निरंजन मेढेकर

‘मिडलाइफ क्रायसिस’नं ग्रासलेल्या जोडप्यांना लैंगिक जीवनातही तोचतोचपणा जाणवतो. नात्यातली सुरुवातीची नवलाई, जादू पुरती ओसरते. अशा वेळी नातं पुन्हा जिवंत, ताजंतवानं कसं करावं? पती-पत्नींच्या अगदी खासगी क्षणांमध्ये केलेला ‘रोल प्ले’ हा त्यावरचा एक छोटासा उपाय आहे. केवळ लैंगिक जीवनच नव्हे, तर एकमेकांच्या आयुष्यात अधिक रस घेऊन एकूण दैनंदिन जीवन पुन्हा पूर्वीसारखं आनंदी करायचं असेल, तर हे छोटंसं ‘नाटक’ तुम्हाला मदत करू शकेल! 

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

लोणच्यासारखं लग्न मुरलं की अनेक जोडप्यांना जाणवणारा एक ‘साइड इफेक्ट’ म्हणजे ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ होऊन एकमेकांचा कंटाळा वगैरे यायला लागतो! एकमेकांच्या सगळय़ाच गोष्टी इतक्या परिचयाच्या होऊन जातात, की कशाचंच काही कौतुक वाटेनासं होऊन जातं.

 आता निशा आणि आकाशचंच बघा ना! हे जोडपं मुंबईच्या उच्च मध्यमवर्गीय वर्तुळातलं. त्यामुळे वर्षांतून एखादी फॉरेन ट्रिप त्यांच्या सवयीची. या वेळी ते भूतानला आलेत; पण एकमेकांबरोबर सलग आठ दिवस घालवायचेत, या नुसत्या विचारानंही आल्या क्षणापासून त्यांना अगदी नकोसं होऊन गेलंय! केवळ जगाला दाखवण्यासाठी आपण असं दर वर्षी ट्रिपला येतो का, असा प्रश्नही त्यांना पडलाय. निशाचा शिस्तशीर स्वभाव आकाशला पटत नाहीये. तर आकाशचं बेशिस्त वागणं, धूम्रपानाची सवय निशाच्या डोक्यात जातेय. एकमेकांसोबतच्या या विचित्र चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मग त्यांनी एक नाटक करायचं ठरवलं. संपूर्ण अनोळखी असण्याचं! याला ‘रोल प्ले’ असं गोंडस नाव आहे. ते मग पहिल्या दिवशी ‘सोलो ट्रॅव्हलर’सारखं भूतानमध्ये एकेकटे भटकले. संध्याकाळी हॉटेलमध्ये अगदी ‘योगायोगानं’ भेटले; पण जेवताना गप्पांमधून त्यांना एकमेकांची नव्यानं ओळख होत गेली. या माणसाची ही बाजू, हे शल्य, हा आशावाद आपल्याला कधी माहितीच नव्हता, असं दोघांनाही जाणवलं. म्हणायला हे नाटक असलं, तरी ते या मध्यमवयीन जोडप्याला एकमेकांच्या अगदी जवळ आणतंय, दोघांतला शृंगार फुलवतंय!

 लेखिका अनिता नायर यांच्या ‘ट्विन बेड्स’ या इंग्रजी कथेचा मराठी भावानुवाद मी तीनेक वर्षांपूर्वी केला होता. त्याचं हे साधारण कथानक. ‘रोल प्ले’कडे केवळ ‘पॉर्न’च्या बटबटीत नजरेतून पाहण्यापेक्षा त्याला एका वेगळय़ा परिप्रेक्ष्यातून पाहणारं. चाळिशीच्या आसपास झडप घालणाऱ्या ‘मिडलाइफ क्रायसिस’मुळे पती-पत्नीचं नातं कोमेजूनजाऊ नये, सहजीवनातला चार्म हरवू नये, यासाठी जोडप्यांनी नेमकं काय करायला हवं, ‘रोल प्ले’, ‘फॅण्टसी’ यांसारख्या गोष्टींमुळे कामजीवनात नवीन सूर गवसू शकतो का, हे पाहणं आवश्यक आहे.

डॉ. संकल्प जैन लिखित Foreplay, role play and rounds या पुस्तकात ‘सेक्शुअल रोल प्ले’ म्हणजे नेमकं काय, हे नमूद करताना म्हटलंय, की ‘रोल प्लेमध्ये दोन्ही जोडीदार शृंगार-समागमात नावीन्य आणण्यासाठी आपापल्या मर्जीनं नवीन पात्र साकारत तशी भूमिका वठवतात. नेमकी कोणती पात्रं निभावायची किंवा कोणता प्रसंग साकारायचा, हे ते जोडपं आधीच ठरवतं. वैवाहिक कामजीवनातला तोच-तोचपणा टाळून त्यात नवीन रंगत आणण्यात, तसंच त्या जोडप्यातली भावनिक-शारीरिक उत्कटता वाढवण्यात रोल प्ले आणि फॅण्टसी महत्त्वाची भूमिका बजावतात.’

‘रोल प्ले’विषयी माहिती असणं आणि प्रत्यक्ष शयनगृहात त्याचा लीलया वापर करणं, यात मोठं अंतर असू शकतं. मुंबईतल्या काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट इरावती महाजन सांगतात, ‘‘कामजीवनात नवीन सूर गवसतो का, ही दोघांनी एकत्रपणे तितकाच रस घेऊन बघण्याची गोष्ट आहे; परंतु बऱ्याचदा तसं होत नाही, कारण दोघांना त्याची सारखीच गरज वाटते असं नाही. मुळात आपल्या समाजात लहानपणापासूनच लैंगिकता, समागम, कामजीवन यांविषयी अजिबात मोकळेपणानं बोललं जात नाही. त्यात लग्नानंतर लवकरात लवकर मूल व्हावं, अशीच अपेक्षा असते. गेल्या काही वर्षांपासून लग्नाचं वाढतं वय, तसंच वंध्यत्वाची समस्या बघता, ज्या जोडप्यांना मूल हवं असतं, त्यांचं लग्नानंतरचं ध्येय कामजीवन उत्तम साधावं हे नसून गर्भधारणा हेच असतं. कामविषयक एकमेकांशी मोकळा संवाद साधता यावा अशी शक्यता निर्माण होईपर्यंत वयाची चाळिशी येते.’’

डॉ. विजय नागास्वामी लिखित आणि डॉ. मोहना कुलकर्णी अनुवादित ‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर..’ या पुस्तकात नमूद केलंय की, ‘कंटाळवाण्या वैवाहिक जीवनात पती-पत्नीचे शारीरिक संबंधही एकसुरी आणि साचेबद्ध होऊन जातात. काही ‘चेंज’मुळे लैंगिक आनंदात भर पडेल असं अनेकांना वाटतं हे खरं आहे! वेगळय़ा जागी, निराळय़ा पद्धतीनं थोडी कल्पनाशक्ती वापरली, तर असा बदल लैंगिक संबंधात अधिक आनंद देऊ शकेल, परंतु समागम करताना वेगळे काही प्रयोग करायला काही वेळा जोडीदार अजिबातच तयार नसतो. दर वेळी ठरावीक एकाच पद्धतीनं समागमाची कृती करणं त्यांना आवडतं. म्हणजे अनेकांना शरीरसंबंध आवडत नाही असं नव्हे, तर ‘एकदाचं उरकून टाकणं’ या प्रकारची वृत्ती असते. लैंगिक संबंध रंजक करण्यासाठी सुचवलेल्या कोणत्याही प्रकारच्या बदलाला अगदी ठामपणे नकार देणं हे बऱ्याचदा विवाहबाह्य संबंध शोधण्यामागचं कारण ठरतं.’

कामजीवनात तोचतोचपणा येण्याच्या कारणांविषयी बोलताना नागपूरमधील सेक्सॉलॉजिस्ट आणि ‘काऊन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल’ या संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे सांगतात, ‘‘एकदा का मुलं झाली, की जोडपी ‘लव्हर’ न राहता केवळ पालक होऊन जातात; पण हे समजून घेणं गरजेचं आहे, की पालकत्व ही अशी गोष्ट आहे, की एकदा आपण पालक झालो, की ती जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत असते. तसंच एकदा मुलं झाली, की ‘सेक्स म्हणजे वासना’ असं गृहीतक काही जण करून टाकतात. वास्तविक सेक्स ही प्रेम व्यक्त करण्याची भावना आहे. ज्यांचं कामजीवन सुरळीत असतं, अशा पुरुषांमध्ये हृदयविकार, मधुमेह, प्रोस्टेटसंबंधी आजारांचं प्रमाण कमी आढळतं. तर स्त्रियांमध्ये कर्करोगाची शक्यता कमी होते.’’

कामजीवनाचा विचार करता जोडप्यांनी वेगवेगळय़ा प्रकारच्या स्पर्शाना का महत्त्व द्यायला हवं, याविषयी बोलताना डॉ. संजय सांगतात, ‘‘बऱ्याचदा स्पर्श म्हटलं, की फक्त ‘कामुक स्पर्श’ या दृष्टीनंच पाहिलं जातं; पण घरात सोबत असताना जोडप्यांमधील सहज स्पर्शही महत्त्वाचा असतो. स्पर्श हादेखील एक संवाद आहे आणि वैवाहिक जीवनातील स्पर्शातला अत्युच्च संवाद म्हणजे सेक्स! कामजीवनात बदल साधण्यासाठी दर वेळी बाहेरगावी जायची गरज नसते. कपडे, वातावरण, तर कधी कामआसनं बदलल्यानंही रंगत आणता येते.’’

मध्यंतरी गर्भनिरोधकाच्या एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार ७४ टक्के भारतीयांना कामजीवनात काही नवीन करून पाहायचंय.सायकोथेरपिस्ट लतिका चौगुले सांगतात, ‘‘वाढतं वय हे शरीरात होणाऱ्या अनेक बदलांची जाणीव करून देतं. या बदलांना सहजपणे सामोरं जाणं अनेकांना जमत नाही. या ‘मिडलाइफ क्रायसिस’चा परिणाम वैवाहिक जीवनावर नक्की होतो. चिंतातुर स्वभावामुळे असुरक्षिततेची भावना वाढते. नातं गृहीत धरलं जातं. यावर मात करायची तर जाणीवपूर्वक एकमेकांना वेळ देणं, नात्यातला ‘चार्म’ टिकवण्यासाठी प्रयत्न करणं, भावनांची दखल घेणं महत्त्वाचं ठरतं.’’

‘सहजीवन असो नाही तर कामजीवन, दर वेळी जोडीदारानं आपल्या मनातलं ओळखावं, ही अपेक्षा चुकीची आहे,’ असं नमूद करत इरावती सांगतात, ‘‘अनेकदा आपल्या मनातलं आपल्या जोडीदारानं ओळखावं ही अपेक्षा धरून बसल्यामुळे स्वत:च्या मनातल्या भावना व्यक्तच केल्या जात नाहीत किंवा जोडीदारानं खूप प्रयत्न करूनही एखादी व्यक्ती अजिबात मनातलं बोलत नाही. त्यामुळे  ’ liberate  झाल्याची भावनाच नात्यामध्ये येत नाही. म्हणजे स्वत:च्या खोल मनातल्या भावनांविषयी पती-पत्नी बऱ्याचदा बोलतच नाहीत.

दर वेळी या भावना लैंगिक सुखासंदर्भातील, फॅण्टसीसंदर्भातीलच असतात असं नाही, पण त्याविषयीही संवाद साधला जात नाही असं दिसतं. त्यामुळे जसजसं वय वाढत जातं, तसं काही तरी चुकल्यासारखं, राहून गेल्यासारखं वाटू शकतं.’’

नात्यातला तोचतोपणा टाळण्यासाठी काही साधे सोपे उपाय सुचवताना इरावती सांगतात, ‘‘पती-पत्नी काही गोष्टी सोबत मिळून करत असतील. उदा. एखादी कला, भाषा, खेळ वा कौशल्य शिकणं, एकत्र नाटक-सिनेमा पाहणं, खाद्यभ्रमंती, पर्यटन, मुशाफिरी करणं, तर त्यांच्यातलं नातं अधिक घट्ट होत जातं. घरकाम आणि कामजीवन याव्यतिरिक्त नवरा-बायकोनं एकमेकांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रस घेणं आणि दिवसातला काही वेळ तरी मोकळेपणानं संवाद साधणं, यामुळे सहजीवनातली मौज टिकून राहू शकते.’’

थोडक्यात, पती-पत्नींनी आयुष्याच्या वेगवेगळय़ा वळणांवर एकमेकांच्या सोबत असणं महत्त्वाचं! मनानं सोबत असलं, की वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शारीरिक जवळीकही साधता येऊ शकते आणि एकमेकांबरोबर मनानं मोकळं असलं, की ‘रोल प्ले’सारखी ‘शृंगारिक नाटकं’ही संसाराच्या रंगमंचावर अगदी उत्कटतेनं वठवता येऊ शकतात!

niranjan@soundsgreat.in

Story img Loader