१९५० नंतरच्या काळात स्त्रियांचे काव्यलेखन अधिकाधिक जोमदारपणे होत असून आज समग्र मराठी काव्याचा तो एक महत्त्वाचा उपप्रवाह आहे. स्त्रीच्या वाढत्या आत्मविश्वासाचे- एका सांस्कृतिक स्थित्यंतराचे- त्यातून दर्शन घडत आहे. मलिका अमरशेख जेव्हा एका कवितेत ‘मी रांधतेय नवे शब्द’ असे म्हणतात, तेव्हा स्त्रीच्या सर्जनशक्तीला फुटलेले नवे धुमारे त्यातून जाणवतात. याबरोबरच आधुनिकता आणि पारंपरिकता यातील द्वंद्वांच्या अनुभूतीची अभिव्यक्तीही त्यातून प्रगट होते. या कालखंडातील कवयित्रींच्या कविता वाचताना मी व्यक्तीकेंद्री समीक्षा पद्धती अवलंबलेली नाही. काव्यात विरघळलेल्या स्त्रीजाणिवांचे प्रतिबिंब आणि त्यामागचे सांस्कृतिक पर्यावरणाचे विभिन्न तरंग जाणून घेण्यावर मी भर दिला आहे. स्त्रीकाव्याचा अभ्यास हा पुरुषांविरुद्धचा कट नसून स्त्रीमन खोलवर जाणून घेण्याचा नि त्याद्वारे स्त्री-पुरुष नाते निकोप होण्याचे मार्ग शोधण्याचा तो एक प्रयत्न आहे, असे माझे मत आहे.
स्त्रीकाव्यामागील वेगळी संवेदनशीलता जाणून घेणे, स्त्रीचे शब्दांशीच नव्हे तर मौनाशीही असलेले विविध प्रकारचे नाते उलगडून पाहणे, १९७५ नंतरच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा स्त्रीच्या कलात्मक जाणिवेवर झालेला परिणाम शोधणे यात मला विशेष स्वारस्य होते. त्यासाठी मी स्त्रीकेंद्री, स्त्रीवादी इतकेच नव्हे तर स्त्रीलिखित विडंबन कविताही अभ्यासल्या. संशोधनातून हाती आलेले त्यातील निष्कर्ष वाङ्मयाच्या इतिहासाचे काही अंशी पुनर्लेखन करण्यास नक्कीच भाग पाडणारे आहे. माजघरातल्या कवितांपासून बीजिंग येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या स्त्रीची कविता तसेच परिघाबाहेरील आदिवासी कवयित्रींच्या कविता असा या काव्याचा बदललेला परिघ स्तिमित करणारा आहे.
हा अभ्यास करताना कवितेच्या संहितेबरोबरच मी अर्पणपत्रिका, प्रस्तावना, पाठराखण याही बाबी अभ्यासल्या. त्यातून काही सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाची निरीक्षणे हाती आली. ‘सभ्य स्त्री आणि सभ्य कवयित्री’ यामागील विशेषणांच्या अर्थाविषयीची शंका, कवयित्रींनी स्त्रीगीतांच्या चाली वापराव्यात ही अपेक्षा.. अशा बाबी सामाजिक संदर्भाचे सूचन करीत गेल्या. स्त्रीची जैविक प्रतिमा आणि सांस्कृतिक अंगाने घडवली गेलेली प्रतिमा यातील अंतर अशा वेळी त्या कवितांमधून प्रगट होत जाणे स्वाभाविकच होते. एक प्रकारे ‘कविता’ ही गोष्ट स्त्रीसाठी ‘आधुनिक पाणवठा’ अशीच उरली आहे. अशा वेळी स्त्रीची व्यक्तिविशिष्टता आणि लिंगभाव विशिष्टता या दोन बिंदूंच्या संदर्भात ही कविता वाचण्याची गरज मला जाणवली. समकालीन काव्याची समीक्षा करणे हे दुहेरी आव्हान होते. सूची आदी पायाभूत संदर्भग्रंथांचा अभाव म्हणून आव्हान आणि कवितेचा कस काळाच्या सहाणेवर लागायचा असल्यामुळेही आव्हान! मात्र समकालीन समीक्षेला एक घटक अनुकूल होता, तो म्हणजे काळाचे स्पंदन मीही अनुभवीत होते. ते पाऱ्यासारखे निसटते. स्पंदन म्हणूनच कवितांमधून शोधणे मला शक्य झाले.
या अभ्यासातून मला स्त्रीच्या ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची बदलती परिमाणे सामोरी आली. मुक्ततेची स्वप्निल ओढ व्यक्तिस्वातंत्र्य या वैचारिक मूल्यामुळे आलेली अस्मितागर्भ जाग आणि जबाबदार असे सामाजिक संलग्नतेच्या जाणिवेतून उमललेले स्वातंत्र्य.. अशी त्याची व्याप्ती जाणवत गेली. पद्मगंधा प्रकाशनच्या अरुण जाखडे यांच्या पुढाकारामुळे मला हा अभ्यास प्रकाशात आणता आला आहे.
स्त्रीच्या आंतरिक जीवनाचे दर्शन घडवताना स्त्रीच्या जगण्याची बदलती परिभाषा वाचण्याचा यातील प्रयत्न काळ आणि सांस्कृतिक पर्यावरण यांचे काव्याशी असलेले अनुबंध जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास वाटतो. तसेच स्त्रीकाव्यावरील आजवरचे पुरुष समीक्षकांचे भाष्य तौलनिकदृष्टय़ा विचारात घेण्यासाठी स्त्रीनिष्ठ समीक्षालेखन उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. माझ्या पुस्तकामुळे तशी तौलनिक समीक्षा करण्यासाठीची प्राथमिक गरज पूर्ण झाली आहे, असे मला वाटते.
स्त्रीकाव्याची चिकित्सा
‘लाटांचे मनोगत’ हे माझे पहिले समीक्षेचे पुस्तक. मी त्यात १९५० ते २००० या कालखंडातील आधुनिक स्त्रीकाव्याची चिकित्सा वाङ्मयीन आणि सांस्कृतिक अंगाने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व असे शब्द... असे अर्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book by dr neelima gundi