वर्तमानपत्रातील एका बातमीकडे सहज लक्ष गेलं.. ‘सलग ३० तास चाललेली हृदयासंबंधीची, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी! डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश!’ बातमी वाचून डॉक्टरांबद्दलचा मनात असलेला आदरभाव आणखीनच वाढला आणि येथेच माझ्या ‘मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा’ या नवव्या पुस्तकाचं बीज रोवलं गेलं.
मुळात नाटक हा माझ्या आवडीचा, जिव्हाळय़ाचा आणि अभ्यासाचा विषय असल्यानं नाटय़विषयक अशी सहा पुस्तकांची निर्मिती झाली आहे. ‘स्त्री समस्या आणि आजचे नाटक’, ‘बोलता..बोलता.’ (नाटय़विषयक मुलाखती), ‘स्त्री नाटककारांची नाटके’, ‘नाटय़ाक्षरे’ (नाटय़विषयक लेखसंग्रह), ‘एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप’ आणि ‘मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा!’
बाकीची ‘मनमोहिनी’ (आठवणींचा संग्रह), ‘शब्दललित’ (ललितलेख संग्रह), काव्यललित’ (कवितासंग्रह) आहेत. यामध्ये विषयांची विविधता आहे. परंतु स्त्रीकेंद्रित प्रश्नांसंदर्भात लिहिणं हे माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. या पाश्र्वभूमीवर नाटकांतील ‘डॉक्टर’ प्रतिमांबद्दल लिहिलेलं हे पुस्तक म्हणूनच मला वेगळं वाटतं.
मला जाणवलं, लहानपणापासून डॉक्टरांची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. डॉक्टरांचे ‘डोन्ट वरी’ हे शब्द कानावर पडले, की आपण निर्धास्त होतो. डॉक्टरांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिलं, त्यांच्याशी बोललं, की निम्मं दुखणं बरं होतं.. असा अनुभव येत असतो. हा आपला डॉक्टरांवरचा विश्वास, श्रद्धेचा भाग असतो.
नाटकांचा अभ्यास करताना काही प्रश्न मनात आले. डॉक्टरांबद्दल एवढी विश्वासाची, आधाराची, देवासारखी, आदराची प्रतिमा आपल्या मनात असते, तर मग केवळ डॉक्टरांवर लिहिलेली अशी नाटकं किती आहेत? नाटकातील इतर पात्रांच्या दृष्टीनं डॉक्टरांचं कोणतं स्थान आहे? ‘फॅमिली डॉक्टर’ ही पूर्वीची संकल्पना नाहीशी होत चालली आहे का? नाटकामधून समाजाचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता असतो? डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं कसं असतं? कसं असायला हवं? नाटकांमधून नाटककारांनी नायिका म्हणून स्त्री डॉक्टर किती प्रमाणात चित्रित केल्या आहेत? पूर्वीची डॉक्टरांची प्रतिमा कशी होती? डॉक्टरांच्या प्रतिमेत काही बदल होत गेले का? या विविध प्रश्नांच्या, दृष्टिकोनाच्या दिशेनं शोध घेण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक आकाराला आलं.
मराठी नाटय़ वाङ्मयाचा इतिहास पाहिल्यास असं लक्षात आलं की मराठी नाटककारांनी समाजातील वेळोवेळी निर्माण झालेल्या समस्यांवर, प्रश्नांवर नाटकं लिहिली आहेत, परंतु ‘डॉक्टर’ ही प्रमुख व्यक्तिरेखा केंद्र धरून लिहिलेली नाटकं अल्प प्रमाणात आहेत. नाटककारांनी डॉक्टरांची व्यक्तिरेखा त्या त्या विषयाच्या संदर्भात, गरजेपुरतीच रंगविलेली दिसते.
बदलत्या काळाप्रमाणे समाज बदलतो. त्या दृष्टीनं नाटकांमधून डॉक्टरांच्याही बदलत्या विविध प्रतिमा जाणवल्या. नाटकांमधून नीतितत्त्वांना, नीतिमूल्यांना परमेश्वर मानणाऱ्या, ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी, दिलेल्या वचनाला जागण्याची मनोवृत्ती असणाऱ्या, मानसिक दृष्टीनं आधार देणाऱ्या, समुपदेशक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून डॉक्टरांच्या वेगवेगळय़ा प्रतिमा मनात घर करून राहिल्या. रंगमंचावर गळय़ात स्टेथोस्कोप घालून वावरणाऱ्या नायिका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ा कमी आहेत. या पाश्र्वभूमीवर डॉ. मुक्ताबाई मुळगावकर (अखेरचा सवाल), ‘आई’ आणि ‘डॉक्टर’ अशा दोन्ही प्रतिमा लक्षणीय वाटल्या.
डॉक्टर अंकल (सुंदर मी होणार) ते डॉक्टर, तुम्हीसुद्धा!.. असा बदललेल्या प्रतिमांचा प्रवास आहे. हे जे स्थित्यंतर घडलं त्याला बदललेली मूल्यव्यवस्थाही कारणीभूत आहे असं जाणवलं. डॉक्टर आणि कलाक्षेत्र यांचा संबंध फार जवळचा आहे. त्या दृष्टीनं डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. गिरीश ओक,
डॉ. सलील कुलकर्णी, डॉ. संजीव शेंडे, डॉ. विवेक बेळे, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, डॉ. गौरी दामले, डॉ. विद्या गोखले, डॉ. कमलेश बोकील आदी वेगवेगळय़ा क्षेत्रांतील डॉक्टर कलाकारांशी मुलाखतींद्वारा संवाद साधला. या सगळय़ा डॉक्टर कलाकारांच्या दृष्टिकोनातून डॉक्टरांचं जीवन म्हणजे एकप्रकारे नाटकच असतं. डॉक्टर रुग्णाला वाचविण्याबाबत शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. जवळजवळ सगळय़ाच डॉक्टर कलाकारांची हीच भूमिका आहे असं जाणवलं. माझ्या नसानसात नाटक विषयाच्या अभ्यासाची आवड भरून राहिली आहे. म्हणून ‘नाटक’ हा माझा श्वास आहे, जगण्याला बळ देणारं, अर्थ देणारं ‘टॉनिक’च आहे.
‘असे शब्द.. असे अर्थ..’ हे सदर प्रसिद्ध झाले आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्त्री लेखिकांची आणि स्त्रीकेंद्रित अनेक पुस्तके आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. सूचना – स्त्रियांनी लिहिलेल्या किंवा स्त्रीकेंद्रित पुस्तकांनाच या सदरात समाविष्ट करण्यात येईल. शब्दमर्यादा ५०० इतकी असून त्या पुस्तकाची किंवा ते पुस्तक का लिहावेसे वाटले, याची अगदी थोडक्यात माहिती देऊन पुस्तकामध्ये समाविष्ट न करता आलेले फक्त काही अनुभव, विचार पाठवायचे आहेत. लेखकांनी २०१२ नंतर प्रसिद्ध झालेली किंवा आगामी पुस्तकेच फक्त या सदरासाठी पाठवायची आहेत. दर पंधरा दिवसांनी हे सदर प्रसिद्ध होणार आहे. कृपया पुस्तकांबाबत कोणताही संवाद साधला जाणार नसून अंतिम निर्णय संपादकांचा राहील.
प्रकाशक वा लेखक आपली पुस्तके येथे पाठवू शकतात. –
पत्ता- चतुरंग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे,
नवी मुंबई- ४००७१०.
आमचा ई-मेल chaturang@expressindia.com