावरून तरी हेच निष्पन्न होतं.
माणूस दोनच गोष्टींनी आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. तो एक तर न्यूनगंडानं पछाडलेला असतो, अभात्वाच्या जाणिवेने पीडित असतो. एडलरने हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी रूढ केला- न्यूनगंड. एक तर तो न्यूनगंडानं पछाडलेला असतो, आपण कुणीच नाही असं त्याला सदैव वाटत असतं, कुणीच नाही. उमर खय्यामच्या प्रसिद्ध ओळी तुम्हाला माहीत असतील. ‘डस्ट अनटू डस्ट’. माती मातीमध्ये मिसळते. आणखी काही नाही.
एखाद्याला न्यूनगंडानं एकदा का पछाडलं तर अगदी खोलवर रोग मूळ धरतं. आपण कुणीच नाही, असं समजून एखादा जगत असेल तर असं जगणं फार अवघड होऊन जातं. तो जिवंतपणीच मरत जातो. मरेपर्यंत जगणारे फार कमी असतात. बहुतेक लोक आधीच मरून जातात.
व्यक्तीमध्ये विराटपण आहे याची जाणीव व्हायला हवी. व्यक्तीमध्ये अनंतपणा आहे याची जाणीव असायला हवी. व्यक्तीमध्ये परमात्मा आहे, याचं स्मरण असायला हवं, म्हणजे व्यक्तीमध्ये हीनपणा येणार नाही.
आणि गंमत अशी की, हीन भावना मिटविण्यासाठी माणूस श्रेष्ठतेच्या कल्पनेमध्ये अडकतो. अहंगंड हीनतेची भावना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. आतमध्ये हीनता वाटत असणारा माणूस संपत्ती गोळा करायला सुरुवात करतो, पैसा कमावून जगाला आणि स्वत:ला दाखवून देतो की, मी कुणी तरी आहे. न्यूनगंड तुम्हाला धावायला लावतो. त्याला सिंहासनावर चढवतो. सिंहासनावर उभा राहून आक्रमकपणे घोषणा देतो की, कोण म्हणतं मी कुणी नाही म्हणून? मी आहे कुणी तरी. हीनताच श्रेष्ठतेची धावण्याची शर्यत बनते. जी माणसं श्रेष्ठ होण्याच्या वेडय़ा शर्यतीत धावायला जातात, ती आतमध्ये न्यूनगंडानं पछाडलेली असतात.
एडलरने तर काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या अर्थपूर्ण आहेत. तो म्हणतो की, जी माणसं धावण्याच्या शर्यतीमध्ये पहिली येतात ती लहानपणी लंगडणारी असतात आणि जी माणसं संगीतामध्ये कुशल असतात त्यांना लहानपणी कमी ऐकायला येत होतं. जी माणसं राष्ट्रपती होतात, पंतप्रधान होतात, ते शाळेमध्ये मागच्या बाकावरचे विद्यार्थी असतात. तो जो न्यूनगंडाचा आघात होतो त्यामुळे आपणही कुणी तरी आहोत हे सिद्ध करण्याच्या मागे लागतात.
म्हणून राजकारणी माणसं न्यूनगंडानं पीडित असतील तर त्यात काही आश्चर्य नाही. मनात एक किडा वळवळत असतो, आपण कुणीच नाही. मनाला दु:ख होतं त्यांच्या. त्रास होतो आणि मग ते धावायला लागतात. आणि एकदा का खुर्ची मिळाली की त्यांचे पाय जमिनीला लागतच नाहीत. शरीराचा वरचा भाग मोठा आणि पाय लहान होतात. त्यांचे पाय जमिनीला लागतच नाहीत. हिटलर अत्यंत सामान्य बुद्धीचा माणूस होता आणि लष्करात सामान्य शिपाई होता. तिथंही तो अयोग्य म्हणून हाकलला गेला होता. स्टॅलिन एक चांभाराचा मुलगा होता. लिंकनसुद्धा चांभाराचा मुलगा होता.
राजकारणी माणसांच्या अंतरंगात डोकावून बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बालपणी ते न्यूनगंडानं पछाडलेले असतील म्हणूनच वेडय़ासारखे धावत असतात. एखादं उंच शिखर गाठत नाहीत तोपर्यंत त्यांच्या जिवाला चैन पडत नाही. शिखर गाठून त्यांनी जगाला तर दाखवून दिलं की, मीसुद्धा कुणी तरी आहे; पण स्वत:ला मात्र काहीही दाखवून देता येत नाही. म्हणूनच कोणतंही पद, कितीही धन, कितीही यश मिळालं तरी शेवटी ते त्याला निर्थक वाटू लागतं. सिंहासनावर बसल्यावर त्याला वाटतं की, बसलोय खरा, पण मी तर तोच आहे आणि त्याला न्यूनगंड पछाडतं. मोठय़ा म्हणून मोठय़ातलं मोठं पदसुद्धा त्यांना समाधान देत नाही. मोठय़ातल्या मोठय़ा पदाच्या पुढेही त्यांची धाव चालूच असते.
मी असं ऐकलंय की, कुणी तरी अलेक्झांडरला विचारलं, तू सारं जग जिंकशील, पण नंतर काय करशील, याचा कधी विचार केला आहेस का? कारण जग तर एकच आहे. अलेक्झांडर उदास झाला. तो म्हणाला, याचा तर मी विचारच केला नाही. सगळं जग जिंकलं, पुढे काय? दुसरं जग आहे कुठं? जग जिंकल्यावर अलेक्झांडरच्या मनात जी न्यूनगंडाची भावना निर्माण होईल त्यापासून त्याची कधी सुटका होणार नाही. दुसरं जग असेल आणि तेही त्यानं जिंकलं तरी त्यापासून सुटका नाही.
न्यूनगंडाची भावनाच विकृत होते आणि अंतर्गत होऊन शीर्षांसन करून श्रेष्ठत्वाची भावना बनून जाते. जो माणूस रस्त्यानं छाती पुढे काढून चालताना दिसला तर त्याची कीव करा, तो न्यूनगंडानं पछाडलेला आहे. जरासा कुणाचा धक्का लागला तरी तो गुरकावून विचारतो, माहीत नाही मी कोण आहे? तो बिचारा न्यूनगंडानं पछाडलेला आहे. ज्या माणसाला लहानसहान गोष्टींनी राग येतो, क्षुल्लक कारणावरून त्याचा अहंकार दुखावला जातो, रस्त्यानं कुणी हसलं तर त्याला वाटतं, आपल्यालाच हसताहेत. असा माणूस न्यूनगंडानं पीडित आहे, असं समजा. हे पछाडणं त्याला श्रेष्ठ होण्याच्या वेडय़ा शर्यतीत धावायला भाग पाडतं. हीनता रोग आहे. श्रेष्ठता या रोगाला दाबणारा महारोग आहे आणि बरेच वेळा रोगापेक्षा औषधच जास्त धोकादायक असतं आणि दाबून टाकलेला आजार आणखीनच धोकादायक होऊन जातो.
(‘योगाचे नवे पैलू’ या साकेत प्रकाशनाच्या डॉ. अरुण मांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा